अयोध्या वारी झाली भारी पण...

Article on Shivsena Party President Uddhav Thackereys Ayodhya Visit
Article on Shivsena Party President Uddhav Thackereys Ayodhya Visit

अयोध्येतील निर्वासित रामाचे दर्शन घेऊन शिवसेनेची चतुरंगसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कर्मभूमी महाराष्ट्रात, मुंबईत परतली आहे. गेली तीन वर्षे सतत मानहानी स्वीकाराव्या लागलेल्या छोटे सरकार होऊन बसलेल्या या पक्षाला अयोध्यास्वारीमुळे कित्येक दिवसांनी सकारात्मक प्रसिद्धी खेचता आली. चलो अयोध्येचे ,चलो वाराणशीचे फलक काही महिन्यांपूर्वी जुलैत उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला मुंबईत झळकवणारे मिलिंद नार्वेकर आणि मुख्यत्वे अयोध्या अभियान एकहाती राबवणारे सामना या मुखपत्राचे संपादक खासदार संजय राउत यांना या प्रसिद्धीचे यश जाते.

महाराष्ट्राच्या राजकारणावर गेली पस्तीस-चाळीस वर्षे प्रभाव टाकणारा शिवसेना हा प्रादेशिक पक्ष काहीसा अडचणीत आहे. केंद्रस्थानी शक्‍तिशाली नेता आला की प्रादेशिक पक्षांच्या कुंडलीतील ग्रहमान काहीसे गडबडतेच. लोकप्रियतेचे चंद्रबळ डगमगू लागते. महाराष्ट्राच्या भगव्या राजकारणात मोठा भाऊ असलेल्या शिवसेनेची मोदी लाटेमुळे अशीच काहीशी गोची झाली होती. मोदीलाटेचा जोर ओसरत चालल्याची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रातील शक्‍तिशाली नेत्याची प्रभा ओसरत असेल तर प्रादेशिक पक्षांना 'अच्छे दिन' येतील या गृहितकाने माया, ममता, मुलायम यांच्यात आशावाद निर्माण झाला. मात्र, शिवसेनेची इथेही गोची आहे. ती आहे हिंदुत्वाच्या वैचारिक धाग्याची.

शिवसेना आणि भाजप परस्परांशी बांधले गेले आहेत ते विचारसरणीने. अयोध्यावारी ही शिवसेनेने केलेली कुरघोडी असेल तर ती शेवटी भाजपच्याच संदर्भात आहे. राजकीय स्पेसबद्दलचा दोहोतील वाद हा गेल्या तीन वर्षातील कळीचा मुद्दा आहे. अयोध्या वारीनेही नेमके त्यावरच शिक्‍कामोर्तब केले. त्यामुळेच शिवसेनेने आक्रमक होत विषय मांडला. संघटनेला कार्यक्रम दिला पण तरीही वेगळे काय केले हा प्रश्न आहेच.

सत्तेत चार वर्षे झाल्यानंतरही मोदी सरकारला बहुमत असतानाही मंदिर का उभारले गेले नाही हा उद्धवजींनी उपस्थित केलेला प्रश्न रास्त आहे. किंबहुना संघपरिवाराचे लाखो अनुयायी हाच प्रश्न दबक्‍या आवाजात करीत आहेत. मंदिर भव्य बनाएंगे पर तारीख नही बताएंगे ही उद्धवजींची टीका खरीच आहे. वाजपेयी सरकारकडे बहुमत नव्हते, त्यामुळे त्यांना ना लंकेला जाता आले ना अयोध्येला. प्रभूराम वनवासात जगत राहिले, रामलला तंबूच्या बाहेर आलेच नाहीत अन् बघता बघता महिने सरले, सरकार पडलेही. मोदींच्या काळाची बात निराळी आहे. बहुमत स्पष्ट आहे. उत्तरप्रदेशाने विक्रमी संख्याबळाने या सरकारला कौल दिला आहे .वाजपेयी सर्वसमावेशक होते, त्यांची हिंदुत्वाची व्याख्या सहिष्णू धर्मनिरपेक्षतेच्या चौकटीत बांधली गेली होती. मोदींचे तसे नाही. त्यांच्याकडे आक्रमक हिंदुत्वाचा 'मसीहा'' म्हणून पाहिले गेले. गुजरातचा कारभार हाकताना त्यांना हिंदुत्व झाकून ठेवण्याची गरज वाटली नाही. किंबहुना हिंदुत्वासाठी ते वेळप्रसंगी कायद्याची चौकट वाकवतील. असा विश्‍वास कार्यकर्त्यात जागवण्यात ते यशस्वी ठरले. असे असतानाही मोदींच्या कार्यकाळात भाजपने मंदिरबांधणीचा निर्णय न्यायालयाच्या कार्यकक्षेत सोडवण्यास प्राधान्य दिले.

तसेही पंतप्रधानपदासाठी मोदींच्या प्रचारात गुड गव्हर्नन्सला प्राधान्य देण्यात आले होते. अयोध्येतील राममंदिराला नव्हे. दिल्ली काबीज केल्यानंतर देशातील एकेक राज्य अमित शहांच्या निवडणूक जिंकण्याच्या कौशल्याने भाजपपूर्ण होत गेले अन् मग आक्रमकपणे मंदिराचा विषय समोर आला. भाजपविरोधकांच्या मते ढासळत चालेली लोकप्रियता सावरत हिंदुत्ववादी मते मिळवण्यासाठी हाती घेण्यात आलेले ते सत्तावापसीचे साधन आहे. संघपरिवार वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून काम करत असतो. त्यामुळे आता मंदिरासाठी धर्मजागरणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे.

हिंदुत्वाच्या हुंकारासाठी मेळावे सुरू होत आहेत. प्रश्न आहे तो शिवसेना या वातावरणात स्वत:चा कसा लाभ करून घेते हा. भाजप हो की नाही या दुविधेत असताना शिवसेनेने अयोध्येवारी करून मथळे मिळवले. माध्यमात दोन तीन दिवस सतत स्थान मिळवले, अशी जागा राज ठाकरेही मिळवत असतात. महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे ते उभे करत असलेले चित्र मनोहारी असते. पण त्यासाठी आवश्‍यक असणारे बळ नसल्याने राज ठाकरे यांना गांभीर्याने घेतले जात नाही. शिवसेनेचीही अयोध्येबाबत तेच होण्याची स्थिती आहे. मंदिर बांधण्यासाठी कायदा हातात घेण्याची शक्‍ती शिवसेनेकडे आज नाही.

संसदेत कायदा आणायचा असेल तर सेनेकडे तेवढे संख्याबळ नाही. एखादा घटकपक्ष फार प्रभावी असेल तर तो अशा तऱ्हेचा ठराव मांडून सत्ताआघाडीला आपल्या दावणीला बांधून ओढत नेऊ शकतो. शिवसेनेला अशा प्रकारचे महत्व देत त्यांच्या माध्यमातून मंदिराचे विधेयक मांडण्याएवढी प्रीती मोदी शहांच्या मनात निर्माण व्हायची आहे. भाजपला विकासही हवा आहे आणि मंदिरही. त्यामुळे ते न्यायालयाच्या निवाड्यामार्फत होणे. भाजपला सोयीचे आहे. भारताची सरासरी लोकसंख्या आज कमालीची तरुण आहे. या तरूणांना राममंदिर हा राष्ट्राच्या अस्मितेचा हुंकार आहे हे मान्य असेलही पण त्यासाठी रक्‍तपात व्हावा, खून-खराबा व्हावा, असे नव्या पिढीला वाटत नाही. आजचे वातावरण तसे नाही.

हिंदीभाषक क्षेत्रात संसदेच्या सर्वात जास्त जागा आहेत. तेथे मंदिरमुद्दा महत्वाचा असेलही पण देशात सर्वदूर मात्र युवकांच्या मागण्या वेगळ्या आहेत. त्यांना रोजगार हवा आहे. 1990 ते 92 दरम्यान असलेली परिस्थिती आज देशात नाही. रामजन्मभूमीची भावनिक आंदोलने आजच्या स्थितीत छेडणे. त्यामुळेच चाचपडून पाहण्याची गरज आहे. मग शिवसेनेने अयोध्येला जाऊन नेमके काय साधले? सहज सुचणारे उत्तर म्हणजे या निमित्ताने सेनेने संघटनेतील मरगळ झाडली. संघटनात्मक पातळीवर बांधल्या गेलेल्या पक्षांना कार्यक्रम हवा असतो. भाजपशी सतत तुलना करणाऱ्या सेनेच्या कार्यकर्त्यांना आपण हिंदुत्वाच्या प्रतिकात्मक राजकारणात काकणभर पुढे असल्याचा दिलासा या मोहिमेने दिला.

भाजपला टोमणे मारत मारत सेनेने तुम्ही मंदिर बांधा, आम्ही समवेत आहोत, असे सांगत आपण वैचारिक सहप्रवासी असल्याची कबुली दिली. बदलत्या वातावरणात भाजपला मित्रपक्षांची गरज आहे. चलो अयोध्येच्या निमित्ताने संघटना कामाला लागली असल्याने आम्हीही जिवंत आहोत याची जाणीव सेना भाजपला करून देऊ शकेल. मुंबई महापालिकेत बरोबरीत आलेल्या भाजपच्या संख्याबळाने मनातून हादरलेल्या शिवसैनिकाला या वारीने बळ दिले. ते आत्मिक आहे अन् नैष्ठिकही. आमचे हिंदुत्व तुमच्यापेक्षा आक्रमक असल्याचा भाव आज शिवसैनिकांच्या मनात जागा झाला आहे.

शिवसेना आणि भाजपला एकमेकांशिवाय पर्याय नाही, हे सत्य आहे. अयोध्यावारीने हे बंध घट्ट केल्याचा दावा धूर्त भाजप नेते करीत आहेत. शिवसेनेच्या मनात वेगळे काही असेल, रामनाम जपत स्वबळाची खुमखमी प्रत्यक्षात आणायची असेल. तर भाळी वनवास असेल. संजय राउत काहीही म्हणोत एक करेगा राममंदिर एवढाच अयोध्यावारीचा निचोड आहे. स्वबळाची परीक्षा चाखायची असेल तर अयोध्या दिल्ली नव्हेच मुंबईचे मंत्रालयही बहुत दूर असेल. 

आता अयोध्येच्या निमित्ताने सक्रीय झालेली संघटना सेनेने महाराष्ट्र दुष्काळाची पहाणी करण्यासाठी पाठवली तर त्याचे फायदे होतील. सेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे शरयूत कागदी नौका होऊन बुडाले, वाहून गेले अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ती मार्मिक आहे. प्रभावहीन ठरू बघणारे विखे अशा खुसखुशीत टिप्पणीने स्वत:साठी जागा तयार करीत आहेत. परिवार मंदिर झाले नाही, म्हणून अस्वस्थ आहे. पण तो भाजपला सोडून लगेच शिवसेनेकडे वळणार नाही.

त्वरेने मंदिर बांधायची जादू भाजपकडेच नाही, तर सेनेकडे कशी असेल? शिवाय, निवडणुकीच्या तोंडावरचे विचार वेगळे असतात. तरूण हा आजचा सर्वात मोठा मतदार. या वर्गाला त्वरेने निर्णय हवे असतात. देशातील 70 टक्‍क्‍यांहून अधिक मतदार पन्नशीच्या खालचे आहेत, असे म्हणतात. देशाची दिशा हा वर्ग ठरवेल. त्यातील तरुण नाराज आहेत. ते हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी असे अननुभवी पर्यायही स्वीकारत आहेत. ते बदल व्हावेत या आशेने. मोदी सरकारवर हा युवकवर्ग मंदिर बांधले नाही म्हणून नाराज नाही. तो नाराज आहे, तो अच्छे दिनची आश्‍वासनपूर्ती होत नसल्याने हजारो बेरोजगारांना काम मिळत नसल्याने सरकार भावनांशी खेळले. प्रभावहीन ठरले, असे या तरूण जनतेला वाटले तर त्याचा एक-दोन टक्‍के का होईना, वाटा सेनेलाही उचलावा 
लागेल. मोदी झंझावात महाराष्ट मिळालेले यश कायम ठेवणे, सेनेसमोरचे आव्हान आहे. त्यासाठी राम कामी येईल. 

रामनामाची नौका निवडणूक सागर पार करून देईल काय याचे उत्तर शिवसेनाही शोधत असेलच. जगाला तारणारा राम हिंदुत्ववादी पक्षांना आधार देईल काय ते बघायचे. हिंदी हार्टलॅण्ड या परिघात मोडणारी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड ही राज्ये मतदानाला सामोरी जात आहेत. त्या निवडणुकांपूर्वी भाजपने राम मंदिराचा मुद्दा बाहेर का काढला नसावा याचा शोध सेना घेत असेलच.

अर्थात ज्याचा-त्याचा राम ज्याला त्यालाच शोधायचा असतो. या सत्तेत राम नाही, असा साक्षात्कार शिवसेनेला या निकालानंतर होईल का काय? उत्तरासाठी काही दिवस वाट पाहणे आवश्‍यक 
आहे. रामनामाचा गजर अधिक जागा मिळवून घेण्यासाठी जपला जात असावा, ही शक्‍यताही आहेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com