जाणून घ्या यशाची पाच रहस्ये! (श्री श्री रविशंकर)

श्री श्री रविशंकर
शुक्रवार, 15 मार्च 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली! 
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

चेतना तरंग
आनंदी वातावरण - शांतता आणि समृद्धी या एकमेकांना जोडलेल्या आहेत. तुम्ही एक संघ म्हणून काम करण्याची गरज असते. संयम, चिकाटी, स्पष्ट हेतू आणि त्रुटींशी जुळवून घेण्याची लवचिकता विकासासाठी आवश्‍यक गोष्टी होय. तुम्ही तुमच्या संघ किंवा गटातील सर्व सदस्यांचा आदर करायला हवा, तसेच एकमेकांवर दोषारोप करू नका. याशिवाय, नेतृत्वाने (टीम लीडर) विश्‍वास, सहकाऱ्यांसह उत्सवी वातावरण तयार करावे. फक्त उत्पादकता आणि अंतिम परिणामावरच लक्ष केंद्रित केल्यास यांपैकी काहीच टिकणार नाही. केवळ प्रेरणा हेच परिणामकारक साधन आहे. त्यामुळे, भूतकाळापासून शिका, भविष्यावर दृष्टी ठेवा आणि उत्साह टिकवा.

कृतिशील कौशल्य - भगवद्‌गीतेचे पूर्ण सार म्हणजे कर्माच्या फळाची अपेक्षा न करता निष्पक्ष भावनेने कर्म करत राहणे. तुम्ही युद्धासारख्या सर्वांत वाईट परिस्थितीतही मानसिक संतुलन टिकवून ठेवले, तर कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकता. कृतीमधील कौशल्यालाच योग म्हणतात. एखाद्याचा उद्धटपणा विनम्रता, अवलंबनाच्या ओझ्यापासून परस्परावलंबित्वापर्यंतचा प्रवास योगसाधनेमुळे शक्‍य आहे. एखादी कृती करताना केवळ शेवटच्या परिणामावरच लक्ष केंद्रित केल्यास तुमच्या सादरीकरणावर परिणाम होईल. फक्त स्वतःप्रति १०० टक्के प्रामाणिकपणा आणि बांधीलकी ठेवा. 

सिंह व्हा - तुम्ही तीव्र इच्छेने स्वप्न पाहा मात्र, अशांती नसावी. त्यामुळे, तुमच्या मनातील स्पष्टता जाऊन योग्य कल्पना सुचणार नाहीत. तुम्ही विपुलतेची हाव न धरल्यासच ती तुमच्याकडे येईल. संस्कृतमध्ये असे म्हणतात की, सिंहासारखे धैर्य असणाऱ्याकडे आणि पूर्णपणे प्रयत्न करणाऱ्याकडेच भरपूर संपत्ती येते. त्यामुळे, सिंहासारखे रुबाबदार, आत्मविश्‍वासू बना. 

नशिबाचा अणू - तुम्हाला वाटेल की, वरील सर्व गोष्टी असतानाही अनेकांची प्रगती का होत नाही? हा आपल्याला माहीत नसलेला भाग अध्यात्माशी संबंधित आहे. हे संपूर्ण भौतिक जग आपल्याला अभावानेच दिसणाऱ्या विशिष्ट लहरींद्वारे नियंत्रित केले जाते. अध्यात्म बुद्धिमत्तेबरोबरच अंतर्ज्ञानही देते. तुम्ही तुमची तीव्र इच्छा आणि विरक्तीचे संतुलन साधता, तेव्हा अंतर्ज्ञान प्राप्त होते. योग्य वेळी योग्य विचार म्हणजेच अंतर्ज्ञान होय. 

ध्यान - तुमच्या जबाबदाऱ्या आणि महत्त्वाकांक्षा अधिक असल्यास त्या प्रमाणात तुम्हाला ध्यानाची गरज भासेल. प्राचीन काळात ध्यान स्वतःला शोधण्याचा मार्ग होता, मात्र आज ताणतणावांवरचा तो प्रभावी उपाय बनला आहे. ध्यान तुमचे केवळ ताणतणावच दूर करत नाही, तर तुमची कार्यक्षमताही वाढवते. तुम्ही तुमचा कामाचा भार कमी करू शकत नाही, मात्र, ऊर्जेची पातळी निश्‍चित वाढवू शकता. ध्यान आणि श्‍वसनाच्या तंत्रातून हे साध्य होते.

Web Title: article shri shri ravi shankar all is well sakal pune today