इंग्लंडमधील अभ्यासक्रमांचे वास्तव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक
गेले काही दिवस आपण परदेशी शिक्षणासंदर्भातील विविध टप्प्यांवरचे फायदे तोटे समजून घेत आहोत. आज खास करून पदव्युत्तर या नावाने काढलेल्या इंग्लंडमधल्या काही अभ्यासक्रमांविषयी (कोर्स) वास्तव पाहणार आहोत. पदवीच्या शेवटच्या वर्षांत पुढे काय शिकायचे व तेही परदेशात आणि स्वस्त अन्‌ मस्त याच्या शोधात रात्री दहा ते डोळे मिटेपर्यंत सारेच विद्यार्थी इंटरनेटवर ‘रिसर्च’ करत असतात, म्हणजे भिरभिरत असतात. त्या साऱ्यांना हे कोर्स प्रचंड आकर्षित करतात. त्याचवेळी वर्षात दोनदा तरी या साऱ्या कोर्सेसचे मार्केटिंग करण्यासाठी तिकडून अनेक टिम्स येऊन त्यांचे एक्‍झिबिशन लावतात. तेही फक्त फाईव्ह स्टार हॉटेलच्या एसी लॉबीत. गेले दशकभर तरी हा सोहळा अविरतपणे सुरू आहे. भारतातील एकही मोठे शहर याला अपवाद नाही. मास्टर्ससाठी, एमबीएसाठी किमान दोन वर्षे शिकायचे असते हा भारतातील नव्हे तर साऱ्याच चांगल्या विद्यापीठांचा प्रघात मोडीत काढून फक्त एकाच वर्षात हे सारे देणारे अनेक कोर्सेस अक्षरशः भूल पाडतात. आधी इंटरनेटचे रिसर्च व त्यानंतर एसी स्टॉलवरची चकचकीत पोस्टर्स पाहून प्रवेश घेणारे, शिकायचा हट्ट धरणारे अक्षरशः असंख्य आहेत.

अत्यंत मान्यवर लेखक, आंतरराष्ट्रीय वावर असलेले तज्ज्ञ संदीप वासलेकर यांच्याच एका लेखातील वाक्‍य सांगायचे तर, असे कोर्स म्हणजे फक्त पदवीदरम्यान न केलेले वाचन कसे करायचे ते शिकणे. 

आता खरी गंमत कोर्स संपल्यावर सुरू होते. सध्याच्या नियमांनुसार इंग्लडमध्ये राहणे जवळपास अशक्‍य. नोकरीसाठी किमान पगार हवा वर्षाला ३८ हजार पौंड. आणि भारतात परतल्यावर त्या पदवीचा पदवीधर हवा असलेली कंपनी, इंडस्ट्री सापडता सापडत नाही. सापडलीच तर दिला जाणारा पगार ऐकवत नाही. करिअर शब्द तर सोडाच, पण त्यासाठी घातलेल्या पैशात अख्ख्या कुटुंबाची जगाची सफर नक्की होऊ शकते इतकी ती रक्कम मोठी असते. 

‘चमकते ते सारे सोने नसते,’ हे वाक्‍य इथे शब्दशः लागू होते. मात्र, याउलट इंग्लंडमध्ये संगीत, कायदा, वृत्तपत्रकारिता, गणित, कम्युनिकेशनसाठी जाणे यातून उत्तम करिअरचा पाया घातला जातो यात शंका नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Shriram Git edu supplement sakal pune today