#MokaleVha अनुकरण

Family
Family

जादा तासाला इयत्ता दुसरीच्या वर्गात गेलेल्या बाईंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या मनात नेमके काय सुरू आहे, हे गप्पांच्या ओघात जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी एक साधा व सोपा प्रश्‍न विचारला, ‘तुमच्या आई-बाबांची एक आवडणारी गोष्ट सांगायची व एक न आवडणारी गोष्ट सांगायची.’

वर्गातील हसतमुख असणारे चिमुकले एकदम शांत झाले. एक मिनिट देऊन बाई म्हणाल्या, ‘कोणाकडून सुरुवात करायची? डाव्या बाजूने, की उजव्या?’ तरीदेखील मुले विचारातच गुंतलेली. शेवटी बाईंनी उजव्या बाजूकडील रियापासून सुरुवात केली. अतिशयोक्ती वाटेल, मात्र वर्गातील ४० विद्यार्थ्यांपैकी एकाही विद्यार्थ्याला आई-बाबांच्या आवडणाऱ्या गोष्टीबद्दल भरभरून बोलता आले नाही. निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ‘आई आवडीची भाजी डब्याला देते,’ ही गोष्ट आवडते किंवा या आशयाची अनेक उदाहरणे दिली. मात्र, आवडणारी गोष्ट याविषयी त्यांना ठामपणे सांगता आले नाही. याच मुलांनी न आवडणाऱ्या गोष्टींची मात्र लांबलचक यादी द्यायला सुरुवात केली. त्यामध्ये प्रामुख्याने, आम्ही घरी जातो तेव्हा आई-बाबा घरी नसतात. घरी आल्यावर आई व बाबा दोघेही आपापले मोबाईल फोन घेऊन बसतात. आमच्याशी खेळत नाहीत किंवा बोलत नाहीत. एकमेकांशी सतत भांडत असतात. अनेक तक्रारी किंवा आपल्या आई-बाबांच्या नावडत्या गोष्टी ऐकताना आज सहजच मनामध्ये ‘अभिमन्यू’ डोकावून गेला. 

आज प्रत्येक मूल एकलकोंडे होत आहे. कारण, एकतर विभक्त कुटुंबपद्धती. एक अथवा दोन मुले, फ्लॅटसंस्कृती या साऱ्याने मुलांच्या भावनांची कुचंबणा होते. साहजिकच आई-वडिलांचे अनुकरण करत मूल एकतर टीव्हीसमोर किंवा व्हिडिओ गेम अथवा मोबाईल गेम्समध्ये गुंतलेले दिसते. या ‘सोशल मीडिया’च्या चक्रव्यूहमध्ये घुसण्याचे धडे पालक म्हणून आपण आपल्या पाल्यांना देत आहोत. मात्र, यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपणासच माहीत नाही. त्यामुळे आपण आपल्या पाल्यांना माहिती करून देऊ शकतो.

भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्याला शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मातीच्या गोळ्याची उपमा दिली आहे. त्याला घडवू तसा घडेल, या अर्थाने आज तुमचे मूल तुमचेच ‘अनुकरण’ करीत आहे व स्वतःला या आभासी चक्रव्यूहामध्ये अडकवत आहे. तेव्हा पालकहो, वेळीच जागे व्हा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com