आरोग्याचे पाच मार्ग

श्री श्री रविशंकर
शनिवार, 16 मार्च 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली! 
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

चेतना तरंग
१) स्वत:बद्दल माहिती घ्या - स्वतःच्या अस्तित्वाविषयी आपल्याला फार थोडे माहीत असते. त्यात शरीर, श्‍वास, मन, स्मरणशक्ती, अहंकार आदी गोष्टींचा समावेश होतो. त्यामुळे एखाद्याला वर्तमानात जगणे आणि आयुष्याचा सामना करणे शक्‍य होते. वर्षातून एकदा सुट्टी घ्या. या काळात निसर्गाशी जोडले जा. सूर्योदयाबरोबर उठा, योगसाधना करा, पौष्टिक आहार घ्या तसेच गायन-वादनासारख्या तुमच्या आवडत्या सृजनशील गोष्टींसाठी वेळ द्या. 

२) ध्यानाला आयुष्याचा भाग बनवा - ध्यान शरीर व मनाला खोलवर विश्रांती देते. त्यामुळे सर्व दैनंदिन कृतीतील गतिशीलता, ऊर्जा वाढते. ध्यान ही सर्वांगीण आरोग्याची गुरुकिल्लीच होय. संकोच, अपेक्षारहित वर्तमानात जगणारे मन हेच ध्यान आहे.
 
३) श्‍वासाबद्दलची जागरूकता - आपण आयुष्यभर श्‍वास घेतो, मात्र शाळा किंवा घरीही आपल्याला श्‍वासोच्छ्वासाचे महत्त्व कधीच सांगितले जात नाही. आपण श्‍वासाची शक्ती समजू शकल्यास विचार व भावनांचे नियंत्रण प्रभावीरीत्या करू शकू.

४) योग्य आहार - आपण आरोग्यदायी शरीर आणि विचार, भावना, कृतीच्या नियंत्रणासाठी आपल्या आहारावर लक्ष ठेवले पाहिजे. ‘जसे अन्न, तसे मन,’ असे म्हटले जाते. आपल्या आहाराचा शरीर आणि मनावर निश्‍चितच परिणाम होतो. ताज्या अन्नासह फळे आणि काही भाज्यांमध्ये अधिक ऊर्जा असते. याउलट, गोठवलेल्या आणि कॅनमध्ये बंदिस्त केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये ती कमी असते. ताज्या, पौष्टिक आहारामुळे शरीर व मनाचे योग्य पोषण होते. ऊर्जा, उत्साह वाढतो. सहनशक्ती आणि आयुष्याचा कालावधीही वाढतो.
 
५) स्वत:साठी वेळ काढा - प्रत्येक दिवशी आपण माहिती गोळा करण्यात गुंतलेलो आहोत. आपण स्वतःला वेळच देत नाही. त्यामुळे आपण सुस्त आणि थकलेले दिसतो. काही क्षण खरोखरच सृजनशील असतात. ते अनुभवायला हवेत. शांतता शरीर व मनाची हानी भरून काढून ते पुनरुज्जीवित करते. त्यामुळे तुमच्या अंतहृदयात शिरा, डोळे बंद करा आणि उर्वरित सर्व जगाला एखाद्या फुटबॉल सारखी किक मारा!

Web Title: article Sri Sri Ravi Shankar all well sakal pune today