नकारात्मकता दूर सारण्यासाठी...

नकारात्मकता दूर सारण्यासाठी...

चेतना तरंग
सध्या जगभरात नैराश्‍य ही मोठीच समस्या झाली आहे. विविध कारणांमुळे नैराश्‍याचे प्रमाण वाढत आहे. तुम्हाला कोणत्याही कारणाने निराश वाटते, तेव्हा तुम्ही स्वतःभोवती नैराश्‍याचे कणच निर्माण करत असता. अशा वेळी एखादी दुसरी व्यक्ती या ठिकाणातून जाते, तेव्हा त्या व्यक्तीने ते ठिकाण सोडले तरी तिला कोणत्याही कारणाशिवाय निराश वाटण्यास सुरवात होते. तुम्ही याचा कधी अनुभव घेतला आहे काय? तुम्ही एखाद्या खोलीत प्रवेश करता आणि अचानक संतापाच्या लहरी अनुभवता. अगदी काही मिनिटांपूर्वीच तुम्ही व्यवस्थित असता, पण त्या खोलीत प्रवेश करता त्यावेळी सर्व राग, ताण तुमचा कब्जा घेतो.

आज पर्यावरणाबद्दल सर्वत्र मोठ्या प्रमाणावर चर्चा केली जाते आहे. आपण हवेचे व जलप्रदूषण करतोय, त्याचप्रमाणे आपण भावनांचे सूक्ष्म पर्यावरण किंवा वातावरणही प्रदूषित करतोय. मनुष्य याच पर्यावरणाचा बळी ठरतोय. तुम्हाला ताण जाणवणे व नकारात्मकता निर्माण होणेही काही वेळा अटळच. कुणाचीही ही इच्छा नसते, मात्र हे घडते. मग तुम्ही हे कसे हाताळाल? आपण आयुष्यात अनेक गोष्टी ऐकतो, मात्र, स्वत:ला ऐकण्यात फार कमी वेळ घालवतो. त्यामुळेच, आपण आपल्या पर्यावरणाबरोबरच, आपले मन, भावना आणि आयुष्याची अतिशय मूलभूत तत्त्वेही गमावतो. खरेतर, आपल्या शरीराची नकारात्मक भावनांच्या तुलनेत आनंद आणि शांततेची कंपने टिकवून ठेवण्याची क्षमता खूपच अधिक असते. एखाद्या अणूच्या रचनेसारखेच हे आहे. अणूच्या केंद्रस्थानी प्रोटॉन्स आणि न्यूरॉन्स असतात आणि इलेक्‍ट्रॉन्स परिघावर फिरतात. आपल्या आयुष्यालाही हेच तत्त्व लागू पडते. आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू आनंदच आहे. मात्र, तो इलेक्‍ट्रॉनप्रमाणे नकारात्मक कणांनी वेढला गेलाय. आपण श्‍वासाच्या मदतीने थोड्या काळात नकारात्मक भावनांपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकतो. श्‍वसनाचे विशिष्ट प्रकार आणि ध्यानाच्या माध्यमातून तुम्ही नकारात्मकतेला दूर सारू शकता. तुम्हाला निराश होण्यासारखे तरी काय आहे? तुम्ही या पृथ्वीतलावर केवळ काही वर्षांसाठी आले आहात. तुम्ही पृथ्वीवर आहात, तोपर्यंत आनंदी राहू शकता. आयुष्य खूप काही घेऊन तुमच्या पुढ्यात उभे आहे. तुमचा आत्मा तुमच्याच हास्याचा भुकेला आहे. तुम्ही त्याला ते दिले तर तो पूर्ण वर्षभर ऊर्जावान राहील आणि तुमचे हास्यही कोणी हिरावून शकणार नाही. तुम्ही स्वतःमध्ये खोलवर डोकावण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी काही वेळ काढा. स्वत:च्या मनामधील सर्व प्रकारचे चुकीचे ग्रह दूर करा. त्यानंतर, आपण आपल्या अस्तित्वाच्या अगदी आतील दैवी गाभ्याचा अनुभव घेऊ शकू. या भावनेच्या आधारावरच आपण मानवी जीवन समृद्ध करू शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com