तर्कशुद्ध मनाच्या पलीकडे... (श्री श्री रविशंकर)

श्री श्री रविशंकर
गुरुवार, 9 मे 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "ऑल इज वेल" पुरवणीत...

चेतना तरंग
तुम्ही सहसा उद्देशपूर्ण, उपयुक्त आणि तर्कशुद्ध असेल तेच करता. तुम्ही पाहत असलेले सर्वकाही तर्कशुद्ध मनाने पाहत असता. एखादा शोध, नवीन ज्ञान, अंतर्ज्ञान हे सर्व तर्कशुद्ध मनाच्या पलीकडे आहे. सत्य हे कारणापलीकडे आहे. तर्कसंगत मन हे दोन्ही रुळामध्ये असलेल्या रेल्वेमार्गासारखे आहे. सत्याला कोणत्याही रुळांची किंवा मार्गाची गरज पडत नाही. सत्य एखाद्या फुग्याप्रमाणे कुठेही तरंगू शकते. समाजाविरुद्ध बंड करण्यासाठी काही लोक तर्कवादी मनातून बाहेर पडतात. त्यांना सामाजिक कायदे तोडण्याची इच्छा असते. रागातून निर्माण झालेला अहंकार, द्वेष, बंडखोरपणा आणि लक्ष वेधून घेण्याचा यामागे उद्देश असतो. पण बरेचदा त्यामागे अहंकार, राग, द्वेष, बंडखोरपणा आणि लक्ष वेधून घेणे ही कारणे असतात. मात्र, हे करणे म्हणजे तर्कसंगत मनातून बाहेर पडणे नाही. (जरी त्यांना असे वाटत असले तरीही.) आपण उद्देशाशिवाय काहीतरी करतो तेव्हा तर्कसंगत मनातून बाहेर पडतो. कोणताही उद्देश नसल्यास प्रत्येक कार्य एक खेळ बनते. आयुष्य तरल बनते.

आपण फक्त तर्कसंगत कृतीशी अडकल्यास जीवन एक ओझे होईल. पण आपण विजय-पराभवाचा विचार न करता खेळतोच. त्याचप्रमाणे विनाउद्देश काहीतरी केले, केवळ अकारण कृती केल्यास ते एक स्वातंत्र्य आहे. उदाहरणार्थ नृत्य करणे. तुम्ही फक्त तर्कसंगत मनातून फक्त बाहेर पडा आणि तुम्हाला एक महान स्वातंत्र्य, अतुलनीय खोली मिळेल. सत्य तुमच्यासमोर येईल. खरे तर वास्तविकता तर्कशास्त्र आणि तर्कशुद्ध मनाच्या पलीकडे आहे. तुम्ही तर्कशुद्ध मनाच्या पलीकडे जात नाही, तोवर तुम्हाला सर्जनशीलता आणि अनंताचा अनुभव होणार नाही. परंतु लक्षात ठेवा, तुम्ही स्वातंत्र्य मिळविण्याकरिता तर्कहीन कृत्य केल्यास त्याचा अर्थ आपल्याकडे आधीपासूनच एक उद्देश आहे. ते अकारण नाही. तर्कसंगत मनाचा अडथळा दूर करा आणि स्वतःसाठी स्वातंत्र्य मिळवा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article sri sri ravishankar all is well sakal pune today