औदार्य आणि वासना (श्री श्री रविशंकर )

औदार्य आणि वासना (श्री श्री रविशंकर )

चेतना तरंग
तुम्हाला तुमचे आयुष्य विकसित होत नसून ते इच्छा, अपेक्षा, अनुत्साहामुळे दबले गेले आहे असे वाटते, तेव्हा तुम्ही काय करता? अगदी या क्षणापासून निःस्वार्थी, उदारतेची, मनापासून प्रेमाची भावना वाटू देण्यास सुरवात करा. उद्यापासून नव्हे, तर याच क्षणापासून. औदार्य हा आत्म्याचा गुण आहे. हा गुण राजपुत्राकडेच असायला हवा, असे नव्हे. अगदी गरिबांतील गरीब व्यक्तीच्या मनातही ही भावना असू शकते. तुम्हाला ही भावना जाणवेल, तेव्हा तुमचे आयुष्य विपुल होऊन जाईल. ते दया आणि प्रेमाने भरेल. औदार्य किंवा दयाळूपणा बाह्य परिस्थितीपासून मुक्त असतो. तुमच्यामध्ये इतर कुणीही ही जाणीव निर्माण करू शकत नाही. आपण स्वत:हून करतो, अशी काहीतरी गोष्ट म्हणजे औदार्य होय. ती एक प्रकारची जाणिवेचीच अवस्था असते. औदार्य म्हणजे कृती नव्हे.

कृतीमध्ये औदार्याचे आविष्कार दिसतात. या पृथ्वीतलावर आपण केवळ देण्यासाठी आलो आहोत हे तुम्ही ओळखता; तेव्हा आपण खूप उदार आहोत, असे वाटण्यास सुरवात होते. अनेकांच्या त्रासामागील अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे वासना होय. वासना मनाचा ताबा घेते आणि शरीर थकवते. बुद्धीलाही मंदपणा आणते. वासना म्हणजे जडत्व. ती मनसोक्त आनंदानंतरही जडत्व आणते आणि दबली गेल्यास राग निर्माण करते. वासना म्हणजे दुसरेतिसरे काही नसून प्रामुख्याने अनावश्‍यक ऊर्जा होय. तिचा व्यवस्थित वापर केल्यास ती उत्साह प्रदान करते. प्रेमाबरोबर बुद्धीलाही नवीन झळाळी देऊन ती तीक्ष्ण बनवते. वासनेचे रूपांतर प्रेमात करण्याचा औदार्य हा एक मार्ग होय. औदार्य ही कृतज्ञतेसारखी भावना नाही. कृतज्ञतेमध्ये नेहमीच स्वत:ची काळजी असते. तुम्ही कृतज्ञ राहता, कारण तुम्हाला काहीतरी मिळालेले असते. अगदी विरक्तीतही तुम्ही औदार्याची भावना अनुभवू शकता. औदार्याशिवायची विरक्ती तुम्हाला स्वकेंद्रित बनवू शकते आणि कोरडेपणाला निमंत्रण देते. आपण भूतकाळात काय केले आहे, याबद्दल विचार करू नका, केवळ औदार्याचा अनुभव घ्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com