प्रेमाचा खरा अर्थ...

श्री श्री रविशंकर
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

चेतना तरंग - श्री श्री रविशंकर,प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
तुम्ही खूपच प्रेम असेल तेव्हा कोणत्याही गैरसमजाची पूर्ण जबाबदारी घेता. कदाचित तुम्ही क्षणभर वरवरची नाराजी व्यक्त कराल. पण तुम्हाला हृदयातून तसे वाटत नसते तेव्हा तुमच्यात पूर्ण समज आलेली असते. तुम्ही अशा स्थितीला याल जिथे तुमचे सगळे प्रश्‍न आणि मतभेद गळून पडतात आणि तिच्यातून फक्त प्रेम झळकेल. बहुतेक वेळा आपण आपल्या मतभेदात अडकून बसतो कारण आपण स्वतःचेच अवलोकन करू शकत नाही. प्रेमाच्या नावाखाली आपण दुसऱ्या माणसाशी ताळमेळ जुळवण्याचा व काहीही करून दुसऱ्यांवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो. आपण प्रेम करतो ते परिपूर्ण आणि दोषरहित असावे, असे वाटणे अगदी नैसर्गिक आहे.

टेकडीच्या वरून तुम्हाला जमिनीवरचे खड्डे दिसत नाहीत. विमानातून जमीन किती गुळगुळीत दिसते. त्याचप्रमाणे चेतनेच्या उच्च स्तरावरून तुम्हाला दुसऱ्याचे दोष दिसत नाहीत. मात्र तुम्ही जमिनीवर आलात की तुम्हाला नेहमी खड्डे दिसतात. तुम्हाला खड्डे भरायचे असतात तेव्हा तुम्हाला ते पहावे लागतात. तुम्ही हवेत राहून घर बांधू शकत नाही.

जमिनीतील खड्डे बघितल्याशिवाय, ते भरल्याशिवाय व दगडधोंडे हलविल्याशिवाय तुम्ही ती नांगरू शकत नाही. त्यामुळे तुम्ही कुणावर प्रेम करता तेव्हा तुम्हाला त्यांच्यातील सगळे दोष दिसतील पण दोष दाखवले की प्रेम नाश पावते. खड्डे भरण्याऐवजी आपण त्यांच्यापासून दूर पळतो. तुम्ही एखाद्यावर प्रेम करता, तेव्हा त्यांच्यातील दोष न बघता त्यांच्यासोबत राहणे आणि त्यांना दोषमुक्त व्हायला मदत करणे हेच चातुर्य आहे. तुम्ही कुणावर तरी प्रेम का करता? त्यांच्यातील गुणांमुळे? आत्मीयता किंवा जवळिकीच्या भावनेमुळे? तुम्ही एखाद्यावर त्यांच्या गुणांमुळे आत्मीयता न वाटू देताही प्रेम करू शकता. अशा प्रकारच्या प्रेमामुळे स्पर्धा आणि ईर्षा वृद्धिंगत होते.

आत्मीयतेच्या भावनेतून प्रेम उत्पन्न होते, तेव्हा असे होत नाही. तुम्ही एखाद्याच्या गुणांमुळे त्यांच्यावर प्रेम करत असाल तर त्याच्या गुणात फरक पडतो किंवा तुम्हाला त्या गुणांची सवय होते तेव्हा प्रेमही बदलते. परंतु तुम्ही एखाद्यावर ते तुमचे आप्त आहेत म्हणून आत्मीयतेच्या भावनेतून प्रेम करत असाल, तर ते प्रेम जन्मभर टिकेल. लोक म्हणतात, ‘‘मी देवावर प्रेम करतो, कारण तो महान आहे.’’ 

यात काही मोठी विशेष गोष्ट नाही. देव सर्वसामान्य, आपल्यापैकीच एक आहे असे कळले तर तुमचे देवाबद्दलचे प्रेम एकदम कमी होईल. 

देव तुम्हाला ‘आपला’ वाटतो म्हणून तुम्ही त्याच्यावर प्रेम करत असाल तर तो कसाही असो, तो उत्पत्ती करो किंवा विनाश तुम्ही तरीही त्याच्यावर प्रेम कराल. आत्मीयतेतून प्रेम करणे हे स्वतःवर प्रेम करण्यासारखे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Sri Sri Ravishankar all is well sakal pune today