श्रद्धा आणि विश्‍वास

Trust
Trust

चेतना तरंग - श्री श्री रविशंकर,प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
सर्व श्रद्धा एकमेकांशी संबंधित आहेत. प्रत्येक श्रद्धा बलवान होण्यासाठी तुमची स्वतःवर, जगावर, ईश्‍वरावरही श्रद्धा हवी. तुम्ही एखाद्या श्रद्धेबद्दलही शंका घेतलीत, तर तुम्हाला या सर्व श्रद्धांचाच संशय येऊ लागेल. नास्तिकांना स्वतःविषयी आणि जगाविषयी श्रद्धा असते, पण परमेश्‍वरावर नसते. परमेश्‍वरावर, जगावर आणि स्वतः वर श्रद्धा नसल्यास भय वाटते. श्रद्धा तुम्हाला पूर्ण धैर्यवान बनविते.

प्रश्न - श्रद्धा आणि विश्‍वास यात काय फरक आहे?
गुरुदेव -
 श्रद्धा ही सुरुवात आहे आणि विश्वास हे त्याचे फळ. श्रद्धा आणि विश्वास यात फरक आहे. विश्वास डळमळीत असतो, श्रद्धा पक्की असते. विश्वास बदलू शकतो, श्रद्धा पक्की असते. स्वतः विषयीच्या श्रद्धेमुळे मुक्ती मिळते, जगावरील श्रद्धेने मनःशांती आणि परमेश्वरावरील श्रद्धा तुमच्यात प्रेम निर्माण करते. परमेश्वरावरील श्रद्धेशिवाय जगावरील श्रद्धा तुम्हाला पूर्ण शांती देणार नाही. पण तुमच्यात प्रेम असेल तर साहजिक तुम्हाला शांती आणि मुक्ती मिळेल. कमालीच्या अस्वस्थ लोकांनी केवळ परमेश्वरावर श्रद्धा ठेवावी. तुमची पूर्ण श्रद्धा असेल, तर प्रश्नच उद्‍भवत नाहीत.

प्रश्न - आम्ही पूर्ण श्रद्धेने तुम्हाला प्रश्न विचारतो, त्याचे काय?
गुरुदेव -
 तुमची ईश्वरावर श्रद्धा आहे, तुम्ही जाणता की कोणीतरी तुमची काळजी घेत आहे, तर मग प्रश्न विचारण्याची गरजच काय? तुम्ही बंगळूरला जाण्यासाठी ‘कर्नाटक एक्स्प्रेस’मध्ये बसला आहात, तर प्रत्येक स्टेशनवर ‘ही गाडी कुठे चालली आहे?’ असे विचारण्याची गरज आहे का? तुमच्या इच्छा पुरविण्यासाठी कोणी तरी आहे, तर मग ज्योतिषाकडे तरी कशासाठी जायचे?

तुमची कशावरही श्रद्धा असू दे, तिला जाणून घेण्याची वस्तू बनवू नका. तुमची श्रद्धा आहे ते जाणून घेण्याची गरज नाही. तुमची देवावर श्रद्धा असेल तर देवाला जाणून घेण्याचा प्रयत्न करू नका. देव आणि स्वत्व या जाणून घेण्याच्या गोष्टी नाहीत. तुम्ही जाणून घेण्याच्या वस्तू केल्या आहेत, त्यांच्यावर तुमची श्रद्धा असू शकत नाही. मुलाची आईवर श्रद्धा असते. मूल आईला जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. त्याची आईवर फक्त श्रद्धा असते. प्रेम ही जाणून घेण्याची वस्तू होऊ शकत नाही. तुम्ही तसे करण्याचा प्रयत्न केला, तर प्रेम नाहीसे होईल.

तुमची श्रद्धा आहे, त्याला जाणून घेण्याची वस्तू बनविल्याने, जाणून घेण्याची उत्सुकता श्रद्धेत अडथळा आणते. बहुतेक वेळा लोक एकमेकांच्या प्रेमात पडतात तेव्हा ते उत्सुकता सोडून देऊ शकत नाहीत. उत्सुकता हळूहळू श्रद्धा आणि प्रेम यांना संपवून टाकते. श्रद्धेचे विश्लेषण करता येत नाही. ज्ञान विश्लेषणात्मक आहे. देव, प्रेम, गुरू, निद्रा, आणि स्व हे समजून घेण्याच्या पलीकडचे आहेत. तुम्ही विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही गोंधळूनच जाल. तुम्ही कशाला तरी जाणून घेण्याची वस्तू बनवता त्या क्षणी विश्लेषण सुरू होते. श्रद्धेशिवाय चेतना असू शकत नाही. ती मेणबत्तीच्या ज्योतीप्रमाणे आहे. श्रद्धा ही चेतनेचा शिथिल आणि स्थिर गुण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com