श्‍वास जाणून घ्या; जीवन समजेल (श्री श्री रविशंकर)

श्री श्री रविशंकर
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली! 
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

आपल्या श्‍वासात अनेक गुपिते दडलेली आहेत. मनातील प्रत्येक भावनेबरोबर श्‍वासाची विशिष्ट लय तयार होते. प्रत्येक लयीचा शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर परिणाम होतो. हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला श्‍वासाचे निरीक्षण करावे लागेल. उदाहरणार्थ, आपण आनंदी असतो तेव्हा फुलून जातो आणि दु:खी असल्यावर आक्रसल्यासारखे वाटते. आपल्याला आनंद आणि दुःख या भावना, शरीरात होणाऱ्या संवेदनाही जाणवतात. मात्र त्या दोन्हीचा संबंध लक्षात येत नाही. फुलून येते ते काय आहे, हे जाणणे म्हणजे ज्ञान आहे. हे ज्ञान, ही जिज्ञासा म्हणजेच चैतन्याचा, जीवनाचा, प्राणाचा, आयुर्वेदाचा अभ्यास होय. तुम्ही एका मिनिटात किती वेळा श्‍वास घेता, हे मोजले आहे का? श्‍वास घेणे ही जीवनातील सर्वांत पहिली क्रिया असते आणि श्‍वास सोडणे ही शेवटची. या मधल्या आयुष्यभरात आपण श्‍वास घेत आणि सोडत असतो, मात्र त्याकडे कधी लक्ष देत नाही. 

शरीरातील 90 टक्के अनावश्‍यक गोष्टी आपण श्‍वासाद्वारे बाहेर टाकत असतो. दिवसभरात 24 तास श्‍वास घेत असलो, तरी फुफ्फुसाच्या क्षमतेच्या फक्‍त 30 टक्के एवढाच तो घेत असतो. आपण पुरेसा श्‍वास घेतच नाही. आपले मन एखाद्या पतंगासारखे असते आणि श्‍वास म्हणजे त्याचा मांजा. तुम्ही श्‍वासाकडे लक्ष दिल्यास तुम्हाला फारशी औषधे घ्यावी लागणार नाहीत. एका मिनिटात आपण साधारणपणे सोळा ते सतरा वेळा श्‍वास घेतो. तुम्ही अस्वस्थ असल्यास तो वीसपर्यंत वर जाऊ शकतो, तणावाखाली किंवा

रागावलेले असल्यास मिनिटाला पंचवीसपर्यंत श्‍वास घेतले जाऊ शकतात. शांत आणि आनंदी असाल तर दहा, आणि ध्यानात असल्यास दोन ते तीन श्‍वास दर मिनिटाला घेतले जातात. गहिऱ्या ध्यानाने दर मिनिटाला घेतलेल्या श्‍वासाचा आकडा कमी करता येतो. एखाद्या लहान बाळाचे निरीक्षण केल्यास ते किती शांतपणे श्‍वास घेत असते हे बघून आश्‍चर्य वाटेल. ते शरीराच्या तिन्ही भागांतून श्‍वास घेत असते. ते श्‍वास घेऊ लागते तसे त्याचे पोट बाहेर येते आणि श्‍वास सोडू लागते तसे पोट आत जाते. तुम्ही तणावाखाली किंवा अस्वस्थ असल्यास बरोबर उलट क्रिया होते. श्‍वास सोडताना पोट बाहेर येते आणि घेताना पोट आत जाते. तुमचे मन तल्लख असल्यास या गोष्टी शिकण्यासाठी शाळेत जायला नको किंवा त्या कुणाकडून शिकायलाही नकोत.

योगासने अशी गोष्ट आहे, की लहान बाळ असताना प्रत्येकाने केली आहे. एखाद्या सहा महिन्यांच्या बाळाला पाय वर करून पडलेले तुम्ही पाहिले असेल. ते पायाने लाथा मारते आणि डोके ही वर उचलते. अगदी तसेच जसे तुम्ही पोटाचे व्यायाम करताना करता. मग ते पोटावर पालथे पडून भुजंगासन करते. झोपलेल्या बाळाला पाहिल्यास त्याचे पहिले बोट व अंगठा चिन्‌ (चेतना) मुद्रेप्रमाणे किंचित जुळवलेले असते. या गोष्टींमुळेच श्‍वास, मन आणि आत्मा यांचे संतुलन टिकून राहाते. आयुर्वेदाचा दृष्टिकोन सर्वंकष असा आहे.

शरीरातील अनेक बिंदू निरनिराळ्या संवेदनांशी निगडित आहेत. हे सर्व अशा एका गोष्टीचे प्रतिबिंब आहेत, की जी सर्वांच्या पलीकडे आहे. ती गोष्ट कोणती आहे? तीच जीवनाचा स्रोत आहे. स्वास्थ्य म्हणजे आजारविरहित शरीर, कंपविरहित श्‍वास, पूर्वग्रहविरहित बुद्धिमत्ता, मोहविरहित चित्त आणि सर्वसमावेशक, आत्म्यालाही सामावून घेणारा दु:खी नसलेला अहंकार. असे स्वास्थ्य मिळवण्याचा मार्ग म्हणजे ध्यान, प्राणायाम, योग तसेच "आर्ट ऑफ लिव्हिंग' शिबिरातील "सुदर्शन क्रिया' ही एकमेवाद्वितीय अशी श्‍वसन प्रक्रिया...

Web Title: Article by Sri Sri Ravishankar in All is well supplement of Sakal Pune Today