भावनांवर मात (श्री श्री रविशंकर)

भावनांवर मात (श्री श्री रविशंकर)

चेतना तरंग
आपल्या भावनांना कसे हाताळायचे, ही मोठीच समस्या आहे! आपण शरीराने वाढतो, मात्र बरेचदा भावनिक दृष्टीने मोठे होत नाही. भावनिक परिपक्वतेचा अभाव नेहमी तुमच्या भावनांची काळजी वाहत असतो. जणू काही तुम्ही स्वतःच्याच भावनांना बळी पडता. मला असे वाटते, मला तसे वाटते! काय करणार? पण तुमच्या वाटण्याचे काय मोठेसे? त्या भावनांचे एक गाठोडे बांधा आणि टाकून द्या समुद्रात. एकदा तुम्ही तुमच्या भावनांपासून मुक्त झालात, की तुम्ही आनंदी व्हाल.

तुमचे मनःस्वास्थ्य का बिघडते याचा विचार करा. बहुतेक वेळा तुम्हाला कुणीतरी काहीतरी मूर्खासारखे बोलते. ते असे का बोलतात? कारण त्यांच्या मनात काहीतरी कचरा साठला होता. तो त्यांना बाहेर टाकायचा होता. आणि तुम्ही नाचतच होतात तो पकडायला! तुम्ही तो कचरा अगदी प्रेमाने पकडून ठेवता. जागे व्हा! तुमचे हसू कुणालाही हिरावून घेऊ देऊ नका.

कुणालाही सतत चांगले किंवा वाईट वाटू शकत नाही. चांगल्या किंवा वाईट भावना लाटांसारख्या येतात. उसळून आलेली लाट तुम्ही थांबवू शकत नाही किंवा तुम्ही लाट निर्माणही करू शकत नाही. लाटा येतात आणि जातात, ढग येतात आणि जातात. तशाच भावना येतात आणि जातात. तरतऱ्हेच्या भावनांच्या लाटा येतात आणि नाहीशा होतात. पण आपण त्याचा इतका मोठा बाऊ करतो की ते आपल्या मनावर घाला घालत राहते. हा भावनिक कचरा अपरिपक्वतेचे लक्षणही आहे.

आपले जीवन एखाद्या नदीसारखे आहे. नदीला वाहण्यासाठी दोन किनारे लागतात. पूर आणि वाहती नदी यातील मूलभूत फरक म्हणजे, नदीमध्ये पाणी पद्धतशीरपणे, ठराविक दिशेने वाहत असते. पुराच्या वेळी पाणी गढूळ आणि दिशाहीन असते. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील ऊर्जेलाही वाहण्यासाठी ठराविक दिशेची गरज असते. तुम्ही दिशा न दाखविल्यास सगळा गोंधळ होतो. आज बहुतेक लोक गोंधळलेले असतात, कारण त्यांना आयुष्याची योग्य दिशा मिळालेली नसते. तुम्ही खूष असता तेव्हा तुमच्यात केवढी तरी चैतन्य शक्ती असते. मात्र या चैतन्याला कुठे जायचे, कसे जायचे ते माहीत नसल्यास ते अडकून बसते. ते साठून राहिल्याने खराब होते. वाहत्या पाण्यासारखे जीवनही पुढे जात राहायला हवे. ऊर्जेला एका विशिष्ट दिशेने जाण्यासाठी निश्‍चयाची, बांधीलकीची गरज आहे. जीवन निश्‍चयावर चालते. जीवनात अगदी लहानशी गोष्ट असो वा मोठी, ती बांधीलकीमुळेच पुढे जात असते. विद्यार्थी शाळेत किंवा महाविद्यालयात प्रवेश घेतो ते निश्‍चय करूनच. तुम्ही डॉक्‍टरकडे जाता ते निश्‍चय करूनच की डॉक्‍टर जे काही सांगतील ते मी ऐकेन, औषधे नीट घेईन. सरकार बांधीलकीवर चालते. कुटुंबही बांधीलकीवर चालते. आई मुलाशी बांधील असते. मूल पालकांशी बांधील असते. नवरा बायकोशी बांधील असतो आणि बायको नवऱ्याशी बांधील असते. प्रेम, व्यवसाय, मैत्री किंवा कार्यालय बांधीलकी ही असतेच. त्याबाबतचे विवेचन पुढील भागात पाहू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com