बुद्ध, संघ आणि धम्म (श्री श्री रविशंकर)

बुद्ध, संघ आणि धम्म (श्री श्री रविशंकर)

चेतना तरंग
आध्यात्मिक मार्गावर तीन घटकांचा समावेश होतो. बुद्ध म्हणजे स्वामी किंवा ज्ञानाचा प्रकाश, संघ म्हणजे गट किंवा संघटना आणि धम्म तुमचा खरा स्वभाव. या तिन्हींमध्ये योग्य संतुलन असते, तेव्हाच जीवन खऱ्या अर्थाने फुलते. बुद्ध हे द्वार आहे. रणरणत्या उन्हात घराबाहेर असल्यावर किंवा मुसळधार पावसात अडकून पडल्यावर आसरा किंवा दरवाज्याची गरज भासते. त्या वेळी ते द्वार किती आकर्षक वाटते, हे तुम्हाला कधी जाणवले का? जगातील कोणत्याही गोष्टींपेक्षा ते अधिक मोहक भासते. त्याचप्रमाणे, तुम्ही प्रभूच्या जवळ जाता तसे अधिक नावीन्य, प्रेम तुम्हाला जाणवते. जगात कोणतीच गोष्ट त्यापेक्षा अधिक शांतता, आनंद देऊ शकत नाही.

तुम्हाला ज्ञानीपणाचे ओझे कधीच वाटणार नाही. ही खोली तळ नसलेली असते. तुम्ही ईश्‍वराच्या जवळ आल्याचेच हे चिन्ह होय. तुम्ही दरवाजाजवळ येऊन तो उघडता तेव्हा जग खूप सुंदर दिसते. हे ठिकाण प्रेम, आनंद, सहकार्य, करुणा आणि सर्व सद्‌गुणांनी भरून गेलेले असते. या दरवाजातून पाहताना कुठलीही भीती नसते. तुम्ही घरातून आल्हाददायकरित्या पाऊस, वादळ आणि प्रकाशमान सूर्यही पाहू शकता. तुमच्या मनात सुरक्षिततेची, आनंदाची भावना असते, अगदी त्याचप्रमाणे, स्वामी असण्यामागेही हाच हेतू असतो. संघ म्हणजे गट. तो दूरवरून खूप मोहक दिसतो, मात्र तुम्ही जवळ जाल तसे तुमच्यातील नको असलेले घटक तो बाहेर आणतो. तुम्ही गट अतिशय चांगला किंवा वाईट आहे, असा विचार केल्यास तुम्ही गटाशी पूर्णपणे समरस झाला नाहीत, असा अर्थ होतो. तुम्हीच तो गट निर्माण केला असल्यास आणि तुम्ही चांगले असल्यास तुमचा गटही चांगला असेल. संघाचा स्वभाव बुद्धाचा अगदी उलट आहे.

बुद्ध तुमचे मन एखाद्या टोकासारखे बनवेल, तर संघात अनेक लोक असल्याने तुमचे मन भटकू शकते, तुकड्यांत विभागले जाऊ शकते. त्यानंतर संघाची मोहकता जाते, तो संघाचा स्वभावच म्हणावा लागेल. तरीही तो अतिशय आश्‍वासक आहे. तो नेहमीच अनाकर्षक असता, तर कुणीही संघाचा भाग झाले नसते. तुम्ही लालसा धरू नका आणि अनासक्तीही. सामान्यत: तुम्ही बुद्धाची अभिलाषा बाळगली की संघाच्या विरुद्ध होता. मात्र संघ किंवा बुद्ध बदलल्याने तुम्ही बदलू शकत नाही. तुमच्या स्वतःमधील खोलवरचे केंद्र शोधणे हा मुख्य हेतू आहे. तुमचा धम्म शोधणे हाच याचा अर्थ, हाच तिसरा घटक होय. धम्म म्हणजे काय? नेहमी मध्यभागी राहणे म्हणजे धम्म होय. तुमचा स्वभाव कुठलाही अतिरेक न करणारा, संतुलित हवा. संपूर्ण अस्तित्व आहे तसे स्वीकारणे, अगदी हृदयापासून हसणे तेही आपल्याला मिळालेल्या या क्षणाची जाणीव ठेवत, प्रत्येक क्षणाचा असा खोलवर स्वीकार करणे म्हणजे धम्म होय. सर्व समस्या, नकारात्मकता आपल्या मनातूनच निर्माण होतात. हे जग सुंदर नाही, आपणच ते सुंदर किंवा कुरूप करतो. मानवी मन या जगाशी संपूर्णपणे समरस होऊ शकत नाही, हीच त्याची समस्या आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com