माझं नाव किम (संदीप वासलेकर)

माझं नाव किम (संदीप वासलेकर)

श्रीमती बर्नेट म्हणाल्या : ‘‘अरे! तुम्ही त्यांना लहान मुलांच्या भेटवस्तू कुठं मिळतात म्हणून विचारलंत? सकाळी मला विचारायचं ना...’’ मी गप्प राहिलो. यावर श्रीमती बर्नेट म्हणाल्या ः ‘‘त्या आहेत किम कॅम्पबेल. कॅनडाच्या सध्याच्या पंतप्रधान. अनेक दशकांतल्या सर्वात लोकप्रिय पंतप्रधानांपैकी एक आहेत त्या...’’

कॅ  नडाची राजधानी ओटावा इथं मेटकाफ व मॅक्‌लारेन रस्ते जिथं एकत्र येतात तिथं कोपऱ्यावर 
सहामजली इमारत आहे. तिथं तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या बर्नेट कुटुंबीयांशी माझी मैत्री होती. मी कॅनडाला कामानिमित्त गेल्यावर त्यांच्या घरी राहत असे.

मी त्यांच्याकडं पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा मला इमारतीची अतिशय आधुनिक सुरक्षाव्यवस्था पूर्णपणे समजलेली नव्हती. एकदा दुपारी मी एकटाच परत आलो व इमारतीचं मुख्य दार उघडण्यासाठी खटपट करू लागलो. तेवढ्यात एक बाई तिथं आल्या. त्यांनी मला मदत केली. मी माझी अडचण सांगितल्यावर त्यांनी मला हातातल्या इलेक्‍ट्रॉनिक किल्ल्या कशा वापरायच्या ते सांगितलं. त्या म्हणाल्या ः ‘‘कदाचित तुम्ही लिफ्टमध्ये अडकाल. ही यंत्रणा समजायला तुम्हाला वेळ लागेल, तेव्हा मी तुम्हाला सोडते.’’

तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या बर्नेट यांच्याकडं मी पाहुणा आलो असल्याचं मी त्या बाईंना सांगितलं. 

त्या म्हणाल्या ः ‘‘असं का? मीही तिसऱ्या मजल्यावरच राहते...’’

तिसऱ्या मजल्यावर पोचल्यावर मी म्हणालो ः ‘‘थॅंक यू, मॅम.’’ 

त्या म्हणाल्या ः ‘‘मॅम म्हणू नका. माझं नाव किम.’’

दोन-तीन दिवसांनी पुन्हा एकदा त्यांची मुख्य प्रवेशद्वारापाशी भेट झाली. मी त्यांना थांबवून विचारलं ः ‘‘भारतात मिळणार नाही अशा भेटवस्तू मला माझ्या मुलासाठी घ्यायच्या आहेत. त्यासंदर्भात काही सल्ला देऊ शकाल?’’ त्यावर ‘रिडो सेंटर’ला कसं जायचं हे त्यांनी मला सांगितलं. तेवढ्यात एक मोठी गाडी आली. त्या गाडीत बसल्या. नंतर पोलिसांची एक गाडी आली व त्यांच्या गाडीमागं गेली. 

‘‘तुमच्या शेजारीण बाईंशी माझा परिचय झाला,’’ असं मी संध्याकाळी बर्नेट कुटुंबीयांना सांगितलं. त्या बाईंशी काय बोलणं झालं हेही सांगितलं.

श्रीमती बर्नेट म्हणाल्या ः ‘‘अरे! तुम्ही त्यांना लहान मुलांच्या भेटवस्तू कुठं मिळतात म्हणून विचारलंत? सकाळी मला विचारायचं ना...’’ मी गप्प राहिलो. यावर श्रीमती बर्नेट म्हणाल्या ः ‘‘त्या आहेत किम कॅम्पबेल. कॅनडाच्या सध्याच्या पंतप्रधान. अनेक दशकांतल्या सर्वात लोकप्रिय पंतप्रधानांपैकी एक आहेत त्या. त्या अनेक वर्षं संरक्षणमंत्री होत्या. पूर्वीच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिल्यावर पक्षानं त्यांची सर्वोच्च पदावर नेमणूक केली; परंतु सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत सरकारी निवासस्थानी राहणं त्या अयोग्य समजतात, म्हणून सध्या स्वतःच्या या खासगी फ्लॅटमध्ये त्या राहत आहेत. बऱ्याच वर्षांपासून त्या आमच्या शेजारीण आहेत.’’

ही माहिती मिळाल्यावर मला इमारतीच्या सुरक्षाव्यवस्थेचं गौडबंगाल कळलं. वरच्या मजल्यावर कॅनडाचे आर्चबिशप म्हणजे धर्मगुरू यांचे कुटुंबीय राहत होते. त्याच्याही वर कॉमनवेल्थच्या महासचिवांचं खासगी निवासस्थान होतं. 

किम अनपेक्षितपणे निवडणूक हरल्या; परंतु विरोधी पक्षातर्फे निवडून आलेल्या पंतप्रधानांनी त्यांच्यापुढं राजनैतिक पदाचा प्रस्ताव ठेवला. एखादा नेता निवडणुकीत पराभूत झाला असेल; परंतु त्याच्यात जर गुण असतील तर ‘केवळ तो विरोधी पक्षातला आहे,’ असा राजकीय विचार बाजूला ठेवला पाहिजे व राष्ट्राच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय राजकारणात त्याच्या गुणवत्तेचा उपयोग करून घेतला पाहिजे...कॅनडाचे नवीन पंतप्रधान व कॅनडाचं संपूर्ण राजकारण हे अशा राजकीय संस्कृतीचं, विचारांचं असल्यानं त्यांनी किम यांना नवीन जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली.

काही काळानं किम या संशोधनाच्या व अध्यापनाच्या क्षेत्रात गेल्या. अलीकडंच त्यांनी एका विद्यापीठातल्या डीन पदाचा राजीनामा दिला व निवृत्तीनंतरचं जीवन एका खेड्यात घालवण्याचा निर्णय घेतला. त्यासंबंधीचं त्यांचं पत्र मला मागच्याच महिन्यात मिळालं व सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

***

यानंतर काही वर्षांनी कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान पॉल मार्टिन यांनी ‘जी-२०’ या कल्पनेला जन्म दिला. भारताचे पंतप्रधान ‘जी-२०’च्या शिखर-बैठकांना जातात तेव्हा वर्तमानपत्रांत पहिल्या पानावर त्याविषयीच्या बातम्या आपण वाचतो. पूर्वी जगाचा आर्थिक कारभार फक्त ‘जी-८’ हा पाश्‍चिमात्य राष्ट्रांचा गट चालवत असे. पॉल मार्टिन यांनी ‘जी-२०’ ही कल्पना आंतरराष्ट्रीय राजकारणात आणून भारत, चीन यांना जगाच्या ‘संचालक मंडळा’वर नेलं.

‘जी-२०’ कल्पनेचा विकास करण्यासाठी मार्टिन यांनी काही जागतिक विचारवंतांचं एक अनौपचारिक मंडळ स्थापन केलं होतं. त्यात त्यांनी माझा समावेश केला. मी यासंबंधीच्या एका सत्रासाठी ओटावाला गेलो होतो; परंतु माझं ठरलेलं विमान चुकलं व दुसरं विमान उशिरा पोचलं. ओटावा विमानतळावर मला घेण्यासाठी आलेल्या सुरक्षा-अधिकाऱ्यांनी ‘हॉटेलमध्ये न जाता पंतप्रधान मार्टिन यांनी बोलावलेल्या चर्चासत्राला परस्पर आमच्याबरोबर यावं,’ अशी सूचना मला केली. मी तसं केलं आणि चर्चेत भाग घेतला. मात्र, विमानतळावरून परस्परच सत्राच्या ठिकाणी गेल्यानं मी तसा ताजातवाना नव्हतो, कपडेही व्यवस्थित नव्हते, म्हणून मग मी जेवणाच्या वेळी ज्येष्ठ नेत्यांपासून लांब राहिलो.

जेवण झाल्यावर एकटाच एका कोपऱ्यात संकोचून मी आइस्क्रीम खात होतो. माझी नजर खाली होती. तेवढ्यात खांद्यावर थाप पडली. वर पाहतो तर समोर मार्टिन उभे होते. त्यांनी हात पुढं केला

व म्हणाले ः ‘‘माझं नाव पॉल. तुमचं नाव काय?’’ -मी माझी ओळख करून दिली व माझ्या अवताराबद्दल आणि सगळ्यांपासून दूर राहिल्याबद्दल माफी मागितली. त्यावर ते म्हणाले ः ‘‘मला तुमच्याशी काही चर्चा करायची आहे. चला, कोपऱ्यातल्या खुर्च्यांवर बसून बोलू या.’’

***

अलीकडंच कॅनडाचे विद्यमान पंतप्रधान जस्टीन त्रुडो भारतात सहकुटुंब येऊन गेले. आग्रा व इतर प्रेक्षणीय स्थळं त्यांनी पाहिली. सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळले. त्यांच्यावर आपल्या 

सोशल मीडियातून प्रखर टीका झाली. त्यांच्या मंत्रिमंडळातल्या काही सदस्यांशी खलिस्तानच्या मुद्द्यावरून आपले राष्ट्रीय मतभेद होते; परंतु राजकीय मतभेद अनेक विदेशी नेत्यांबरोबर असतात. चीनसारख्या देशाबरोबर तर आपले प्रखर मतभेद आहेत; पण चीनच्या राष्ट्राध्यक्षांवर अथवा इतर नेत्यांवर कधी आपल्या प्रसारमाध्यमांनी व सोशल मीडियानं अशी अतिशय प्रखर वैयक्तिक टीका का कधी केली नाही? की एका मोठ्या देशाच्या नेत्यानं कुटुंबीयांबरोबर प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यावी, भारतीय पेहराव घालावा, सर्वसामान्य लोकांत मिसळावं व नेता आणि सामान्य नागरिक यांच्यातली सीमारेषा पुसून टाकावी हेच आपल्या भारतीय मनाला पटलं नाही?

मी जस्टिन त्रुडो यांना एका स्वागतसमारंभात पाहिलं. समारंभ त्यांच्याच सन्मानार्थ असल्यानं त्यांची ओळख सर्व उपस्थित मंडळींना अर्थातच होती. मी हस्तांदोलन केल्यावर ते म्हणाले ः ‘‘माझं नाव जस्टिन. आता जरा डावीकडं चेहरा करा. त्या फोटोग्राफरला आपला फोटो काढायचा आहे’’.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com