इस मोड से जाते हैं!

इस मोड से जाते हैं!

चौकटीतली ‘ती’ 
चाकोरी सोडून वेगळं जगू पाहण्याची, चौकट मोडून स्वतःला व्यक्त करण्याची आस स्त्रियांमध्ये असतेच. समाजबंधनामुळं प्रत्येकीला ही आस प्रकट करता येत नाही. ती प्रकट करणाऱ्या स्त्रीला ‘बंडखोर’ हे विशेषण लागतं. आरती बोस अशाच काही बंडखोर स्त्रियांपैकी एक. तिचं बंड एवढंच की ती ‘रांधा-वाढा-उष्टी काढा’ हा संसाराचा रूढ मार्ग सोडून राजकारण हेच आपल्या जगण्याचं ईप्सित मानते. स्त्रियांनी राजकारणात जाणं आता सर्वमान्य झालं असलं, तरी पन्नास-साठ वर्षांपूर्वीचा काळ तसा नव्हता. आरती ही त्याच काळात वाढलेली, घडलेली स्त्री. एका सर्वसामान्य आरतीपासून ‘आरतीदेवी’ बनण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी तिनं स्वतःचं घर, संसार आणि सुरक्षित आयुष्य या गोष्टींवर पाणी सोडलेलं असतं.

एका धनाढ्य उद्योगपतीची लाडात वाढलेली कन्या, हीच आरतीची सुरवातीची ओळख. पैशाच्या बळावर ‘ऑक्‍सफर्ड’मध्ये शिकून आलेल्या या मुलीनं वडिलांचा मोठा ‘कारोबार’ सांभाळणं स्वाभाविक ठरलं असतं. पण ती एका हॉटेल मॅनेजरच्या प्रेमात पडते. ‘तुला वाढवताना माझ्यापुढची उद्दिष्टं वेगळी होती. तू सोशल वर्क करावंस, समाजात स्थान मिळवावंस, राजकारण्यांत उठबस वाढवावीस... जेणेकरून माझ्या व्यवसायाला फायदा होऊ शकेल. एका सामान्य माणसाशी लग्न करून पोराबाळांना जन्म घालण्यासाठी तुझा जन्म झालेला नाही...’ हा पित्याचा हितोपदेश डावलून ती लग्न करते. तिचा पती जे. के. हा नोकरीत रमणारा, कविता करणारा, स्वप्नाळू पण वास्तवाचं भान असलेला वगैरे. लग्नानंतर त्यांना एक मुलगी होते, पण तिचं मन संसारात रमत नसतं. पित्याचं वैभव, त्यांचं सामाजिक, राजकीय वलय या गोष्टी तिला खुणावत असतात. जेकेनं हॉटेल सोडून दुसरी ‘प्रतिष्ठे’ची नोकरी करावी, सोशल वर्क करावं असंही तिला वाटत असतं. पण त्याला हे मंजूर नसतं. दोघांमध्ये खटके उडतात. ‘मला असली नेतेगिरी आवडत नाही. माझा नवरा बनण्याचा प्रयत्न करू नकोस, बायको आहेस, बायको म्हणूनच राहा,’ त्याचा पुरुषी अहंकार फणा काढतो. आपल्या दोघांचे रस्ते वेगवेगळे आहेत, हे तिला उमगतं. नगरपालिकेची निवडणूक लढविण्यासाठी म्हणून ती जेकेचं घर सोडून जाते, ती कायमचीच. राजकारणाच्या पायवाटेवरून हमरस्त्यापर्यंत कशी पोचते, हे तिलाही कळत नाही. ती दहा वर्षांत एक प्रभावशाली, निडर, मुरब्बी राजकारणी होते. एका पक्षाची सर्वेसर्वा बनते. 

नियतीला पुन्हा त्या दोघांची भेट घडवावीशी वाटते. निवडणुकीच्या निमित्तानं तिला एका शहरात वास्तव्य करावं लागतं. तिचा मुक्काम असलेल्या आलिशान हॉटेलचा मॅनेजर ‘जेके’च असतो. तब्बल दहा वर्षांच्या वियोगानंतर त्यांची भेट होते. संबंध तुटले असले तरी एक आंतरिक धागा असतोच. हाच धागा त्यांच्या नियमित भेटी घडवून आणतो. हरवलेले क्षण ते पुन्हा गोळा करू पाहतात. निवडणुकीच्या धामधुमीत तिला एवढाच विरंगुळा ठरतो. पण विरोधकांना आयतं कोलीत सापडतं. हॉटेल मॅनेजर जेकेच्या संबंधावरून तिच्यावर चिखलफेक केली जाते. पोस्टरबाजी होते. निवडणूक हातची जाणार असं वाटत असतानाच आरतीदेवी चक्क विरोधी उमेदवाराच्या प्रचारसभेत जाऊन जेकेशी असलेलं आपलं नातं लोकांसमोर उघड करते. ‘पत्नीनं आपल्या नवऱ्याला भेटणं हा अपराध असेल तर मला जरूर शिक्षा द्या. ती मी भोगेन. पण माझ्यावर चिखलफेक करू नका. जनताजनार्दनाच्या भल्यासाठी मी घरदार सोडलं. पती, मुलगी यांचा वियोग सहन केला. लोकांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी मी ही किंमत मोजली. पण आता मी हे सोडून परत निघाले आहे. माझ्या स्वतःच्या घरी. मला तुमचे आशीर्वाद हवेत,’ आरतीदेवीच्या या नाट्यपूर्ण, भावनिक आवाहनानंतर वातावरण फिरतं. विरोधकांचा डाव उलटतो नि आरती प्रचंड मताधिक्‍यानं विजयी होते. ती ‘जेके’च्या घरी परत आलेली असते. पण तो समंजसपणे तिला तिच्याच रस्त्यानं जाण्याचा सल्ला देतो, ‘तुझा पराभव हा माझा विजय होऊ शकत नाही,’ हा विश्‍वास तिला देतो. आरती पुन्हा जाते. या वेळी त्याचं प्रेम सोबत घेऊन...

प्रसिद्ध हिंदी लेखक कमलेश्‍वर यांच्या ‘काली आँधी’ या कादंबरीवर लेखक-दिग्दर्शक गुलजार यांनी बनवलेल्या ‘आँधी’ (१९७५) या चित्रपटातली आरती साकारली होती बंगाली अभिनेत्री सुचित्रा सेननं. या गहिऱ्या व्यक्तिरेखेला तिनं उंची बहाल केली नसती तरच नवल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com