अहंकारावर सप्तसुरांची मात!

सुनील देशपांडे
शनिवार, 27 एप्रिल 2019

"सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने "सेफ्टी झोन"वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "मैत्रीण" या पुरवणीत...

चौकटीतली ‘ती’ 
पती-पत्नी एकाच क्षेत्रात कार्यरत असतील आणि पत्नी स्वतःच्या कर्तृत्वावर पतीच्या पुढे निघून गेल्यास त्याला ते सहन होईल? की अहंकाराच्या खडकावर आदळून त्यांच्या संसारनौकेचा चक्काचूर होईल?

सुबीर आणि उमा यांच्या नव्या संसाराकडे पाहून काहींना असा प्रश्‍न पडणं साहजिक होतं. कारण तो असतो लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेला पार्श्‍वगायक आणि ती नवोदितच; पण अतिशय गोड गळ्याची बुद्धिमान गायिका. मुंबईच्या चित्रपट जगतात ‘सुबीर कुमार’चं चांगलं बस्तान बसलेलं. रेकॉर्डिंगसाठी त्याच्या दारी निर्मात्यांच्या रांगा लागलेल्या. घरात पैशाच्या राशी साठलेल्या; पण एवढं सुख असूनही तो अंतर्यामी एकाकी, बेचैन आहे. यशातून येणारी बेफिकिरी स्वभावात उतरलेली. त्यातूनच दिवसरात्र काम-काम आणि काम! नाही म्हणायला भावासमान माया लावणारा मित्र कम सेक्रेटरी चंद्रू आणि त्याच्या गाण्यावर भाळलेली मैत्रीण चित्रा या दोघांचीच त्याला काय ती सोबत. सततची रेकॉर्डिंग्ज, फिल्मी पार्ट्या, चाहत्यांचा गराडा, इन्कम टॅक्‍सच्या कटकटी यांना वैतागलेल्या सुबीरला एके दिवशी गावाकडून दुर्गामौसीचं पत्र येतं. लहानपणीच मातापित्याचं छत्र हरपलेल्या सुबीरचं पालनपोषण याच दुर्गामौसीनं केलेलं. त्यामुळे तिचा सांगावा येताच सुबीर हातातली कामं सोडून तडक तिला भेटायला जातो. दुर्गामौसीचे मानलेले भाऊ पंडित सदानंदजी यांची मुलगी उमाला गाताना पाहून सुबीर तिच्यावर लुब्ध होतो. गाण्याइतकंच स्वच्छ, नितळ व्यक्तिमत्त्व लाभलेली उमा त्याच्या मनात भरते. मौसीच्या मनातही सुबीर आणि उमा यांचं लग्न व्हावं, ही तीव्र आकांक्षा असते. लगोलग लग्न लागतं आणि सुबीर उमाला घेऊनच मुंबईला परत येतो. वैवाहिक जीवनाबरोबरच सांगीतिक जीवनही एकत्र बहरावं, अशी त्याची अपेक्षा असते; पण ती गाणं म्हणायला तेवढी उत्सुक नसते. अखेर त्याच्या आग्रहाखातर ती सिनेमासाठी गायला तयार होते. तिच्या आवाजानं जणू चमत्कार घडतो! पाहता पाहता तिला गाण्यासाठी, समारंभांसाठी बोलावणी येऊ लागतात. निर्माते तिच्यासाठी वाट्टेल ती रक्कम मोजायला तयार असतात. ‘मार्केट’मध्ये तिचा भाव त्याच्यापेक्षा वधारतो. चाहत्यांचा गराडा त्याच्यापेक्षा तिच्यासमोर वाढू लागतो. साहजिकच सुबीरचा पुरुषी अहंकार दुखावतो. वारंवार घडणाऱ्या घटनांनी तो अधिकाधिक दुखावत जातो. त्याची मर्जी राखण्यासाठी उमा गाणं सोडायचं ठरवते, पण पराभूत सुबीरला तिचा हा ‘त्याग’, हे ‘बलिदान’ नको असतं. कर्तृत्वाच्या जोरावर तिला मात देणं त्याला शक्‍य नसतं. त्यातूनच त्याचं नैराश्‍य, चिडचिड, त्रागा वाढतो. मनाला विरंगुळा लाभावा म्हणून चित्राकडे जाणं-येणंही वाढतं. एकदा सुबीर घरी न आल्यानं उमा मध्यरात्री चित्राच्या घरी जाऊन त्याला घेऊन येते. दुखावलेला सुबीर त्या रात्री संतापाला वाट मोकळी करून देतो. उमा माहेरी निघून जाते. निराशेनं खंगते. गरोदर राहिलेल्या उमाच्या तब्येतीवर परिणाम होतो. बाळंतपणात तिचं मूल दगावतं. तिच्या जगण्यातलं चैतन्यच हरवतं. हे सारं बघून मौसी सुबीरला चांगला खडसावते. अखेर तो उमाकडे जातो. ती एव्हाना दगडासारखी निष्प्राण झालेली असते. तो तिची क्षमायाचना करतो. पुन्हा मुंबईला घेऊन येतो. तिच्या प्रकृतीत सुधार व्हावी यासाठी वेगवेगळे उपचार करवतो. पण उमाचा जगण्यातला रसच निघून गेलेला. एव्हाना त्याचं स्वतःचंही गाणं बंद पडलेलं असतं. सुबीर आणि उमाचे हितचिंतक असलेले संगीतप्रेमी रायसाहब अखेरचा उपाय म्हणून आपल्या संस्थेतर्फे त्याचं गाणं आयोजित करतात. संगीतानं या दोघांना एकत्र आणलेलं असतं आणि संगीतच पुन्हा दोघांना जवळ आणू शकेल, असा त्यांना विश्‍वास असतो. सुबीर अनिच्छेनं गायला तयार होतो. रंगमंचावर त्याचं गाणं सुरू असताना विंगेत बसलेल्या उमाला हुंदके अनावर होतात. कारण सुबीरच्या तोंडी असतं त्यांनी संसाराच्या आरंभी रचलेलं त्यांचं जीवनगाणं. उमाला सावरण्यासाठी रायसाहब तिलाही त्याच्यासोबत गायला उभं करतात. दोघांच्या एकत्र गाण्यानं उमा सावरते. तिला दिलासा मिळतो. एक मोडू पाहणारं लग्न पुन्हा सावरलं जातं. कणसूर बाजूला होऊन संगीत पुन्हा नितळ, निर्मळ होतं...

पती-पत्नीच्या सहजीवनाचाच नव्हे, तर एकूण मानवी नात्यांचा तरलपणे वेध घेणारे दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांच्या ‘अभिमान’ (१९७३) या चित्रपटातली ही उमा साकारताना जया भादुरीनं प्रयत्नात कोणतीही कसूर केली नाही. त्याआधीच्या ‘अनुराधा’ (१९६०) मध्ये कर्तव्यनिष्ठ डॉक्‍टर पतीमुळे संगीतसाधक पत्नीची होणारी घुसमट हृषीदांनी कमालीच्या संयतपणे चित्रित केली होती. तब्बल एक तपानंतर हा विषय हाताळताना त्यांनी तोच संपन्न अनुभव दिला. जीवनातलं संगीत जगायला हवंच, पण लग्न मोडून नव्हे, हाच संदेश बहुधा त्यांना द्यायचा असावा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article By sunil deshpande in Maitrin Supplement