कोई चुपके से आके... (सुनील देशपांडे)

कोई चुपके से आके... (सुनील देशपांडे)

चौकटीतली ‘ती’ 
पती-पत्नीच्या संसारात दोघांपैकी एकाच्या पूर्वायुष्यातल्या व्यक्तीचा प्रवेश होणं, ही त्या संसारासाठी संभाव्य वादळाची नांदी ठरू शकते. अशा परिस्थितीत ती दोघं किती समजूतदारपणा दाखवतात यावर त्या ‘वादळा’ची तीव्रता आणि कालावधी अवलंबून असतो. अमर आणि मीता यांच्या बाबतीत हेच घडतं. त्यांच्या संसारात आलेलं एक छोटंसं वादळ शमतं, पण त्या निमित्तानं दोघांनाही परस्परांना नीट समजून घेण्याची संधी मिळते.

अमर हा मुंबईतल्या एका बड्या दैनिकाचा संपादक, तर त्याची पत्नी मीता ही गृहिणी. लग्नाला सहा वर्षं झालीत. आलिशान घर, दाराशी गाडी, घरात नोकरचाकरांचा राबता, उच्चभ्रू वर्तुळातल्या नियमित होणाऱ्या पार्ट्या या जीवनशैलीला ते चांगले रुळलेत. उणीव असेल तर एवढीच की त्यांना अजून मूलबाळ नाही. त्यात अमर कामात एवढा बुडालेला की तो तिला हवा तेवढा वेळ देऊ शकत नाही. परिणामी तिला स्वतःच्या आयुष्यात एक विचित्र रितेपण जाणवतोय. अशा वेळी तिच्या संसारात तिचा लग्नाआधीचा मित्र शशी पुन्हा डोकावतो. इतक्‍या वर्षांनंतर त्याचं येणं तिला मुळीच नको असतं. तरीही तो बळेबळे तिला भेटायला घरी येतो. खरं तर शशीनं अमरच्याच दैनिकात नोकरीसाठी अर्ज केलेला असतो. तिच्या शिफारशीनं ही नोकरी मिळू शकेल, ही आशा त्याला असते. पण मीता तुटकपणे वागून त्याला वाटेला लावते. तरीही शशीला त्याच्या गुणवत्तेच्या बळावर ती नोकरी मिळते. तो अमरच्या दैनिकात रुजू होतो. त्याचा विश्‍वासू सहकारी बनतो. काहीसा अबोल, हुशार असलेला शशी अमरला आवडत असतो. याच विश्‍वासातून अमर शशीला जेवणासाठी घरी घेऊन येतो. शशीचं घरी येणं-जाणं वाढतं. हे असह्य झालेली मीता एकदा शशीला फटकारते. तो निमूटपणे निघून जातो. पण त्यांचं संभाषण अमरच्या कानी पडतं. मीता आणि शशी यांची पूर्वीची ओळख असल्याचं त्याला कळतं. त्याचा संशय वाढतो. याच संशयातून तो तिच्याशी तुसडेपणानं वागू लागतो. भांडण, आरडाओरडाही करतो. एवढंच नव्हे, तिकडे शशीला राजीनामा द्यायलाही सांगतो. पण शशीनं आधीच राजीनाम्याचं पत्र तयार ठेवलेलं पाहून तो वरमतो. त्याला स्वतःचा वेडेपणा कळतो. शशीचा राजीनामा तो फेटाळतो. मीताशी झालेला त्याचा बेबनाव अगदीच ‘फिल्मी’ म्हणण्याजोग्या पद्धतीनं दूर होतो. दोघांचा संसार सुखात सुरू राहतो.

पती-पत्नीमधल्या नात्याचा (खरं तर दोघांच्याही ‘अतृप्ती’चा) वेध हेच मुख्यतः ज्यांच्या चित्रपटांचं मूलतत्त्व राहिलं त्या बासू भट्टाचार्य यांचे ‘अनुभव’, ‘आविष्कार’, ‘गृहप्रवेश’, ‘पंचवटी’ आणि ‘आस्था’ हे चित्रपट याच एका सूत्राभोवती गुंफलेले होते. या मालिकेतली पहिली कलाकृती असलेल्या ‘अनुभव’ (१९७१) या कृष्ण-धवल चित्रपटाला त्या वर्षीचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. बासू भट्टाचार्य यांच्या सर्वच चित्रपटांतली जोडपी संसारात असमाधानी असतात. ‘अनुभव’मधली मीता हीदेखील त्यातलीच एक. सर्व सुख हाताशी असूनही ती असमाधानी आहे. ही अतृप्ती कशामुळं आहे, हे तिला कळलेलं नाही. कदाचित, तिला मूल नसल्यानं, किंवा सदैव कामात बुडालेला नवरा तिला वेळ देऊ शकत नसल्यानं किंवा पतीबाबतच्या तिच्या अपेक्षाच मुळात फोल ठरल्यानं... वरवर पाहता ती सुखी आहे, पण कसली तरी बेचैनी तिला कुरतडते आहे. ही कोंडी दूर करण्यासाठी घरातल्या नोकर-चाकरांना कायमची सुट्टी देऊन ती घरकामाची सूत्रं स्वतःच्या हाती घेते. ही मात्रा लागू पडते. अमरच्या उत्कट सहवासात ती मोहरून निघते. सुखात न्हाऊन निघालेली असतानाच नेमका ‘शशी’ तिच्या आयुष्यात पुन्हा डोकावतो. त्याला टाळण्याचा तिचा प्रयत्न फोल ठरतो. त्यातून निर्माण झालेली कोंडी सोडवताना ती प्रथमच अमरपाशी मन मोकळं करते. पुरुषाला आपली वाट निवडण्याचं स्वातंत्र्य असतं, पण स्त्रीला दुसऱ्याच कुणी तरी निवडलेल्या वाटेवरून जावं लागतं... मीता ही त्याच व्यवस्थेतली एक मुलगी. तारुण्यात पाऊल ठेवल्यानंतर अवचितपणे तिला शशी भेटतो. निरागस, निर्मळ मनाचा. त्यांची ओळख काही महिनेच टिकते. उणे-पुरे सहा तास तिनं त्याच्यासोबत घालवले असतील. पण त्या सहा तासांच्या निखळ सोबतीत त्याच्याकडून तिला जे मिळतं (वास्तवात त्यानं तिला स्पर्शही केलेला नसतो!) ते सहा वर्षांच्या वैवाहिक जीवनातही तिला मिळालेलं नसतं. एके काळी शशीला भेटण्यात जी आतुरता, जी असोशी तिला असे, ती असोशी अमरविषयी तिला कधीच वाटलेली नसते. कारण त्यानं तिच्या गरजाच ओळखलेल्या नसतात...

शंभराहून अधिक चित्रपटांत काम करूनही अभिनयाचा पूर्ण कस लागेल अशा भूमिका तनुजाला मिळाल्या त्या केवळ एका हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढ्या! त्यात ‘अनुभव’ची मीता त्यात सर्वोच्चस्थानी तळपणारी. कुठेही टिपेचा सूर न लावता, स्वतःच्या खास बसक्‍या आवाजात तनुजानं या भूमिकेत उत्कटतेनं रंग भरले. नवऱ्यासमोर मन मोकळं करण्याच्या दृश्‍यातलं जवळ जवळ आठ मिनिटांचं तिचं ‘स्वगत’ हा तर या भूमिकेचा कळसाध्यायच! खंत इतकीच, की तनुजानं एवढा उत्कट ‘अनुभव’ पुन्हा कधी दिला नाही...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com