चौकटीतली ‘ती’  : उसनं घरटं

चौकटीतली ‘ती’  : उसनं घरटं

बलराज आणि पूर्णिमा ऊर्फ निमा कोहली हे पुण्याच्या उच्चभ्रू वस्तीतल्या बंगल्यात राहणारं सुखवस्तू, सुसंस्कृत कुटुंब. या जोडप्याला दोन मुलगे असतात. मोठा मुलगा सागर याचं पुण्याच्याच मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दिल्लीच्या मुलीशी, सरिताशी प्रेम जमलंय. सरिता संस्कारी वातावरणात वाढलेली, नव्या घराचं हित जपणारी असल्याचं पाहून बलराज आणि निमा त्यांच्या लग्नास आनंदानं संमती देतात. सारं कसं छान चाललेलं असतानाच बलराजला अचानक रुग्णालयातून निरोप येतो, ‘ती’ गंभीर असल्याचा. ‘ती’ म्हणजे शारदा. आणि हा निरोप मनोरुग्णालयातून आलेला असतो...

शारदा ही दुसरी-तिसरी कुणी नसून बलराजचीच पहिली पत्नी, निमाची मोठी बहीण असते. पंधरा-वीस वर्षांपूर्वी त्या दोघांचं लग्न झालेलं. सुस्वभावी शारदाच्या सहवासात बलराजचा संसार सुखानं सुरू असतो. दोघांना एक मुलगा होतो. शारदाची धाकटी बहीण निमा ही देखील सुस्वरूप, लाघवी स्वभावाची असल्यानं बलराज आणि शारदा यांना तिचा लळा लागतो. निमाला आपली मुलगी मानून ते तिचं थाटात लग्न लावून देतात. पण दुर्दैवानं लग्नानंतर काही तासांतच निमाचा नवरा एका अपघातात मृत्युमुखी पडतो. साऱ्या कुटुंबावर जणू वज्राघात होतो. शारदा त्या धक्‍क्‍यानं जिन्यावरून कोसळते. मेंदूला मार बसल्यानं स्मृती गमावलेल्या शारदाला मनोरुग्णालयात भरती केलं जातं. तिथं ती गेल्या चौदा वर्षांपासून उपचार घेत असते. दरम्यान, शारदाच्या पश्‍चात निमा बलराजकडे राहू लागते. पतीनिधनाचं दु:ख गिळून छोट्या सागरचा ती आईसारखा सांभाळ करू लागते. शारदाच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची चिन्हं मुळीच दिसत नाहीत. अखेर त्या घटनेनंतर सात वर्षांनी बलराज आणि निमा सर्वसंमतीनं लग्न करतात. त्यांनाही एक मुलगा होतो. बलराज अधून-मधून शारदाच्या प्रकृतीची विचारपूस करत राहतो. असं असतानाच अचानक ‘तो’ निरोप येतो. इस्पितळात एका मनोरुग्ण महिलेनं डोक्‍यात मारल्यानं शारदा कोमात गेलेली असते. तब्बल सात दिवसांनी ती शुद्धीवर येते ती चक्क हरवलेली स्मृती परत घेऊनच! डॉक्‍टरांसाठी देखील हा चमत्कारच असतो. पूर्णत: बरी झाल्यानंतर शारदाला घरी पाठवावं यावर साऱ्यांचं एकमत होतं. त्या घरासाठी खरं तर हा आनंदाचाच क्षण असायला हवा, पण... मधल्या चौदा वर्षांच्या कालखंडात बलराजच्या घरात जे ‘बदल’ झाले, त्यापासून शारदा पूर्णत: अनभिज्ञ आहे. तिला या बदलांची हळूहळू कल्पना देऊया, अन्यथा पुन्हा एकदा धक्का बसून शारदा पहिल्याच अवस्थेत जाऊ शकेल, असा धोक्‍याचा इशारा डॉक्‍टर देऊन ठेवतात. शारदा घरी येणार असेल तर आपल्याला पुन्हा चौदा वर्षांपूर्वीच्या अवस्थेत म्हणजे ‘वैधव्य’ भाळी लेवून वावरावं लागणार, या कल्पनेनं निमा विचित्र कोंडीत सापडते. बरी झालेली शारदा अचानक कुणालाही न सांगता इस्पितळातून बाहेर पडते अन्‌ टॅक्‍सीत बसून थेट घरी पोचते. शारदाच्या अचानक येण्यानं घरात तारांबळ उडते. निमा कशीबशी परिस्थिती सांभाळून घेते. तिला विधवेच्या, म्हणजे पूर्वीच्याच अवतारात बघून शारदा विचारते, ‘का गं, तू दुसरं लग्न नाही केलंस?’ निमा थातुरमातूर उत्तरानं वेळ मारून नेते. एवढ्यात बलराज, सागर हेही घरी येतात. निमाचा मुलगा बब्बू शारदाच्या नजरेला पडू नये यासाठी त्याला सरिताच्या होस्टेलवर ठेवलेलं असतं. शारदा हळूहळू आपल्या संसारात रुळू लागते. बलराज व आपल्या लग्नाची कोणतीही खूण शारदाच्या दृष्टीला पडू नये याची पूर्ण खबरदारी निमा घेत असते. पण यात तिला कमालीच्या मानसिक कुचंबणेला सामोरं जावं लागतं. बलराजही पेचात सापडतो. सगळं घर एका विचित्र तणावाखाली वावरत असतं. पण हे नाटक फार काळ टिकत नाही. निमाचा मुलगा बब्बू आई-वडिलांच्या आठवणीनं होस्टेलमधून पळ काढून घरी येऊन थडकतो. त्याच्या येण्यानं सारं गुपित उघड होतं. आपल्या गैरहजेरीत निमा व बलराज यांनी लग्न केलंय आणि बब्बू हा त्यांचाच मुलगा आहे, हे कळताच शारदा सुन्न, नि:शब्द होते. एका अपरिहार्य परिस्थितीत, केवळ तडजोड म्हणून हे लग्न करावं लागलं, असं समर्थन सगळेजण शारदापुढं करू पाहतात. शारदाला ते स्वीकारण्यावाचून गत्यंतर नसतं. पण पूर्ण विचारांती ती एक धाडसी निर्णय घेते. पुन्हा वेडाचे झटके आल्याचं ढोंग ती करते. शारदा ‘व्हायोलंट’ झाल्याचं पाहून पुन्हा एकदा तिची रवानगी मनोरुग्णालयात केली जाते. या वेळी कायमची. कारण शारदानं आता समजून-उमजून वेडेपणाचं नाटक केलेलं असतं...

जुन्या पिढीतल्या मराठी लेखिका लीला फणसळकर यांच्या एका कादंबरीवर आधारित असलेल्या ‘बसेरा’ (१९८१) या रमेश तलवार दिग्दर्शित चित्रपटातली ही अनोखी शारदा साकारली होती राखीनं. धाकट्या बहिणीखातर शारदानं केलेला त्याग वास्तवात घडणं शक्‍य आहे का? शारदानं वेडेपणाचं सोंग घेतलंय हे कळाल्यानंतरही सरिता आणि डॉ. गोखले केवळ तिनं घातलेल्या शपथेपायी हा निर्णय खपवून घेतात, हे कसं पटावं? पण शेवटी ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ मान्य केली की असे प्रश्‍न निकाली निघतात. सत्तरच्या दशकातली मोहक नायिका ते नव्वदच्या दशकातली हातखंडा ‘माँ’ या अभिनय-प्रवासात राखीनं कारकिर्दीच्या ऐन मध्यावर ही ‘शारदा’ अतिशय संयतपणे साकारली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com