अमेरिकामाता की जय!

Protests against Donald Trump
Protests against Donald Trump

The thousands who flocked to the District for President Trump's inauguration Friday reflected a divided and polarized nation.

ही सुरुवात आहे 'वॉशिंग्टन पोस्ट'मधील एका लेखाची!

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष म्हणून विराजमान झाले आहेत. 'आय फॉर आय' या न्यायानं जग आंधळं होईल, तसंच अतिरेकी राष्ट्रवादानं जग लुळं-पांगळं होईल, हा धडा इतिहासानं देऊनही ज्यांना समजत नाही, त्यांना असे अध्यक्ष हवे असतात. म्हणून ट्रम्प अध्यक्ष होत असतात.

असे ट्रम्प मग 'अमेरिका फर्स्ट' म्हणतात आणि अमेरिकेलाच कित्येक शतकं मागं घेऊन जातात. 'अच्छे दिन' आले, असं म्हणणारे सगळे ट्रम्प विखार निर्माण करतात. विद्वेष निर्माण करतात.

अमेरिकेतही आता 'भक्त' जन्माला आले आहेत. 

वॉशिंग्टन पोस्टच्या याच लेखावर उमटलेल्या प्रतिक्रिया बघितल्या तरी त्याचा अंदाज येऊ शकतो. 

ज्या ओबामांनी 'We are not Red America or blue America. We are United States of America' असं सांगितलं, रुजवलं, त्याच अमेरिकेचं आताचं दुभंगलेपण ज्या लेखात मांडलं गेलंय, त्यावरची ही प्रतिक्रिया बघा.  'The 'divide' is being created by liberal groups who are hiring these professional protesters.' किंवा ही दुसरी प्रतिक्रिया बघा. 'Agreed....the nation is divided. 
Let's see, who has been president for the last 8 years? OBAMA caused it!!!!!!!'

तिथंही आता फुरोगामी, फेक्युलर वगैरे सुरु झालंय. 

मात्र, तिथं लोक बोलताहेत. जाहीरपणे मांडताहेत. नव्या अध्यक्षांसमोर काय आव्हानं आहेत, यावर चर्चा नाहीए होत. नवे अध्यक्ष हेच अमेरिकेपुढचं आव्हान आहे, असं तिथं विचारी लोक जाहीरपणे मांडताहेत. कलावंत आणि लेखक जाहीरपणे शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घालू शकताहेत. संपादक- पत्रकार थेट विरोधाची भूमिका घेताहेत. 'ट्रम्पना आम्ही अध्यक्ष मानूच शकत नाही. ही अमेरिकाच नव्हे' किंवा 'अमेरिकेला हिटलर मिळाला आहे', अशा शब्दांत लोक निदर्शनं करताहेत. 'आम्ही देश सोडू', असं लेखक जाहीरपणे म्हणताहेत. 'असा उद्दाम माणूस (!) आम्हाला अमान्य आहे', असं हॉलिवूडमधले तारे म्हणताहेत. 'दंगली भडकवेल हा नवा अध्यक्ष', असं म्हणणा-या लेखक-कलावंतांचं ऐकून घेतलं जातंय. ज्यांनी दंगली भडकवल्या, त्यांच्या विरोधात बोलणा-या अनंतमूर्ती अथवा आमीरप्रमाणं ते एकाकी नाहीत. 

'सारे ट्रम्प लोकशाही व्यवस्थेचा फायदा घेत निवडून येतात. म्हणून त्यांना जनमताचा कौल या नावाखाली आम्ही सहन करु शकत नाही', असं एका पत्रकारानं म्हटलंय. पण, अजूनतरी त्याला नोकरी सोडावी लागलेली नाही. 

'अमेरिकामाता की जय' असा जयघोष तिथंही सुरु झालाय. ज्या लष्कराला गेली आठ वर्षं फार काही प्रोजेक्ट मिळाला नव्हता, ते लष्कर आता नव्या संधीची वाट पाहातंय. 

जे आहे ते सगळं भयानक आहे. आजवर झालं ते सगळं चुकलं. आता आपण अमेरिका नव्यानं घडवू, असं ट्रम्प सांगताहेत. प्रत्यक्षात सध्या अमेरिकी अर्थकारणाचं फार बरं चाललंय. गेल्या काही तिमाहींमध्ये अमेरिकी अर्थकारणाचा वेग जोमदार आहे. रोजगारनिर्मिती वाढलीय. ओबामांनी सूत्रं स्वीकारली तेव्हा गलितगात्र असणारी अमेरिका आता सुदृढ झालीय. पण, हे काहीच नाही. मी आता इथं स्वर्ग निर्माण करणार आहे, असं एखाद्या ट्रम्पनं नशेत बरळावं आणि लोकांनी ते नशेत ऐकून उत्तेजित व्हावं, असं तिकडंही सुरु आहे. 

जी अमेरिका जगाच्या श्रमावर आणि बुद्धीवर उभी आहे, जिथं बेरोजगारीचा दर वरचेवर कमालीचा घटतो आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात तर नवे रोजगार अमेरिकी माणसाला मिळाले आहेत, तिथं बाहेरच्यांना घेऊ नका, असं सांगणं हा आत्मघात आहे. पण, नवश्रीमंतांप्रमाणं नववंचित वर्ग आकाराला आलाय. नवश्रीमंत ज्याप्रमाणं स्तिमित करुन टाकावं, अशा वर्गातनं आलेले, तेच नववंचितांचं आहे. त्यांचं आपलं असं समूहकारण विकसित होत असताना, त्यालाही आपल्याच प्रवाहाकडं वळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. विखार हाच मुख्य प्रवाह होत असताना, शहाण्या-समंजस माणसाप्रमाणं बोलणं हा पोलिटिकल इनकरेक्टनेस आहे! भंजाळलेपण ही नव्या जगाची प्रकृती आहे.
ट्रम्प यांनाही संसदेचा अनुभव नाही. ते पहिले असे अध्यक्ष की ज्यांनी रिपब्लिकन पक्षाचा उल्लेखही आपल्या भाषणात केला नाही. सोबत कोण मंत्री असणार, ते स्पष्ट नाही. पण, मी एकटा सारं बदलून टाकेन आणि अमेरिका ग्रेट करेन, असं ते सांगताहेत. एखाद्या बिझनेसमनप्रमाणं त्यांनी अमेरिका नावाची नवी कंपनी खरेदी केली आहे. 

'आपल्याला आपले रोजगार परत मिळवायचे आहेत, आपल्याला आपल्या सीमा परत मिळवायच्या आहेत', असं सांगत ट्रम्प यांनीही आपला मोर्चा सीमेकडं वळवला आहे. इस्लामी दहशतवादाला जगातून हद्दपार करायचं आहे, ही त्यांची घोषणा तर आहेच. त्याशिवाय लष्कराला काम कसं मिळणार? बिजनेसमनचा खिसा कसा भरणार? आणि, देशभर 'ट्रम्प-ट्रम्प' असा घोष कसा निनादणार? 

होय! ट्रम्पसुद्धा अगदी तसेच आहेत. वाचन-लेखन, विचारधारा, विचारवंत, साहित्य, कला, संगीत याच्याशी नातं न सांगणारे. पण ट्रम्प यांच्या रासवटपणाला आत्मविश्वास मानणारे आहेत. ट्रम्पसारख्या वाह्यात वळूला '५६ इंची छाती'चे पुरुषी प्रतीक मानणारेही आहेत. ट्रम्पच्या बेताल, फेकू भाषणांना प्रभावी वक्तृत्व मानणारेही कमी नाहीत. विखार निर्माण करायचा ट्रम्प यांनी. पण, ट्रम्प वृत्तीला विरोध हेही जणू विखाराचे दुसरे टोक आहे, असं भासवण्याचा प्रयत्न तिकडंही सुरु आहे. म्हणजे तीन प्रकारचे लोक लक्षणीय आहेत. एक आक्रमक भक्त. दुसरे ट्रम्पविरोधक. आणि, तिसरे असे 'समंजस' आहेत की, त्यांना ही दोन्ही टोकं सारखीच विखारी वाटतात. आणि, मग ते समतोल संवादाची भाषा करतात. प्रत्यक्षात, समंजस संवाद हवा असेल तर ट्रम्पसारख्या वृत्तींना लोकशाही मार्गाने, पण थेटपणे आणि टोकदारपणे विरोध्च केला पाहिजे! ही सारी चर्चा आता अमेरिकेतही सुरु झाली आहे. 

काही ट्रम्प थेटपणे ग्लोबलायझेशनला विरोध करत, मूलतत्त्ववादी भाषा करत असतात. तर, काही 'मल्टिनॅशनल' ट्रम्प ग्लोबलायझेशनचा फायदा घेत तीच भाषा करताना आपण बघत असतो. या दोन्ही ट्रम्प्समध्ये कॉमन एकच गोष्ट असते. ते एक व्हर्च्युअल शत्रू निर्माण करतात. आणि, आपण विरुद्ध ते अशी झुंज लावतात. मग, स्वप्न दाखवतात विकासाचे. हे असे चुनावी जुमले आपण पाहिले आहेत. चुनावी जुमले पुढे नेणारे ट्रम्प यांचे नवे इमले त्यांच्या अध्यक्षीय भाषणात दिसले!

काय पण योगायोग असतात!

बराक ओबामांच्या निरोपाच्या भाषणाने पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा अजून तशाच आहेत, तोवर ट्रम्प यांच्या भाषणाने आलेला अश्रूंचा पूर ओसरायला तयार नाही!

बराक ओबामांवर आपण खूप प्रेम केलं. पण, आज समजतंय, ओबामांनी नक्की काय दिलं आपल्याला! निरोप देताना भावव्याकुळ झालेल्या अमेरिकी जनतेनं ओबामांना न्याय दिला, पण सारेच ओबामा असे भाग्यवान नसतात! काही ओबामांना न्याय मिळण्यासाठी साक्षात इतिहासालाच साकडं घालावं लागतं!
असो...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com