नवऱ्यासोबत कुटुंबीयांचाही पाठिंबा (श्‍वेता मेहेंदळे)

श्‍वेता मेहेंदळे
मंगळवार, 23 एप्रिल 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने "सेफ्टी झोन" वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "मैत्रीण"या पुरवणीत...

कम बॅक मॉम
स्त्री म्हणजे फक्त चूल आणि मूल, ही संकल्पना आता नाहीशी झाली आहे. आजच्या काळातील स्त्री चार भिंतींच्या पलीकडे जाऊन नवनवीन काम करण्यास पुढे सरसावली आहे. मीही आजच्या काळातील सुशिक्षित आणि नवं काहीतरी करू इच्छिणारी स्त्री आहे. त्यामुळे प्रेग्नंसीनंतर मी माझ्या क्षेत्रात काम करणं थांबवलं नाही. माझा मुलगा आर्य अकरा महिन्यांचा झाला आणि मी अभिनयाला पुन्हा सुरवात केली. कुटुंबाची जबाबदारी वाढली, आई म्हणून बऱ्याच जबाबदाऱ्या हाती आल्या; पण इथवरच आपण थांबायचं नाही, असं ठरवत पुन्हा नव्या जोमानं मी प्रेग्नंसीनंतर कामाला सुरवात केली. माझा नवरा राहुल मेहेंदळेही या क्षेत्रातच काम करतो.

आम्ही दोघं एकाच क्षेत्रात काम करीत असल्यानं त्यानं मला फार सांभाळून घेतलं. प्रेग्नंसीमध्येही मी काम केलं. ‘मोगरा फुलला’ नावाच्या शोचं मी सूत्रसंचालनही केलं. आर्य झाल्यानंतर काही महिन्यांनी मला ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेसाठी विचारणा करण्यात आली. याच मालिकेमधून मी पुन्हा अभिनय क्षेत्रात कम बॅक केलं. माझ्या कामात माझ्या नवऱ्याचा पूर्ण पाठिंबा तर आहेच; पण त्यापेक्षाही घरच्यांचा पाठिंबा असणं खूप महत्त्वाचं आहे आणि तो मला मिळाला. ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’साठी फोन आला तेव्हा मी सासूबाईंना विचारलं. त्यांचं एकच उत्तर होतं, ‘‘मिळालेली संधी सोडू नकोस. तुला समोरून विचारणा होत आहे. तर तू कोणताच विचार करू नकोस. आम्ही आर्यला सांभाळू.’’ मला असं वाटतं, की हे फार कमी जणांच्या बाबतीत घडतं आणि त्यातलीच मी एक आहे. आजही नाटकांचे दौरे मी करते. किमान दहा दिवस तरी दौरे असतात. घराबाहेर मी पाऊल टाकते ते कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळेच. आई होणं म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्मच. पूर्ण आयुष्यच बदलून जातं. पण, आपल्या जोडीदाराचा, घरच्यांचा पाठिंबा मिळाला, की सगळं काही सुरळीत होऊ शकतं, असं मला वाटतं. शिवाय, ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’च्या टीमनंही मला खूप समजून घेतलं. मला चित्रीकरणाच्या वेळेमध्ये सूट दिली होती. आर्य खूपच लहान असल्यामुळे माझ्या सगळ्याच बाजू सांभाळून घेतल्या. प्रेग्नंसीनंतर पुन्हा कम बॅक केल्यावर मला कोणत्याच बाबतीत काहीच त्रास झाला नाही. एकाच प्रकारच्या भूमिका माझ्या वाट्याला येत आहेत, असंही घडलं नाही. अभिनय बोलका असेल, तुम्ही स्वतःला स्लिम फिट ठेवलंत, स्वतःच्या शरीराची-आरोग्याची काळजी घेतल्यास वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका तुमच्याकडे येतील. आताही मी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत काम करीत आहे. या मालिकेमधील माझी भूमिका माझ्या वयाच्याच मुलीची आहे. प्रेग्नंसीनंतर मला फक्त काकूबाईच्या किंवा आईच्याच भूमिका आल्या, अशातला भाग नाही. कलाविश्‍वात वावरत असताना स्वतःला कसं ठेवायचं, हे आपल्या हातात असतं. प्रेग्नंसीनंतर माझ्याकडे काम येईल का किंवा मी काम करू शकेल का, असं मला कधीच जाणवलं नाही. प्रेग्नंसीआधी मी माझं काम जेवढं एन्जॉय करीत होते तेवढंच आता आई झाल्यानंतरही घरातली जबाबदारी वाढल्यानंतरही करते. लहानपणापासून मला आर्यनं कधी त्रास दिला नाही. माझ्या सगळ्याच घरच्यांचा त्याला लळा लागल्यानं मी चित्रीकरणासाठी गेले, तरी त्याच्या हट्टासाठी मला हातातलं काम टाकून घरी परत कधीच यावं लागलं नाही.

काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. आर्य मला खूप दिवसांपासून बोलत होता, ‘आई, मला तुझ्या मालिकेच्या सेटवर यायचं आहे.’ मी एका रविवारी त्याला सेटवर घेऊन गेले. आमच्या मालिकेमध्ये त्याच्या वयाची दोन लहान मुलंही आहेत. त्यामुळे तो सेटवर त्यांच्यामध्ये रमलाही. अभिनेत्री म्हणून काम करीत असताना मुलगी, पत्नी, सून, आई या भूमिका साकारणं तसं सोपं. पण, खऱ्या आयुष्यात या भूमिका साकारताना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. आता आर्य सात वर्षांचा आहे. त्याचं लहानपण मी त्याच्याबरोबर जगले. तो अगदी इयत्ता पहिलीमध्ये असताना मी त्याला शाळेत सोडायला जायचे. त्याच्या शाळेचा पहिला दिवस अजूनही आठवतोय. शिवाय, आपली आई इतर पालकांपेक्षा काहीतरी वेगळं काम करते, टीव्हीवर दिसते, याचा त्याला अभिमान आहे. आम्ही कुठे बाहेर फिरायला गेलो, की लोक आम्हाला भेटायला येतात, आमच्याबरोबर फोटो काढतात. आर्य आमचा मुलगा म्हटल्यावर त्याच्याबरोबरही फोटो काढतात. याची त्याला गंमत वाटते. कामात कितीही व्यस्त असली, तरी पुरेसा वेळ मी त्याच्याबरोबर असते. अभिनेत्री म्हणून काम करीत असताना मी आईपणही तितकंच एन्जॉय करते. 

(शब्दांकन - काजल डांगे)

Web Title: Article Sweta Mehendale come back mom maitrin sakal pune today