कारणराजकारण : ...तर ग्रामीण संस्कृती नष्ट होईल! (व्हिडिओ)

बुधवार, 17 एप्रिल 2019

खेड्यापाड्यांचे स्थलांतर शहरी भागाकडे होत असल्याचे जाणवले. ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे आहेत, ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणावर राजकारण्यांवर अवलंबून आहे. ग्रामीण भागात सहकार आणि शेती क्षेत्राशी नाळ जोडली गेली होती ती नाळ तोडली जाऊ लागल्याने खेडी ओस पडायला सुरवात झाली आणि मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होऊ लागले. 

लोकसभा निवडणुकानिमीत्त सकाळने कारणराजकारण ही मालिका सोशल मिडियावर घेतली. त्यास प्रतिसादही उत्तम मिळाला. मालिकेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग फिरता आला. खेड्यापाड्यांचे स्थलांतर शहरी भागाकडे होत असल्याचे जाणवले. ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे आहेत, ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणावर राजकारण्यांवर अवलंबून आहे. ग्रामीण भागात सहकार आणि शेती क्षेत्राशी नाळ जोडली गेली होती ती नाळ तोडली जाऊ लागल्याने खेडी ओस पडायला सुरवात झाली आणि मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होऊ लागले. 

इंदापूर तालुक्‍यातल्या निरवांगी, निमसाखर आदी 22 गावांमध्ये गावांमध्ये पिण्याचं पाणी विकत घेण्याची वेळ गावकऱ्यांवर आहे. जवळून वाहणाऱया निरा नदीला वाळूमाफियांनी नष्ट करून टाकले आहे. येणाऱ्या काळात ही गावे दुष्काळाने होरफळून गेलेली दिसतील. जवळच पुण्यासारख्या शहराकडे स्थलांतर होईल. गावातील एक गृहस्थ सांगत होते की, नव्या पिढीतील 100-125 पोरं असतील पुण्यात अन्‌ मुंबईला. बेरोजगारी, पाणी प्रश्न असे अनेक स्थानिक प्रश्न आहेत ज्या कारणाने या वर्गाला गाव नकोय. फोर-जी फाईव्ह-जीच्या जमान्यातही मोबाईलला तुरळक ठिकाणी ग्रामीण भागात रेंज मिळते. डिजिटल इंडियाचे नेटवर्क आपण खेड्यांपर्यंत पोहचवू शकलेलो नाहीत. गावात 50-60 वर्षांच्या ग्रामस्थांची संख्याच जास्त दिसते. 

ग्रामीण भागात रस्ते, पाणी, वीज, आरोग्याच्या सोयीसुविधा यासाठी लोक झगडत आहेत. काही भागात रस्त्यांच्या दुर्दशेमुळे ताशी 10-20 किमीपेक्षा जास्त प्रवास शक्‍य नाही. ही परिस्थिती कशामुळे उद्भवली! लागेबांधे सांभाळण्यासाठी राज्यकर्ते काहीही करू शकतात या एका वाक्‍यात या प्रश्नाचे उत्तर सापडते. 

ग्रामस्थ काय करतात हा प्रश्न उरतोच, ज्याचे राजकारण्यांशी आणि राजकारणाशी काही लागेबांधे नाही, असे लोक ही परिस्थिती पाहण्यापलीकडे काहीच करत नाहीत. तर, जे स्वताला कार्यकर्ते म्हणवून घेतात. ते आपल्या स्थानिक मुद्यांवर किंवा महत्वाच्या प्रश्नावर थेट बोलत नाहीत. ते बोलतात आपल्या नेत्यांसाठी आपण ज्या पक्षाचा झेंडा हातात घेतला आहे त्या पक्षासाठी! नेते फक्त निवडणुकांपुरते येणार तुमच्यावर आश्वासनांची खैरात करणार, निवडणुका संपणार प्रश्न 'जैसै थे'च राहणार ! मग शिकलेली पोरं मार्ग शोधण्याच्या नादात शहराकडं वळण घेणार. परिणामी खेडीपाडी ओस पडायला सुरू होणार !