तुम्हाला सतत कोणता आजार झाल्याचे वाटते का? मग, जरा काळजी घ्याचं

Tension
Tension

‘सर, नक्की तोंडाचा कर्करोग नसेल ना? तशा पुण्यातले सगळे डॉक्‍टर्स झालेत म्हणा. सगळे ठामपणे सांगताहेत, काही नाहीये म्हणून; पण माझी खात्री पटत नाहीय. सरळ मुंबईला जाऊन टाटाला दाखवू का? मला वाटतंय की काहीतरी गंभीर आहे नक्की! माझ्या एका मित्राला सेम लक्षणं होती आणि...’’ अजय माझ्यासमोर काकुळतीला आला. शेजारी त्याची पत्नी डोक्‍याला हात लावून बसली होती. 

अजयच्या तोंडामध्ये उष्णतेमुळे फोड आले होते. वारंवार येत होते. शहरातल्या नामांकित डॉक्‍टर्सनी निर्वाळा दिला होता की, कुठलाही गंभीर आजार नाहीये; पण अजयच्या मनातली भीती जात नव्हती. त्याचं दैनंदिन रुटीन कमालीचं डिस्टर्ब झालं होतं. त्यामुळे घरच्यांचं मन:स्वास्थ्य हरवलं होतं. काही काळापूर्वी छाती भरून आल्यासारखं वाटत होतं. डॉक्‍टरांनी निदान केलं, अपचनामुळे होतंय; पण याला हार्ट-अॅटॅक लक्षणं वाटली. तेव्हाही बरेच डॉक्‍टर्स झाले. कामावर दांड्या आणि प्रचंड पैसे खर्च झाले; पण याचं समाधान होत नव्हतं. हे नसलेल्या कॅन्सर आणि हृदयरोगाच्या काल्पनिक भीतीचं झाल्यावर अंगावर एक पांढरा डाग दिसला. लगेच मला कोड नसेल ना, ही भीती आणि स्कीनचे डॉक्‍टर्स सुरू झाले. 

काय झालं काय होतंय अजयला? आणि असे बरेच अजय हल्ली का दिसतात? आपण सर्वच कधी ना कधी आजारी पडतो किंवा कधीकधी आपल्याला गंभीर आजारी पडू की काय, अशी भीती वाटते. डॉक्‍टरांशी बोललो, त्यांनी समजावलं की, ही भीती नाहीशी होते; पण काही व्यक्तींच्या बाबतीत ही भीती एक मोठा प्रॉब्लेम बनून जाते. यामुळे त्यांचं दैनंदिन जीवन काळोखून जातं. त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्ती, नातेवाईक वैतागून जातात. समजावून सांगूनही आपल्याला काहीतरी भयंकर, गंभीर दुखणं झालंय आणि त्याचं डॉक्‍टरांना निदान होत नाहीय, ही समजूत(गैर) झालेली असते.

मुळात दुखणं मनाशी संबंधित असतं. या अस्वस्थतेच्या आजाराला DSM (Diagnostic Statistical Manual) नुसार Hypochondria किंवा Illness Anxiety Disorder म्हणतात. यामध्ये कधीकधी कुठलंच शारीरिक लक्षण वास्तवात नसू शकतं किंवा सामान्य शारीरिक संवेदना गंभीर आजाराची लक्षणं वाटतात.  

तज्ज्ञांनी काहींही नसल्याचा निर्वाळा दिला तरी यांची समजूत पटत नाही. मुख्य म्हणजे हे चक्र एका आजाराच्या लक्षणांच्या शक्‍यतेची भीती वाटून गेल्यावर दुसऱ्या आजाराच्या लक्षणांची शक्‍यता, या पद्धतीने चालूच राहते. काहीवेळा एकाच आजाराची तक्रार चालू राहते आणि व्यक्ती सातत्याने काळजी आणि मृत्यूची भीती या दडपणाखाली वावरते. काहीवेळा comorbidity असू शकते. म्हणजे panic disorder आणि hypochondria. या disorders ची मुख्य लक्षणे - आपल्याला गंभीर आजार झाला आहे किंवा होणार आहे, याची कुरतडणारी काळजी. किरकोळ लक्षणे किंवा शरीरातील नैसर्गिक संवेदनांना गंभीर आजाराची पूर्वसूचना समजणे. वारंवार डॉक्‍टर बदलणे आणि वारंवार टेस्ट्‌स करत राहाणे. वर्तमानपत्रे, टी.व्ही.वरील आजारासंदर्भातील बातम्या तसेच वैद्यकीय चर्चांना घाबरणे. विविध साइट्‌सवर दिलेली आजाराची लक्षणे आपल्याला लागू होताहेत का, हे सारखं ताडून पाहणे. आपल्या कुटुंबीयांत किंवा पूर्वीच्या पिढ्यांत असलेला कुठलाही आजार आपल्याला होईल ही भीती बाळगणे. आपल्याला आजार होईल, या भीतीने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे. सततच्या काळजीने दैनंदिन जीवन नीट जगता न येणे. 

या disorderचा त्रास - अशा व्यक्ती स्वत: त्रस्त असतातच; त्रास खूप वाढला तर नैराश्‍याचा आजार जडू शकतो. स्वस्थता मिळवण्यासाठी व्यसनांचा मार्ग काही व्यक्ती अवलंबतात. सततच्या वैद्यकीय चाचण्यांमुळे प्रचंड आर्थिक फटका कुटुंबाला बसू शकतो. नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी कार्यक्षमता कमी होत जाणं हे घडतं.  

Disorder ची कारणं - अनुवांशिकता, मेंदूतील रासायनिक असंतुलन, व्यक्तित्त्वाम‍मधले दोष, जवळच्या नातेवाइकाचा वा व्यक्तीचा गंभीर आजारामुळे झालेला मृत्यू, त्यामुळे बसलेला धक्का. 

उपाय -  औषधांबरोबर psychotherapies आवश्‍यक ठरतात. समुपदेशनाबरोबर, Exposure थेरपी, तणाव नियोजनाची तंत्रे, स्वस्थतेची तंत्रे तसंच CBT उपयोगी ठरते. CBTमध्ये आपल्याला गंभीर आजार असण्याच्या शक्‍यतेच्या भीतीची कारणं शोधली जातात. शारीरिक संवेदनांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवलं जातं. विचारपद्धतीत दुरुस्ती केली जाते. अनाठायी काळजीचा दुष्परिणाम आपलीच तब्येत बिघडण्यात आणि कुटुंबीयांचे मानसिक, शारीरिक स्वास्थ्य बिघडण्यात कसा होतो, याची जाणीव करून दिली जाते. 

ताणतणावाला तोंड कसं द्यायचं याचं प्रशिक्षण दिलं जातं. गर्दी, समारंभ टाळण्याची निर्माण झालेली प्रवृत्ती नाहीशी करण्याचा प्रयत्न केला जातो. भीतीला तोंड देण्याचा प्रयत्न कसा करायचा, हे शिकवलं जातं. कामातील एकाग्रता आणि आनंद परत मिळवणं आणि वाढवण्याची तंत्रे शिकवतात. ती प्रत्यक्ष वापरण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. 

The best cure for hypochondria is to forget about your body and get interested in someone else's 
- Goodman Ace 

गुडमन एसच्या या वाक्‍यातील विनोदाचा भाग सोडला तरी थेरपिस्टच्या मदतीबरोबर, व्यक्तीनं स्व-मदत करणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. तरंच या लक्षणांकडे दुर्लक्ष करायला आणि त्यांच्यावर मात करायला आपण शिकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com