पिढ्या माणसांच्या आणि मोबाईलच्या... (अतुल कहाते)

अतुल कहाते akahate@gmail,com
Sunday, 13 December 2020

फोनचा प्रवास वेगवेगळ्या पिढ्यांचा आहे. देशात गेल्या काही वर्षांत  जिओनं दूरसंचार क्षेत्रात जी विलक्षण उलथापालथ घडवली ती चौथ्या पिढीमधल्या (‘फोर-जी’) तंत्रज्ञानाच्या आविष्कारानं. आता याच कंपनीनं ‘फिफ्थ जनरेशन (फाईव्ह-जी) या गटात आपण पुढच्याच वर्षी उडी घेणार असल्याचं जाहीर केल्यामुळे देशभर नवी चर्चा सुरू झाली. काय आहे हे तंत्रज्ञान ? काय बदल होतील यानं ? जगात काय परिस्थिती आहे. याबद्दलचा वेध...

फोनचा प्रवास वेगवेगळ्या पिढ्यांचा आहे. देशात गेल्या काही वर्षांत  जिओनं दूरसंचार क्षेत्रात जी विलक्षण उलथापालथ घडवली ती चौथ्या पिढीमधल्या (‘फोर-जी’) तंत्रज्ञानाच्या आविष्कारानं. आता याच कंपनीनं ‘फिफ्थ जनरेशन (फाईव्ह-जी) या गटात आपण पुढच्याच वर्षी उडी घेणार असल्याचं जाहीर केल्यामुळे देशभर नवी चर्चा सुरू झाली. काय आहे हे तंत्रज्ञान ? काय बदल होतील यानं ? जगात काय परिस्थिती आहे. याबद्दलचा वेध...

‘आजच्या पिढीतली मुलं म्हणजे...’ अशा प्रकारची वाक्यं प्रत्येक पिढीमधले लोक वापरत असतात. पिढीची ही संकल्पना आता फक्त माणसांच्या पिढ्यांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. मोबाईल फोनच्या तंत्रज्ञानामध्येसुद्धा सातत्यानं अद्ययावत होत जाणार्‍या तंत्रज्ञानाचं बारसं करण्यासाठी पिढीचीच ही संकल्पना वापरली जाते. म्हणूनच मोबाईल फोनच्या आता येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाला या तंत्रज्ञानाची पाचवी पिढी म्हणजेच ‘फिफ्थ जनरेशन (फाईव्ह-जी)’ म्हणून ओळखलं जातं. नुकतंच रिलायन्स जिओ कंपनीनं या बाबतीमध्ये आपण पुढच्याच वर्षी उडी घेणार असल्याचं जाहीर केल्यामुळे ‘फाईव्ह-जी’चा हा मुद्दा नव्यानं चर्चेला आला आहे. याचा अर्थ या पाचव्या पिढीच्या आधीच्या चार पिढ्या आपण अनुभवलेल्या आहेत. एका मानवी पिढीची सद्दी कैक दशकं चालते; पण मोबाईल फोनच्या तंत्रज्ञानाची एक पिढी मात्र काही वर्षंच तग धरते. नव्या तंत्रज्ञानाच्या आगमनाचा वेग सातत्यानं वाढत चाललेला असल्यामुळे हे घडतं. म्हणूनच आपण अजून नीटपणे या तंत्रज्ञानाच्या चौथ्या पिढीशी ‘फोर्थ जनरेशन (फोर-जी)’ जेमतेम जुळवून घेतलेलं असताना या पाचव्या नव्या पिढीची नांदीही आपल्याला खुणावते आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एकीकडे मोबाईल फोनचं तंत्रज्ञान पहिल्या ते पाचव्या पिढीकडे वेगानं जात असलं तरी त्यात दुर्लक्षित होत असलेला एक अत्यंत रंजक भाग आपण हे तंत्रज्ञान कशा प्रकारे वापरतो हा आहे. मुळात ‘फोन’ हा शब्द ऐकला की अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत “आपण कुणाशी तरी बोलण्यासाठी हे उपकरण वापरायचं” यापलीकडे आपल्याला त्यासंबंधी काही जाणवत नसे. आता मात्र ‘फोन’ या उपकरणाची व्याख्याच समूळ बदललेली आहे. फोन करून कुणाशी तरी बोलायचं हा फोनच्या अनेक वापरांपैकी एक आणि अनेक जणांच्या बाबतीत तर दुय्यम झालेला प्रकार आहे! शहरी भागांमध्ये तरी अनेक लोकांचे फोन आता एकदम ‘स्मार्ट’ झाले आहेत. साहजिकच बोलण्यासाठी कमी आणि इतर असंख्य गोष्टींसाठी जास्त; असा फोनचा वापर जागोजागी सुरू आहे. आपल्या फोनमध्ये जगभरातले बव्हंशी लोक एकाच वेळी डोकं खुपसून बसलेले असण्याचं दृश्य काही वर्षांपूर्वी कुणी कल्पिलंही नसतं. आता मात्र ते आपल्याला हटकून दिसतं. अगदी घरामध्येही जास्तीत जास्त माणसं आपापल्या फोनमध्ये बुडून गेलेली असतात. हा बदल घडण्यामागेसुद्धा मोबाईल फोनच्या नवनव्या पिढ्या वेगानं अवतरत राहण्याचा मोठा वाटा आहे. या वेगानं जर ते घडलं नसतं तर कदाचित स्मार्टफोनची कल्पनाही तंत्रज्ञांना सुचली नसती आणि आपोआपच फोन हे उपकरण पूर्वीसारखं एकमेकांशी बोलण्यासाठीचं साधन म्हणूनच ओळखलं गेलं असतं.

Image may contain: one or more people, text that says "x 5G"

आधीच्या पिढ्या 
पहिल्या पिढीतले (”वन-जी‘) मोबाईल फोन खरंच असेच होते! साधारणपणे १९८० च्या दशकामध्ये हे फोन काही प्रगत देशांमध्ये वापरले जात. अर्थातच त्यांचा वापर खूप  मर्यादित होता. तसंच त्यांच्याद्वारे संभाषण साधणं म्हणजे एक मोठी कसरतच असे. मोठाल्या आकारांचे हे जड फोन वापरायलाही अजिबात सुटसुटीत नव्हते. फोन लागलाच तर तो मध्येच खंडीत होणं ही हमखास घडणारी गोष्ट होती. (गंमत म्हणजे तिथून आपण आता पाचव्या पिढीकडे जाण्याची भाषा जवळपास चार दशकांनंतर करत असूनही या बाबतीतलं साम्य आपल्याला आत्ताही आढळतं!). दुसऱ्या पिढीमध्ये (‘टू-जी‘) १९९० च्या दशकात दोन महत्त्वाची तंत्रज्ञानं अवतरली. पहिलं तंत्रज्ञान होतं जीएसएमचं आणि दुसरं सीडीएमएचं. जीएसएमचं तंत्रज्ञान इतकं यशस्वी ठरलं की अजूनही भारतातले बव्हंशी फोन या जीएसएमवरच चालतात.

पहिल्या आणि दुसर्‍या पिढीमधला मुख्य फरक म्हणजे पहिली पिढी जुन्या अॅनॅलॉग प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करत असे; तर आता दुसऱ्या पिढीमध्ये आधुनिक डिजिटल तंत्रज्ञान आलं. जसं आपण टेपरेकॉर्डरमधल्या कॅसेट्स किंवा व्हिडिओ प्लेअरमधल्या व्हिडिओ कॅसेट्सपासून आधी सीडी आणि त्यानंतर डीव्हीडी यांच्याकडे आलो; तसं. अॅनॅलॉगकडून डिजिटलकडे जायचं म्हणजे प्रचंड मोठा बदल असतो. माहिती साठवण्याची, ती एकीकडून दुसरीकडून नेण्याची आणि त्याच्या वेगाची अशा अनेक गोष्टींच्या क्षमता कैकपटींनी वाढतात. यामधला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या बदलामुळे मानवी बोलणं, लिखित संदेश, इंटरनेटवरचा मजकूर, ध्वनी, व्हिडिओ, चित्र या सगळ्या निरनिराळ्या प्रकारच्या माहितीच्या प्रकारांच्या साठवण्यामधले तांत्रिक फरक नष्ट होतात. सगळंच आता डिजिटल होतं. म्हणजेच सगळं आपण संगणकीय यंत्रणांच्या ०-१ च्या भाषेत साठवू, नेऊ-आणू शकतो. स्वाभाविकपणे तंत्रज्ञानामधल्या अनेक अडचणीही दूर होतात. ते सगळं खूप सुलभ होऊन जातं. म्हणूनच याच पिढीमध्ये आवाजी फोन कॉल्स आणि एसएमएस हे लिखित संदेश अशा दोन वेगवेगळ्या माध्यमांमधल्या गोष्टी शक्य झाल्या. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुसर्‍या पिढीमधल्या सीडीएमएम तंत्रज्ञानाकडून खूप आशा असल्या तरी प्रत्यक्षात मात्र ते अपयशी ठरलं. जीएसएम सुरुवातीला युरोपमध्ये आणि सीडीएमए अमेरिका तसंच जपान इथे अशी विभागणी झाली खरी; पण लवकरच जीएसमएनं सीडीएमएवर जवळपास सगळीकडे मात केली. सीडीएमएचं तंत्रज्ञान खरं म्हणजे जीएमएमच्या तंत्रज्ञानापेक्षा जास्त चांगल्या दर्जाचं मानलं जाई; पण जीएमएमच्या मागे अनेक मोठ्या कंपन्यांचा भरभक्कम पाठिंबा उभा राहिला, जीएमएम तंत्रज्ञानाशी संबंधित असलेल्या अनेक गोष्टींच्या नियमावली वेगानं प्रमाणित झाल्या आणि जीएसएम झपाट्यानं पुढे गेलं. भारतात अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनीनं सीडीएमए तंत्रज्ञान आणून क्रांती घडवण्याचा संकल्प सोडला खरा; पण काही वर्षांमध्ये त्यांचा हा प्रयत्न साफ फसल्याचं दिसून आलं. 

यानंतरच्या तिसर्‍या पिढीमध्ये (‘थ्री-जी’) स्मार्टफोनमध्ये वापरल्या सगळ्या गोष्टींसाठीच्या सुविधा आल्या. आता लोक आपला स्मार्टफोन वापरून चित्रं, व्हिडिओ अशा गोष्टींचा आनंद घेऊ शकायला लागले. नव्या शतकाच्या जन्माबरोबरच या नव्या पिढीतल्या तंत्रज्ञानानं लोकांना वेडं करून सोडलं. संगणक किंवा लॅपटॉप वापरूनच ज्या गोष्टी लोक इतके दिवस करू शकायचे ते आता आपला स्मार्टफोन हातात धरून अगदी सहजपणे करायला लागले. 

भारतात जिओनं दूरसंचार क्षेत्रात जी विलक्षण उलथापालथ घडवली ती यापुढच्या चौथ्या पिढीमधल्या (‘फोर-जी’) तंत्रज्ञानाच्या आविष्कारानं. आता लोकांना आपल्या स्मार्टफोनवरून नेटफ्लिक्स, अॅमॅझॉन प्राईम यांच्यासारखे कार्यक्रम बघणं, व्हॉट्सअॅपपासून इतर अनेक सुविधांचा वापर करून व्हिडीओ कॉल्स करणं, टीव्ही चॅनेल्स ‘लाईव्ह’ बघणं, अत्यंत खर्‍याखुर्‍या वाटतील अशा भन्नाट गेम्स अनेक जणांबरोबर इंरनेटवरून खेळणं, व्हिडिओकॉन्फरन्सिंग करणं अशा असंख्य गोष्टी शक्य झाल्या. जिओनं आपल्या प्रतिस्पर्ध्यांना खिळखिळं करून सोडलं. काही कंपन्या बंद पडल्या, काही एकत्र आल्या, काहींना आपल्या व्यवसायाचं रूप पार बदलून टाकावं लागलं. लवकरच प्रतिस्पर्धी कंपन्यांनासुद्धा या चौथ्या पिढीमधल्या सुविधा आपल्या ग्राहकांना पुरवण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. 

मोबाईल फोनचं तंत्रज्ञान चौथ्या पिढीमध्ये जात असतानाचा एक महत्त्वाचा बदल म्हणजे आता फोन वापरण्याचं जे मुख्य कारण असतं त्या कारणासाठी; म्हणजे फोन करण्यासाठी; आपण कुठलंही शुल्क आकारणार नाही असं जिओनं जाहीर केल्यामुळे इतर कंपन्यांनाही जाहीर करावं लागलं. ही मोठी गंमतच आहे. जेमतेम ३० वर्षांमध्ये अत्यंत महाग दरानं कॉल करून बोलावं लागणार अशा सुरुवातीपासून फुकट कॉलपर्यंत मोबाईल तंत्रज्ञान गेलं. याचं कारण म्हणजे आधी म्हटल्याप्रमाणे मुळात मोबाईल फोनचा वापरच लोक बोलण्यासाठी निमित्तमात्र प्रकारे करायला लागले. इतर सगळ्या सुविधा वापरणं आणि इंटरनेट तसंच सोशल मीडिया यांचा धुमाकूळ यामुळे लोक त्यातच बुडून गेले. मोबाईल फोन हे त्यासाठीचं प्रमुख साधन बनलं. आपोआपच फोनची व्याख्याही बदलत गेली. लिखित, तुटक आणि चित्रमय भाषा वापरून लोकांचा एकमेकांशी संवाद वाढत गेला. 

या पार्श्वभूमीवर आपण आता मोबाईल फोनच्या तंत्रज्ञानाच्या पाचव्या पिढीच्या (‘फाईव्ह-जी’) काळात उभे आहोत. सुरुवातीला फाईव्ह-जी म्हणजे नेमकं काय; याचा विचार करू. मोबाईल तंत्रज्ञानाची नवी पिढी अवतरली की त्यामध्ये आधीच्या पिढीच्या मानानं खूप जास्त वेगानं माहिती आणि आवाज एकीकडून दुसरीकडे नेण्याची क्षमता येते. म्हणजेच थ्री-जीकडून फोर-जीकडे येताना ही क्षमता खूप वाढली; आता फोर-जीकडून फाईव्ह-जीकडे जाताना ती आणखी कैकपटींनी वाढेल. साहजिकच आपल्याला नेटफ्लिक्स, टीव्ही, व्हिडिओ कॉल्स, यूट्यूब, गेमिंग वगैरेंमध्ये आणखी जास्त स्पष्टता जाणवेल. सगळंच ‘हाय डेफिनिशन (एचडी)’सारखं अत्यंत स्पष्ट, ठळक, बारकाव्यांनिशी दिसायला लागेल. एखादी मोठी फाईल डाऊनलोड करायला सध्या तीन मिनिटं लागत असतील तर फाईव्ह-जीमध्ये त्यासाठी कदाचित तीन सेकंदही पुरतील. 

पण फाईव्ह-जी म्हणजे एवढंच नाही! आता अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून अमेरिकेमधला एखादा ह्रदयरोगतज्ज्ञ पुण्यामधल्या रुग्णावर आपल्या ठिकाणाहूनच शस्त्रक्रिया करू शकतो. हे कसं शक्य आहे? तर त्या ह्रदयरोगतज्ज्ञाला रुग्णाची पुण्यामधली स्थिती व्हीडिओ/ऑडिओ यांच्या साहाय्यानं ‘लाईव्ह’ दिसत असते. आपल्या समोरच्या स्क्रीनवरच्या या रुग्णाच्या ह्रदयावरची शस्त्रक्रिया हा ह्रदयरोगतज्ज्ञ समोरच्या स्क्रीनवरच करतो. म्हणजेच तो अमेरिकेत आणि रुग्ण पुण्यात असं असताना हा ह्रदयरोगतज्ज्ञ पडद्यावर आपल्या हातातली उपकरणं हलवतो. त्यानं ती उपकरणं जशी हलवली असतील त्यांचं अचूक मोजमाप करून पुण्यामध्ये त्या रुग्णाच्या जवळ उभा असलेल्या यंत्रमानवाच्या हातामधली तशीच उपकरणं त्याच प्रकारे हलतात. म्हणजेच अमेरिकेमधला ह्रदयरोगतज्ज्ञ जणू पुण्यामधल्या रुग्णावरच शस्त्रक्रिया करतो! 

कदाचित आपल्याला ही कल्पनेची भरारी किंवा एखादी विज्ञानकथा वाटेल; पण आता तंत्रज्ञानाच्या मदतीनं निदान साध्या स्वरुपाच्या अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया होऊ शकतात. अर्थातच त्यासाठी विलक्षण वेगानं माहिती एकीकडून दुसरीकडे गेली पाहिजे. उदाहरणार्थ अमेरिकेमधल्या ह्रदयरोगतज्ज्ञानं आपल्या हातामधली शस्त्रक्रियेची उपकरणं हलवल्यानंतर अत्यंत जलदपणे तशीच हालचाल पुण्यामधल्या यंत्रमानवाकडूनही झाली पाहिजे. म्हणजेच अमेरिकेमधून पुण्यामध्ये येणारा माहितीचा संदेश अत्यंत झपाट्यानं आला पाहिजे. एक वेळ आपण टीव्ही बघताना मध्येच चित्र किंवा आवाज यातलं काही अडकलं तर आपण तेवढ्यापुरते वैतागून जाऊ; पण त्यानं त्यापलीकडे फार नुकसान होणार नाही. इथे मात्र अक्षरश: माणसाच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न आहे. साहजिकच यामध्ये माहिती एकीकडून दुसरीकडे अक्षरश: डोळ्यांची उघडझाप होण्याच्या आत गेली पाहिजे. 

ऑग्मेंटेड रिअॅलिटी (एआर) - माहिती एकीकडून दुसरीकडे जाण्याचा वेग वाढत गेला की त्याबरोबर तंत्रज्ञ नवनव्या संकल्पनांना कसा जन्म देतात याचं हे ठळक उदाहरण झालं. या उदाहरणामध्ये ‘ऑग्मेंटेड रिअॅलिटी (एआर)’ नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हे तंत्रज्ञान सध्याही अस्तित्वात आहे; पण त्यात फाईव्ह-जीच्या वेगाची झिंग मिसळल्यावरच खरी बहार येईल. याचं वैद्यकीय उदाहरण आपण वर बघितलंच; पण त्याची इतर काही उदाहरणं तर आपण अनुभवलेलीच आहेत. फक्त आपल्याला ‘हे म्हणजे एआर’ असं माहीत नसतं. काही वर्षांपूर्वी भारतात सगळीकडे एक गेम खूप लोकप्रिय झाली होती. पुण्या-मुंबईतसुद्धा कित्येक तरुण-तरुणी आपल्या हातामधला स्मार्टफोन बघत बघत त्यात काहीतरी टिपण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. बर्‍याच जणांना हा काय प्रकार आहे हे नक्की समजत नव्हतं. थोडी चौकशी केल्यावर ‘पोकेमॉन गो’ नावाची गेम हे तरुण-तरुणी खेळत असल्याचं त्यांना समजलं. हा नेमका प्रकार तरी काय होता? 

ज्या स्मार्टफोनमध्ये ही गेम इन्स्टॉल करण्यात आली होती त्या गेमच्या स्क्रीनमधून गेम खेळणार्‍याला समोरचं खरोखरचं दृश्य दिसत असे. उदाहरणार्थ समजा एखादा मुलगा आपला स्मार्टफोन हातात धरून या गेमच्या स्क्रीनकडे बघत कमला नेहरू पार्कमध्ये चालत असेल तर त्याला खरोखरच तिथली झाडं, चालणारे लोक, खेळणारी मुलं हे सगळं दिसत असे. यापुढची गंमत म्हणजे गेमनं त्या गेम खेळणार्‍याचं ठिकाण त्याच्या स्मार्टफोनच्या ‘लोकेशन’वरून टिपलेलं असे. त्यामुळे हा मुलगा आत्ता कमला नेहरू पार्कमध्ये आहे हे गेमला समजायचं. त्याबरोबर कमला नेहरू पार्कमध्ये ‘ट्रेझर हंट’सारख्या काही वस्तू लपवून ठेवल्याचं ही गेम त्या मुलाला भासवायची. हा मुलगा बागेत फिरत राहिला की त्याला यापैकी काही वस्तू गेमच्या स्क्रीनमध्ये दिसायला लागतील. म्हणजेच प्रत्यक्षातल्या बागेत ही गेम आभासी वस्तू पेरल्यासारखं त्या मुलाला भासवेल. तो मुलगा गेमच्या या स्क्रीनमधून त्या वस्तू टिपत राहण्याचा प्रयत्न करेल आणि आपली ‘ट्रेझर हंट’ पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. साहजिकच अनेक मुलं-मुली या गेमला पार भुलून गेले होते. प्रत्यक्षात हा ‘एआर’ तंत्रज्ञानाचाच अविष्कार होता. 

हे एआरचं तंत्रज्ञान म्हणजे आधीच्या व्हीआर तंत्रज्ञानाची पुढची पायरी. व्हीआर (व्हर्च्युअल रिअॅलिटी) तंत्रज्ञानाचं सर्वोत्तम उदाहरण म्हणून आपण ‘ज्युरॅसिक पार्क’ या गाजलेल्या चित्रपटाचं उदाहरण घेऊ शकतो. त्यामध्ये खर्‍या दृश्यांमध्ये ज्या बेमालूमपणे तंत्रज्ञांनी डायनॅसॉरची आभासी दृश्यं पेरली होती ते बघून लोक थक्क झाले. खरोखरच डायनॅसॉर अजूनही अस्तित्वात आहे असं कित्येक जणांना हा चित्रपट बघितल्यावर वाटायला लागलं. म्हणजेच वास्तवात आभास अशा सराईतपणे मिसळला गेला होता की वास्तव (रिअॅलिटी) आणि आभास (व्हर्च्युअल) यांच्यामधला फरकच जणू नष्ट झाला होता. म्हणून याला व्हीआर हे नाव देण्यात आलं. 

एआरमध्ये असं आभासी जगाचं व्हीआर तर असतंच; पण त्यात आपणही सामील होतो. म्हणजेच आता आपल्याला फक्त पडद्यावरच डायनॅसॉर दिसेल असं नाही; तर तो कदाचित आपल्याही मागे लागेल (म्हणजे आपल्याला खरोखर तसं वाटायला लागेल). असा विलक्षण आभास समोरचं जग आणि आपलं जग यांचंच आता बेमालूमपणे मिश्रण करून टाकेल. साहजिकच आपण आपल्यासमोरच्या आभासी जगाकडे निव्वळ तटस्थपणे न बघता त्यात प्रत्यक्ष सहभागी होता येईल. म्हणूनच व्हीआरच्या ऐवजी हे सहभाग दर्शवणारं एआर. आपण अमेरिकी ह्रदयरोगतज्ज्ञ पुण्यामधल्या रुग्णावर शस्त्रक्रिया करतानाचं उदाहरण घेतलं ते याच स्वरुपाचं होतं. 

या एआर तंत्रज्ञानामुळे माणूस आणि तंत्रज्ञान यांच्यामध्ये असलेलं अंतर संपुष्टात येऊन दोघं एकमेकांमध्ये मिसळून जातील. अर्थातच त्यासाठी पुन्हा प्रचंड वेगानं माहिती एकीकडून दुसरीकडे जाण्याची गरज आलीच. फोर-जीमध्ये ते शक्य नाही; पण फाईव्ह-जीमध्ये ते घडू शकेल. अनेक कंपन्या त्यासाठी प्रयत्नशील आहेत. वैद्यकशास्त्रापासून करमणुकीपर्यंत असंख्य क्षेत्रांमध्ये या एआरमुळे नाट्यमय घडामोडी घडू शकतील. 

इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) 
फोर-जी तंत्रज्ञानानं माणसा-माणसामधलं संभाषण वेगवान, गंमतशीर, सहज-सोपं बनवलं असं आपण नक्कीच म्हणू शकतो. फाईव्ह-जी याच्या पुढे एक पाऊल टाकेल. या तंत्रज्ञानामध्ये यंत्रं किंवा उपकरणं (म्हणजे ‘थिंग्ज’) एकमेकांशी ‘बोलायला’ लागतील. यातून या यंत्रांचं किंवा उपकरणांचं इंटरनेटचं जाळं अस्तित्वात येईल. म्हणूनच याला आयओटी असं नाव देण्यात आलं. आता हा प्रकार नेमका काय आहे? 

एका तंत्रसाक्षर शेतकर्‍याला समजा पिकाला खूप कमी किंवा खूप जास्त पाणी दिलं जातं या समस्येनं भेडसावलं आहे. त्यानं यासाठी आयओटीचं तंत्रज्ञान वापरायचं ठरवलं तर काय होईल? त्याच्या शेतामध्ये ठरावीक ठिकाणी मातीचा ओलसरपणा, हवेची आर्द्रता अशा अनेक गोष्टी अधूनमधून तपासणारे सेन्सर त्याला बसवता येतील. हे सेन्सर या सगळ्यांच्या पातळ्या मोजत राहतील. ज्या क्षणी या पातळ्या एका मर्यादेच्या खाली आल्या असल्याचं हे सेन्सर टिपतील त्याबरोबर हे सेन्सर आपोआप पाण्याचा पंप सुरू करण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करतील. त्यामुळे पिकांना पाणी दिलं जाईल. पाणीपुरवठा किती वेळ सुरू ठेवायचा आणि तो केव्हा बंद करायचा हे ही यंत्रणाच ठरवेल. सेन्सरनं ही माहिती सातत्यानं टिपत राहणं आणि ती पाण्याच्या पंपाच्या यंत्रणेला पाठवणं हे दोन यंत्रांनी एकमेकांशी संवाद साधण्याचं उदाहरण झालं. म्हणूनच याला आयओटी म्हणतात. 

स्वयंचलित गाड्या 
वर उल्लेख केलेल्या साध्या उदाहरणापासून स्वयंचलित (चालकविरहित) गाड्यांपर्यंत सगळ्या प्रकारच्या अत्याधुनिक यंत्रणा आयओटीच्याच जोरावर चालतात. सर्वसामान्यपणे लक्ष विचलित होणं, डुलकी लागणं, दारू आणि चालकाकडून घडणारी चूक ही अपघात होण्यामागची प्रमुख कारणं मानली जातात. या चारही बाबतींमध्ये स्वयंचलित गाडया महत्त्वाची कामगिरी बजावू शकतात. तसंच या गाडया पूर्णपणे स्वयंचलित असल्याच पाहिजेत असंही नाही; बऱ्याच प्रमाणात त्या स्वयंचलित असू शकतात आणि गरज पडेल तेव्हा मानवी चालक गाडीचा ताबा आपल्याकडे घेऊ शकतो. या संदर्भात विमानांचं उदाहरण उपयुक्त ठरावं. विमान चालवण्यासाठीची स्वयंचलित म्हणजेच ''ऑटो पायलट'' यंत्रणा हळूहळू प्रगल्भ होत गेली. त्याचबरोबर मानवी वैमानिकाचं प्रत्यक्ष काम कमी होत गेलं. आता ही स्वयंचलित यंत्रणा आपलं काम बरोबर करत असल्याची खात्री करणं आणि जेव्हा ते होत नसेल तेव्हा विमानाची सूत्रं आपल्याकडे घेणं हे वैमानिकांचं मुख्य काम बनलं. अर्थातच स्वयंचलित गाडयांच्या संदर्भात इतरही असंख्य अडचणींचा विचार करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ रस्त्यामध्ये वाहनांची प्रचंड गर्दी असल्यामुळे वाहतुकीचे दिवे बंद ठेवून पोलिसांनी वाहतूक नियंत्रित करणं, एखादा रस्ता बंद असणं, अनपेक्षित घटना घडणं, खराब हवामान असणं अशा अनेक गोष्टी निर्णायक ठरू शकतात. तरीसुध्दा ज्या वेगानं गुगल, तेस्ला आणि इतर काही कंपन्यांच्या स्वयंचलित गाडयांनी प्रगती साधली आहे ती बघता निदान काही प्रमाणात तरी गाडयांचं स्वयंचलन नजीकच्या भविष्यात नक्कीच शक्य आहे असं आपण खात्रीनं म्हणू शकतो. 

संगणक, बिनतारी संदेशवहन, वाहनाची सद्यस्थिती अचूकपणे ओळखणं अशा अनेक गोष्टींच्या संदर्भात आता अपूर्व क्रांती झाली आहे. साहजिकच मोटारनिर्मिती करणाऱ्या जवळपास सगळयाच मोठया कंपन्यांनी चालकविरहित गाडया तयार करण्यासाठीची धडपड सुरू केली आहे. गाडयांच्या निर्मितीशी तसा दुरूनही संबंध नसलेली एक कंपनी मात्र खरं म्हणजे या सगळया धडपडीच्या अग्रक्रमी आहे आणि ती म्हणजे गुगल. गेली सहा वर्षं गुगलच्या संशोधन विभागामधला एक गट चालकविरहित गाडी तयार करण्यासंबंधीच्या कामामध्ये गर्क आहे. या गाडीनं आपली मूळ जागा सोडून भलतीकडेच भटकू नये यासाठी रडार आणि कॅमेरे अशी यंत्रणा वापरली जाते. याखेरीज प्रकाशाचा आणि हालचालीचा अंदाज येण्यासाठीही त्यात योग्य उपकरणं बसवली आहेत. अत्याधुनिक जीपीएस यंत्रणा आणि चाकांना जोडलेले सेन्सर्स हेही आहेतच. अर्थातच पुन्हा विलक्षण वेगानं माहिती एकीकडून दुसरीकडे नेण्यासाठी फाईव्ह-जी आहेच! 

वादविवाद 
एकीकडे फाईव्ह-जी तंत्रज्ञान अशा प्रकारच्या अशक्यप्राय शक्यता आता आपल्यासमोर घडवून आणताना दिसत असलं तरी त्याचा प्रवास इतका सोपा नाही. मुळात चीननं या क्षेत्रात आपली मक्तेदारी प्रस्थापित केलेली असताना अचानकपणे जागतिक पातळीवरच्या अनेक घडामोडींमुळे प्रगत देशांसकट भारतानंसुद्धा चीनच्या नावावर फुली मारलेली आहे. आपल्या उपकरणांद्वारे चीन हेरगिरी करतो आणि सगळ्यांवर नजर ठेवून असतो असं मानलं जातं. त्याविषयीचे काही पुरावेसुद्धा मिळालेले असल्यामुळे या सगळ्या देशांनी स्वतंत्रपणे फाईव्ह-जीच्या तंत्रज्ञानावर काम सुरू केलं आहे. त्याच संदर्भात जिओनं केलेली घोषणा महत्त्वाची आहे. अर्थातच चीननं साधलेली प्रगती मोठी असल्यामुळे आता चीनविना हा प्रवास करणं इतर सगळ्या देशांना निश्चितपणे जड जातं आहे; पण त्यातूनही मार्ग निघेलच. कदाचित या सगळ्याला त्यामुळे उशीरही होऊ शकतो. अमेरिकेमध्ये काही ठिकाणी फाईव्ह-जी सुरू झालेलं असलं तरी आपल्याकडे त्यासाठी वेळ लागेल. 

आंतरराष्ट्रीय राजकारणामधल्या वादांखेरीज फाईव्ह-जीच्या तंत्रज्ञानाविषयी घेतला जाणार एक अत्यंत महत्त्वाचा आक्षेप सुरक्षिततेसंबंधीचा आहे. २०१५ साली माहितीच्या सुरक्षिततेच्या दोन अभ्यासकांनी एका जीपचं नियंत्रण स्वत:कडे घेतलं. हे दोघं जण या जीपपासून सुमारे १६ किलोमीटर्स अंतरावर होते! असं असूनही त्यांना हे कसं काय शक्य झालं? त्यांनी या वाहनामध्ये करमणुकीसाठी बसवलेल्या यंत्रणेच्या इंटरनेटच्या जोडणीचं नियंत्रण आपल्या ताब्यात घेण्यात यश मिळवलं! या घटनाक्रमाचा व्हीडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यात जीपचालक अत्यंत घाबरलेला दिसतो. याचं कारण म्हणजे त्याच्या जीपचं नियंत्रण स्वत:कडे घेतलेल्या दुक्कलीनं दुरूनच या जीपची वातानकूल यंत्रणा आपल्याला हवी तशी नियंत्रित करायला सुरुवात केली. तसंच त्यांनी चालक ऐकत असलेल्या रेडिओचं स्थानक बदलून वेगवेगळे कार्यक्रम लावायला सुरुवात केली. याखेरीज त्यांनी या जीपचे वायपर्स सुरू केले आणि काही काळानंतर तर त्यांनी गाडीचं इंजिनच बंद करून टाकलं! लवकरच आयओटीमुळे २ हजार ते साडेसात हजार कोटी उपकरणं एकमेकांना जोडली जातील असं मानलं जात असताना असे प्रसंग आपल्याला निश्चितच हादरवून सोडणारे आहेत! एकूण हे तंत्रज्ञान जगात आणि आपल्या देशात क्रांती घडवणार हे नक्की.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Atul Kahate Generations people and mobiles