जीवनविद्येची ‘भन्नाट शाळा’ ! (डॉ. केशव साठये)

डॉ. केशव साठये keshavsathaye@gmail.com
Sunday, 27 December 2020

आईला वडिलांकडून दिली जाणारी क्रूर वागणूक यामुळे ही मुले बिथरून जातात आणि हे करपलेले बालपण अनेकांना व्यसनात गुरफटून गुन्हेगारी विश्वात आणून सोडते. त्यांना भरकटू न देता समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि एका सभ्य आणि सुसंस्कृत विश्वाचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे करुन देणे या उद्देशाने या ठिकाणी कार्यक्रम निर्मिती होऊ लागली. मुलांच्या  भावविश्वाशी तादात्म्य पावून हे कार्यक्रम तयार केले जात असल्यामुळे ऐकणाऱ्यांना ते आपले वाटतात. कार्यक्रम आणि श्रोते यामधील दरी यामुळे कमी होते. साहजिकच श्रवण अधिक आनंददायी होते.

आईला वडिलांकडून दिली जाणारी क्रूर वागणूक यामुळे ही मुले बिथरून जातात आणि हे करपलेले बालपण अनेकांना व्यसनात गुरफटून गुन्हेगारी विश्वात आणून सोडते. त्यांना भरकटू न देता समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि एका सभ्य आणि सुसंस्कृत विश्वाचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे करुन देणे या उद्देशाने या ठिकाणी कार्यक्रम निर्मिती होऊ लागली. मुलांच्या  भावविश्वाशी तादात्म्य पावून हे कार्यक्रम तयार केले जात असल्यामुळे ऐकणाऱ्यांना ते आपले वाटतात. कार्यक्रम आणि श्रोते यामधील दरी यामुळे कमी होते. साहजिकच श्रवण अधिक आनंददायी होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रेडिओ हे माध्यम हे इतकं विलक्षण आहे की महात्मा गांधी यांच्यासारखे लोकनेतेही आकाशवाणीच्या प्रेमात पडले होते. त्यांनी एकमेव भाषण या माध्यमातून दिले त्याला ही आता ७०-७५ वर्षे झाली. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीत निर्वासितांचे अश्रू पुसण्यासाठी ते बोलले, जनता भारावून गेली आणि गांधीजींही उद् गारले “ या माध्यमात दैवी शक्ती आहे”. हे आज आठवायचे कारण म्हणजे मी नुकतंच ‘भन्नाट शाळा’ या  वेब रेडिओवरचे काही कार्यक्रम ऐकले. मुलांसाठी मुलांना घेऊन, मुलांच्या कलानं हे कार्यक्रम केल्याचं जाणवत होतं. ‘डोळ्यावरचे काढून  झापड नव्याने दुनिया बघेन म्हणतो’ अशा या रेडिओच्या शीर्षकगीताच्या पहिल्या दोन ओळी. त्या ऐकताना श्रोत्यांच्या मनात एक आश्वस्त भाव निर्माण झाल्याशिवाय राहात नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१२ ते १९ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ही एक प्रकारची प्रेरणावाहिनीच  आहे. याची सुरवात व्हायला भारत  सरकारच्या  सांस्कृतिक विभागाची एक अभ्यासवृत्ती  कारणीभूत झाली. डॉ वेदवती जोगी यांनी यात रिमांड होममधल्या मुलांसाठी एक ‘सृजनशीलतेतून शिक्षण’ हा प्रकल्प केला होता. त्याला मिळणारा प्रतिसाद आणि समाजातील वाया गेलेली मुले असा शिक्का बसलेल्या कुमार व किशोरवयीन मुलांसाठी अशा उपक्रमाची असलेली गरज लक्षात घेता याला अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक स्वरूप देण्याचा त्यांनी निर्धार केला आणि या माध्यमांचा दांडगा अनुभव असलेल्या  बिपिनचंद्र चौगुले या जुन्या सहकाऱ्याबरोबर ही ध्वनीयात्रा सुरु केली. या दोघांनी राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या आधीन असलेल्या ५३ शासकीय  बाल सुधारगृहांना व निरीक्षण गृहांना १ जानेवारी २०२० पासून या श्रवणप्रवासात सामील करुन घेतले. राज्यातील बाल सुधारगृहांची सुमारे चार हजार मुले मुली याचा लाभ घेत आहेतच, शिवाय पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सध्या प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम सुरु आहे. इथल्या आठ हजार मुलामुलींनी या भन्नाट  शाळेत ‘प्रवेश’ही  घेतला आहे. प्रतिसाद ही चांगला आहे. अपेक्षा ही  की महाराष्ट्रातील अधिकाधिक  शाळा या माहिती मनोरंजनाच्या विश्वात सामील होतील. या वेब रेडिओवरील कार्यक्रम विनामूल्य उपलब्ध आहेत याचं कारण डॉ. सायरस पूनावाला यांच्यासारखे  देणगीदार  या उपक्रमाला लाभले.

Image may contain: outdoor and nature

सुरवातीला सुधारगृहातील मुले डोळ्यासमोर ठेवून हे कार्यक्रम बनवले जात असत. कार्यक्रमाच्या  निमित्ताने मुलांशी बोलल्यानंतर यांच्या लक्षात आले की घरातील दूषित वातावरण, आईला वडिलांकडून दिली जाणारी क्रूर वागणूक यामुळे ही मुले बिथरून जातात आणि हे करपलेले बालपण अनेकांना व्यसनात गुरफटून गुन्हेगारी विश्वात आणून सोडते. त्यांना भरकटू न देता समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि एका सभ्य आणि सुसंस्कृत विश्वाचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे करुन देणे या उद्देशाने इथे कार्यक्रम निर्मिती होऊ लागली. मुलांच्या  भावविश्वाशी तादात्म्य पावून हे कार्यक्रम तयार केले जात असल्यामुळे ऐकणाऱ्यांना ते आपले वाटतात. कार्यक्रम आणि श्रोते यामधील दरी यामुळे कमी होते. साहजिकच श्रवण अधिक आनंददायी होते. बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार अशा समाजातील नाजूक विषयांवरही हा रेडिओ बोलू लागला. ऐकणारे कधी तल्लीन होतात, कधी अंतर्मुखही. असे बदल एका रात्रीत होणार नाहीत. पण श्रोत्यांच्या प्रतिक्रिया  ऐकल्या की लक्षात येतं की त्यांच्यात हळूहळू वर्तनबदल होतो आहे. आई, बहिण आणि एकूणच स्त्रीचे आपल्या जीवनातील मोल त्यांना लक्षात येऊ लागले आहे. त्यांच्याबद्दलचा आदरभाव जागृत होऊ लागला आहे. पहाट उगवत आहे, पांढरं फुटत आहे.  

गप्पा टप्पा, कथा, नाटक, संगीत अशा पेहरावात  मनोरंजनाची हमी देणारे नादमधूर  कार्यक्रम यावर होतातच शिवाय कायदा, आरोग्य, शिक्षण या विषयात समुपदेशन, व्यवसाय मार्गदर्शन करणाऱ्या आशयसंपन्न कार्यक्रमाद्वारे हा वेब रेडिओ मुलांच्या  सर्वांगीण विकासासाठी झटत आहे. व्यसनात अडकलेल्या मुलांनी निर्धारानी त्यातून मार्ग कसा काढला हे सांगणारी हृदयस्पर्शी मालिकाही इथे ऐकायला मिळते. ’नापासांची शाळा’ या मालिकेत शिक्षण  हे जगण्यातल्या दैनंदिन मूल्यांमध्ये दडलेले असते याचा  सुंदर अविष्कार कानावर पडतो. त्यामुळे आयुष्यात डोळस करणारी ही भन्नाट शाळा मुलांना कधी चुकवावीशी  वाटत नाही. या वेब रेडिओचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे श्रोता आणि सादरकर्ता अशी  विभागणी नाही. श्रोते हेच अनेकवेळा इथे आशय निर्माते असतात. त्यांच्याकडून येणाऱ्या माहितीवर अनेक कार्यक्रमांचा इमला उभारला जातो. त्यामुळे ते कधी सादरकर्ते होतात कधी  स्वतः आर. जे. होऊन कार्यक्रमांची रंगत वाढवतात. 

श्राव्य असो वा दृकश्राव्य या माध्यमाचे यश हे तुम्ही ते कोणत्या भाषेत कार्यक्रम करता, ती भाषा कशी वापरता  यावर अवलंबून असते. ही भाषा औपचारिक नसते केवळ  बोलण्याचीही नसते, ही भाषा असते कार्यक्रमाच्या घटकात मिसळून गेलेली; कार्यक्रमाचे व्यक्तिमत्व होऊन सादर होणारी असते . मुख्यतः मराठी व थोडी हिंदी असे हे कार्यक्रम जेंव्हा आपल्याला ऐकायला मिळतात तेंव्हा ते त्या त्या भाषेचा लहेजा आणि संस्कृती घेऊन येतात. एकूण इथला ऐवज उपयुक्त आणि उत्साहवर्धक आहे .

भन्नाट शाळा हा वेब रेडिओ शाळा व शिक्षणाबद्दल सकारात्मक भावना मनात निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे हे अनेक मुलांच्या प्रतिक्रया ऐकल्यानंतर पटते. दर शुक्रवारी नवा कार्यक्रम उपलब्ध केला जातो. आंतरजालावरील रेडिओचा फायदा हा की तो आपण आपल्या सोयीने त्या संकेतस्थळावर जाऊन हवा तेंव्हा ऐकू शकतो.  http://bhannatshala.in या संकेतस्थळावर तसेच त्यांच्या फेसबुक पेजवरही हा वेब रेडिओ तुम्हाला ऐकता येईल. यासाठी कोणतेही शुल्क अथवा नोंदणीची गरज नाही. 

येत्या १ जानेवारी २०२१ पासून नव्या रूपात भन्नाट शाळा सर्वांसाठी उपलब्ध होत आहे. आज आंतरजालावर व समाज माध्यमांच्या पसाऱ्यात  शेकडो साईट्स उपलब्ध आहेत. या गदारोळात आशयसंपन्न संकेतस्थळाचा शोध घेणे हे अवघड  काम असते. तो शोध इथे नक्की संपेल. लेखाच्या सुरवातीला या वेब रेडिओच्या  शीर्षक गीताच्या दोन ओळी उद्धृत केल्या आहेत. त्याच्या पुढच्या ओळी आहेत  ‘अंधाराशी तोडून नाते आता जरा जगेन म्हणतो’.  अज्ञानरूपी अंधाराशी लढताना ‘भन्नाट शाळा’सारखा  दिवा हातात असला की त्या  प्रकाशमान  वाटेवर चालत  अर्थपूर्ण जगण्याच्या मुक्कामावर पोहोचणे सहज शक्य आहे. भन्नाट शाळेचा हाच तर अभ्यासक्रम आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Dr Keshav Sathye