लढाई कोरोनाच्या लशीची... (डॉ. नानासाहेब थोरात )

डॉ. नानासाहेब थोरात thoratnd@gmail.com
Sunday, 6 December 2020

संपूर्ण जगात कोरोना या आजारावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी चीन देखील लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. भारत, अमेरिका, ब्रिटन आणि रशिया या देशांमध्येही यावर जोरदार काम सुरू आहे. कोरानाचा प्रतिबंध करणाऱ्या या लशी नेमक्या आहेत तरी कशा? आणि त्यामध्ये नेमका फरक काय आहे ?  लस तयार करण्यासाठी जगभर चाललेल्या या प्रयत्नांचा वेध...

संपूर्ण जगात कोरोना या आजारावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी चीन देखील लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. भारत, अमेरिका, ब्रिटन आणि रशिया या देशांमध्येही यावर जोरदार काम सुरू आहे. कोरानाचा प्रतिबंध करणाऱ्या या लशी नेमक्या आहेत तरी कशा? आणि त्यामध्ये नेमका फरक काय आहे ?  लस तयार करण्यासाठी जगभर चाललेल्या या प्रयत्नांचा वेध...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जगात कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण सापडून नुकतेच एक वर्ष होऊन गेले. या एका वर्षाच्या कालावधीमध्ये आजच्या दिवसापर्यंत सहा कोटी पन्नास लाख लोकांना या आजाराची बाधा झाली असून पंधरा लाखापेक्षा अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चीन पासून ते आफ्रिकेतील छोट्या देशातसुद्धा लॉकडाऊन करण्याची वेळ आली. या वर्षीच्या मार्च महिन्यापासून या रोगाला गंभीरपणे घेतले गेले. तेव्हापासून आजपर्यंत जवळपास प्रयोगशाळेत ५० प्रकारच्या लसी विकसित होत असून, १५ लशींच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु असून, ९ लशींच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी चालू आहे. यामध्ये ‘फायझर’या अमेरिकन कंपनीची जर्मनीमध्ये विकसित करण्यात आलेली लस, मॉडर्न कंपनीची अमेरिकेत विकसित झालेली, आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये विकसित झालेली तसेच रशियन कंपनीची स्फुटनिक लस या लशींच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी होऊन त्यांचे परिणामसुद्धा जाहीर झालेत. आजच्या या लेखात आपण भारतामध्ये कोणती लस कधीपर्यंत येतील, वेगवेगळ्या प्रकारच्या या लशींमध्ये नक्की काय फरक आहे, कोणती लस कमीत कमी किमतीमध्ये मिळेल आणि या लसींची परिणमकारकता काय असेल याची मूलभूत माहिती घेऊ.

कोणती लस कोणत्या टप्प्यावर ?
जागतिक पातळीवर सध्या पाच कंपन्यांच्या लशी वेगवेगळ्या देशांच्या सरकारी राष्ट्रीय नियामक प्राधिकरण संस्थांकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत, नेमकेपणानं सांगायचं झालं तर त्यांनी आपत्कालीन मान्यता मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. यामध्ये ‘फायझर’ कंपनीच्या लशीला ब्रिटन सरकारची मान्यता मिळाली असून, पुढील आठवड्यापासून ती लस वयोवृद्ध (८०  वर्षावरील ) लोकांना दिली जाणार आहे. तसेच मॉडर्न कंपनीची लस लवकरच ब्रिटन, युरोप आणि अमेरिकेमध्ये आपत्कालीन मान्यता कायदयानुसार वितरित केली जाईल. रशियन कंपनीच्या स्फुटनिक लसीला रशियामध्ये वितरित करण्याची मान्यता मिळाली असून ती सुद्धा लवकरच वितरित केली जाईल. भारतामध्ये सध्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लस सीरम कंपनी तयार करत असून (कोविशील्ड) या लशीचा तिसरा टप्पा पूर्ण होत आला आहे. या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटकसहित संपूर्ण भारतामध्ये १७ ठिकाणी चालू आहे. कोविशील्ड लसीचा ०.५ मिलीचा पहिला डोस आणि पुन्हा २८-२९ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जात आहे. याचबरोबर सीरम कंपनी (सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) अमेरिकन कंपनी नोव्हावॅक्सने विकसित केलेल्या कोविड -१ या लसीची सुद्धा चाचणी करत आहे.

ऑगस्ट महिन्यामध्ये नोव्हावॅक्स कंपनीने कोविड -१ लसीचे वार्षिक दोन अब्ज डोस तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) बरोबर करार केला आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या साहाय्याने संपूर्णपणे भारतातच विकसित झालेली आणि भारत बायोटेक या कंपनीमध्ये उत्पादित होणारी कोवॅक्सिन या लशीची सुद्धा तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहेत. देशातील हरियाणा, मध्यप्रदेश, दिल्ली, ओडिशा, पश्चिम बंगाल अशा वेगवेगळ्या राज्यातील २२ ठिकाणी २६ हजार जणांवर या लशीचे परिणाम पहिले जातील. रशियामध्ये विकसित झालेली आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटोरीज मध्ये उत्पादित होत असलेली, ‘स्पुटनिक-V’ या लशीचीसुद्धा तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. सध्या, ‘स्पुटनिक-V’ लसीच्या चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यात चार लाख  स्वयंसेवक सहभागी होत आहेत, त्यापैकी २२ हजाराहून अधिकजणांना प्रथम डोस दिला गेला आहे आणि १९ हजारापेक्षा जास्त स्वयंसेवकाना  पहिला आणि दुसरा डोस दिला आहे. याबरोबरच अजून एक स्वदेशी म्हणजे भारतात विकसित झालेली लस अर्थातच झेडस कॅडिलासुद्धा दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी करत आहे.
 
मूलभूत फरक काय !
लस शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणेस विषाणूचा रोग निर्माण करणारा भाग ओळखण्यासाठी प्रशिक्षण देते. पारंपारिक लशींमध्ये एकतर कमकुवत व्हायरस किंवा व्हायरसचे शुद्धीकृत साक्षांकृत प्रथिने असतात. ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रा झेनेका/ सीरम ही लस पारंपरिक पद्धतीनं विकसित केली असून यामध्ये कोरोना व्हायरस स्पाइक प्रोटीन चिंपांझीमधील कोल्ड विषाणू बरोबर जोडलेला आहे. हा अनुवांशिक अभियांत्रिकी केलेला विषाणू रुग्णामध्ये इंजेक्शनने दिला जातोय. हा व्हायरस (विषाणू) निरुपद्रवी असून रुग्णांच्या शरीरावर कोणताही अपाय करू शकत नाही. मात्र  शरीरातील पेशीमध्ये गेल्यानंतर, हा विषाणू कोरोना व्हायरस स्पाइक प्रोटिन्स (प्रथिने) ओळखणारी  प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) करण्यासाठी मदत करतो. त्यानंतर शरीरातील रोग प्रतिकारशक्तीमध्ये असणाऱ्या टी सेल्स (टी पेशी) व्हायरसमुळे संसर्गित झालेल्या सामान्य पेशींना तटस्थ करतात. तसेच शरीरातील रोग प्रतिकारशक्तीमध्ये भविष्यात येणाऱ्या मूळ व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी स्मृती तयार करून ठेवते, त्यामुळे असा व्हायरस आल्यानंतर रोग प्रतिकारशक्ती लगेच त्याला ओळखून बाहेर काढून टाकते आणि आपण कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या संसर्गापासून सुरक्षित राहतो. 

फायजर आणि मॉडर्न लस
फायजर आणि मॉडर्न कंपनीची लस ही एकाच प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. यामध्ये नवीन प्रकारचे ‘एमआरएनए’ तंत्रज्ञान वापरले असून या दोन्ही लशी पारंपरिकपेक्षा वेगळ्या आहेत. या ‘एमआरएनए’ तंत्रज्ञानामध्ये व्हायरल प्रोटीन इंजेक्शन देण्याऐवजी एखाद्या व्यक्तीला अनुवांशिक साहित्य ‘एमआरएनए’ मार्फत दिले जाते. हे एमआरएनए व्हायरल प्रोटीन एन्कोड करते. जेव्हा या अनुवांशिक सूचना शरीराच्या वरच्या बाह्य भागात इंजेक्ट केल्या जातात तेव्हा स्नायू पेशी त्यांचे शरीरात थेट व्हायरल प्रोटीन तयार करण्यासाठी मदत करतात. हा दृष्टीकोन कोरोना व्हायरस निसर्गात काय करतो याची नक्कल करतो. एमआरएनए शरीरामध्ये केवळ कोरोनाव्हायरस प्रोटीनचे गंभीर  घटक कोड करते यामुळे रोगप्रतिकारक यंत्रणेस रोगाचा उद् भव न घेता वास्तविक कोरोना व्हायरस कसा दिसतो याचे पूर्वावलोकन मिळते. हे पूर्वावलोकन प्रतिरक्षा प्रणालीस शक्तिशाली अँटीबॉडीज डिझाइन करण्यास वेळ देते जे एखाद्या व्यक्तीस संसर्ग झाल्यास वास्तविक व्हायरस निष्प्रभ करू शकते. एमआरएनए शरीरामध्ये छोट्या लिपिड कणांमध्ये बसवून शरीरामध्ये इंजेक्ट केले जातात. 

रशियन स्पुटनिक-V लस हिसुद्धा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीसारखीच तंत्रज्ञान वापरून तय्यार केली आहे. तर भारत बायोटेकच्या म्हणण्यानुसार, त्याची कोव्हॅक्सिन ही एक निष्क्रिय लस आहे जी नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ व्हायरॉलॉजि (एनआयव्ही )द्वारे विभक्त केलेल्या कोरोना व्हायरस भागापासून विकसित केली आहे. विशेषत: लशीचे स्वरूप किंवा ते कसे विकसित केले गेले याबद्दल अधिक माहिती दिली गेली नाही. अशा लसी तयार करण्याची प्रक्रिया कधीपासून सुरू झाली याबद्दल कोणत्याही पूर्वसूचना जाहीर केलेल्या नाहीत. 

इतर काही लसी...
चीनची कॅसिनो बायोलॉजिक्स हि कंपनी सुद्धा लस विकसित करत असून, तथापि त्या लसीचा यशस्वी दर माहित नसून, चीनी लस उत्पादक कंपनीने अद्याप त्यांच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचण्यांमधून मिळालेली माहिती जाहीर केली नाही.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Dr nanasaheb Thorat on war corona vaccine