काश्‍मीरबद्दलचा ‘बागुलबुवा’..! (संदीप काळे)

Sandip-Kale
Sandip-Kale

काश्मीरमधल्या प्रत्येक माणसाला शांततेत जगायचं आहे; पण परिस्थिती तसं करू देत नाही, जिहादी वातावरण, कट्टर जातीयता आणि राजकारणासाठी वापरला जाणारा प्रत्येक माणूस काश्‍मीरसारख्या स्वर्गातही दुःखी असल्याचं मला जाणवत होतं. इम्रान मला सांगत होता, ‘‘माझे शिक्षक महेबूब. ते लहान असतानाच त्यांचे वडील घरातून निघून गेले. ते अद्याप आलेले नाहीत. ते कुठं गेले यावर सरांनी कधीही आम्हा मुलांना खोलात जाऊन सांगितलं नाही; पण आम्हाला कळून चुकलं होतं. महेबूब सरांचे वडील आपल्या आजूबाजूला अनेक गायब होणाऱ्या माणसांप्रमाणेच गायब झाले होते.’’

काश्‍मीरमध्ये ‘त्या’ सात दिवसांच्या दौऱ्यात मी अनेक विषय समजून घेण्यासाठी अनेकांना भेटलो. काश्‍मीरचं राजकारण, समाजकारण, तिथला दहशतवाद हा विषय समजून घेतला. स्वतंत्र काश्‍मीरची मागणी यांसारखे अनेक विषय चर्चेतून पुढे आले. अनेक क्षेत्रांत काम करणारी वेगळी मंडळीसुद्धा यादरम्यान भेटली; पण या सगळ्या माणसांमध्ये श्रीपती आणि इम्रानखान ही दोन माणसं माझ्या काळजात घर करून राहिली.

श्रीपती या जवानाच्या मनाची घालमेल, त्याची देशसेवा मागच्या आठवड्याला तुम्ही सर्वांनी ‘भ्रमंती लाइव्ह’च्या माध्यमातून अनुभवली. आज तुम्हाला मी इम्रानखानविषयी सांगणार आहे. इम्रानखानच्या अंतर्मनाला लागलेली ‘धग’ काश्‍मीरच्या त्या प्रत्येक तरुण मनाचा ठाव घेणारी आहे. एक पिढी काही तरी चांगलं करू पाहत आहे; पण काश्‍मीरमधील वातावरण त्या पिढीला तसं करू देत नाही.

पहलगामच्या आसपास असणाऱ्या ठिकाणाला भेटी देण्यासाठी मी सकाळी सहा वाजताच निघालो. प्रचंड थंडी आणि गारठा होता. स्टॅंडपर्यंत येऊन पुढे घोड्यावरचा प्रवास सुरू झाला. मला घोड्यावर घेऊन जाणारा मुलगा अगदी बारा वर्षांचा होता. सलीम त्याचं नाव. त्याच्याशी झालेल्या संवादामधून तो एक दिवस शाळा करतो आणि एक दिवस आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पर्यटकांना घोड्यांच्या माध्यमातून सेवा देत चार पैसे कमवण्याचे काम करतो. काश्‍मीरमधल्या नव्वद टक्के लोकांची चूलही तिथं येणाऱ्या पर्यटकांवर पेटते. एक- एक करत तिथली सगळी स्थळं आम्ही पाहत होतो. मिनी स्वित्झर्लंड असणाऱ्या ठिकाणी मी पोहोचलो. तिथलं सगळ सौंदर्य डोळ्यामध्ये साठवून ठेवण्यासाठी माझी नजर भिरभिरत होती. उंच-उंच झाडांकडून माझी नजर खाली जमिनीवर चरणाऱ्या मेंढ्यांकडे गेली. त्या मेंढ्यांकडे पाहताना जेव्हा वर नजर जात होती, तेव्हा एखाद्या चित्रकाराने उत्कृष्ट चित्र बनवावं, असा तो नजराणा होता. मी एका मेंढीला जवळ घेऊन हात फिरवत होतो. बाकी मेंढ्या समोर गेल्याचं पाहून मी ज्या मेंढीला घेऊन कुरवाळत होतो, ती मेंढी दूर पळाली. पाठीमागून त्या मेंढीशी बोलणारा आवाज आला, ‘मुस्कान रुक ना ! क्‍या हुआ?’ मी मागं वळून पाहिलं तर एक तेरा-चौदा वर्षांचा उंच नाकाचा गोरापान मुलगा हातामध्ये काठी घेऊन त्या मेंढीला आवाज देत होता. मेंढी निघून गेली. तो मुलगा माझ्याजवळ येऊन थांबला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्या पळालेल्या मेंढीकडे पाहत तो म्हणाला, ‘मुस्कान बहोत शरमाती है.’
मी त्या मुलाच्या जवळ जात म्हणालो, ‘‘या मेंढ्या किती सुंदर आहेत.’’ त्यानंही मला होकार देत आपली मान हलवली. आमचं दोघांचं बोलणं सुरू झालं. त्यानं एका मेंढीला आवाज दिला. ‘हीना, इधर आ.’ समोरच्या कळपामधून हीना पुढं आली. त्यानं त्या हीनाला जवळ घेतलं, कुरवाळलं. ‘जावो’ म्हणत, परत त्या मेंढ्यांच्या कळपात पाठवून दिलं.

आमच्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. मी सुरुवातीला त्याच्याशी जरा घाबरत बोलत होतो. काश्‍मीरला निघताना मला प्राध्यापक लतिका भानुशाली यांनी सांगितलंच होतं, ‘‘रस्ता सोडून इकडं तिकडं भटकू नको. तिथं पावलोपावली दहशतवादी असतात.’’ ही आठवण मी मनावर पक्की बिंबवली होती. मी त्या मुलाला त्याचं नावं काय, तो काय करतो, त्याचं कुटुंब काय करतं, असे अनेक प्रश्‍न त्याला विचारले. तो अगदी नम्रपणे मला सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं देत होता.
‘‘तुला भीती वाटत नाही का?’’ या प्रश्‍नाचं उत्तर देताना तो म्हणाला, ‘‘सरजी, तुम्ही सांगताय तशी कशाचीही भीती मला वाटत नाही. भीती एकच आहे. रात्री गेल्यावर जेवायला मिळेल की नाही याची?’’
मी म्हणालो, ‘‘ते कसं काय?’’
तो म्हणाला, ‘‘आई मशिदीसमोर फुगे विकायचं काम करते. वडील टोप्या विकायचं काम करतात आणि मी आमच्या मेंढ्या राखायचं काम करतो. तरीही संध्याकाळचं आम्हाला जेवायला मिळेल की नाही, हाच प्रश्‍न गेल्या दोन वर्षांपासून आम्हाला सातत्यानं पडत असतो.’’
मी म्हणालो, ‘‘असं का?’’ तो म्हणाला, ‘‘३७० नंतर इथली परिस्थिती बदलली आहे. ३७० त्यानंतर लागलेला कर्फ्यू, त्यानंतर सातत्याने पडणारा बर्फ, ३७० नंतरची आंदोलनं आणि पुन्हा लॉकडाउन. यामध्ये काश्‍मीरच्या नागरिकांना एक वेळचं जेवायलाही पोटभर मिळालेलं नाही, अशी स्थिती होती. तुम्ही माझ्या मेंढ्या पाहताय ना, त्यांच्या अंगावरचे केस गेल्या दोन वर्षांपासून काढलेच नाहीत.’’

मी ज्या मुलाशी बोलत होतो, त्याचं नाव इम्रानखान. तो सातवीमध्ये शिकतोय. मी इम्रानला विचारलं, तुला मोठं होऊन काय बनायचंय? तुझ्या शाळेचं वातावरण कसं असतं. तुझे बहीण-भाऊ काय करतात. त्या सगळ्या प्रश्‍नांची इम्रानने मला उत्तर दिली; पण त्या उत्तरांमधून माझ्या मनात जे काही प्रश्‍न निर्माण झाले त्या प्रश्‍नांची कुणीही उत्तरे देऊ शकत नाही, अशी परिस्थिती होती. इम्रान म्हणाला, ‘माझ्या गावामध्ये दहावीपर्यंत शाळा आहे. शाळेत जेमतेम दीडशे मुलं असतील. त्यापैकी वीस मुलंही शाळेत येत नाहीत. प्रत्येकाला लहानपणापासूनच आपल्या आई-वडिलांचा छोटा व्यवसाय सांभाळावा लागतो. मला मोठं होऊन शिक्षक व्हायचं आहे. इथल्या मुलांमध्ये मला शिक्षणाचं बाळकडू पेरायचं आहे.’

मी त्याला मध्येच म्हणालो, ‘मग तू नियमित शाळेत का जात नाहीस.’ त्यावर तो म्हणाला, ‘माझी आई म्हणते, बाळा तू शिकून मोठा होशील, हे खरं आहे; पण त्याआधी आपल्याला जिवंत राहणं फार महत्त्वाचं आहे. तू शाळेत गेलास, तर आपल्या मेंढ्या कोण सांभाळेल. या मेंढ्यांच्या माध्यमातून होणाऱ्या नफ्यातून आम्हाला बहिणीच्या लग्नाचं कर्ज फेडायचं आहे.’ मी म्हणालो, ‘बहीण काय करते?’
तो म्हणाला, ‘माझ्या बहिणीचं अंडी विकायचं छोटंसं दुकान आहे.’

मी पुन्हा म्हणालो, ‘बहिणीचे यजमान काय करतात?’ तो त्यावर काहीही बोलला नाही. मला वाटलं, आपण त्याच्या कौटुंबिक वातावरणात घुसतो म्हणून त्याला आवडलं नसावं. ‘तुझा भाऊ काय करतो?’ या प्रश्‍नावरही तो अधिक बोलणं टाळत होता.

मी म्हणालो, ‘तू तुझ्या कुटुंबाला मदत करतो, ही चांगली बाब आहे; पण तू शिकलं पाहिजेस, तरच तुझं शिक्षक व्हायचं स्वप्न पूर्ण होईल.’ मी जसं जसं बोलत होतो, तसं तसं त्याच्या लक्षात येत होतं. हा माणूस आत्मियतेनं आपल्याशी काही तरी बोलतो. तो म्हणाला, ‘गरिबीमुळे अनेक वेळा शाळा बुडते, हे खरं आहे; पण शाळेत जायला खरंच अनेक वेळा भीती वाटते. आजूबाजूच्या भागातून आमच्या शाळेला बॉम्बने उडवून देऊ, अशा धमक्‍या आल्या.’
मी म्हणालो, ‘असं कधी झालंय का?’

तो म्हणाला, ‘कुठं कुठं असे प्रकार सातत्यानं घडत असतात. त्याची भीती मनामध्ये आहेच.’ तो खुलल्याचं माझ्या लक्षात आलं. मी म्हणालो, ‘सांग ना मग तुझा भाऊ काय करतो?’ तो म्हणाला, ‘सरजी, माहीत नाही. भाऊ आणि बहिणीचा नवरा चार वर्षांपासून घरी परतलेच नाहीत. सुरुवातीला ते वर्षभरानंतर तरी घरी यायचे. आता गेल्या चार वर्षांपासून त्यांचा पत्ता नाही. कुणी म्हणतात, दुबईमध्ये काम करतात. कुणी म्हणतात, जिहादी संघटनांमध्ये काम करतात, तर कुणी म्हणतात, आर्मीच्या गोळीबारामध्ये मारले गेले.’ इम्रान हे मला सगळं सांगताना त्याच्या चेहऱ्यावर कसलाही भीतीचा लवलेश नव्हता. मला कळून चुकलं, जिहादी संघटना, गोळीबार, दहशतवाद हे सगळं बघून, अनुभवून त्याचं मन, अगदी दगडासारखं होऊन गेलंय. आपला जीव कोणत्याही क्षणी जाऊ शकतो, अशी भीती त्यालाही नेहमी वाटते.

त्याच्या लांबच्या लांब आणि मोठ्या असणाऱ्या कपड्यांधून त्यानं एक पुस्तक आणि एक वही माझ्या समोर ठेवली. उर्दू पुस्तक असलेल्या पहिल्याच पानावर मशिदीच्या चित्रासमोर मुलगा नमाज पडतानाचं चित्र दिसत होतं. त्याची वही हातात घेतल्यावर जेव्हा मी पहिलं पान काढलं, तेव्हा त्या पानावर एक ओळ मला दिसली. त्या ओळीचा अर्थ मी इम्रानला विचारला तेव्हा तो म्हणाला. ‘‘या अल्लाह सबको बंधुभावसे रहने की बुद्धी दो.’’ मला त्या एका ओळीच्या अर्थावरून खूप काही बोध झाला होता. तिथल्या प्रत्येक माणसाला इम्रानने व्यक्त केलेल्या भावनेतून जगायचं होतं; पण परिस्थिती तसं करू देत नव्हती. जिहादी वातावरण, कट्टर जातीयता आणि राजकारणासाठी वापरला जाणारा प्रत्येक माणूस काश्‍मीरसारख्या स्वर्गातही दुःखी असल्याचं मला जाणवत होतं.

इम्रान मला सांगत होता, ‘माझे शिक्षक महेबूब. ते लहान असतानाच त्यांचे वडील घरातून निघून गेले. ते अद्याप आलेले नाही. ते कुठं गेले यावर सरांनी कधीही आम्हा मुलांना खोलात जाऊन सांगितलं नाही; पण आम्हाला कळून चुकलं होतं. महेबूब सरांचे वडील आपल्या आजूबाजूला अनेक गायब होणाऱ्या माणसांप्रमाणेच गायब झाले होते. त्यांची वाट धर्मासाठी सुरू झाली होती. त्यांची वाट आपल्या धर्माला धोक्‍यापासून वाचवण्यासाठी होती. आपल्या माणसांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे, या भावनेतून त्यांची वाट तयार झाली होती. महेबूब सर नेहमी सांगतात, आपला ग्रंथ आपली ही घटना आहे.

आपण मानवतावादी धर्माचे सदस्य आहोत. आपला ना कुठला कट्टरवाद आहे, ना कुठला धर्म.’ तो छोटोसा असलेला इम्रान मला तत्त्वमूल्यांच्या गोष्टी सांगत होता. त्याचा प्रत्येक विषय माझ्या मनात खोलवर शिरत होता. त्याचं बोलणं मला त्या काश्‍मीरमध्ये असणाऱ्या प्रत्येक मानवतावाद चालणाऱ्या प्रत्येक माणसाचं बोलणं वाटत होतं. आम्ही दोघं जण गप्पांमध्ये रंगलो असताना दुरून येणारा माणूस त्याला आवाज देताना मला दिसला. त्यानं इम्रानच्या हातावर एक छोटीसी पोटली ठेवली आणि तो पुढे जात राहिला. मी त्याला विचारलं, ‘कोण आहे ही व्यक्ती?’

तो म्हणाला, ‘माझे काका आहेत.’ हाताने जागा साफ करत मला ‘इथं बसा’, असा त्यानं इशारा केला. आपल्या हातात काकानं आणलेला रोटीचा तुकडा सोडत त्यानं अर्धा तुकडा माझ्या हातात ठेवला आणि अर्धा तुकडा स्वत:च्या हातावर. काश्‍मीरमधली माणसं तिथं जाणाऱ्या प्रत्येक माणसावर जिवापाड प्रेम करतात. इम्रानच्या माध्यमातूनही मी शेवटच्या दिवसापर्यंत अनुभवत होतो. मी इमरानला म्हणालो, ‘तुझे मित्र शाळा, जिहादी संघटना आणि दहशतवाद याला घेऊन काय विचार करतात.’ तो शांतपणे म्हणाला, ‘जसे महेबूब सरांचे वडील विचार करतात. तोच विचार त्यांच्या मनात आहे. या सगळ्या मुलांच्या मनावर सातत्याने बिंबवल जातं, ‘तुमच्या आया-बहिणींना धोका आहे. तुमच्या धर्माला धोका आहे. तुम्हाला शिक्षण शिकवून अजून या धोक्‍यामध्ये फसवलं जातं. याला तुम्ही बळी पडू नका,’ असं सांगितलं जातंय.

छोट्या-छोट्या गोष्टी तरुण मुलांमध्ये बिंबवण्याच काम करतात. अनेक धर्मांध संघटना काम करतात. आम्ही मात्र महेबूब सरांचे ऐकतो. दहशतवाद आणि धर्मांधता ही आमच्या तरुण मनाला लागलेली कीड आहे,’ असं तो मला सांगत होता. हे सर्व बोलत असताना संजय नहार आणि श्रीराम पवार सर यांनी काश्‍मीरबद्दल सांगितलेले अनेक विषय माझ्या डोळ्यासमोर येत होते. मी इम्रानला म्हणालो, ‘चल येतोस का मुंबईला,’ तो लगेच म्हणाला, ‘नको नको.’

मी म्हणालो ‘का?’
‘तिथल्या शिवसेनेविषयी माझ्या मनात फार भीती आहे. जम्मू काश्‍मीरमधला मुसलमान मुंबईमध्ये गेला, की शिवसेना ही संघटना त्यांच्या मागावर असते, असं मी माझ्या मित्रांकडून ऐकलंय.’ मी हसलो आणि म्हणालो, ‘कुणी सांगितलं? असं काही नाही.’ तो म्हणाला, ‘मला फारसं माहीत नाही.’ त्याचे अनेक मित्र धर्मकांडामध्ये कसे अडकले आहेत, याची कित्येक उदाहरणं तो मला देत होता. त्याच्या सांगण्यावरून माझ्या लक्षात येत होतं. काश्‍मीरच्या नव्या पिढीचं पाऊल कुणीकडं पडतंय. ३७० नंतर हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर काश्‍मीर पुनर्रचना विधेयक मंजूर झाल्यामुळे आता आम्ही काश्‍मिरी सून आणू शकतो, असे बेजबाबदार वक्तव्य मुलांच्या मोबाईवर फिरत होतं. त्यातून संताप वाढला. त्यानंतर कट्टरवादही मोठ्या प्रमाणावर उफाळून आला, असंही तो मला सांगत होता.

तो लहान असला, तरी त्याच्या प्रत्येक बोलण्याला अनुभवाची झालर लागलेली होती. काश्‍मीरमध्ये उफाळत असलेल्या या धगेला खूप कंगोरे होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काश्‍मीरमध्ये कधीही दहशतवादी हल्ला होऊ शकतो. तुम्ही गेलात तर तुमच्यावर हल्ला होऊ शकतो. हे सगळं चुकीचं पेरलं गेलं होतं. काश्‍मीरमध्ये दहशतवादांची भीती एक टक्का आहे, तर तिथं प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसांची माणसावर प्रेम करण्याची वृत्ती हजार पट असेल.

आपल्याकडील अनेक जण भीतीपोटीच काश्‍मीरला जात नाहीत. खरं तर काश्‍मीर एवढं, सौंदर्य जगात कुठेही नाही; तरीही आपण ते सौंदर्य अनुभवत नाही. सांगितलेल्या चुकीच्या घटनांवर, अफवांवर विश्‍वास ठेवणाऱ्या त्या प्रत्येक माणसाला मला या सात दिवसांतील अनुभवांबाबत सांगायचं आहे.

काश्‍मीरमधला प्रत्येक भाऊ तुम्हाला भेटायला बोलवतो. तिथलं सौंदर्य तुमच्या स्वागतासाठी सज्ज होऊन बसलं आहे. त्या जम्मू-काश्‍मीरमधलं प्रेम अनुभवा. काश्‍मीरचे तसे दोन चेहरे आहेत. एक सौंदर्याचा आणि एक गरिबीचा. तुम्ही सौंदर्य पाहा आणि गरिबी दूर करण्यासाठी काय करता येईल.

माझ्या घोडेवाल्याने मला परत जाण्यासाठी आवाज दिला. मी इम्रानचा निरोप घेत त्याला मुंबईला ये, असं निमंत्रण देत तिथून निघालो. इम्रानने माझ्या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं दिली होती; पण इम्रानच्या उत्तरानंतर माझ्या मनात पडलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्यायला कुणालाही जमणार नव्हतं. जर या प्रश्‍नांची उत्तरं मिळाली असती, तर तुमच्या माझ्या मनामध्ये काश्‍मीरविषयी असलेला नको तो ‘बागुलबुवा’ निर्माण झालाच नसता.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com