प्रेमाच्या कळा, लागल्या जिवा... (संदीप काळे)

Sandip-kale
Sandip-kale

‘मला गाणं येत नव्हतं. तिनं मला गाणं शिकवलं. माझ्या गाण्याच्या सूर लागत नव्हता; तर ती मला म्हणायची, ‘‘ डोळे मिट, माझा चेहरा समोर आण, म्हणजे सुरांना आपोआप आवाज येईल. मी तसेच प्रयोग करत गेलो. आमचं गाणं हिट झालं. आम्हाला बक्षीस मिळालं आणि त्याच गाण्यातून आयुष्याचा सूर पुढं न्यायचं ठरवलं. भेटीगाठी आणा-भाका, प्रेमपत्र हे सर्व सुरू झालं.’’

पुण्यात अनेकांच्या गाठीभेठी ठरल्या होत्या. त्या भेटीगाठींसाठी त्या दिवशी शिवाजीनगर भागातून मी प्रवीणदादा गायकवाड यांना भेटण्यासाठी कोथरूडला निघालो. प्रवीणदादांना भेटण्यासाठी इतरही काही मंडळी आली होती. त्यांनी त्यांचा चालक विनोद यांच्याकडे मला थांबा असा निरोप दिला. विनोद आणि मी त्याच भागात गाडी लावून आम्ही चालत येत असताना, एका गाण्याचे शब्द कानावर पडले, तिथल्या चौकात एक जण हातामध्ये माईक घेऊन छोट्या स्पीकरवर गाणे म्हणत होता. येणारे-जाणारे लोक त्या गाणाऱ्याला पैसे देत होते. गाणं गाणाऱ्याच्या आवाजात कमालीचा दर्द होता. त्याच्या सादरीकरणात आपलेपणाचा बाज होता. मी आणि विनोद अगदी जवळ जाऊन त्या माणसाचं गाणं ऐकत होतो. पैसे काढले, ते त्या व्यक्तीच्या हाती देत विनंती केली, अमूक अमूक गाणं म्हणा. तो माणूस मला म्हणाला, ‘‘मी कोणाच्या आवडीनुसार गात नाही. मला जी गाणी गायची आहेत, तीच गाणी मी म्हणतो.’’ तो ज्या चौकात उभा होता. त्या चौकात येऊन मिळणारे रस्ते, त्या सगळ्या रस्त्यांवर त्याची नजर भिरभिरत होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मला प्रवीणदादांचा फोन आला. आम्ही त्यांच्या दिशेनं निघालो. प्रवीणदादांच्या सोबतची मीटिंग संपली आणि मी तिथून बाहेर पडलो. पुन्हा बघितलं तर तो गाणारा माणूस त्या चौकात अजूनही गात होता. मी तिथं थांबून पुन्हा गाणं ऐकू लागलो. भावूक होऊन तो गात होता आणि माझे पाय खिळून राहिले होते. ‘‘ मेरे सपनो की रानी कब आएगी तू, क्‍या करते थे साजना, मेरी किस्मत मे तू नहीं शायद, अशी वेगवेगळी गाणी मी ऐकत होतो. त्यानं निवडलेली सगळी गाणी नकारात्मक, कुणाच्या तरी आठवणींचीच होती, असं जाणवत होतं. त्याची भिरभिरणारी नजर कुणाची तरी वाट पाहणारी मला वाटत होती. चला आता निघावं, असा मनात विचार आला आणि पुढं जाण्यासाठी पाऊल टाकलं.

तोच त्यानं ‘क्रांती’ चित्रपटातलं ‘जिंदगी की ना तूटे लडी'', हे गाणं म्हणायला सुरुवात केली. मी ते गाणं कानावर पडताच पुन्हा थांबलो. ते गाणं सुरू असताना, ‘आज से अपना वादा रहा, हम मिलेंगे हर मोड पर,’ हे कडवं आलं आणि तो रडायला लागला. बाजूची फुलं विकणारी महिला उठली आणि "दादा, रडू नका. शांत बसा'' म्हणून त्याची समजूत घालत होती. बाजूला जमलेली माणसंही हळूहळू करून निघायला लागली. त्या गर्दीमधला एक जण म्हणाला, ‘चला, आता तो एकदा रडल्यावर परत काही गाणार नाही.’’ हे अनेक वेळा होतं, अशी कुजबूज तिथं जमलेल्या लोकांमध्ये सुरू झाली होती. त्या बाईनं त्या व्यक्तीला पाणी प्यायला दिलं. मी त्याच्याजवळ गेलो आणि म्हणालो, ‘दादा, तुम्ही खूप छान गाता. तो काही बोलण्याच्या मूडमध्ये नव्हता. त्या रडण्यामागं नक्की काही तरी कारण असावं. ते कारण काय हे शोधण्याचा मी प्रयत्न करत होतो; पण तो काही फारसा दाद देईना. त्यानं एका बॅगमध्ये आपलं सामान भरायला सुरुवात केली. मी त्याचं लक्ष माझ्याकडे वेधत त्याला म्हणालो, ‘‘दादा, तुमचं हे गाणं, कुणाला तरी साद घालणारं आहे.

कोणाच्या तरी आठवणींमध्ये तल्लीन होऊन तुमचे सूर बाहेर पडताहेत.’’ त्यानं एक नजर माझ्यावर टाकली आणि खाली मान झुकवली, त्यातच त्याच्या डोळ्यातून आसवं गळायला लागली. मी त्या गाणाऱ्या व्यक्तीच्या बाजूला बसलो आणि त्याला म्हणालो, कुठे शिकला गाणं तुम्ही? असं रस्त्यामध्ये गाणं म्हणायची पद्धत मी परदेशात, चित्रपटात बघितली. आपल्याकडं मी हे पहिल्यांदा अनुभवतो. असं मीच एकटा त्याच्याशी बोलत होतो. तो थोडासा खुललाही. मी माझं व्हिजिटिंग कार्ड त्याच्या हातात ठेवलं. ते कार्ड पाहून तो हळूहळू बोलायला लागला. तो म्हणाला, मी गाणं कुठंही शिकलो नाही. गाण्यातून कुणाला तरी आवाज देण्यासाठी मला माझ्या मनानं मजबूर केलं आणि त्याच आतल्या मनानं या सुरांमध्ये जादू भरली. ते सूर बाहेर पडत असतात. तो पुणेरी स्टाइलमध्ये संवाद साधत होता; पण त्याचं कोड्यातलं बोलणं मला काही कळेना. आमचा बोलणं सुरू होतं, बाजूला उभ्या असलेल्या एका रिक्षात त्यानं सामान नेऊन ठेवलं. त्या रिक्षाच्या मागं लिहिलं होतं, ‘तू कहा खो गई’. आमचं बोलणं सुरू असताना तो आता निघतो, म्हणून जाण्याच्या तयारीला लागला.

मी विचारलं, तुम्ही कुठं राहता? तो म्हणाला, इथं जवळचं. मी विचारलं, ‘‘मी येऊ का तुमच्या घरातल्या मंडळींना भेटायला, तो हसला आणि रिक्षा बंद करत खाली उतरला आणि म्हणाला, ‘‘आम्हा गरिबांना तुमचं स्वागत करताना आनंदच होईल; पण काय करता येऊन.’’ माझ्या लक्षात आलं. मला घेऊन सोबत जाण्यासाठी तो थोडा अनुकूल वाटतो. त्यानं पुढचं काही म्हणण्याच्या अगोदर मी रिक्षात बसलो. मी त्यांना म्हणालो, किती पैसे घेता, तो हसायला लागला.
ही रिक्षा तुमचीच का? त्याचं उत्तर होतं हो.''

गप्पा सुरू असतानाच त्याच्या घरी पोहोचलो. एक महिला आमच्या रिक्षाच्या दिशेनं आली, रिक्षेतील सामान तिनं घेतलं. तो गाणारा माणूस त्या महिलेची ओळख करून देताना म्हणाला, ही माझी पत्नी सुनीता. तिनं नमस्कार करत घरात बोलावलं. पुन्हा गप्पा सुरू झाल्या. खरंतर तो माणूस गाताना का रडत होता, हेच चर्चेत केंद्रस्थानी ठेवून त्याच्याशी बोलायचं होतं; पण तो त्या विषयाकडं यायला तयार नव्हता. तो विषय आला, की तो सांगायचा, भावनिक होऊन रडतो हो माणूस. त्यात काय? त्याची पत्नी हातामध्ये सरबताचा ग्लास घेऊन आली. मी त्यांच्याकडे बघत म्हणालो, दादा खूप छान गातात. त्याची पत्नी लगेच म्हणाली, ‘‘ मग गाणारच! पक्के मजनू आहेत ते.’’ तो गाणारा माणूस एकदम तिच्याकडे बघत मला म्हणाला, ‘‘माझी बायको मला प्रेमावरून काही तरी बोलण्याच्या मूडमध्ये दिसते. ती आपला घाम पदराने पुसत त्याच्याकडं बघत म्हणाली, ‘‘नाही बोलणार हो. बोललं तरी काही फरक पडेल का? आता २५ वर्षं झाली लग्नाला. २५ वर्षांत काही झालं नाही. आता काही बदलेल याची अपेक्षा नाही.’’

मी त्या महिलेलाच म्हणालो, ‘अहो, हे गाताना अक्षरश: रडतात, इतकं तल्लीन होऊन गातात. ती म्हणाली, ‘अहो, त्यात नवीन काही नाही. हे मी लग्न झाल्यापासून बघतीय. आमचं बोलणं चालू असतानाच त्यांचा मुलगा, मुलगी घरामध्ये आली. त्या माणसानं माझी आणि त्यांची ओळख करून दिली. मला हवा होता तो विषयही गप्पांमधून पुढे आणला. तो विषय इतका खुलत गेला, की त्याचे अनेक पैलू समोर येत गेले. मी ते सगळे पैलू ऐकून अवाक झालो होतो. वयाची पंचेचाळिशी पार केलेल्या माणसालाही आपलं पहिलं प्रेम विसरणं किती अवघड असतं, याचं हे उत्तम उदाहरण होतं.

मी ज्या गाणाऱ्या माणसाशी बोलत होतो त्याचं नाव सतीश बाबूराव झाडे. सतीश हे वैशाली कुलकर्णी नावाच्या मुलीच्या प्रेमात पडले. तिचं प्रेम त्यांना मिळू शकलं नाही. तेव्हापासून आजपर्यंत ते आपल्या प्रेयसीची वाट पाहत आहेत.

आमच्या गप्पा सुरू असताना, सतीशच्या पत्नीमध्येच येऊन मला सांगत होत्या. आमचं लग्न झाल्यावर दोन वर्षं हा माणूस माझ्यासोबत बोललासुद्धा नाही. सगळे यांना समजून सांगायचे; पण ते त्यांचं ऐकायचे नाहीत. मी सतीशला म्हणालो, तुमची आणि वैशालीची भेट कशी झाली?

सतीश म्हणाले, कॉलेजला असताना आम्ही एका वर्गात शिकायचो. ती खूप चांगलं गाणं म्हणायची. कॉलेजच्या गॅदरिंगला आम्ही गाणं म्हटलं होतं. मला गाणं येत नव्हतं. तिनं मला गाणं शिकवलं. माझ्या गाण्याच्या सूर लागत नव्हता; तर ती मला म्हणायची, ‘‘डोळे मिट, माझा चेहरा समोर आण, म्हणजे सुरांना आपोआप आवाज येईल. मी तसेच प्रयोग करत गेलो. आमचं गाणं हिट झालं. आम्हाला बक्षीस मिळालं आणि त्याच गाण्यातून आयुष्याचा सूर पुढे न्यायचं ठरवलं. भेटीगाठी आणा-भाका, प्रेमपत्र हे सर्व सुरू झालं. तेव्हा प्रेमपत्र ही एक फॅशन होती आणि त्या पत्रांना सांभाळून ठेवणं म्हणजे आपली एक दौलत सांभाळून ठेवण्यासारखं असायचं. ती सगळी पत्रं तिच्या वडिलांच्या हाती लागली. दुसऱ्या दिवशी तिचे वडील कॉलेजमध्ये आले. आम्हाला प्राचार्यांसमोर उभं करण्यात आलं. आम्ही यापुढं कधीही चुकीचं वागणार नाही, हे आमच्याकडून लेखी स्वरूपातून घेण्यात आलं. दुसऱ्या दिवसापासून पुन्हा कॉलेज सुरू झालं आणि आमचं प्रेम अजून घट्टपणे सुरू झालं. सतीश हे सगळं सांगत असताना माझं पूर्ण लक्ष हे सतीशवरच होतं. जेव्हा मी सतीशची बायको सुनीताकडे बघितलं, तेव्हा सुनीता आपल्या हातातल्या पदरानं आपले डोळे पुसताना दिसली. सतीशचं हे सगळं प्रेमप्रकरण ऐकताना तिला वाईट वाटत होतं. आपल्या नवऱ्याविषयीचं प्रचंड प्रेम, ती रडताना व्यक्त करत होती.

मी सतीशला पुन्हा म्हणालो, पुढे कायं झालं? सतीश म्हणाला, काही नाही. एके दिवशी वैशाली मला म्हणाली, माझ्या घरी ये आणि माझ्या वडिलांकडे मागणी घाल. मीही तिला म्हणालो, हो, त्यात काय? माझ्या घरी तसं कुणी नव्हतं. मी जन्मल्यावर आई वारली, दहावीत असताना वडील गेले. मामानं लहानाचं मोठं केलं. वडिलोपार्जित छोटंसं घर. आयुष्यात तसं काही शिल्लक नव्हतं. तिनं सांगितल्याप्रमाणं मी तिच्या घरी गेलो. तिच्या आई-वडिलांना विनंती करून लग्नाची मागणी घातली. त्यावर तिचे आई-वडील म्हणाले, आम्हाला वाटलं प्राचार्यांसमोर नेल्यामुळे तुमचं प्रेमप्रकरण थांबलं असेल; पण हे लग्नापर्यंत येऊन थांबलं. तिच्या वडिलांनी माझ्यासमोरच तिला जोरदार मारहाण केली. असं वाटत होतं, तिच्या वडिलांचा हात धरावा आणि त्यालाही तसंच मारावं. जसा तो वैशालीला मारत होता. तिची आई माझ्यासमोर आली. मला म्हणाली, तू इथून निघून जा. परत माझ्या मुलीच्या आयुष्यात येऊ नकोस. तू परत तिच्या आयुष्यात आलास, तर तिचा बाप तिचा मुडदा पाडेल. ती पळून गेली, तर माझा मुडदा पडेल. मी त्या घरातून बाहेर पडलो. उच्चजातीय, उच्चशिक्षित, लोकांच्या घरी प्रेमाला भीक घातली जात नाही, हे मी ऐकलं होतं.

आज प्रत्यक्षात मी अनुभवत होतो. मी बाहेर पडताना, ‘‘सतीश, मला इथून घेऊन जा. मला इथून घेऊन जा,’’ असा वैशालीचा आक्रोश ऐकतच मी बाहेर आलो; तरी तिचं ओरडणं सुरू होतं. मला वाटलं ती दुसऱ्या दिवशी कॉलेजला येईल. येताच क्षणी तिला पळवून न्यावं. तिच्यासोबत लग्न करावं, असं मी ठरवलं होतं. जात, गरिबी अशी अनेक कारणं आमच्या प्रेमात अडसर बनून उभी राहिली होती.

दुसऱ्या दिवशी ती कॉलेजमध्ये येईल, याची मी वाट पाहत होतो. दोन दिवस झाले, तीन दिवस झाले. ती काही कॉलेजमध्ये येईना. तिच्या मैत्रिणीलाही ती कुठं गेली, हे माहिती नव्हतं. शेवटी मीच तिच्या घरी गेलो. बघतो तर काय घराला कुलूप. मी तिच्या शेजाऱ्यांना विचारलं ते म्हणाले, ‘‘ ते घर सोडून तेव्हाच गेले. ते इथे भाड्याच्या घरात राहायचे. कुणी म्हणायचं ते गावी गेले, कुणी म्हणायंच, पुण्यातच दुसऱ्या भागात राहायला गेले. मी सगळं सोडून वर्षभर तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण तिचा शोध लागला नाही. तिचं मला एक नेहमी सांगणं असायचं, ‘‘तूला माझी जेव्हा आठवण येईल, तेव्हा डोळे मिटून मनातून गाणं म्हण. मी तुझ्या गाण्याला साथ देत, तुला भेटायला येईन.’’

सतीशची बायको मध्येच म्हणाली, ‘‘ती येतीयं आता तुम्हाला भेटायला. ती कुठंतरी मजेत जगत असेल आणि हा बाबा २५ वर्षांपासून तिच्यासाठी रडत बसला आहे. पुण्यामधल्या सगळ्या गल्लीबोळात चौकाचौकांत दोन-तीन वेळा यानं गाणं गात फेऱ्या मारल्या असतील. एकाही नोकरीत टिकत नाहीत हे. माझ्या वडिलांच्या लक्षात आल्यावर त्यांनी यांना एक रिक्षा घेऊन दिली. रिक्षामध्ये बसलेल्या प्रत्येक माणसाला, ती पोरगी कुठं राहते, तुम्हाला माहिती आहे का? अशी विचारपूस करायचे हे’’ आपली बायको मूडमध्ये अजून काही तरी बोलेल, हे लक्षात आल्यावर त्यांनी बायकोला चांगलंच फटकारलं.

ते दोघंही माझ्याशी बोलत होते आणि मी ऐकत होतो. नंतर मी निघालो. मला सतीशच्या डोळ्यात वैशालीविषयीचं प्रचंड प्रेम आणि अजूनही ती येईल, ही आशा दिसत होती; तर दुसरीकडं त्याची बायको सुनीता सतीशवर प्रेम करत होती. सतीशची मुलगी वनिता आपल्या वडिलांना समजावत होती आणि मुलगा सचिन आपल्या आईला समजावत होता. मी अक्षरश: गोंधळून गेलो होतो. त्या घरात पडलेले अनेक प्रश्न माझ्या डोक्‍यात घुमत होते. सगळ्यात मोठा प्रश्न होता तो म्हणजे प्रेमाला चौकटीत बांधले तर जे हाल होतात, त्यातून कसे बाहेर पडायचे हा !

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com