Sunandan-Lele
Sunandan-Lele

स्वप्न सत्यात येतं तेव्हा... (सुनंदन लेले)

माझ्या आयुष्यात काहीच सरळ घडत नाही...कुठलंच यश मला सहजी मिळत नाही... झगडणं माझ्या नशिबी लिहिलेलेचं आहे, ही वाक्य आपल्या कानावर सतत पडत असतात. बऱ्याच लोकांना असंच वाटतं की कष्ट, त्रास, अडचणी केवळ त्यांनाच सहन कराव्या लागतात. जेव्हा आपण तामिळनाडूमधल्या खेड्यात जन्माला आलेल्या एका खेळाडूची कहाणी ऐकतो तेव्हा समजतं की कष्ट, संघर्ष, आणि स्वप्नांचा पाठलाग करणं म्हणजे नक्की काय असते. ही कहाणी आहे अनेक अडचणींना तोंड देत भारतीय क्रिकेट संघात कष्टाने जागा मिळवल्यावर स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवणार्‍या वेगवान गोलंदाज टी नटराजनची.

गरिबीशी लढा
कहाणीची सुरुवात होते तामिळनाडूतील सेलम गावापासून. अंदाजे ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिन्नप्पामपट्टी खेडेगावातून. थंगरसू आणि शांता या दांपत्याला एकूण ५ अपत्य, त्यातील सर्वांत मोठा मुलगा म्हणजे नटराजन. नटराजनचे वडील थंगरसू कापड गिरणीत कामगार तर आई घराजवळच खाद्यपदार्थांचा एक स्टॉल चालवायची. दोघे काबाड कष्ट करून सातजणांच्या कुटुंबाची देखभाल कशीतरी करत होते. नंतर थंगरसू यांनी गिरणीतील नोकरी सोडून शांता बरोबर पूर्णवेळ हा स्टॉल चालवण्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. स्टॉलवरचे चिकन गावातील सगळ्यांच्या आवडीचे होते.

पाच मुलांना वाढवताना थंगरसू- शांता या दाम्पत्यांची तारांबळ उडायची, कारण सरकारी साध्या शाळेत पाठवले तरी अभ्यासाची पुस्तक वह्या घेणेही परवडत नव्हते. मोठा मुलगा नटराजनला लहानपणापासून म्हणजे पाचवीत असल्यापासून क्रिकेट खेळण्याची आवड होती. त्याच्या गोलंदाजीतील चमक पहिल्यांदा जयप्रकाश या गृहस्थांनी हेरली आणि तेव्हापासून जयप्रकाशनं नटराजनला सर्वतोपरी साहाय्य आणि मार्गदर्शन केले आहे. ‘जयप्रकाश माझ्याकरता मोठा भाऊ, मार्गदर्शक आणि प्रशिक्षक आहे. त्याने मला या पातळीवर खेळायला मार्ग दाखवला माझ्याकडून मेहनत करून घेतली आणि कितीही अडचणी आल्या तरी स्वप्नांचा पाठलाग करायला भाग पाडले’’, नटराजन जयप्रकाश बद्दल बोलताना भावनिक होतो ते उगाच नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

क्रिकेटची सुरुवात
नटराजन गावात क्रिकेट खेळला ते टेनिस किंवा टेप लावलेल्या चेंडूवर. क्रिकेटचा लेदर बॉल त्याने वयाच्या २०व्या वर्षी पहिल्यांदा हाती घेतला. नटराजनची गुणवत्ता आणि मेहनत करायची तयारी बघून जयप्रकाशने त्याला चेन्नईला जाऊन खेळण्याचा नुसता सल्ला दिला नाही तर पालकांना परवानगी द्यायला राजी केले. सेलम आणि चिन्नप्पामपट्टी गावातील स्थानिक स्पर्धा खेळताना मिळालेल्या बक्षिसांच्या पैशातून नटराजनने कपडे आणि क्रिकेटचे थोडेफार चांगले बूट विकत घेतले. पहिल्यांदा नटराजन चेन्नईला चौथ्या गटातील साखळी स्पर्धेत क्रिकेट खेळू लागला. क्लबच्या सदस्यांनी त्याच्यातली गुणवत्ता बघून नटराजनला गोलंदाजीसाठी खास प्रकारचे शूज दिले, जो तो मनापासून जपायचा. साधारण वयोगटातील संघात चांगले खेळून खेळाडू राज्याच्या रणजी संघात प्रवेश मिळवतो. वयाच्या २०व्या वर्षी क्रिकेटचा चेंडू होती धरलेल्या  नटराजनला वयोगटातील संघातून खेळणे काय माहीतच नव्हते. त्याने स्थानिक क्रिकेटमधे अशी काही चांगली गोलंदाजी केली की निवड समितीने त्याला तामिळनाडूच्या रणजी संघात शेवटी घेतलेच.

संकटांची वादळे
रणजी संघात निवड झाल्यावर चिन्नप्पामपट्टी गावात तर आनंदाचा पूर आला. हा पूर पहिल्याच मोसमात ओसरला कारण नटराजनच्या गोलंदाजीच्या शैलीत दोष आढळला. चेंडू टाकण्याची पद्धत सदोष वाटल्याने त्याला गोलंदाजीपासून रोखले गेले. दोष दूर करून गोलंदाजीच्या शैलीत बदल करून पुनरागमन करायचे मोठे आव्हान नटराजनसमोर उभे ठाकले. ‘बरेच प्रशिक्षक मित्रं सांगतात की अशा वेळी मनाने कणखर राहणे गरजेचे असते. पण खरे सांगतो बोलणे सोपे आणि सहन करणे कठीण असा तो प्रकार होता. जयप्रकाशने त्या काळातही मला धीर देऊन स्वप्नांचा पाठलाग करायला भाग पाडले. २०१६ साली मला तामिळनाडू प्रिमिअर लीग मध्ये खेळायची संधी मिळाली तो निर्णायक क्षण होता’, नटराजन सांगतो.

जेव्हा किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने नटराजनला आयपीएल संघात दाखल करून घेतले तेव्हा एकीकडे आनंद वाटत होता तर दुसरीकडे प्रचंड दडपण आले. त्याला कारण असे होते की नटराजनला लिलावात बेसिक किमतीला विकत न घेता पंजाब संघाने तब्बल ३ कोटींची बोली लावली. ‘आयपीएल संघात घेतल्याचा आनंद झाला त्यापेक्षा ३ कोटी रुपयांना बोली लावल्याचे प्रचंड दडपण माझ्यावर आले’, नटराजन म्हणतो. २०१७ साली नटराजनला गोलंदाजी टाकतो त्या हाताच्या कोपराला मोठी दुखापत झाली. इतकी गंभीर दुखापत की त्याला ऑपरेशन करण्यावाचून पर्याय नव्हता. ‘संधी आणि संकट जणू काही रेल्वे रुळासारखे समांतर जात होते माझ्या खेळ जीवनात’, त्या कठीण काळाबद्दल बोलताना नटराजन म्हणतो.

सूर्य उगवला
कोपराच्या दुखापतीतून सावरून खेळू लागल्यावर नटराजनचा परत एकदा भाग्योदय झाला जेव्हा सनरायझर्स हैद्राबादने त्याला आयपीएल संघात दाखल करून घेतले. ‘नटराजन वेगवान गोलंदाज असला तरी कमालीचा शांत माणूस होता. तो कधीच इतर वेगवान गोलंदाजांप्रमाणे आक्रमक वृत्ती दाखवायचा नाही. एक गोष्ट नक्की होती की दिसायला साधा असला तरी त्याच्या गोलंदाजीवर मोठे फटके मारणे आम्हा सगळ्यांना सरावादरम्यान कठीण जायचे’, सनरायझर्स संघातून खेळलेल्या युसुफ पठाणने नटराजनबद्दल बोलताना सांगितले.  पहिले दोन वर्ष सनरायझर्स संघात दाखल झालेला असूनही नटराजनला सामने खेळायला मिळाले नाहीत. फायदा एकच झाला की मुथय्या मुरलीधरन आणि भुवनेश्वर कुमार बरोबर राहून सराव करून नटराजनला बरेच काही शिकता आले. गोलंदाजीतील बारकावे अंगी बाणवता आले ज्याचा खरा फायदा त्याला २०२० मध्ये झाला. २०१९-२० रणजी मोसमात चांगला मारा केल्यावर नटराजनचा आत्मविश्वास चांगलाच वाढला. 

एव्हाना त्याच्या गोलंदाजीच्या शैलीतील त्रुटी दूर झाल्या होत्या आणि कोपराच्या दुखापतीतून पूर्ण मुक्ती मिळाली होती. २०२० आयपीएल मोसमात सनरायझर्स हैद्राबाद संघाचा कप्तान डेव्हिड वॉर्नरने नटराजनला पूर्ण संधी देण्याचा विचार पक्का केला. नटराजनने कप्तानाचा विश्वास सार्थ ठरवत १६ सामने खेळताना नुसता किफायतशीर मारा केला असे नाही, तर १६ फलंदाजांना बाद केले. यात ए बी डिव्हिलियर्स सारख्या दिग्गज फलंदाजाला नटराजनने बोल्ड केले. २०२० मधल्या आयपीएल मोसमानंतर नटराजनला ‘यॉर्कर मॅन’ नाव पडले. हुकमी यॉर्कर टाकणारा गोलंदाज म्हणून त्याची कीर्ती पसरली. कष्टाचे फळ नटराजनला मिळाले आणि त्याचे प्रशिक्षक जयप्रकाश यांचे स्वप्न साकारले गेले जेव्हा नटराजनला ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाणार्‍या भारताच्या ट्वेन्टी-२० संघात निवडले गेले.

स्वप्न साकारले
पहिले दोन एक दिवसीय सामने गमावल्यावर संघ व्यवस्थापनाने जसप्रीत बुमरा आणि महंमद शमीला विश्रांती देण्याचा निर्णय घेताना नटराजनला एक दिवसीय पदार्पण करायची संधी दिली. नटराजनने खरी चमक दाखवली ती  ट्वेन्टी-२०  मालिकेत. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दडपण टाकूनही नटराजनने गोलंदाजी करताना टप्पा, दिशा यावर कौतुकास्पद नियंत्रण ठेवले. विशेष करून महत्त्वाच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२०  सामन्यात ४ षटकात २० धावा देताना नटराजनने २ मुख्य फलंदाजांना बाद करून सामना जिंकून देण्यात वाटा उचलला नाही तर मालिकेतील विजयात मोठा हातभार लावला. कप्तान विराट कोहलीपासून ते हार्दिक पंड्यापर्यंत सगळ्यांनी नटराजनचे कौतुक केले. देशी विदेशी समालोचकांनी आणि क्रिकेट जाणकारांनी नटराजनवर स्तुतिसुमने उधळली.

आता ओढ घराची
गेल्या चार महिन्यांबद्दल बोलताना नटराजन भावुक होतो. ‘‘आयपीएलची तयारी मग आखातात झालेली मुख्य स्पर्धा आणि त्यात मिळालेले यश. भारतीय संघात झालेली निवड आणि तिथूनच परस्पर ऑस्ट्रेलिया दौरा. शेवटी  ट्वेन्टी-२०  मालिकेतील विजय आणि त्यातील नटराजनची कामगिरी हे सगळेच स्वप्नवत वाटत आहे मला. हे शक्य झाले ते माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे आणि जयप्रकाश यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे. म्हणूनच मी आदरापोटी जयप्रकाश यांचे नाव मनगटावर गोंदवून घेतले आहे. ते माझ्या सतत सोबत आहेत असेच मला तो टॅटू बघून वाटते आणि मोठा मानसिक आधार मिळतो.

माझ्या कुटुंबाने खूप गरिबीत दिवस काढले आहेत. वेळप्रसंगी पोटाला चिमटा काढून माझ्या क्रिकेटला पाठबळ दिले आहे. आता मला माझ्या कुटुंबाला सुखी करायचे आहे. त्यांना चांगले जीवन अनुभवायला द्यायचे आहे. तसेच मला आयपीएल स्पर्धा चालू असताना मुलगी झाली आहे जिला मी अजून पाहिलेले सुद्धा नाही. म्हणून आता मला घराची ओढ लागली आहे. कधी घरी जातोय आणि कुटुंबाला भेटतोय माझ्या मुलीबरोबर खेळतोय असे झाले आहे मला’’, नटराजन म्हणतो.

चिन्नप्पामपट्टी सारख्या छोट्या गावातून येऊन असंख्य अडचणींवर मात करताना नटराजनने देशाकरता क्रिकेट खेळायचे स्वप्न नुसते मनात बाळगले नाही तर त्याचा नेटाने पाठपुरावा केला. जर हीच जिद्दं कायम राखत नटराजन गोलंदाजीत सुधारणा करत गेला तर २०२१ साली होणार्‍या  ट्वेन्टी-२० च्या जागतिक करंडक स्पर्धेत संघातील अत्यंत महत्त्वाचा खेळाडू म्हणून तो ठरू शकतो.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com