भक्कम आधार देणारे व्हा... (उदय टिकेकर)

उदय टिकेकर saptrang.saptrang@gmail.com
Sunday, 13 December 2020

पालक म्हणून आपण विचारांची गर्दी झालेल्या मुलाला त्या गोंधळातून बाहेर काढून योग्य मार्ग दाखवायचा असतो. बाकी आपण काही करू शकत नाही. पालक जर मुलांच्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीत हस्तक्षेप करू लागले तर मुलांचं वैयक्तिक स्वातंत्र्य उफाळून येतं आणि मग ते भलत्याच दिशेला जातात. त्यामुळे आपण मुलांच्या आयुष्यातील मजबूत खांब आहोत एवढीच जाणीव त्यांना करून देणं महत्त्वाचं असतं.

पालक म्हणून आपण विचारांची गर्दी झालेल्या मुलाला त्या गोंधळातून बाहेर काढून योग्य मार्ग दाखवायचा असतो. बाकी आपण काही करू शकत नाही. पालक जर मुलांच्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीत हस्तक्षेप करू लागले तर मुलांचं वैयक्तिक स्वातंत्र्य उफाळून येतं आणि मग ते भलत्याच दिशेला जातात. त्यामुळे आपण मुलांच्या आयुष्यातील मजबूत खांब आहोत एवढीच जाणीव त्यांना करून देणं महत्त्वाचं असतं. पडणं, धडपडणं या गोष्टी आयुष्यात होतातच, पण त्या प्रत्येक वेळी हा खांब आधारासाठी आहे ही जाणीव त्यांना पालकांनी करून द्यावी.

माझे आई-बाबा हे कायमच माझ्यासाठी एक आदर्श, उत्तम मार्गदर्शक म्हणून राहिलेले आहेत. मी आज जे काही आहे ते त्यांच्यामुळंच आहे. त्यांनी मला काही शिकवलं असं म्हणण्यापेक्षा ते माझ्याकडं आनुवंशिकतेनं आलं आहे असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. कारण ‘‘तू अमुक गोष्ट कर’’ असं त्यांनी मला कधी सांगितलं नाही. त्यांच्या वागण्यातून माझ्यात ते रुजत गेलं. माझी आई ही माणुसकीचा झरा होती. आलेल्या लोकांचं अतिशय आनंदानं आदरातिथ्य करणं, त्यांना चांगले, स्वादिष्ट पदार्थ करून खाऊ घालणं तिला खूप आवडायचं. एखाद्याला तिच्या हातचा पदार्थ आवडला तर पुढच्या वेळी महिन्यांनी वा वर्षांनी त्यांच्याकडे जाताना ती तो पदार्थ आठवणीने करून घेऊन जायची. आज तिला जाऊन सहा वर्ष झालीत तरी लोक तिच्या पदार्थांची, आदरातिथ्याची भेटल्यावर आठवण काढतात. तिचा हाच वारसा माझ्याकडे आला आहे. मला देखील पदार्थ बनवून लोकांना खाऊ घालायला आवडतं. शुटिंगला जाताना एखाद्याला आवडलेला पदार्थ मी आठवणीने बनवून तरी घेऊन जातो किंवा विकत घेऊन जातो. यासाठी सेटवर माझी विशेष ओळख असते. आपण दिलेला पदार्थ कोणीतरी आवडीनं खातं यात मला मनापासून आनंद मिळतो. ही सवय आईकडूनच माझ्याकडे आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वडिलांकडून मी नियमित व्यायाम करणं, आजचं काम पुढं न ढकलता आजच करायचं या महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. पूर्वी मी काहीसा आळशी होतो. पण कालांतरानं मला जाणवलं की वेळच्यावेळी काम केलं म्हणजे आपण तणावमुक्त आणि शांत राहतो. जगण्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण बहुतेक वेळा गोष्टी वेळेवर पूर्ण न झाल्यामुळं, वेळ निघून गेल्यामुळं आपण अस्वस्थ किंवा निराश होत असतो. वेळ पाळली तर हे त्रास होत नाही. पपांना संगीताचं अतिशय वेड होतं. ते गेल्यावर मी त्यांनी लिहिलेल्या रोजनिशी (डायरी) वाचल्या तेव्हा मला ते अधिक ठळकपणे कळलं. लोक डायरी लिहितात तेव्हा बहुतेक वेळा डायरीमध्ये,"मला या व्यक्तीची ही गोष्ट आवडली नाही, अमुक व्यक्ती मला वाईट बोलली" यासारख्या गोष्टी दिसून येतात. पण वडिलांचं संगीत प्रेम प्रत्येक पानातून दिसलं. डायरीच्या पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत," आज या खाँसाहेबांचं गाणं ऐकलं, आहाहा! काय मजा आली!!" यासारख्या वर्णनाबरोबर त्या रागाचं नोटेशन लिहून ठेवलेलं होतं असे सगळे तपशील दिसून आले. ही सकारात्मकता, आपल्या आवडत्या गोष्टींकडे  वेडानं बघणं, त्यामध्ये चोवीस तास गुंतून राहाणं ही गोष्ट त्यांच्याकडूनच माझ्याकडे आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अर्थात त्यांनी लिहिलेलं सगळं वाचल्यानंतरही गोष्ट माझ्या लक्षात आली. वडिलांना संगीतात करिअर करायचं होतं, पण त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे असेल किंवा अन्य काही कारणामुळे असेल ते करता आलं नाही. मला नाटकात, अभिनय क्षेत्रात काम करायचंय हे मी वीस-बावीसाव्या वर्षी त्यांना सांगितल्यावर मात्र त्यांनी मला अगदी मनापासून पाठिंबा दिला. ते म्हणाले, ‘‘ उदय, तू बिनधास्तपणे काम कर, पैशाची वगैरे काही काळजी करू नकोस !’’ त्यांचं हे वागणं  त्यावेळी माझ्या दृष्टीने अगदी स्वाभाविक होतं कारण मुळातच त्यांनी कधीच कुठली गोष्टीचा अथवा आपल्या विचारांचा देखावा केला नव्हता. त्यांचं हे स्वाभाविक वागणं ही किती मोठी गोष्ट होती हे आता मला समजतंय. मी एक वर्षाचा असल्यापासून त्यांच्या सोबत ब्राम्हणसभेच्या तालमीला जायचो. संगीतातल्या कितीतरी गोष्टी मी अगदी सहज समजून घेतल्या. बरेचदा माझी पत्नी शास्त्रीय गायिका आरती मला आश्चर्याने विचारते की,"अरे! हे तुला माहीत आहे?"  हे इतकं सहज माझ्याकडे आलं आहे की त्यात मोठेपणा वगैरे मला काही जाणवतच नाही. माझ्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आलो हीच गोष्ट माझ्यासाठी खूप ग्रेट आहे.

Image may contain: 3 people, glasses

पालक म्हणून मी माझ्या आईवडिलांपेक्षा अधिक खुल्या विचारांचा आहे. कदाचित पुढची पिढी असल्यामुळे असं असू शकतं. सहनशक्ती, अधिक काळजी घेणं या गोष्टींबाबत पालकत्वातील हे वेगळेपण दिसून येतं. स्वानंदीच्या बाबतीत मी सतत तुझ्यामागे आहे ही जाणीव तिला करून दिली आहे, पण तिच्या निर्णयात, आयुष्यात मी ढवळाढवळ करत नाही. माझ्या पालकांचीही माझ्या जगण्यात ढवळाढवळ नव्हती, पण प्रत्यक्ष आणि भावनिक पातळीवर ते अधिक गुंतलेले होते. मी पण  स्वानंदीच्या बाबतीत तसा गुंतलेला आहे पण मी ते दर्शवत नाही. माझं तिच्याकडे व्यवस्थित लक्ष असतं पण लांबून ! तिला गरज पडली की मी लगेच हजर होतो. ती बाहेर ट्रेकिंगसाठी, शुटिंगसाठी  गेली की मी सतत संपर्कात राहून लक्ष ठेवत असतो. हल्लीच्या मुलांना स्वातंत्र्य हवं असतं आणि ती गोष्ट ते चांगल्या प्रकारे पेलतातही. आम्ही मात्र पालकांवर खूप अवलंबून होतो. ही पिढी इतकी स्वतंत्र झाली कारण त्यांना तेवढ्या मोठ्या प्रमाणात गोष्टी उपलब्ध आहे. जगात काय सुरू आहे हे त्यांना सहज समजतं. काळानुसार पिढीमध्ये होणारा हा बदल मी स्वीकारला आहे. या बदलाला सामोरं जाताना आपण मुलांचे मित्र बनणं अधिक गरजेचं आहे. मी स्वानंदीचा वडिलांपेक्षा मित्र जास्त आहे. या गोष्टी मी  आजूबाजूला बघूनच शिकलो. 
काही वडील आणि मुलीच्या, वडील- मुलांच्या नात्यांची निरीक्षणं केली, त्यातल्या नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही बाजू समजून घेतल्या. सकारात्मक बाजू ही आपल्याला आपोआपच प्रभावित करते आणि आपण तसे वागायला लागतो. मी बऱ्यापैकी तसाच असल्याने हे बदल माझ्यात सहज झाले असं म्हणता येईल. आपण मुलांसोबत ‘बापगिरी’ करण्यापेक्षा ‘दोस्तगिरी’ केली तर प्रत्येक गोष्ट, अडचण सांगण्यासाठी मुलांचा पहिला फोन आपल्याला येतो हे खात्रीने सांगतो. माझ्या आणि स्वानंदीच्या बाबतीत नेहमी असाच थेट संवाद असतो."बाबा हे असं असं आहे, मी काय करू?" असं ती कुठेही असली तरी मला थेट फोन करून विचारते. मैत्रीण किंवा अन्य कोणी आमच्यामध्ये अजिबात नसतं. या थेट संवादाचं कारण म्हणजे आमच्यात असणारं मैत्रीचं नातं. मी माझ्या आईवडिलांचा थोडा उशिरा मित्र झालो, त्यातही आईचा लवकर आणि वडिलांचा नंतर झालो. पण स्वानंदीच्या बाबतीत पहिल्या दिवसापासूनच आमच्यात हे मैत्रीचं नातं आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने संवाद अगदी थेट असतो.

आपल्या मुलाला अथवा मुलीला डोळ्यासमोर वाढताना बघणं हे खूपच आनंददायी असतं, कमाल असतं आणि खूप आश्चर्याने भरलेलं असतं. स्वानंदी जे काही करते त्या प्रत्येक गोष्टीतून मिळणारा आनंद हा प्रत्येक वेळी द्विगुणित होत असतो. हे काही केवळ माझं व आरतीचं श्रेय नाही, तर माझ्या पालकांकडून माझ्याकडे जे आलं ते पुढे आपोआपच स्वानंदीकडे गेलं आहे. तिची कोणतीही समस्या सोडवण्यासाठी मी तिच्यासाठी पहिला पर्याय असतो याचा मला खरोखरच आनंद वाटतो. तिला मनाने रिलॕक्स होण्यासाठी मी सर्वात जवळचा वाटतो ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीसाठी मनमोकळं होणं, मनाने शांत राहणं हे गरजेचं असतंच. त्यासाठी प्रत्येकाला एक जागा हवी असते. माझ्या आणि स्वानंदीच्या बाबतीत आम्ही दोघं परस्परांसाठी ती जागा आहोत. हा अनुभव खरोखरच  खूप कमालीचा आहे.

हल्लीच्या मुलांना खरं तर काही शिकवण्याची फारशी गरज नसते, कारण शाळा, कॉलेजातून ते खूप काही शिकून आलेले असतात, त्यात चांगलं वाईट दोन्ही असतं. त्यातून योग्य ते निवडण्यासाठी योग्य ती दिशा दाखवणं एवढचं आपलं काम असतं. वाहतूक पोलीस जसं वाहतूक कोंडी झाल्यावर, ज्याप्रमाणे मार्गदर्शन करून हळूहळू ती कोंडी दूर करतो, तसंच पालक म्हणून आपण विचारांची गर्दी झालेल्या मुलाला त्या गोंधळातून बाहेर काढून योग्य मार्ग दाखवायचा असतो. बाकी आपण काही करू शकत नाही. पालक जर मुलांच्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीत हस्तक्षेप करू लागले तर मुलांची वैयक्तिक स्वातंत्र्याची भावना उफाळून येते आणि मग ते भलत्याच दिशेला जातात. त्यामुळे आपण मुलांच्या आयुष्यातील मजबूत खांब आहोत एवढीच जाणीव त्यांना करून देणं महत्त्वाचं असतं. पडणं, धडपडणं या गोष्टी आयुष्यात होतातच, पण त्या प्रत्येक वेळी हा खांब आधारासाठी आहे ही जाणीव त्यांना पालकांनी करून द्यावी. या सर्व गोष्टी गोष्टी मी स्वानंदीला माझ्या वागण्यातूनच शिकवल्या असं म्हणता येईल. एखादी गोष्ट कर, असं सांगण्यापेक्षा "मी असं करतो आहे, बघ तुला वाटलं तर तू पण कर" एवढच मी तिला सांगतो. ते ही अतिशय प्रेमाने ! जबरदस्ती केली तर मुलं ती गोष्ट खोडून काढतात, शिवाय त्यांना बाहेर अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्यातून त्यांना आपला मार्ग योग्य वाटला पाहिजे. हल्ली शाळेपासूनच मुलांची मतं बऱ्यापैकी पक्की झालेली असतात. त्यामुळे त्यांच्या हिताचं काहीही सांगताना त्यांची मतं आपण आधी शांतपणे ऐकून घ्यावी आणि मग त्यातून गाळून योग्य ते विचार मुलांसमोर ठेवावे, हे पालक म्हणून आपण केलं पाहिजे. तरच मुलं आपण सांगितलेल्या गोष्टीवर विचार करतील.

मी आणि आरती प्रेमात पडलो तेव्हा ती किती व्यस्त असणार आहे ते मला, आणि मी किती व्यस्त असणार आहे हे तिला माहीत होतं. पण आमच्या सगळ्यांचा आधाराचा खांब माझी आई होती. त्यामुळे स्वानंदी झाल्यावरही आरती दौऱ्यावर असेल तेव्हा मी आहे, हे तिला माहित होतं, मी व्यस्त असेल तेव्हा आई आहे हे मला माहित होतं आणि आता स्वानंदीलाही, आम्ही आहोत, हे पक्क माहित आहे. त्यामुळे,"अरे बापरे!! आता काय करायचं?" असा प्रश्न आम्हाला कधीच पडला नाही. आमच्यापेक्षा स्वानंदीवर आईचेच संस्कार जास्त झालेत, कारण आम्ही दोघं व्यस्त असायचो तेव्हा आई स्वानंदीबरोबर असायची आणि आम्हाला वेळ असायचा तेव्हा आम्ही सगळे एकत्र असायचो. आई आमचा खूपच भक्कम खांब होती, जिने आम्हा सगळ्यांना आधार दिला. लोकांसाठी काहीतरी करणं, त्यांच्याबद्दल सहानुभूती असणं या गोष्टी स्वानंदीकडे माझ्या आईकडूनच आल्या आहेत.

स्वानंदीनं ‘एलएलएम’ केलं, त्यानंतर तिनं वर्ष -दीड वर्ष पुण्यात प्रॕक्टीस केली. पुढच्या शिक्षणासाठी तिला अमेरिकेत जायचं होतं. पण तिची आवड वेगळी आहे हे आम्हाला माहित असल्यानं  त्यावेळी मी व आरतीनं ठरवलं आपण तिच्याशी बोलू या आणि आम्ही तिला विचारलं, ‘‘बाळा तुझं मन नक्की कुठे आहे? तू अमेरिकेत जाऊन कॉर्पोरेट लॉ शिकून काय करशील?" ती म्हणाली,‘‘ पैसे कमवीन ’’ त्यावर आम्ही म्हणालो, ‘‘पण तुझी मनापासून आवड कोणती आहे?’’ कारण आम्ही तिला कॉलेजात असल्यापासूनच पुरूषोत्तम करंडक आदी स्पर्धामध्ये सहभागी होताना बघत होतो. मोठमोठी पारितोषिकं तिला मिळालेली बघितली होती. तिची गुणवत्ता आम्हाला दिसत होती.

सगळ्या स्पर्धा, तालमी, स्पर्धेच्या फेऱ्या या वेळी आम्ही तिथे जायचो. तिच्यात अभिनयाची गुणवत्ता आहे हे आम्हाला माहित होतं. त्यामुळे आम्ही तिला विचारलं," तुला खरंच या क्षेत्रात जायची इच्छा आहे का? की अभिनय ही तुझी खरी आवड आहे? फक्त पैशांचाच प्रश्न असेल तर आमची तू एकच मुलगी आहेस, त्यामुळे आमचं सगळं तुझंच आहे. पण तुला तुझ्याच कमवलेल्या पैशांवर तुला जगायचं असेल तर आमची त्याला ना नाही. तू अभिनय क्षेत्रात स्थिर होईपर्यंत आम्ही तुला महिन्याला  ठराविक रक्कम देऊ. माझ्या वडिलांनी मला आधार दिला तसं आम्ही तुझ्यासाठी आहोतच. आम्हाला माहित आहे की अभिनय क्षेत्रात पैसे मिळण्यासाठी भरपूर वाट बघावी लागते, पण तोपर्यंत ती तुझी कमाईच समज. तुझे आईबाबा आहेत तुझ्यासोबत, तुला जे मनापासून करावसं वाटतं ते तू कर." असं सगळं सांगितल्यावर तिने निर्णय बदलला. त्यानंतर तिचं "प्राइज टॕग" हे नाटक आलं, त्यात विजय केंकरेंनी तिला पाहिलं आणि मग पुढे "दिल दोस्ती दुनियादारी" मालिका मिळाली. हा तिच्या करिअरच्या आणि आमच्या पालकत्वाच्या दृष्टीने "टर्निंग पॉइंट" म्हणता येऊ शकेल.

पैसा ही गोष्ट माझ्या दृष्टीने कधीच महत्त्वाची नव्हती. पॕशन आणि कामातून मिळणारा आनंद हेच माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. त्यातून आपण पुरेसा पैसा नक्कीच मिळवू शकतो हे माहित होतं. शिवाय गरज पडेल तशी त्या त्या वेळी ती ती गोष्ट मला मिळत गेली, त्यामुळे समाधानी राहिलो. अगदी हेलिकॉप्टरच घ्यायचं असा वेडा हट्ट मी ठेवला नाही. एक छानशी गाडी घेऊन मला भरपूर आनंद मिळत आहे तर तो मी का घेऊ नये? हे माझं आधीपासूनच मत होतं. तेच मी स्वानंदीला सांगितलं," आपण डाऊन टू अर्थ जेवढं राहू तेवढं आपलं आयुष्य सुखी राहील." कारण आयुष्यातील सगळी दुःख, कसोटी, अस्वस्थता हे सगळं "आणखी हवं" या स्पर्धेतून सुरू होतं. त्यामुळे मी नेहमी स्वानंदीला सांगतो की स्पर्धा आपल्या स्वतःशी असावी. आजचा दिवस संपला की दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने कामाला सुरूवात करावी. स्वतःशी स्पर्धा असेल तर आपोआप तुमची उन्नती होते आणि आपोआप सगळं तुम्हाला मिळत जातं. मी स्वतः आजही याच विचाराने जगतो. त्यामुळे प्रत्येक दिवशी नव्या ऊर्जेने आणि उत्साहाने काम करू शकतो. स्वानंदीला ही गोष्ट मी दिली आहे याचा मला आनंद आहे.

मुलांना "अमुक गोष्ट करू नको" असं सांगितलं तर तिथे बंड सुरू होतं. त्यामुळे मुलांनी एखादी गोष्ट आपल्या मनासारखी करावी असं जर पालकांना वाटत असेल तर आधी ती गोष्ट त्यांनी स्वतः केली पाहिजे. मोबाइलच्या वापराबाबतही हेच तत्त्व पाळलं पाहिजे. अन्यथा मुलं पालकांचं ऐकत नाहीत. स्वानंदी लहान होती तेव्हा मोबाइल हा विषयच नव्हता, पण आता मुलं मोबाइलचा अती वापर करतात, ही समस्या अनेक पालकांना सतावते. मुळात मोठ्यांना तो हातातून खाली ठेवता येत नाही, तर मुलांना बोलून काय फायदा!. पालकांनी मुलांचा अतिशय प्रिय, कायम सोबत असणारा, सामजून घेणारा पण अती ढवळाढवळ न करणारा मित्र बनलं पाहिजे. ही जाणीव आपल्या मुलांना करून दिली तर त्यांच आयुष्य फार कमाल होतं. कारण त्यानंतर मुलंही आपल्याकडे त्याच प्रेमानं आणि कौतुकानं बघतात. एकदा त्यांचं मन खुलं झालं की मग ते तुम्ही सांगाल ते सगळं टिपकागदासारखं त्यांच्यात शोषून घेतात. पण तोपर्यंत संयम हवा, कारण पालकत्व हे अतिशय संयमानं करण्याचं काम आहे. पालक बरेचदा आपलं नैराश्य अथवा पराभव मुलांवर रागावून, त्यांना मारून व्यक्त करतात. हे अतिशय चूक आहे. बरेचसे पालक आपल्या स्वतःच्या कोषातून बाहेरच येत नाही, पण एकदा मूल झालं की पालकांनी आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. करिअर आणि मूल या दोन्ही गोष्टींना समान महत्त्व आणि समान वेळ दिला पाहिजे. हे संतुलन पालकांना ठेवता आलं पाहिजे.
(शब्दांकन : मोना भावसार )

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Uday Tikekar on strong supporter