
मी स्वतंत्र विचारांचा असलो आणि स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता असलो तरी स्वातंत्र्य हे जबाबदारीसोबत येतं असं माझं म्हणणं आहे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातली सीमारेषा समजून घेतली पाहिजे, ती जर समजून घेतली नाही तर अवघड होईल आणि पालक म्हणून ती समजणं तर अतिशय गरजेचं आहे. मुलांना या सर्व गोष्टी समजावताना सर्वप्रथम पालक व मुलांच्या नात्यात दृढ मैत्री असणं फार गरजेचं आहे, ते सांभाळण्याचा मी नेहमी प्रयत्न केला. लहानपणी मला ज्या गोष्टींबद्दल न्यूनगंड होता किंवा ज्या गोष्टी मला मिळाल्या नाहीत, त्या गोष्टींची कमतरता मुलांना वाटू नये हे मी पाहिलं. अर्थात यात भौतिक गोष्टींचा समावेश नसून मानसिक गरजा माझ्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.
मी स्वतंत्र विचारांचा असलो आणि स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता असलो तरी स्वातंत्र्य हे जबाबदारीसोबत येतं असं माझं म्हणणं आहे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातली सीमारेषा समजून घेतली पाहिजे, ती जर समजून घेतली नाही तर अवघड होईल आणि पालक म्हणून ती समजणं तर अतिशय गरजेचं आहे. मुलांना या सर्व गोष्टी समजावताना सर्वप्रथम पालक व मुलांच्या नात्यात दृढ मैत्री असणं फार गरजेचं आहे, ते सांभाळण्याचा मी नेहमी प्रयत्न केला. लहानपणी मला ज्या गोष्टींबद्दल न्यूनगंड होता किंवा ज्या गोष्टी मला मिळाल्या नाहीत, त्या गोष्टींची कमतरता मुलांना वाटू नये हे मी पाहिलं. अर्थात यात भौतिक गोष्टींचा समावेश नसून मानसिक गरजा माझ्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.
पुण्यातील सदाशिव पेठेतील एकत्र कुटुंबात मी लहानाचा मोठा झालो. पारंपरिक पुणेरी वातावरण होतं. लवकर उठणं, लवकर झोपणं याबरोबरच ‘वक्रतुंड महाकाय’ या श्लोकापासून सकाळची सुरुवात व्हायची. संध्याकाळी परवाचा (पाढे), रामरक्षा म्हणायची, जेवताना लहान मुलं आधी बसायची, मग पुरुष मंडळी, मग स्त्रिया जेवायच्या. अशाप्रकारे अत्यंत पारंपरिक आणि एकत्र कुटुंब पद्धतीतील माझं घरं होतं. तेव्हा जीवनात टीव्हीचा प्रवेश झालेला नव्हता. स्वतःची आवड वगैरे असं काही ते स्वतंत्र वातावरण नव्हतं. त्यामुळं आजच्यासारखं पालकांशी मोकळेपणानं बोलण्याची तेव्हा पध्दतीच नव्हती. आज मी पालक म्हणून माझ्या मुलांशी मित्रत्वाच्या नात्याने बोलतो, तसं माझ्या पालकांशी बोलण्याची तेव्हा परवानगीच नव्हती. मनातील काही गोष्टी विचारायच्या असतील तर त्या कशाबशा आईपर्यंतच पोहोचायच्या, वडिलांना थेट विचारण्याचा प्रसंग कधी आलाच नाही. आज उलटं होतं, आज वातावरण इतकं मोकळं आहे की माझी मुलंच बरेचदा माझे पालक असल्यासारखे वाटतात. त्यामुळे पालक व्हायची माझी संधी राहूनच गेली असं गमतीनं म्हणता येऊ शकेल.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
माझं बालपण अतिशय पारंपरिक वातावरणात गेल्यामुळं काही संस्कार नक्कीच झाले आहेत. भाषाशुध्दी, व्याकरण, पाठांतर, उच्चार या गोष्टी पक्क्या झाल्या. त्याचा पुढं मला माझ्या करिअरमध्ये नक्कीच फायदा झाला. पावकी, निमकी हे पाढे माझे अजूनही पाठ आहेत. आम्ही सगळे चुलत भाऊ वगैरे मिळून दहा भावंडं. गणपतीच्या दिवसांत सगळे मिळून दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन एकवीस वेळा अथर्वशीर्ष म्हणायचो. शेवटच्या दिवशी गणपतीचा एक फोटो मिळायचा. तो फोटो मिळवण्यासाठी धडपड असायची. घरात दीड दिवसाचा गणपती असायचा. ती संस्कृतीच वेगळी होती. त्याची वर्णनं आपण अनेक साहित्यातून वाचलेलीपण आहेत. मी त्याच संस्कृतीचा एक भाग होतो, त्याची एक प्रकारे शिस्तही लागते. पण आज मात्र मी वैचारिक, वैयक्तिक स्वातंत्र्याचाच पुरस्कर्ता आहे. त्याकाळच्या वातावरणात एक शिस्त, सुसूत्रता नक्कीच होती, पण बऱ्याचशा गोष्टी, प्रश्न, विचार मनातल्या मनातच राहायचे आणि ती काही फारशी बरी गोष्ट होती असं मला वाटत नाही.
मनातले प्रश्न विचारायची सुध्दा भिती वाटणं, त्या गोष्टी नाहीच विचारायच्या हे मला योग्य वाटत नाही. कारण प्रश्न हे पडलेच पाहिजेत. लहान वयात पडणाऱ्या प्रश्नांना उत्तरंही त्या त्या वेळी त्या पध्दतीनं मिळालीच पाहिजेत, पण प्रश्न विचारण्याची काही सोयच नसणं हे बरं लक्षण नाही. थोडक्यात माझ्या लहानपणी असणारी पारंपरिक एकत्र कुटुंब पद्धती ही काही बाबतीत योग्य असली तरी तिचे काही तोटे नक्कीच होते. त्यामुळे दोन अत्यंत वेगळ्या वातावरणाचा अनुभव आमच्या पिढीनं घेतला असं म्हणता येईल. मी गंमतीने मुलांना म्हणतो," तुम्ही किती बिनधास्तपणे आम्हाला, असं कर, तसं कर सांगतात. आमच्या लहानपणी आमचे आईवडील ऑर्डर द्यायचे आणि आता तुम्ही देतात, मग मी कधी पालक होणार? दोन्हीकडे मी रिसिव्हींग एंडलाच राहिलो ना!" अर्थात पालक झाल्यानंतरही मी रिसीव्हींग एन्डला राहिलो याचं कारण म्हणजे मी व माझी पत्नी डॉ. स्वाती आम्ही मोकळ्या, नव्या, स्वतंत्र विचारांचे पुरस्कर्ते आहोत, त्यामुळे हा मोकळेपणा आयुष्यातही असावा हा त्यामागचा विचार होता.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
चाकोरीबद्ध आणि जुन्या विचारांचं वातावरण अनुभवल्यामुळे एक प्रकारची बंडखोरी आपोआप विचारांमध्ये येतेच, माझ्या आयुष्यातही ती आली. अशावेळी काही धाडसी निर्णय तुम्हांला घ्यावे लागतात आणि पचवावेही लागतात. त्याची किंमत तुम्हालाच चुकवावी लागते. पण त्या विषयी पश्चात्ताप नसतो कारण तुम्हाला काहीतरी करून बघायचं असतं. यशापयश मिळणं हा त्यातला मुद्दा खूप वेगळा आहे, पण आपल्याला आयुष्यात जे मिळवायचं आहे त्यासाठी प्रामाणिक मेहनतीतून मिळणारा आनंद हा कुठल्याही यशाइतकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे माझ्यामध्ये असणारी बंडखोरी ही तो आनंद मिळवण्याच्या विचारातूनच आली. शाळेत असताना मी गणितात चांगला होतो. त्यामुळे माझ्या आजीची इच्छा होती की मी शिकावं, ग्रॕज्युएट व्हावं आणि छानपैकी बँकेत नोकरी करावी. हीच त्यावेळेची सर्वांत मोठी अचिव्हमेंट होती. नऊ ते पाच नोकरी, छान संसार या पलीकडचं आयुष्य हा त्यावेळी पर्यायच नव्हता. तसं आयुष्य मला जगायचं नव्हतं, कारण माझ्या आवडीनिवडी वेगळ्या होत्या, त्या कुठल्याही पारंपरिक प्रकारच्या नव्हत्या. नाटकात सिनेमात काम करून पैसे मिळवणं किंवा व्यवसाय म्हणून ते करणं हा त्यावेळी माझा धाडसी निर्णय होता.
आता करिअरसाठी खूप वेगवेगळे पर्याय आहेत, संधी आहेत आणि मुख्य म्हणजे पालकांना स्वतःलाच वाटतं की आपल्या मुलानं यामध्ये करिअर करावं. त्यासाठी लाखो रूपये खर्च करून मुलांना परदेशी पाठवायलाही आजची पालक मंडळी तयार असते. त्यावेळी तशी परिस्थिती नव्हती. म्हणून मला एकप्रकारे बंडखोरीच करावी लागली. बारावीनंतर नाट्यशास्त्र विषयात पदवीधर व्हायचं असं ठरवेपर्यंत," तो काही ऐकणार नाही, त्याच्या मनात असेल तेच तो करेल", अशा पातळीपर्यंतची मानसिकता घरच्यांची तयार झाली होती. त्यांनी फारसा विरोध केला नाही, पण हे जे करतो आहे ते काही फार भारी नाही असंच त्यांना वाटत होतं. काही नातेवाइकांची प्रतिक्रिया तर," ही तर अगदीच दळभद्रीपणाची लक्षणं आहेत," अशी होती.
म्हणजे जी गोष्ट आपण छंद आणि हौस म्हणून जपतो त्याचा हा रंग लावून व्यवसाय म्हणून उपयोग करतो आहे, म्हणजे यासारखं दळभद्र लक्षणंच नाही, असा काहींचा दृष्टिकोन होता. पण अशावेळी आपण त्याकडे दुर्लक्षच करायचं असतं आणि मी तेच केलं. मी नाट्यशास्त्रात पदवी घेतली, त्यानंतर मासकम्युनिकेशन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यामुळे मला काय करायचंय आणि कुठे जायचंय हे पक्कं माहीत होतं. मात्र त्यात मला फार उंचीवर जायचं आहे, राष्ट्रीय पुरस्कार मिळवायचा, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करायचं असं काही डोक्यात नव्हतं. मला फक्त ज्या क्षेत्रात आनंद मिळतो त्या क्षेत्रात काम करायचं होतं. त्यात मेहनत करायची होती, त्यात स्वतःला तपासून बघायचं होतं. आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करताना कितीही कष्ट करावे लागले तरी त्यातून आनंदच मिळतो. सोळा तास काम केल्यावर सुध्दा,"काय मस्त वाटतंय!" अशीच प्रतिक्रिया येते. तर नावडतं काम करणाऱ्याला एक दोन तासांचा ओव्हरटाइम सुध्दा नकोसा वाटतो. मुळात त्याला आठ तासाचं कामही त्याला नकोसं वाटतं. माझं काम माझ्या आवडीचं असल्यामुळे मला संघर्ष वगैरे कधी जाणवलाच नाही किंवा असला तरी त्याचा कधी त्रास झाला नाही, उलट त्यातून आनंद मिळाला.
मी स्वतंत्र विचारांचा असलो आणि स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता असलो तरी स्वातंत्र्य हे जबाबदारीसोबत येतं असं माझं म्हणणं आहे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातली सीमारेषा समजून घेतली पाहिजे, ती जर समजून घेतली नाही तर अवघड होईल आणि पालक म्हणून ती समजणं तर अतिशय गरजेचं आहे. मुलांना या सर्व गोष्टी समजावताना सर्वप्रथम पालक व मुलांच्या नात्यात दृढ मैत्री असणं फार गरजेचं आहे, ते सांभाळण्याचा मी नेहमी प्रयत्न केला. लहानपणी मला ज्या गोष्टींबद्दल न्यूनगंड होता किंवा ज्या गोष्टी मला मिळाल्या नाहीत, त्या गोष्टींची कमतरता मुलांना वाटू नये हे मी पाहिलं. अर्थात यात भौतिक गोष्टींचा समावेश नसून मानसिक गरजा माझ्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. एक गोष्ट नक्की की, माझं बालपण रूढीवादी परंपरांच्या वातावरणात गेलं असलं तरी मी त्याच्याकडे सकारात्मक नजरेतूनच बघतो आणि त्यातल्या चांगल्या गोष्टींबद्दलच मला बोलायला आवडतं. त्यामुळे माझं बालपण खूप छान होतं आणि त्यात वेगळी मजा होती.
पण मी जेव्हा पालक झालो तेव्हा मला आणखी वेगळा दृष्टिकोन मिळाला. मला जाणवलं की प्रत्येक पिढीनुसार स्पर्धेची पातळी खूप वाढत गेली आहे. म्हणजे माझ्या लहानपणीची स्पर्धा, माझं लग्न झाल्यानंतरची संसारातील स्पर्धा, मी पालक झाल्यानंतर मुलांच्या जीवनातील स्पर्धा, ही दिवसेंदिवस खूप अघोरी होत चालली आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये मुलांचं बालपणच नासून गेलं की काय असं मला आणि माझी पत्नी डॉ. स्वाती आम्हा दोघांना वाटतं. या स्पर्धेमुळे ती माणूस कमी आणि यंत्रच अधिक बनू लागली आहेत. त्यामुळे आमचा प्रयत्न असा असतो की या तथाकथित स्पर्धेत आपली मुलं थोडी मागे राहिली तरी चालतील, पण त्या स्पर्धेच्या नादापायी त्यांच्यातील मानवी मूल्येच कमी होणार असतील तर उद्या त्यांनी कोणतेही यश प्राप्त केले तरी त्यात काही अर्थ राहणार नाही. हा मुद्दा आम्हांला जास्त महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे नातेसंबंधांमधील छोट्या गोष्टीतील गंमत, मुलांशी आपला होणारा संवाद या गोष्टी मला जास्त महत्त्वाच्या वाटतात. माझा मुलगा वेद मला कुठलाही प्रश्न अगदी सहज विचारू शकतो हे मला वेगवेगळ्या अर्थाने बरं वाटतं.
आमच्यामध्ये आदरापोटी असणारी थोडी भीती आहेच पण तेवढं स्वतंत्र वातावरणही आहे. त्यांच्यातील मानवी मूल्ये कशी जपली जातील याकडे आम्ही जास्त लक्ष देतो. आज माझ्या दोन्ही मुलांचे म्हणजे भैरवी व वेद दोघांचे त्यांच्या इतर चुलत वगैरे भावांशी खूप चांगले नातेसंबंध आहेत. वेद आजीशी दीड-दोन तास छान गप्पा मारतो. बरेच ठिकाणी या गोष्टी मी हरवलेल्या बघतो. "तू कशी आहेस?" या पलीकडे फारसा संवाद त्यांच्यात दिसत नाही. त्यामुळे माझ्या मुलांचं याबाबतीत मला नक्कीच कौतुक वाटतं.
सध्या सभोवताली असलेल्या अघोरी स्पर्धेचं आणखी एक चित्र म्हणजे बरेच पालक आपल्या अतृप्त इच्छा मुलांवर लादतात. त्या इच्छा मुलांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये त्या मुलाला अथवा मुलीला काय करायचं आहे की नाही, याचा विचारच केला जात नाही. ही गोष्ट सगळ्यात भयानक व धोकादायक आहे. कारण आपल्या अतृप्त इच्छा पूर्ण होण्यासाठी पालक मुलांना जन्माला घालत नाहीत. पालकांनी मुलांकडे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिलं पाहिजे. त्यांची आवडनिवड, त्यांची इच्छा पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे आणि पालक म्हणून तुम्ही त्यांना केवळ मार्गदर्शन केलं पाहिजे, आपले विचार, इच्छा मुलांवर अजिबात थोपवता कामा नये. एका ठरावीक वयापर्यंत आपण मुलांना चांगल्या-वाईट गोष्टींबद्दल सांगू शकतो, पण कालांतराने त्यांची त्याच गोष्टीबाबत वेगळी मतं होऊ शकतात.
त्याबद्दल ते तुमचं मत खोडू शकतात. अशावेळी पालकांना सुयोग्य आणि पटेल असं उत्तर मुलांना देता आलं पाहिजे. अन्यथा पालक स्वतः ती मूल्ये पाळत नसतील आणि केवळ मुलांना त्याबद्दल सांगत असतील तर मोठी झाल्यावर मुलांना पालकांबद्दल आदर राहाणार नाही. थोडक्यात जी मूल्यं मुलांनी पाळावी असं आपल्याला वाटतं, ती आधी स्वतः पाळली पाहिजे, म्हणजे ती वेगळी शिकवावी लागत नाहीत. कारण आपल्या वागण्याचा परिणाम मुलांवर आपोआप होतच असतो. त्यामुळे या सर्व गोष्टी पालकांनी अतिशय नाजूक आणि संवेदनाशील पद्धतीनं हाताळल्या पाहिजे. पण त्याचबरोबर मुलांशी संवाद साधताना त्यात मोकळेपणा, खरेपणा आणि हळुवारपणा पाहिजे. बरेचदा असं दिसतं की आपलं मूल स्पर्धेत टिकत नाही हे बघून त्याचा न्यूनगंड त्या मुलापेक्षा त्याच्या पालकांनाच जास्त येतो. हे फार भयानक आहे. त्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर होतो. अशावेळी मुलाला वाटतं की कालपरवापर्यंत छान वागणारे माझे पालक अचानक आपला राग का करू लागले आहेत, तो अधिक गोंधळतो.
नात्यातील अशी अनेक प्रकारची गुंतागुंत अलीकडे बघायला मिळते. म्हणूनच या गोष्टी अतिशय नाजूक असल्याने संवेदनशीलतेने हाताळल्या पाहिजे.
आज भैरवी व वेद यांना माझं व्यस्त वेळापत्रक माहीत आहे. स्वाती डॉक्टर असल्याने तिच्याही कामाच्या वेळा माहीत आहेत, बाबा घरी असला तर पूर्ण वेळ आपल्यासोबत असतो आणि नसला तर मग शुटींग संपेपर्यंत येत नाही हे ते जाणून आहेत. पण दहाबारा वर्षापूर्वी आलेला अनुभव मला हलवून टाकणारा होता. त्यावेळी माझं कुटुंब पुण्यात होतं आणि कामासाठी मला सतत मुंबईत राहावं लागायचं. व्यस्ततेमुळे मी फार कमी वेळा घरी यायचो.
वेद त्यावेळी साधारण दीड वर्षाचा होता. एकदा मी घरी गेल्यानंतर तो मला काका म्हणाला. कारण मी कधीतरी दिसतो आणि बाहेरच्यांना तो काकाच म्हणायचा त्यामुळे मलाही तो काका म्हटला. त्याच्या वयाच्या दृष्टीने ते बरोबर होतं, पण ते बघून त्यावेळी माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. त्यामुळे रात्री उशीरा आलो तरी चालेल, मुलांना नुसता झोपलेलो दिसलो तरी चालेल पण आपण एकत्र राहिलं पाहिजे हे त्यावेळी मला प्रकर्षाने जाणवलं. त्यानंतर ताबडतोब दोन महिन्यातच मी कुटुंबाला मुंबईत आणलं कारण ती गरजच होती. थोडक्यात आपलं करिअर कितीही व्यस्त असलं तरी कुटुंबाचं नात दृढ राहण्यासाठी पालकांना प्रयत्न करावेच लागतात, प्रसंगी कुटुंबाच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय घ्यावेच लागतात.
याबरोबरच पालकांनी मुलांना घरात मोकळं वातावरण उपलब्ध करून दिलं पाहिजे. मुलांच्या इच्छा, आवड, त्यांचं व्यक्तिमत्त्व जाणून त्याला आणखी खुलवलं पाहिजे. प्रत्येकाचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं हे समजून ते घडवण्यासाठी मुलांवर स्वतःच्या इच्छा न लादता त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य आकार देण्याचा प्रयत्न करावा. पालक म्हणून आपण एवढंच करू शकतो. मुलांना काय वाटतं याला नेहमी प्राधान्य दिलं पाहिजे आणि मग त्याला प्रोत्साहन देण्यासाठी, त्यादृष्टीने त्याला उत्तम मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून देणं हे पालकांचं कर्तव्य आहे. आपण सांगितलेली एखादी गोष्ट किंवा नियम काही वेळा आपल्याकडूनच मोडले जातात.
अशावेळी मुलं तो विरोधाभास चटकन निदर्शनास आणून देतात. त्यावेळी आपण चुकल्याबद्दल चटकन माफी मागणं योग्य ठरतं. बाबा चुकला पण त्याने माफी मागितली हे मुलांना लक्षात राहातं आणि पुढे ते जर चुकले तर ते ही चटकन चूक कबूल करून माफी मागतात. संस्कार करणारे पालक वेगळे आणि प्रत्यक्ष वागणारे पालक वेगळे असं होऊ शकत नाही आणि असं पालकांनी चुकूनही करू नये.
माझा आणि स्वातीचा प्रेमविवाह असल्यामुळे दोघांना एकमेकांच्या कामाच्या क्षेत्रांची पूर्ण कल्पना होती. मी माझे व्यावसायिक करिअर उशीरा म्हणजे वयाच्या तिशीत सुरू केलं. त्यापूर्वीच्या माझ्या सगळ्या बाबी प्रायोगिकच जास्त होत्या. त्यामुळे संसारातील एक वेळ अशीही होती की, स्वाती बाहेरचं सगळं बघत होती आणि मी घरातलं सगळं बघत होतो. त्यानंतर एक काळ असा होता की त्यावेळी माझ्याकडे व्यस्ततेमुळे घरासाठी अजिबातच वेळ नव्हता, त्यावेळी घराची सगळी जबाबदारी स्वातीनेच सांभाळली. मधला एक काळ असा होता की डॉक्टर असूनही त्यावेळी ती गृहिणी म्हणूनच जबाबदारी सांभाळत होती, पण यात कुठेही मनस्ताप वगैरे नव्हता, आमच्यात तेवढा समजूतदारपणा होता व आहे. पुढे मला स्थैर्य आल्यावर मी स्वातीला पुन्हा तिचं काम सुरू करण्याबाबत आग्रह केला. तू तुझ्या कामासाठी वेळ दे आणि मी पण घरासाठी वेळ देतो, असं ठरवलं. अशाप्रकारे समजूतदारपणाने परिस्थितीनुसार आम्ही गोष्टी हाताळल्या. आता स्वाती स्वतंत्र प्रॕक्टीसही करते.
कोरोनामुळं आलेल्या लॉकडाऊनचा काळ तर आमच्यासाठी फारच उत्तम होता. कारण त्या काळात पूर्णवेळ आम्ही कुटुंब म्हणून एकत्र होतो. असा वेळ आम्हाला पूर्वी मिळालाच नव्हता. त्याकाळात कामाची मस्त वाटणी झाली होती. खरं वाटणार नाही पण त्या पाच महिन्यात दोन्ही वेळेचा संपूर्ण स्वयंपाक मीच केला होता. तो खूपच आनंददायी अनुभव होता. मुलांनी साफसफाई करायची आणि स्वातीने उरलेली बाकीची कामं करायची अशी कामाची विभागणी होती. कारण त्यावेळी कामाला बाहेरचं कोणीच येणार नसल्यामुळे घरातच कामाची विभागणी केली होती. स्वाती डॉक्टर असल्याने ती त्यावेळी बाहेरची परिस्थिती हाताळण्यासाठी उभी होती. त्यावेळी ‘आर्सेनिक अल्बम’ या औषधाची मागणी खूपच वाढली होती आणि आयुष मंत्रालयाची त्याला मान्यता होती. त्यामुळे ते तयार करून लोकांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था आम्ही केली. जवळपास पन्नास हजार लोकांपर्यंत आम्ही हे औषध पोहोचवलं. अशा सामाजिक कामाचा नकळतपणे मुलांवरही खूप चांगला परिणाम होतो.
आपल्याला जमेल तेवढं आपल्या परीने लोकांपर्यंत पोहोचणं एवढंच आम्हाला अपेक्षित होतं. त्यामुळे आम्ही या कामाची कुठेही फारशी चर्चा केली नाही. पण आपण जेव्हा निरपेक्षपणे समाजाच्या हितासाठी एखादी गोष्ट करतो तेव्हा त्याचा खूप चांगला परिणाम मुलांवर होतो हे आम्हांला या अनुभवातून समजलं. मी व स्वातीने हे काम करायचं ठरवलं तेव्हा मुलंही अतिशय उत्साहाने ,"आम्ही काय करू?" असं विचारत आमच्या कामात सहभागी झाली. अशा कामामुळे मुलांना पालक म्हणून तुमच्याबद्दल प्रचंड आदर निर्माण होतो. हे व्हावं म्हणून अर्थातच आम्ही हे काम केलं नव्हतं. पण नकळतपणे संपूर्ण कुटुंब त्यात सहभागी झालं. मुंबईपासून कोकण, पुण्यापर्यंत आम्ही औषध पाठवले. औषध स्वाती तयार करायची आणि आम्ही त्याच्या वितरणाची व्यवस्था बघायचो. औषधाचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, विनोद सातव यांनी ते पाठवण्यासाठी मदत केली, माझा मित्र उत्तम ठाकूरने औषधांच्या बाटल्या मिळवून देण्यासाठी मदत केली. तसंच वैभव वाघ, संदीप भोसले या मित्रांनी देखील पुढे येऊन मदत केली.
थोडक्यात तुम्ही एखादं चांगलं काम करायला सुरूवात केली तर लोकही मदतीसाठी लगेच पुढे येतात आणि मग तो उपक्रम एकट्याचा न राहता सर्वांचा होतो. आपण अशा उपक्रमात नक्कीच सहभागी झालं पाहिजे. पालकत्वाच्या दृष्टीने ते महत्त्वाचं पाऊल ठरतं.
सध्याचा काळ हा तंत्रज्ञानाचा आहे त्यामुळे मोबाइल, स्मार्ट फोन या गोष्टी लोकांच्या जगण्याचा भाग बनू पहात आहे. पण माझं वैयक्तिक मत या बाबत वेगळं आहे. मोबाइल पेक्षा लॕण्डलाइन फोन मला जास्त चांगला वाटतो. याचं कारण म्हणजे ही आधुनिक गॕजेट्स वापरण्याची योग्य पध्दती अजून आपल्याला माहित नाही असं मला वाटतं. ते सर्व योग्य प्रकारे वापरण्याच्या योग्यतेचे आपण आहोत का? हे सर्वप्रथम बघितलं पाहिजे. कारण सध्याची परिस्थिती बघता ते अतिशय विचित्रपणे लोकांच्या आयुष्याचा भाग बनलेलं असल्याचं दिसतं. हे टिळक व आगरकर यांच्या "आधी स्वराज्य की समाजसुधारणा" या वादासारखं आहे. आधी गॕजेट योग्य प्रकारे वापरण्याची समज लोकांना द्यावी, मगच ती गरजेनुसार वापरली जावी. कारण घरातील चार माणसं समोरासमोर बसून एकमेकांशी न बोलता मोबाइलवर चॕट करत आहे यासारखं भयानक चित्र दुसरं नाही. मी तंत्रज्ञानाच्या विरोधात अजिबात नाही, पण ते योग्य प्रकारे वापरण्याचं शिक्षण आधी मिळालं पाहिजे असं मला वाटतं.
वेद आता दहावीत आहे पण अजून त्याच्याकडे स्वतःचा मोबाइल नाही. अर्थात मी त्याला मोबाइल वापरायचाच नाही अशी सक्ती कधीच केली नाही. कारण मुलांना एखादी गोष्ट करू नकोस म्हटलं की त्याबद्दल आपोआप सुप्त आकर्षण निर्माण होतं आणि ते आणखी दोन चुकीच्या गोष्टी करतात. त्यापेक्षा त्याबाबतीत चर्चा करून काय योग्य व काय अयोग्य हे समजून सांगितलं तर मुलं नक्कीच योग्य मार्ग निवडतात. त्यासाठी सक्ती करायची गरजच नाही. आमच्याकडे मुलांना कसलीच सक्ती नाही, बंधन नाहीत. त्याऐवजी हे का करायचं नाही, याचे दुष्परिणाम काय, याविषयी आपण संवाद साधू या, ही आमची भूमिका असते. "मी सांगतो म्हणून तू हे करायचं नाही," ही पालकांची भूमिका चुकीची असते, त्याऐवजी,"मी का सांगतो" हे मुलांना व्यवस्थित शब्दात सांगणं गरजेचं असतं. ते पालकांना सांगता आलं पाहिजे. कारण लादून कुठलीही गोष्ट होत नाही.
पालकत्व हे ज्येष्ठ व कनिष्ठ यांच्यातील अतिशय सुंदर नातं आहे. यात ज्येष्ठांनी आपले कुठलेही विचार,अपेक्षा लहानांवर लादू नये. कारण त्या पूर्ण करण्यासाठी मुलांचा जन्म झालेला नसतो. ज्येष्ठांनी मुलांची गुणवत्ता ओळखून त्याचे व्यक्तिमत्त्व उत्तम प्रकारे घडण्यासाठी जे आवश्यक आहे ते करणं गरजेचं असतं. पालकत्वाकडे मी या दृष्टीने बघतो. असं झालं तर त्या नात्यात, त्या संबंधात खरी मजा आहे. अन्यथा सणांना केवळ नमस्कार करण्यापुरता नातं असणं, याला काही अर्थ नाही. नात्यातील औपचारिकता आणि मनापासून प्रेम वाटणं" यातला फरक पालक आणि पाल्य या दोघांनी समजून घेतला पाहिजे. अर्थातच यात ज्येष्ठांची म्हणजेच पालकांची जबाबदारी जास्त आहे.
कारण मुलं तुमच्या दृष्टिकोनातून, तुमच्या वागण्यातून घडणार आहेत. ते केवळ तुमचं मूल म्हणून वाढणार नाही, तर समाजाचा एक भाग म्हणून वाढणार आहे, हे पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक मूल वर्गात पहिलं येऊ शकत नाही, पण एक चांगला माणूस नक्कीच बनू शकते आणि चांगला माणूस बनण्यासाठी कुठलीच स्पर्धा नाही. आपलं मूल चार स्पर्धेत पहिलं आलं पण माणूस म्हणून ते शून्य असेल तर त्या पहिलं येण्याला माझ्या दृष्टीने काहीच अर्थ नाही. त्यामुळे स्वतःची मतं मुलांवर न लादता, त्यांना चांगली मूल्ये देऊन एक स्वतंत्र विचारांचा उत्तम ‘ माणूस’ बनवणं हे माझ्या दृष्टीने ‘पालकत्व’ आहे.
(शब्दांकन : मोना भावसार )
(हे साप्ताहिक सदर आता समाप्त होत आहे.)
Edited By - Prashant Patil