गानसम्राज्ञींच्या आयुष्यातले कवडसे...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

प्रतिनिधी
पुस्तक परिचय 
पुस्तकाचं नाव :
स्वरसाधना 
संपादन : अप्पा परचुरे, रेखा चवरे -जैन 
प्रकाशक : परचुरे प्रकाशन मंदिर, गिरगाव, मुंबई (०२२-२३८५४६९१)
पृष्ठं : १७४  मूल्य : ३०० रुपये.

भारतरत्न - स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आयुष्य  रोमहर्षक घटनांनी भरलेलं आहे. आयुष्यातले अनेक चढ -उतार त्यांनी पाहिलेले आहेत. त्यांच्यासारख्या नामवंत व्यक्तीच्या आयुष्याबद्दल व त्यांच्या जीवनातल्या विविध घडामोडींबद्दल अनेकांना प्रचंड उत्सुकता असते. या ताज्या पुस्तकात त्यांनी वेळोवेळी लिहिलेले २४ लेख व त्यांच्यावर इतरांनी लिहिलेले आठ लेख आहेत. यापैकी तीन लेख म्हणजे दैनिक सकाळचे संपादकीय लेख आहेत. या तीन लेखांमधून लताबाईंची थोरवी नेमक्या शब्दांत वाचकांपर्यंत पोहचते. 

स्वतः लताबाईंनी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या नियतकालिकांमधून लिहिलेले लेख काही आठवणी सांगणारे तर काही व्यक्तींविषयी आहेत. त्यांचा ‘मुक्काम कोल्हापूर ’ हा लेख त्यांच्या बालपणीच्या कालखंडाची माहिती देतो. मा. विनायकराव यांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये त्या काम करत होत्या. त्या काळात त्यांना विनायकरावांकडून आलेले अनुभव, कंपनींच वातावरण याबद्दल त्यांनी विस्तारानं लिहिलंय. काही आठवणी या कटू आणि गरीबीत माणसाला काय काय सहन करावं लागतं तसेच काहीवेळा अपमान झाल्यावर त्याकडं कसं दुर्लक्ष करावं लागतं ते कळतं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लाताबाईंची श्रीमंती आणि त्यांचे आजचे स्थान कितीही उंच असले तरी त्यांना बाल व तरुणपणीच्या काळात काहीवेळा काही गोष्टींचा अभाव कसा सहन करावा लागला ते यातल्या लेखातून कळतं. ज्या व्यक्तींवर त्यांनी लिहिलंय त्यांच्याबद्दलची विशेष माहिती या लेखांमुळे कळते. यातल्या काही लेखांमधून त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती तसेच त्यांना प्रेरणादायी असलेल्या नामवंत व्यक्ती यांच्याबद्दलही कळतं. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याबद्दल त्यांना किती आदर आहे, त्यांचा आणि दीनानाथ मंगेशकर यांचा स्नेह कसा होता त्याचीही माहिती यातल्या लेखातून मिळते. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर तसेच राम शेवाळकर, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, कवी ग्रेस यांच्याबद्दल लताबाईंनी विलक्षण ओलाव्यानं लिहिलंय. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्येष्ठ संगीतकार व त्यांचे भाऊ हृदयनाथ यांनी त्यांची मुलाखत घेतलीय, त्या मुलाखतीच्या आधारे एक लेख इथं आहे. ही मुलाखत केवळ बहीण भावाच्या गप्पा अशी नाही. संगीतक्षेत्राविषयी तसेच त्यांनी ज्या ज्या संगीतकारांबरोबर काम केलं त्यांची वैशिष्टे त्यांनी कथन केली आहेत. त्यांना काय संघर्ष करावा लागला तेही त्यांनी सांगितलं आहे. वडिलांबद्दलच्या आठवणी तसेच नव्या पिढीतल्या संगीतकाराविषयी त्यांची मतं या मुलाखतीत त्यांनी मोकळेपणानं व्यक्त केली आहेत.

आपल्याला आयुष्यात काय मिळालं, अजून काय करायला हवं हेही त्यांनी लेखात स्पष्ट केलंय. त्यांच्याकडे असलेले हिरे आणि सोन्याचे दागिने वेगळे आहेत, कारण त्याची रचना. या दागिन्यांचे डिझाइन त्या स्वतः तयार करतात हा गुण आपल्यात वडिलांकडून कसा आला तेदखील त्यांनी एका लेखात आवर्जून कथन केलंय त्याचबरोबर लहानपणी बक्षीस मिळालेला एक दिलरुबा व त्याबद्दल त्यांना असलेली असोशी आणि वडील दीनानाथ यांनी त्याबाबत त्यांना कठोरपणे सांगितलेली महत्त्वाची बाब सांगताना, त्या आपल्याला त्यातून काय शिकायला मिळालं तेही सांगतात. लताबाईंचं आयुष्य वेगळंच आहे, एका छोट्या पुस्तकात ते आयुष्य पकडणं अवघडचं आहे. मात्र त्यांची जडणघडण आणि त्यांच्या जीवननिष्ठा काय आहेत याची कल्पना यातल्या लेखांमधून निश्‍चितच येते. रेखा चवरे - जैन आणि अप्पा परचुरे यांनी नेमके लेख निवडून हे पुस्तक माहितीपूर्ण आणि वाचकाला काही तरी मिळाल्याचं समाधान कसं देईल याकडे लक्ष दिल्याचं जाणवतं. लताबाईच्या तेजस्वी आयुष्यातल्या प्रकाशाचे कवडसे म्हणजे यातले लेख आहेत. त्यांच्या तेजाची कल्पना यातून नक्की येते.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article writes about swarsadhana book