पालकांनो, बालवाडी अभ्यासासाठी नसते!

nursery
nursery

मुलांचं साधारणतः तीन ते सहा (किंवा आठ) वर्षांपर्यंतचं वय अतिशय महत्त्वाचं असतं. बालकाचा विकास कसा होईल, हे या वयातच ठरत असतं. या वयात मेंदू घडत असतो, त्याची अत्यंत झपाट्यानं वाढ होत असते. मेंदू हा माणसाच्या शिकण्याचा अवयव... त्याला शिकतं ठेवणं, त्याच्या शिकण्याच्या क्षमता वाढवत नेणं, त्याची शिकण्याची कौशल्यं विकसित करणं, हे "बालशिक्षणा'त अभिप्रेत असतं.

पण, "बालशिक्षण' म्हणजे काय, ते कसं असावं, या विषयी पालकांनी विचारच केलेला नसतो. तो आम्ही कशाला करायचा, हा त्यांचा दृष्टिकोन असतो. पालक मुलांना बालवाडीत का घालतात? त्याला शाळेत जायची सवय लागावी म्हणून, घरी जुळवून घेण्याची सवय नसते ती लागावी म्हणून, की सगळी मुलं जातात म्हणून? होय, मुलांना बालवाडीत घालण्याचं खरं उद्दिष्ट "बालशिक्षण' हेच असतं, पण बालशिक्षण म्हणजे औपचारिक शिक्षण नव्हे. बालशिक्षण हे मुलांचं पूर्वप्राथमिक शिक्षण असतं, ज्यातून त्यांच्या औपचारिक शिक्षणाची सुरवात होत असते. काय असावं या पूर्वप्राथमिक शिक्षणात? तर त्यातून मुलांच्या ज्ञानेंद्रियांचा वापर होईल, अशा निरनिराळ्या कृतींची, अनुभवांची संधी देणं, स्वतः धडपडत, गोंधळत, प्रश्‍नांची उत्तर शोधण्यासाठी त्यांना उद्युक्त करणं, तसं वातावरण तयार करून मुलांच्या सर्वांगीण विकासाची पायाभरणी करणं, हे सारं अपेक्षित असतं.

अभ्यास, पाठांतर, परीक्षा, पास-नापास, या स्वरूपाचं शिक्षण म्हणजे बालशिक्षण नव्हे. नक्कीच नव्हे. खरं तर राज्य शासनाचा नियम आहे, की अंक आणि अक्षर यांची ओळख पहिलीच्या सुरवातीला करून घ्यावी, तोपर्यंत अभ्यास शिकवू नये. पण, तो डावलून अनेक बालवाड्यांमध्ये अंक किंवा अक्षर ओळख पक्की केली जाते. पानांच्या पानं लिहून आणण्याचा गृहपाठही दिला जातो. बालवाडीतही मुलांवर अभ्यासाचं, लेखनाचं ओझं का लादलं जातं? बालवाडीतही गृहपाठ हा लिखाण स्वरूपातच कशाला हवा? पालकांचा सहभाग असलेली एखादी कृती हाही गृहपाठ होऊ शकतो. एखाद्या रविवारी रेल्वे स्थानक किंवा भाजी मंडईत मुलांना घेऊन जाणं, स्वयंपाकघरातील वस्तूंची ओळख करून देणं, हाही अभ्यासच असतो की!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com