वेळेचे भान राखाच...

वेळेचे भान राखाच...

काही दिवसांपूर्वीच मी, डॉ. यतिंद्र पाल (वायपी) सिंह लिखित ‘क्लॉक टॉवर्स ऑफ इंडिया’ हे एक छान पुस्तक वाचलं. सिव्हिल इंजिनिअर असलेल्या ‘वायपी’ यांनी भारतीय रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागात उल्लेखनीय सेवा बजावली होती. या सेवाकाळात भारतातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांत असलेल्या क्लॉक टॉवरबाबत त्यांना आकर्षण निर्माण झाले होते. मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमधील राजाभाई क्लॉक टॉवर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील टॉवर क्लॉकचा त्यांनी आपल्या पुस्तकात समावेश केला आहे. 

१९८९ मध्ये क्षेपणास्त्र कार्यक्रमात सहभागी असताना पुण्याच्या पहिल्या भेटीदरम्यान खडकी कॅन्टोन्मेंटजवळील दापोडी लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीएमई) मी गेलो होतो. त्यावेळी तेथे मी एक अत्यंत दिमाखदार क्लॉक टॉवर पाहिलं. १९९३ मध्ये संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त टपाल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले, त्यावर या टॉवरची दखल घेण्यात आली होती. नंतर मला असे समजले की, पुण्यात आणखी सहा क्लॉक टॉवर आहेत, मात्र ते सर्व बंद आहेत. २०१५ मध्ये नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भेट दिली होती. तिथं असलेला क्लॉक टॉवरही दहा वर्षांपासून बंद असल्याचे सांगण्यात आले. उत्तर प्रदेशातील माझ्या मेरठ शहरातही भव्य क्लॉक टॉवर असून तो सुद्धा असाच बंद आहे आणि त्याच्या दुरुस्तीसाठी कोणीही गंभीर नाही. सद्यस्थितीत देशातील बहुतांश क्लॉक टॉवर हे बंद अवस्थेत आहेत, त्यातील घड्याळे कालबाह्य किंवा दुरुस्त न होणाऱ्या स्थितीत आहेत. तसेच टॉवरच्या इमारतींची पडझड झाली असून तिथे अतिक्रमणेही झाली आहेत. जो देश आपल्याला मिळालेल्या वारशाचा आदर राखत नाही, त्या देशाच्या भविष्यात सहसा यश येत नाही. 

क्लॉक टॉवर कालबाह्य झाली आहेत की वेळच अप्रासंगिक ठरत आहे?  नाही, कारण फक्त वेळ ही बाब आता वैयक्तिक झाली आहे. आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहेत आणि वेळ ही प्रत्येकाची खासगी बाब बनली आहे. वेळेबाबतची सामूहिक जागृतीची जाणीव नसल्याने, आपल्या आयुष्यात अधिक प्रभावी आणि सुसंगत बनण्याऐवजी लोकांनी आता स्वत:च्या तंद्रीत राहण्याचा नवा प्रकार ओबेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डर (ओबीसी) विकसित केला आहे. 

लोक आता टिव्ही शोसाठी अलार्म लावतात, गप्पांच्या कार्यक्रमांचे वेळापत्रक आखतात आणि दररोज अर्थहिन वैचारिक कचरा तयार करतात. लोक आता बराच काळ कोणतेही काम न करता ढिम्म बसू शकतात आणि तरीही स्वत:च्या संवेदना आणि मन व्यग्र ठेवतात. ‘उत्क्रांतीवादाचा सिद्धांत’ देणारे चार्ल्स डार्विन यांचे एक वाक्य येथे सांगावेसे वाटते. ते म्हणतात, ‘जी व्यक्ती आयुष्याचा एखादा तास वाया घालवू शकते, तिला जीवनाचा अर्थ समजलेला दिसत नाही.’ आता आयुष्यातील आपल्या वेळेचे मूल्य ओळखण्याची आणि त्याचा योग्यरितीने वापर करण्याची आणि आदर्श उदाहरण प्रस्थापित करण्याची वेळ आली आहे. जे जगाच्या जडणघडणीत कोणतेही योगदान न देता जगत राहतात, ते नामशेष होणाऱ्या एखाद्या प्रजातीप्रमाणे विस्मृतीत जातात. 

वय वाढत जाताना तुम्हाला आपल्या शरीराची शक्ती क्षीण होत असल्याचे, मनातील उत्साह कमी होत असल्याचे आणि आपला आत्मिक उत्साह आणि उत्कटता हरवल्याचं तुम्हाला जाणवतं. कालांतरानं अपव्यय केलेल्या वेळेबाबत आपल्याला दु:ख वाटून, पश्‍चाताप करून, शोक व्यक्त करून काहीच फायदा होणार नाही. वेळेची किंमत ठेवा. कारण ती  वेळ तुमचीच असते. तास आणि मिनिटे लक्षात ठेवण्यापेक्षा तुमच्या श्‍वासावर आणि ह्रदयाच्या ठोक्यांवर लक्ष ठेवा. भिंतीवरचे घड्याळ बंद होण्याअगोदर शरीरातली ‘टिकटिक’ थांबू नये. गेल्या काही वर्षातील दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्ये ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवरची मि. रोबो ही मालिका मला सर्वाधिक भावली. २०१५ मध्ये सुरू झालेल्या मालिकेचे चार सीझन पूर्ण झाले आहेत. इंटरनेटने जोडलेले जग सध्या कोठे गेले आहे, याचे वास्तववादी दर्शन या वेब मालिकेतून घडते आणि ते भीतीदायक आहे. यात तो तरुण नायक घोषित करतो की, मी कंटाळवाण्या दिनचर्येत अडकलो असून ती कधीही संपणार नाही, असेच वाटते. मग तो आपल्या कंटाळवाण्या दिनक्रमातून बाहेर येण्यासाठी लोकांचे फोन हॅक करु लागतो आणि हाच जीवनात रोमांच आणण्याचा एकमेव मार्ग असल्याचे स्पष्टीकरण तो देतो. 

आपण सर्वजण जीवनरुपी महासागरातील बेटं आहोत. जसे समुद्रातील लाटा पाण्याशी एकरूप असतात, तसेच अपाणही प्रत्यक्षात काळाने एकमेकांशी जोडलेलो आहोत. क्लॉक टॉवर हे संघटित सामुदायिक जीवनाचे निदर्शक असून ते शाळा, रुग्णालय, बाजारपेठेसह सर्वांना जोडण्याचे काम करते आणि सर्वांत महत्त्वाचे आपण एकत्र राहिले पाहिजे, याबाबतची आठवण करून देते. म्हणूनच प्रत्येक शहरातील आणि नगरातील क्लॉक टॉवर योग्य सुस्थितीत असणे खरोखरच गरजेचे आहे. सामूहिक जाणिवा कालसुसंगत असल्या तर त्यामुळे निर्माण होणारा सकारात्मक प्रभाव हा वादातीत आहे. क्लॉक टॉवरमधून येणारा वास्तवदर्शी आवाज हा इंटरनेटच्या आभासी जगापेक्षा अतिशय वेगळा आहे.

तुमचे विचार आणि भावनांशी कोणालाही खेळू देऊ नका आणि वास्तविक जीवनात जमीनीवर राहा. आपल्या कल्पनेतील विश्‍वाला अधिक उत्तम बनवत असताना प्रत्यक्षातील जगापासून दूर जाऊ नका. शेवटी कल्पनेतील जगातून मिळणाऱ्या अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा आपले नातेसंबंध आणि आरोग्य अधिक महत्त्वाचे असतात. 
(सदराचे लेखक वैज्ञानिक तसेच विविध घडामोडींचे अभ्यासक आहेत. )
(अनुवाद : अरविंद रेणापूरकर)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com