कविता माणसातली (अरविंद जगताप)

अरविंद जगताप jarvindas30@gmail.com
रविवार, 3 फेब्रुवारी 2019

माणसं खूप महत्त्वाची असतात. आपल्याला घडवण्यात. फेसबुकवर दिसतात त्यापेक्षा वेगळी असतात माणसं हे भेटून कळतं. अशी माणसं कविताच असतात. प्रत्येकवेळी कविता कशी सुचेल आपोआप? कविता कागदावरच असली पाहिजे असं नाही. आपलीच असली पाहिजे असं नाही. निसर्गातच असेल असं नाही. माणसात पण कविता असते. पान शोधलं पाहिजे. प्रत्यक्ष भेटलं पाहिजे....

माणसं खूप महत्त्वाची असतात. आपल्याला घडवण्यात. फेसबुकवर दिसतात त्यापेक्षा वेगळी असतात माणसं हे भेटून कळतं. अशी माणसं कविताच असतात. प्रत्येकवेळी कविता कशी सुचेल आपोआप? कविता कागदावरच असली पाहिजे असं नाही. आपलीच असली पाहिजे असं नाही. निसर्गातच असेल असं नाही. माणसात पण कविता असते. पान शोधलं पाहिजे. प्रत्यक्ष भेटलं पाहिजे....

लेखक असा विषय आला, की पुस्तकाबाबतची चर्चा आपसूक आलीच. नवे लेखक जुन्या लेखकांना काय वाचायला हवं ते विचारत राहणार. पुस्तकांची नावं, लेखकांची नावं, समीक्षा, गटबाजी असं सगळं चालू; पण मुळात लेखकासाठी हे पुरेसं असतं का? खरंतर खूप महत्त्वाची पुस्तकं आयुष्यात पहिल्यांदाच लिखाण करणाऱ्या माणसांनी लिहिली. साहित्याचा, लेखनाचा कसलाही वारसा आणि वातावरण नसताना लिहिली; पण त्यांचं लिखाण महत्त्वाचं का वाटलं? एकतर त्यांच्यावर कुठला प्रभाव नव्हता. दुसरी गोष्ट साहित्यक्षेत्रात खळबळ माजवून टाकतो हा अविर्भाव नव्हता. होतं ते प्रामाणिक; पण अस्सल लिखाण. नवीन परदेश, अनोळखी माणसं. असे लेखक नेहमी वाचकांना आवडून जातात आणि त्यांच्या लिखाणाचा पाया असतो त्यांचं भवताल, आसपासची माणसं. लिखाणाचं माध्यम कोणतंही असो ही माणसं नकळत आपल्या कलाकृतीचा भाग होतात. फक्त ही माणसं वाचनालयात सापडत नाहीत. गुगलवर नीट समजत नाहीत. ही माणसं शोधावी लागतात डोळे उघडे ठेवून.
जंगलात फिरणारी अनेक माणसं आहेत. औषध शोधत असतात. दुर्मिळ वनस्पतीसाठी पायपीट करत असतात. एक म्हातारा माणूस दमलेला असूनही पायपीट करत असतो. गावातल्या बाईला डोकेदुखीचा त्रास आहे. तिला आता हा म्हातारा बाबाच आधार आहे. डॉक्‍टरच्या हातचा गुण येत नाही. म्हातारा आपलं कर्तव्य समजून वनस्पती शोधत फिरतोय. त्याचं दुखः हे आहे, की आता औषधी वनस्पती दुर्मिळ नाही तर नष्टच होत आल्यात. आपल्या देशाचं "मेडिकल' आहे ते. आपण नष्ट करत आणलंय आणि ते आपल्या गावीही नाही.

रघुनाथ ढोले नावाचा माणूस पुण्याच्या अगदी जवळ राहतो. एक दिवस त्यांना वाटलं, की माणसाच्या पिढ्यान्‌पिढ्या झाडं तोडताहेत. चुलीपासून शेकोटीपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी झाड तोडलं जातं. या पापाचं प्रायश्‍चित्त म्हणून गंगेत डुबकी मारायची? झाड तोडलं तर ते लावावं लागणार. रघुनाथ ढोले यांनी नर्सरी चालू केली. गेली कित्येक वर्षं लाखो रोपं ते फुकट वाटतात. ज्यांना रोपं दिली त्यांना सांगतात ः "तुम्हाला माझी मुलगी दिलीय असं समजा. माझं लक्ष असणार आहे.' औषधी झाडं, देशी झाडं लोकांना वाटायचं काम ढोले करतात.

अबीद सुरती नावाचा लेखक. मुंबईच्या मिरारोडला राहणारे वयाची साठी ओलांडलेले अबीद सुरती. गेली कित्येक वर्षं दर रविवारी एका सोसायटीत जातात. पन्नास शंभर घरात शिरून बेसिनचा, बाथरूमचा असे सगळे नळ चेक करतात. लिकेज आहे की नाही ते बघतात. असेल तर सोबत नेलेल्या प्लंबरकडून नळाची दुरुस्ती करून देतात. हमखास एक तरी लिकेज असतंच. अशा प्रकारे अबीद सुरती या एकट्या माणसानं लाखो लिटर पाण्याची बचत केलीय. एकटा माणूस काय काय करू शकतो याचा आदर्श नमुना.

नगरच्या गावात भापकर गुरुजी आहेत. सगळे त्यांना येडा मास्तर म्हणतात. आज त्यांचं वय 88 आहे; पण त्यांनी आतापर्यंत एकट्याच्या जीवावर बनवलेल्या रस्त्यांची लांबी चाळीस किलोमीटरच्या आसपास आहे. गेली साठ वर्षं हा माणूस रस्त्यासाठी काम करतोय. सरकारच्या मागं न लागता स्वतःच रस्ते बनवले. कारण काय तर एकदा गांधीजी म्हणाले ः "रस्ते बनवले तर गावाचा विकास होईल.' झालं! भापकर गुरुजीनी आपली सगळी जमापुंजी रस्त्याच्या कामाला लावली. त्यांचं कौतुक अजूनही म्हणावं तेवढ झालं नाही; पण एकदा सरकारी लोकांनी त्यांना आमच्या हद्दीत रस्ता का बनवला म्हणून अटक करायचा प्रयत्न जरूर केला.

अमरावतीत मतीन भोसले आहे. रेल्वे स्टेशनवर, बसस्थानकात किंवा रस्त्यावर भीक मागणारी मुलं, कचरा गोळा करणारी मुलं, चोऱ्या करायला शिकलेली मुलं यांना गोळा करून शाळा चालवतो. त्यानं शाळेचं नाव ठेवलंय "प्रश्नचिन्ह' आणि ते खरंच आहे. त्याच्या शाळेतल्या खूप मुलांनी आपल्या बापाला पोलिसांनी जनावरासारखा मारलेला पाहिलाय. आईला अटक केलेलं पाहिलंय; पण त्या मुलांना आता पोलिस व्हायचंय. कारण काय तर मोठं होऊन ते कुणाला असं मारणार नाहीत. शिक्षण सगळ्यात जास्त गरजेचं आहे ते या मुलांना. मतीन भोसले प्रसंगी भीक मागून त्या मुलांना शिकवतो.
सांगलीत एक सायकलचं पंक्‍चर काढणारा माणूस आहे. त्याची आवड म्हणजे पुस्तकं. अगदी मराठी प्राध्यापकही अवाक्‌ होतील असं वाचन आहे त्याचं. बरं नुसता वाचून गप्प नाही माणूस. पुस्तकावर सविस्तर चर्चा पण करतो. कोल्हापूरला सुहास वायंगणकर नावाचा माणूस आहे. निसर्गाचा अभ्यासक. फुलपाखरांच्या शेकडो जाती पाठ असलेला. फुलपाखरांसाठी काम करणारा. घरापुढं शोभेच्या झाडांचं कुंपण करणाऱ्या लोकांना फुलपाखराला आवडतील अशी झाडं लावा अशी विनंती करणारा माणूस. असंख्य झाडांच्या उपयोगापासून ते शास्त्रीय नावापार्यंत सगळं काही पाठ असणारा माणूस. घरातल्या बाथरूमला असं डिझाईन करून देतो, की तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात किंवा जंगलात आंघोळीला बसलाय असं वाटावं. ही माणसं प्रत्यक्ष भेटूनच समजतात.

दत्तप्रसाद दाभोळकर. खरंतर नरेंद्र दाभोलकर यांचे भाऊ असल्यावर तेवढीच ओळख राहणार; पण मुळात दत्तप्रसाद शास्त्रज्ञ. बरं तेसुद्धा थेट अंटार्क्‍टिकाला जाऊन आलेले. त्यात कवी, लेखक. बरं, कवी असे की दुसऱ्यांच्या कविता पण पाठ असणारे. हे तर खूपच दुर्मिळ. त्यात लिखाण असं, की तेंडुलकर, दुर्गा भागवत पत्र पाठवायचे. चर्चा करायचे. नर्मदेवर खूप अभ्यासपूर्ण लिखाण आहे. आता खूप लोक नानाजी देशमुख यांच्याविषयी माहिती नाही म्हणतात. दत्तप्रसाद यांनी अतिशय सविस्तर लिहिलंय नानाजींविषयी. सती प्रथा असो, काश्‍मीर प्रश्न असो, 1857 चा उठाव असो. हे सगळे विषय खूप भ्रमंती करून, मुलाखती घेऊन त्यांनी लिहिलेत. मराठीत एवढ्या गंभीरपणे एखाद्या विषयाचं एवढं अभ्यासपूर्ण लिखाण तेही पदरमोड करून फार कमी लिहिलं गेलंय. या दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या घराचं नाव आहे "या.' मोबाईल बंद करून भेटणार असाल तर विवेकानंद, विज्ञान, संशोधन, कविता अशा असंख्य विषयावरचं अफाट चिंतन ऐकायला मिळतं.

नगरच्या स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी. लोकांनी टाकून दिलेली, अनौरस मुलं, कधी बसस्थानकावर सापडलेलं नवजात बाळ अशी हजारो मुलं सांभाळण्याचं, त्यांना पालक मिळवून देण्याचं काम ते करतात. आजवर हजारच्या आसपास मुलं त्यांच्या "स्नेहालय'मधून दत्तक गेलीत. परवाच गेलो होतो, तर एक मुलगी इटलीला जाणार होती. एक मुलगा स्पेनला जाणार होता. रस्त्यावर टाकून दिलेली मुलं आता नव्या जगात जाणार होती. पुण्य वगैरे गोष्टी खऱ्या असतील, तर गिरीश कुलकर्णी या एकट्या माणसाला एखाद्या राज्याच्या लोकसंख्येएवढ्या माणसांपेक्षा जास्त पुण्य लाभलेलं असेल. एवढ मोठं काम आहे त्यांचं. माणूस म्हणून आपल्याकडे लोक किती खालच्या स्तरावर आहेत हे त्या निष्पाप मुलांना टाकून देणाऱ्या लोकांचा विचार करून जाणवतं. मात्र, त्याचं वेळी गिरीश कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी ज्या मायेनं या बाळांची काळजी घेतात हे बघून माणूस म्हणून आपल्याकडे किती थोर माणसं आहेत याची जाणीव होते.

प्रदीप लोखंडे पुण्यात आहेत. पूर्वीपासून त्यांचा एक कार्यक्रम. गावोगावच्या लोकांना पत्र पाठवून त्यांची माहिती गोळा करायची. हळूहळू त्यांच्याकडे गावांची सविस्तर माहिती गोळा झाली. आज डेटाचं युग आहे. कॉम्पुटरवर गोळा होतो चुटकीसरशी; पण पत्र पाठवून, लोकांशी संवाद साधून मिळवलेला डाटा जास्त महत्वाचा आहे. केवळ डेटा म्हणून नाही. आज या माध्यमातून लोखंडे ग्रामीण भागातल्या मुलांसाठी हजारो लायब्ररी चालवतात. पत्र या गोष्टीचा किती महत्त्वपूर्ण फायदा होऊ शकतो हे लोखंडे यांच्या कामातून जाणवतं.

सरकारवर, नेत्यांवर आपण नेहमी बोलत असतो; पण अशी माणसं बघितली की असं वाटतं देश चालतो तो यांच्या जीवावर. एरवी हा देश कसा काय चालतो हा प्रश्नच असतो. आपण कल्पनेत खूप माणसांची चित्रं रंगवत असतो. नायक तयार करतो. खलनायक तयार करतो; पण आपल्या अवतीभवती अशी कितीतरी माणसं आहेत जी नायकच आहेत. रंगवायची गरज नाही. सातत्यानं अशी माणसं आपण शोधली पाहिजेत. त्यांना प्रत्यक्ष भेटलं पाहिजे. शंभर पुस्तकांचं एकदाच वाचन झाल्यासारखं समृद्ध वाटू लागतं. आपण लिहितो म्हणजे सुचेल तेच लिहावं असं काही नाही. चांगली कविता चटकन इतरांना ऐकवावी वाटते, तसं चांगल्या माणसांबद्दल पटकन इतरांना सांगावं वाटतं. आजवर "चला हवा येऊ द्या', ब्लॉग, सोशल मीडिया अशा कित्येक माध्यमांतून अशा असंख्य लोकांबद्दल लिहिता आलं. खूपदा चित्रपटात अशाच माणसांच्या संघर्षातली, अनुभवातली एखादी गोष्ट येते. माणसं खूप महत्त्वाची असतात. आपल्याला घडवण्यात. फेसबुकवर दिसतात त्यापेक्षा वेगळी असतात माणसं हे भेटून कळतं. अशी माणसं कविताच असतात. प्रत्येकवेळी कविता कशी सुचेल आपोआप? कविता कागदावरच असली पाहिजे असं नाही. आपलीच असली पाहिजे असं नाही. निसर्गातच असेल असं नाही. माणसात पण कविता असते. पान शोधलं पाहिजे. प्रत्यक्ष भेटलं पाहिजे.

Web Title: arvind jagtap write article in saptarang