#FridayFeeling आता अनुभवा खऱ्या शिवथरघळीचे सौंदर्य

अरविंद तेलकर
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

विकएंडला फिरायला जायचंय, नवीन ठिकाणांची माहिती हवी आहे... तर मग वाचा दर शुक्रवारी "सकाळ पुणे टुडे"च्या "मैत्रीण" पुरवणीतील "विकएंड पर्यटन" हे सदर...

दोन्ही बाजूंना डोंगरांचे कडे आणि मध्येच असलेली अरुंद दरी, म्हणजे घळ. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये अशा अनेक घळी आहेत. अनेक घळींना इतिहास आहे आणि त्या प्रसिद्ध आहेत. परंतु सर्वांत प्रसिद्धीला आली, ती समर्थ रामदासस्वामींची शिवथर घळ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात दोन शिवथर होते. एक शिवथर तालुका आणि दुसरं रायगड जिल्ह्यातल्या बिरवाडीजवळचं शिवथर. साधारण शतकभरापूर्वी समर्थ साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक शंकर श्रीकृष्ण देव यांनी काही कागदपत्रांच्या आधारे ही घळ शोधून काढली. वास्तविक त्यांनी ही घळ माणसं लावून खणली होती. म्हणजे तिथं गुहा नव्हती. दुसरी शिवथर घळ आळंदीच्या अरविंदनाथ महाराजांनी ऐतिहासिक पुराव्यांचा आधार घेऊन शोधून काढली. या घळीतली गुहादेखील त्या काळच्या माणसांनीच खोदून काढली होती. मात्र या गुहेत राहता येईल, अशा सोयीही केलेल्या आहेत. त्यावरून हीच घळ खरी असावी. शिवाय सध्या प्रसिद्ध असलेल्या घळीबाबत स्वतः देव हेदेखील साशंक होते. दासबोधासारखा ग्रंथराज त्यांनी ज्या घळीत बसून लिहिला, ती ही घळ नसावी, असंच त्यांनाही वाटत होतं.

Image result for shivtharghal HD images

सध्या प्रसिद्ध असलेली घळ खरी, की नव्यानं शोधलेली घळ खरी हा इथं मुद्दा नाही. सध्याची शिवथर घळ ही तिथल्या निसर्गसौंदर्यामुळं, पावसाळ्यात तिथं कोसळणाऱ्या धबधब्यामुळं पर्यटकांना आकर्षित करते. मात्र या शिवथर घळीला भेट देणाऱ्यांनी वरंध-कुंभारकोंडमार्गे सुमारे २० किलोमीटरवरच्या नव्या आणि खऱ्या शिवथर घळीलाही आवर्जून भेट दिली पाहिजे. हा संपूर्ण परिसर शिवकाळात जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्या आधिपत्याखाली होता. मोरे हे तत्कालीन विजापूर दरबारात वतनदार देशमुख होते. जावळीतल्या घनदाट जंगलांमुळं आणि सह्याद्रीच्या दुर्गम भागामुळं ते वरचढ झाले होते. कालांतरानं शिवाजी महाराजांनी १६४८मध्ये हा प्रदेश जिंकून घेतला. याच काळात, म्हणजे १६४९ मध्ये रामदासस्वामी या प्रदेशातील घळीत वास्तव्यास आले. सन १६६० पर्यंतचा काळ त्यांनी इथं व्यतीत केला आणि त्या काळात त्यांनी दासबोध आणि इतर ग्रंथसाहित्याची निर्मिती केली. दक्षिण दिग्विजयासाठी जाण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी शिवथर घळीत येऊन समर्थांचा आशीर्वाद घेतला होता.

Image result for shivtharghal HD images

पर्यटकांना आकर्षित करणारी शिवथर घळ ही वरंध घाट उतरल्यानंतर लागणाऱ्या बिरवाडी गावाजवळ आहे. घळीच्या पायथ्यापर्यंत वाहनं जाऊ शकतात. सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये वाघजाईदेवीच्या कुशीत हे ठिकाण आहे. काळ नदीचा उगम याच परिसरात होतो. ही पश्‍चिमवाहिनी नदी पुढं सावित्री नदीला जाऊन मिळते. काळ नदीच्या तीरावर कुंभे, कसबे आणि आंबे अशी तीन छोटी गावं आहेत. पार्किंगच्या ठिकाणापासून पायऱ्या चढून वर आल्यानंतर देव यांनी शोधून काढलेली शिवथर घळ दिसते. घळीच्या शेजारीच धीरगंभीर आवाजात कोसळणारा धबधबा आहे. घळीच्या वरच्या डोंगरावर चंद्रराव मोऱ्यांच्या वाड्याचे भग्नावशेष आहेत. इथून राजगड, रायगड, तोरणा आणि प्रतापगड साधारण समान अंतरावर आहेत. शिवथर घळीतल्या गुहेत रामदासस्वामी आणि कल्याणस्वामींच्या मूर्ती आहेत. समर्थांच्या साहित्याचं लेखन कल्याणस्वामींनी केलं होतं.

Image result for shivtharghal HD images

वरंध-कुंभारकोंडमार्गे २० किलोमीटरवर रामदासपठार डोंगररांगेत खरी शिवथर घळ आहे. याच घळीला समर्थांनी सुंदरमठ असं नाव दिलं होतं. रामदासपठारावर समर्थ मठाची जागा आहे. इथं १९५७ मध्ये समर्थांचं मंदिर बांधण्यात आलं आहे. या मठापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटरवर ही घळ आहे. मठाच्या माळापर्यंत वाहनं जाऊ शकतात. घळीच्या मुखाशी दगड आणि मातीच्या साह्यानं बांधलेला उघडा दरवाजा आहे. गुहेच्या समोरच समर्थांच्या बसण्याची जागा दिसते. साधारण एक हजार चौरस फूट क्षेत्र असलेल्या या गुहेत दगड आणि मातीचं बांधकाम केलेल्या तीन भिंती आहेत. हवा खेळती राहण्यासाठी खिडक्यासदृश पोकळ्या आहेत.

गुहेच्या समोरच्या भिंतीमध्ये समर्थांच्या बसण्याची जागा खोदून काढली आहे. त्याला सिंहासन म्हणतात. त्याशिवाय देवघर आणि सात कोनाडे आहेत. घळीपासून अर्ध्या किलोमीटरवर गोविंदमाची आहे. दहा फुटांवर रामगंगा नावाचा धबधबा आहे. सुमारे ३० फुटांवर गुप्तगंगा आहे. जवळच शिवकाळात प्रसिद्ध असलेला जांभळीचा माळ, मठाचा माळ, बोरीचा माळ, उंबराचा माळ, फणशीचा माळ आदी समर्थसाहित्याशी संबंधित ठिकाणं आहेत. या दोन्ही घळींना पर्यटकांनी आवर्जून भेट दिली पाहिजे, इतका हा प्रदेश देखणा आहे. शिवथर घळीचा समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे २९८५ फूट आहे.

Image result for shivtharghal HD images

कसे जाल? - पुण्याहून भोर-वरंध-बिरवाडीमार्गे शिवथर घळ सुमारे १११ किलोमीटर. मुंबईहून गोवा महामार्गानं माणगाव-लोणेरे-महाड-बिरवाडीमार्गे २०५ किलोमीटर. साहसी पर्यटकांसाठी दुसरा मार्ग राजगड-भुतोंडे-बेळवंडी नदी-कुंबळ्याचा डोंगर-गोप्याघाटमार्गे कसबे शिवथरपर्यंत पोचता येतं. तथापि, हा मार्ग काहीसा अवघड आणि वेळ खाणारा आहे. शिवथरघळ श्री सुंदरमठ सेवा समितीच्या इमारतीमध्ये पूर्वपरवानगी घेऊन निवासाची सोय होऊ शकते. स्वतःचा शिधा दिल्यास भोजनाचीही सोय होते. पायथ्याच्या गावांमध्येही भोजनाची सोय होऊ शकते. शिवथर घळीपर्यंत एसटी बसचीही सोय आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arvind Telkar article on Shivthar Ghal