धनेशांच्या देशात...!

hornbill bird
hornbill bird

मानवाचं मन किती चंचल असतं नाही. त्याला कितीही आवर घालण्याचा प्रयत्न केला, तरी ते बेटं काही केल्या ऐकत नाही. त्याचं असं झालं, की माझ्या एका पक्षीमित्राचा फोन आला. आमची चर्चा चालू असताना अचानक विषय निघाला फोटोग्राफीसाठी जवळपास कुठंतरी जाण्याचा. हिवाळा चालू असल्यानं स्थलांतरित पक्ष्यांची छायाचित्रं काढण्याची एकही संधी हातची गमावून चालणार नव्हतं. ठिकाण ठरवता ठरवता अनाहूतपणे दांडेलीचा विषय निघाला. दांडेली म्हणजे वन्य पशू-पक्ष्यांचं महत्त्वाचं आश्रयस्थान. मग अन्य सर्व ठिकाणं आपोआप रद्दबातल झाली आणि दांडेलीला जाण्याचं निश्र्चित झालं. दिवस ठरला आणि आम्ही निघालो. जायला-यायला दोन दिवस आणि तीन दिवस फक्त फोटोग्राफी, असा कार्यक्रम आम्ही पार पाडणार होतो. नेहमी पायांना भिंगरी लावून फिरावं लागतं, पण दांडेलीत पायी जाण्याची सोय नसल्यानं, मोटारीच्या चाकांनाच भिंगरी लावावी लागणार होती. उत्साह दांडगा होता. छान गप्पा मारता मारता खेड शिवापूर कधी आलं ते समजलंच नाही. गणेशप्रसाद नावाच्या नेहमीच्या हॉटेलात झणझणीत मिसळ-पाव हाणली आणि निघालो. नेहमी टोल टोलवून जाण्याचे मनातले मांडे, या वेळी मात्र मोदीकृपेनं फळाला आले. थेट बेळगावपर्यंतचे सर्व टोल टोलवून आम्ही दुपारी चारच्या सुमारास दांडेलीत पोचलो. हॉटेलात सामान टाकलं आणि दुसऱ्या दिवसासाठीचा उत्साह कायम ठेवण्यासाठी खोलीतच आराम केला.

दुसरा दिवस धावपळीचा होता. मागच्या वेळी जिथं भरपूर पक्षी दिसले होते, ते ठिकाण गाठलं. पण तिथं काहीच नव्हतं. दिवसभर वणवण भटकलो, पण मनाजोगतं काही दिसलंच नाही. दांडेलीच्या भर जंगलात बसवेश्र्वराचं एक पुरातन मंदिर आहे. उळवी त्या गावाचं नाव. तिथं वन्यपशूंचा संचार असतो, असं आम्हाला गेल्या वेळी कोणीतरी सांगितलं होतं. पण या वेळी तिथं मोठी जत्रा भरली होती. मानव प्राण्यांच्या गोंधळी वावरामुळं पशूच काय पण पक्ष्यांनीही दडी मारली होती. संध्याकाळ होत आली होती. आता हॉटेलवर वेळेत पोचायचं, तर निघायलाच हवं होतं. अंधारात रस्ता चुकला असता, तर मोठीच पंचाईत होती. कारण आम्ही अक्षरशः वाट फुटेल तिथं जात होतो. गावंही तुरळक असल्यानं विचारायची सोय नव्हती. शिवाय रस्त्यांवर दिशादर्शक पाट्याही नव्हत्या. पहिला दिवस भाकड गेला. लहानपणी खेळताना जसा देत असू, तसाच हा पहिला दिवस आम्ही भुताला अर्पण केला. सुरवातच अशा नन्नाच्या पाढ्यानं झाली.

माणूस आशावादी असतो. आज नही तो कल सही, असा मनातल्या मनात घोष करत आम्ही पहिली रात्र रजनीनाथाच्या चरणी लीन झालो. दुसऱ्या दिवशी पहाटेच दाराबाहेर पक्ष्यांनी भूपाळी आळवायला सुरवात केली होती. शकुनावर विश्र्वास न ठेवणाऱ्या आम्हा पामरांनी ताबडतोब हा शुभशकुन असल्याचं शुभवर्तमान परस्परांना दिलं. आदल्या दिवशी रात्रीच आम्हाला एक खास टिप मिळाली होती. टिप देणाऱ्यावर आमचा विश्र्वास होता म्हणून सूर्योदयापूर्वीच आम्ही तिथं पोचलो. पंढरीचे वारकरी जसे विठुरायाला पाहून ब्रह्मानंदी लीन होतात, तशीच काहीशी आमची गत झाली होती. आम्हीही पंढरीतच आलो होतो ना! सहस्त्ररश्मीच्या आगमनापूर्वीच वडाच्या एका झाडावर कल्लोळ माजला होता. हा कल्लोळ होता विविध प्रकारच्या पक्ष्यांचा! एकाच ठिकाणी इतके पक्षी? आमचा आनंद गगनात मावेना.

वडाचं हे झाड वेगळंच होतं. चांगल्या बोराएवढ्या टपोऱ्या पिवळ्या फळांनी झाड लगडलं होतं आणि या फळांवर पक्ष्यांनी जणू हल्लो बोल केला होता. कोण नव्हतं त्यात. भली मोठी चोच सावरत चोखंदळपणे फळं निवडणारा मलबारी धनेशांचं (मलबार पाईड हॉर्नबिल) जणू ते साम्राज्यच. तरीही एखाद्या परोपकारी राजाप्रमाणं छोट्या पक्ष्यांनाही फळांचा आस्वाद ते घेऊ देत होते. त्याचाच छोटा भाईबंद असलेला मलबारी राखी धनेश (मलबार ग्रे हॉर्नबिल) आपल्या जोडीदारांसह तिथं हजर होते. पुणे परिसरात भरपूर भटकंती केल्यानंतरच दर्शन देणारा यलो फूटेड ग्रीन पीजन (हरियल) इथं होता. महाराष्ट्राचा राज्य पक्षी असूनही त्यांची संख्या कर्नाटकातच अधिक असावी. आकारानं मलबारी धनेशाच्या चोचीएवढाच असलेला धिटुकला कॉपरस्मिथ बार्बेट (तांबट) एवढ्या संख्येनं एकाच ठिकाणी मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला.  या पक्ष्याच्या मागावर मी कितीतरी दिवसांपासून होतो. मनाजोगता एकही फोटो मला मिळू शकला नव्हता. आता मात्र माझ्या पुढ्यातच ते वेगवेगळ्या पोझेस देत होते. मध्येच एक ब्राऊन हेडेड बार्बेट (तपकिरी डोक्याचा कर्टुक) दर्शन देऊन गेला. आपला आदला दिवस भाकड गेल्याचा आम्हाला विसरच पडला.

रसदार फळांनी लगडलेलं या भागातलं हे एकुलतं एक झाड. साहजिकच आसपासच्या पक्ष्यांनी त्यावार धाड घातली नसती, तरच नवल वाटलं असतं. फळांवर यथेच्छ ताव मारल्यानंतर भरल्या पोटानं पक्ष्यांनी आपली नेहमीच्या जागेकडे झेप घेतली. इथली मांदियाळी संपल्याचं आमच्या लक्षात आलं. तरीही नेटानं आणखी काही वेळ आम्ही तिथंच थांबलो. उन्हं चढू लागल्यानंतर पक्षी आपल्या नेहमीच्या जागी जातात. आता पुन्हा उद्या सकाळी, असं म्हणत आम्ही पुन्हा वायदेशा झाल्यासारखे दांडेलीच्या जंगलात घुसलो. शक्यता वाटली ते सर्व आडमार्ग धुंडाळले पण छ्या...पक्षी काही गावेनात. दिवसभर फिरल्यानंतर वेगळे म्हणता येईल, असे यलो ब्राऊड बुलबुल (पिवळ्या भिवईचा बुलबुल) मात्र मिळाला. त्याशिवाय दूरवरच्या झाडावर एक फ्लेम थ्रोटेड बुलबुल (लाल गळ्याचा बुलबुल) आणि गर्द नारिंगी रंगाचा स्मॉल मिनिव्हेट आणि पिवळ्या रंगाची त्याची जोडीदारीण दिसले. शिवाय एक स्पायडर हंटर (कोळीखाऊ) आणि पर्पल सनबर्ड (शिंजीर) दिसले. दुसऱा दिवस खरोखऱीच आम्ही साजरा केला.

तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुन्हा त्याच ठिकाणी गेलो. दिसायला हरियलसारखाच पण तांबड्या पंखांचा पाँपाडूर पीजनही (तांबड्या पंखांचा हरियल) कुटुंबांसह तिथं आले होते. वडाच्या या जादुई झाडाच्या मागे हालचाली दिसत होत्या. म्हणून आम्ही मुक्काम हलवून झाडाच्या मागच्या एका ओंडक्यावर स्थानापन्न झालो. कॅमेरा सज्ज ठेवला आणि वेगळ्या पक्ष्यांचा वेध घेऊ लागलो. थोड्याच वेळात तिथं एक ब्लॅक लोअर्ड यलो टिट (पिवळी वल्गुली) तिथं आला. झाडावरच्या फळांचा यथेच्छ आस्वाद घेतल्यानंतर तांबट पक्षी दुसऱ्या एका झाडावर जाऊन खोडावरील खपलीत दडलेल्या किड्यांचा शोध घेत होते. शाकाहारानंतर थोडा मांसाहार हवाच ना! आजूबाजूला थोडी नजर फिरवल्यानंतर एक व्हाईट बेलीड ड्राँगो (पांढऱ्या पोटाचा कोतवाल), व्हाईट रम्प्ड शामा (शामा) आणि एक लाँग टेल्ड श्राईक (लांब शेपटीचा खाटिक) हे पक्षी दिसले. पक्ष्यांचा हा गोतावळा आपल्या स्थानी गेल्यानंतरच आम्ही उठलो.

मागच्या वेळी आम्हाला एका तळ्याचा शोध लागला होता. तिथं नेहमी येणाऱ्या लोकांनी पाण्यात मगर असल्याची टिप दिली होती. रस्त्यालगत असूनही लोकांना त्याची माहिती नसल्यानं तिथं नेहमीच शांतता असायची. नाही म्हणायला प्रेमी युगुलांचा तिथं वावर असतो. मात्र ते त्यांच्यातच मश्गूल असल्यानं, त्यांचा आम्हाला आणि आमचा त्यांना काहीच त्रास नव्हता. किनाऱ्यावर एखादी मगर उन्हं खायला आली नाही ना, हे पाहात आम्ही एका जागी बसकण मारली. आता प्रतीक्षा होती, ती स्टॉर्क बिल्ड किंगफिशरची. म्हणजे मराठीत त्याला बकचंचू किलकिला म्हणतात. शरीराच्या आकाराच्या मानानं त्याची चोच खूप मोठी आणि बगळ्यांच्या जातीतल्या पक्ष्यासारखी असते. म्हणून तो बकचंचू! बोलवल्याप्रमाणे थोड्याच वेळात तो आला. त्यामागोमाग पॉंपाडूर पीजनही आला. मात्र आम्हाला गेल्या वेळेसारखे विविध पक्षी काही दिसले नाहीत.

आता तिथं बसून राहण्यात काहीच अर्थ नव्हता. आम्ही पुन्हा गणेशगुडीच्या दिशेनं निघालो. कारवारच्या रस्त्यावर शोध घेण्याचा आमचा विचार होता. काळी नदीवरील पूल ओलांडून आम्ही निघालो. हमरस्त्याला अनेक फाटे फुटलेले होते. असे अनेक रस्ते आम्ही पालथे घातले. पण फारसं काही हाती गवसलं नाही. संध्याकाळपर्यंत भटकलो. निर्मनुष्य जंगलाचा फील घेण्यातही एक प्रकारचं थ्रिल होतं. दांडेलीच्या जंगलात विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आहेत. मात्र यावेळी आमचा सीझन चुकला होता. उत्तराखंडचा दौराही असाच ऑफ सीझनमध्ये आम्ही पार पाडला होता. जूनमध्ये आम्ही गेलो होतो आणि अपेक्षेपेक्षा लवकरच तिथं पावसानं हजेरी लावली होती. तरीही आपल्याकडे न सापडणारे अनेक पक्षी आम्हाला मिळाले होते.

काही मिळो न मिळो, जंगलाचा, निसर्गाचा फील घेणं यातही मजा असते. शहरी वातावरणात आपल्याला त्याचा अनुभव काही घेता येत नाही. भूतानला जाण्यापूर्वी एखादी ट्रिप करावी, म्हणूनच आम्ही दांडेली निवडली होती. ही ट्रिप यशस्वी झाली होती. खरं तर इथं येण्याचा खरा सीझन आहे मार्च ते मे. या काळात झाडांना भरपूर फळं असतात. आडमार्गानं गेल्यास भरपूर वन्यपशू किंवा पक्षी दिसू शकतात. आता पुढच्या वेळी पुन्हा फळांच्या सीझनमध्येच इथं येण्याचा निर्धार करून आम्ही पुन्हा माणसांच्या आणि सिमेंटच्या जंगलाकडे परतीचा प्रवास सुरू केला. आता मात्र मोदी सरकारनं टोलबाबत वाढवलेली मुदत संपलेली होती. येताना टोल न टोलवता आम्ही तो भरतच परत आलो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com