आमच्या जीवाची किंमत फक्त 33 रुपये 

योगेश कानगुडे
मंगळवार, 7 एप्रिल 2020

आशा वर्कर्स कोरोनाच्या काळात कोणत्या परिस्थितीत काम करत आहेत याचा 'इसकाळ'ने आढावा घेतला.

कोरोना व्हायरस सगळीकडे सध्या थैमान घालत आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा डोळ्यात तेल घालून काम करीत आहे. आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळ कमी पडतंय वाटायला लागल्यावर सरकारने 'आशा' वर्कर्स यांना आरोग्य विभागाच्या मदतीसाठी बोलावले आहे. सरकार त्यांना कामांसाठी महिन्याला एक हजार वेतन देणार आहे. शासनाकडून बोलावणे आल्यानंतर आशा वर्कर्स 'कोरोना'शी धैर्याने लढत आहेत. खरं तर ग्रामीण व शहरी भागात आशा वर्कर्स गरोदर महिलांची तपासणी करणे, नवजात बालकांची काळजी घेणे, बालकांचे लसिकरण करणे, माता-बालमृत्यू दर कमी करणे, गरोदर महिलांना पोषक आहाराबाबत मार्गदर्शन करणे, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करणे यासह टि.बी., एचआयव्ही, मलेरीया, डेंग्यू यासारख्या साथीच्या आजारांमध्ये लोकांचे आरोग्य सांभाळन्याचे काम करतात. आशा वर्कर्स 'कोरोना' संदर्भात आपलं कर्तव्य पार पडत असताना त्यांच्यावर हल्ले होत आहेत. काही जणींना तर यापेक्षा वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या आशा वर्कर्स कोरोनाच्या काळात कोणत्या परिस्थितीत काम करत आहेत याचा आढावा इसकाळने आढावा घेतला. 

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्‍यातील आशाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले कि घरोघरी जाऊन जिल्ह्याबाहेरुन आलेल्या लोकांची नाव नोंदणी करण्याच्या त्यांना सूचना आहेत.आशा वर्कर्सना तर अवघे हजार रुपये इतके कमी मानधन आहे. त्यातून कोरोनाच्या कामात गुंतवले गेलेय.हे काम करायलाही आम्ही तयार असलो तरी आम्हाला मास्क, सॅनिटायझर किंवा हॅण्डग्लोज हे शासनाने पुरविणे क्रमप्राप्त होते, आरोग्य विभागाने त्याबाबत आधीच तजवीज करायला हवी, मात्र तशी तजवीज केलेली नसल्याने अनेक आशा वर्कर्सनी स्वत: या वस्तू खरेदी करुन कामाला सुरुवात केलीय आहे. 

आमच्या जीवाची किंमत फक्त 33 रुपये 

पुढे बोलताना ती आशा म्हणाली सरकार आम्हाला फक्त एक हजार महिन्याला देणार आहे. म्हणजे दिवसाला 33 रुपये आम्हाला मिळणार आहे. मग आम्ही 33 रुपयांसाठी आमच्या जीवाशी का खेळायचं. आम्ही दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरीसाठी गेलो तर आम्हाला 200 ते 300 रुपये मिळतात. फक्त 200 रुपये दिवसाला पकडले तरी 6000 रुपये होतात. शेवटी नुकसान आमचं होतं आणि जीवाची काळजी वेगळी. एकाद्या वेळेस आम्हाला काही कामानिमित्त सुट्टी हवी असेल तर ती ही मिळत नाही. हे काम करत असताना मला काही झालं तर डॉक्‍टर मला या 33 रुपयांत ठीक करेल का? असा प्रश्न विचारल्यानंतर मात्र आमी निःशब्द झालो. सरकारने कोरोनाचे काम करताना तुमचं काही बरं वाईट झालं तर 50 लाखांची विमा पॉलिसी आणलीय त्याबद्दल काय वाटते? यावर त्या म्हणाल्या मी मेल्यावर त्या 50 लाखाचं काय करू. जिवंत असताना व्यवस्थित जगता येईल एवढं मानधन दिल तर बरं होईल. त्यासाठी 50 लाखांची गरज नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला काही होईल याची वाट कशाला बघायची. 

या सगळ्यवार बोलताना लाल बावटा आशा वर्कर्स युनियनच्या सोलापूर जिल्ह्याच्या जनरल सेक्रटरी पुष्पा पाटील म्हणाल्या कि आशा वर्कर्स यांनी सांगितले कि जेव्हापासून हा सर्व्हे सुरु झाला तेव्हापासून त्यांना साधे मास्कही दिले नाही, सॅनिटायझर तर खूप दूरची गोष्ट. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाय योजना नाही. मोबदला नाही. या महिला सगळं साहित्य स्वतःच वापरतात. शेवटी आम्ही मुंबई येथेआरोग्य सेवेच्या मुख्य आयुक्तांना पत्र पाठवल्यानंतर त्यांनी सुरक्षा किट आणि 1000 हजार रुपये मोबदला देण्याचे मान्य केले आहे. आम्ही शहरातील आशांना सांगितलं आहे पूर्ण सुरक्षा किट दिल्यानंतरच कामाला सुरुवात करायची. ग्रामीण भागात तर सरपंच आणि पोलीस पाटलांचा या कामासाठी प्रचंड दबाव आहे. गावातून तुमची निवड झाली आहे अन तुम्ही नाही कास काय म्हणतात. तुम्हाला नंतर आम्ही सगळं सुरक्षा किट मिळवूं देऊ असं म्हणून काम करून घेत आहेत. यातून त्यांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे. 

Image may contain: 2 people, people standing

सोलापुरातील ती गंभीर घटना 

महाराष्ट्रात आशा वर्कर्स यांच्यावर हल्ले होत आहेत. त्यांना व्यवस्थित वागणूक मिळत नाही असं आपल्याला ऐकायला मिळत आहे. सर्व्हे करताना तुम्हाला कशी वागणूक मिळते या प्रश्नावर पुष्पा पाटील म्हणाल्या कि ग्रामीण भागातील आशा यांना गावातच काम असल्यामुळे काही अडचण येत नाही. शहरी भागात मात्र प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पाटील पुढे म्हणाल्या गेल्या आठवड्यात सोलापुरातील बुधवारपेठ परिसरात एक घटना घडली. एक आशा वर्कर्स या भागात काम करत होती. काम करत असताना तिला घशात त्रास व्हायला लागल्यानंतर ती सिव्हिलमध्ये चेकअपसाठी गेली. सगळ्या टेस्ट नेगिटिव्ह आल्या. डॉक्‍टरांनी तिला दोन चार दिवस आराम करण्याचा सल्ला दिला. त्यावर ती आशा त्या डॉक्‍टरांना म्हणाली कि माझे वरिष्ठ मला सुट्टी देणार नाहीत. तुम्ही मला एका चिट्टीवर लिहून द्या असं म्हटल्यावर तेथील डॉक्‍टरांनी तिच्या हातावर विनाकारण होम क्वारंटाईन शिक्का मारला. मग तिला वाटले कि होम क्वारंटाईन शिक्का आहे त्यामुळे थोडा आराम मिळेल पण झाले उलटे. एक दिवस व्यवस्थित गेला. दुसऱ्या दिवशी शेजारच्या लोकांनी पाहिल्यानंतर तिला कोरोना झाला अशी अफवा उठवली आणि त्या दोंघां नवरा बायकोला लोकांनी सिव्हिलमध्ये भरती होण्यासाठी त्रास देऊ लागले. मग रात्री ती माहेरी गेल्यानंतर ही तसाच त्रास. ती रात्र कशीतरी काढल्यानंतर शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती पूर्ववत केली. खरं तर तिच्या हातावर शिक्का मारणं गरजेचं नव्हतं. फक्त तिला दोन चार दिवसांचा आराम हवा होता. हे सगळं सिव्हिलमधील गलथान कारभारामुळे झाले व त्या आशाला मानसिक त्रास झाला. 
सरकार लोकांना आव्हान करत आहे जे होम क्वारंटाईन आहेत त्यांना त्रास देऊ नका पण त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. 

शेवटी आमची नोंद कुठे नाहीच? 

अनेक आशा वर्कर्स यांच्याशी बोलल्यानंतर शेवटी सर्वांचा एकच सूर होता कि आम्ही जीवाची काळजी न करता एवढं सर करतो आहे. पण सरकार डॉक्‍टर्स, नर्स आणि पोलिसांच्या कामगिरीबद्दल कायम बोलत असते. आमचं साध नावसुद्धा घेतलं जात याचं मात्र मनापासून वाईट वाटतं हे सांगायला त्या विसरल्या नाहीत. सरकारने फक्त दोन शब्द चांगले वापरले तरी आम्हाला आणखी हुरूप येईल. हे संकट मोठं आहे त्याचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. फक्त अपेक्षा आहे ती कौतुकाच्या दोन शब्दांची. 

आपलं सरकार काय म्हणतंय? 

राज्यातील आशा वर्कर्स यांची परिस्थिती जाणून घेतल्यांनंतर आम्ही राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील याड्रावकर यांच्याशी बोल्यांनंतर त्यांनी सांगितले कि आशा वर्कर्स गेला महिनाभर चांगले काम करत आहे. जिथे कोणाला सुरक्षा किट मिळाले नसेल त्यांना ते मिळण्यासाठी स्थानिक प्रशासनाला योग्य ती कृती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आशा वर्कर्स या खूप कमी मोबदल्यात काम करत आहेत त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी हि सरकारची आहे. काही ठिकाणी आशा वर्कर्स यांना स्थानिक लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. त्यावर आरोग्य राज्यमंत्री म्हणाले काही ठिकाणी असे प्रकार घडले आहेत. त्याठिकाणी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. स्थानिक लोकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत असलेल्या आशा वर्कर्स यांना सहकार्य करा. ते आपल्या भल्यासाठीच आहे. पुढे ते म्हणाले कि ज्यांनी या कोरोनाच्या संकटाच्या काळात त्यांचा सहानुभूतीने विचार करून योग्य मोबदला मिळावा म्हणून प्रयत्न करणार आहे.

ASHA Workers Fighting against Coronavirus from Frontline Read Inside Story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ASHA Workers Fighting against Coronavirus from Frontline Read Inside Story