आनंदाचे डोही आनंद तरंग

आषाढी वारी ही वारकऱ्यांची मुख्य उपासना आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाची वारी स्वतंत्र असते
Ashadi Wari 2022 warkari enjoying their journey towards pandharpur
Ashadi Wari 2022 warkari enjoying their journey towards pandharpur sakal

आषाढी वारी ही वारकऱ्यांची मुख्य उपासना आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाची वारी स्वतंत्र असते. पंढरीच्या वारीची उपासना ही अगदी साधी आणि सोपी आहे. त्यातून मिळणारे आत्मिक समाधानाचे फळ जीवनाला तारून नेणारे असते. वारीत चालताना जो आनंद मिळतो, तो स्वर्गातील देवांनाही मिळत नाही. वारकऱ्यांची वाट प्रत्यक्ष पांडुरंग पाहत असतो. या वारीत वारकऱ्यांच्या कायिक, वाचिक, मानसिक अशा तिन्ही उपासना पूर्ण होतात. पंढरीच्या वारीत वारकरी परमानंद अनुभवतात. जो मनोभावे वारी करतो, त्या प्रत्येकाला परमानंद भरभरून मिळतो. त्याच आत्मिक आनंदाच्या उर्जेवर वारकरी पुढच्या वारीपर्यंतची वाटचाल करतात. म्हणूनच वारी हा परमोच्च आनंदाचा भक्तिप्रवाह आहे.

गेली दोन वर्ष जग कोरोनामय महामारीने ग्रासले होते. त्यामुळे तब्बल दोन वर्ष सरकारला आषाढी पायी वारी रद्द करावी लागली. मनवारी करण्याशिवाय वारकऱ्यांना कोणताही पर्याय नव्हता. अतिशय संयमी भूमिकेतून वारकऱ्यांनी सरकारचा निर्णय स्वीकारला आणि घरातूनच मनवारी केली. पायी वारी करता न आल्याने लाखो वारकऱ्यांचा आनंद दोन वर्ष हिरावला. त्या काळात मन बेचैन होते. त्यात दोष ना वारकऱ्यांचा होता, ना सरकारचा. त्यावेळी ‘जीव झुरे तुझ्यासाठी’, अशी वारकऱ्याची अवस्था झाली होती.

कोरोनाचा कहर कमी झाल्यामुळे यंदा वारी होत आहे. मनाला आनंदाचे भरते आले आहे. लाखो वारकरी पंढरीची वाट चालत आहेत. नामस्मरण करीत भगवंताचे गुणगान गात पंढरीला पायी चालत जाऊन देवाला भेटण्यात मनाला वेगळाच आनंद असतो.

‘नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेळिया ।

सुख देईल विसावा रे।।...

या अभंगाप्रमाणे प्रत्येक वारकऱ्याची पावले पंढरीकडे निघाली आहेत. आता काय व्हायचे ते होऊ दे, पण वारी करणारच, हाच भाव प्रत्येक वारकऱ्याचा आहे. गेल्या दोन वर्षांत अमेरिका, जपान, जर्मनीसारख्या प्रगतशील देश काळजी घेऊनही कोरोनाला रोखू शकले नाहीत. त्यामुळे वारीत ‘देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो।। याप्रमाणे वारकरी श्रद्धा आणि भक्तीच्या बळावर चालत जाऊन पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी आपली परंपरेची वारी रुजू करतील. वारी चुकल्यानंतर काय यातना होतात, हे वारकऱ्यांनाच माहीत असते. यंदा सर्व संतांच्या पालखी सोहळ्यांमधून वारकरी पंढरीकडे येत आहेत. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशीच वारकऱ्यांची अवस्था आहे. पंढरीत भक्तीचा महासागर अवतरणार यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com