काय वाटतेय मराठा क्रांती मोर्चातील तरूणाईला?

आशिष मेटे
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

मुंबईत उद्या (बुधवार) मराठा क्रांती मोर्चा निघतोय. मुंबईच्या आणि या आधी वर्षभरात निघालेल्या क्रांती मोर्चांचे संघटन, नियोजन केले तरूणाईने. या तरूणाईचे प्रातिनिधीत मनोगत मांडताहेत औरंगाबादहून आशिष मेटे.

अहमदनगर जिल्ह्यात १३ जुलै २०१६ ला मानवतेला काळिमा फासणारी क्रुर कोपर्डीची घटना घडली आणि राज्यभर असंतोषाचा उद्रेक उसळला ज्याला मराठा म्हणजे सधन, सरंजामशहा, माजोरडा अशी वृत्ती ठेवणाऱ्यांनी हिणवले, जातीयवादाचे लेबल लावले. मात्र, एक क्रूर घटनेच्या विरोधात मनात तयार झालेला असंतोष सर्व सामाजिक प्रश्नांच्या विरोधात उभा राहिला. तो रस्त्यावर यायला लागला. पहिला मराठा क्रांती मोर्चा ९ ऑगस्ट 2016 ला विद्रोहाची भुमी असलेल्या औरंगाबादमध्ये निघाला ज्यात आघाडीवर होते युवक व युवती. विस्थापित असलेला हा मराठा तरुण एकत्र आला. संघटित झाला. त्यात तो जमेल तसे शिक्षण घेत असल्याने शांत डोक्याने विचार करु लागला. मधल्या काळात मोर्चा समन्वयक म्हणुन फिरणारे मॅनेज झाले...त्यांनी सेटिंग केली अशी, एक अफवा मिडीयातील अभिजन वर्गाकडून मोठ्या प्रमाणात पसरवण्यात आली; पण तरीही मोर्चा डगमगला नाही. त्याचे कारण हा मोर्चा उभा राहिला तो मराठा समाजातील तरुणांच्या ताकदीवर. या समन्वयकांच्या नावावर नव्हे.

जसं धंदा हा शब्द समोर आला तर आपल्या सगळ्यांच्या समोर येतो तो जैन, मारवाडी, सिंधी समाज; तसंच शेती हे नाव पुढे आले की समोर येतो मराठा समाज. मराठा समाजाच्या प्रश्नांचे मुळ शोधले तर ते शेतीमध्येच निघते. आज दुष्काळाचे कालचक्र समाजमन नकारात्मक करतेय आणि आत्महत्या वाढत आहेत. आजघडीला राज्यभरात झालेल्या शेतकरी आत्महत्यांमध्ये सर्वाधिक मराठा समाजातील शेतकरी आहेत ही आमच्यासाठी खरंच शोकांतिका आहे. हा सगळा उद्रेक दिसत आहे तो मराठा क्रांती मोर्चामध्ये मराठा तरुणांच्या मनांत. आज शेतकरी दादा जमेल तसं पोराला शिकवतो अन् गावकुस सोडायला लावुन नोकरी करायला लावतो; पण तो तरुण बाहेर जरी पडला तरी त्याचे मन गावात असतं, त्याच्या शेतात असते. त्याला आठवत असतो त्याच्या बापाचा चेहरा जो त्या शेतात राबत असतो. त्याच्या बापाचे अपयश, त्याची इथल्या व्यवस्थेकडुन होणारी हेळसांड हे सगळे थेंबे थेंबे तळं साचे या म्हणीप्रमाणे मनात साचत राहिले. त्यातून जो मार्ग निघाला, तो मराठा क्रांती मोर्चात.

कोपर्डीमध्ये बळी गेलेल्या आमच्या "निर्भया" ताईला न्याय मिळुन देण्यासाठी रस्त्यावर उतरलेला हा समाज कोणाच्याही विरोधात नव्हता. तो रस्त्यावर उतरला होता न्याय मागण्यासाठी. पण त्या सर्व समाजाला जेव्हा जातीयवादाचे लेबल लावले गेले, त्यांची खिल्ली उडवली गेली तेव्हा हा सर्व समाज भडकला. पण तरीही त्यांनी त्यांचा उद्रेक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक अधिकारात राहुनच दाखवला. आम्ही आमच्या प्रश्नांसाठी भांडतोय, न्याय मागतोय तो ही सरकारकडे (मग ते कोणाचेही असो) तर यांना पोटशुळ का उठावा, हा अनुत्तरित प्रश्न आहे. हा मोर्चा दलित विरोधी आहे, हा मोर्चा ब्राम्हण मुख्यमंत्री आहे म्हणून निघाला आहे वगैरे वगैरे लेबल लावुन या लोकांनीच हा संपूर्ण समाज भडकवला.

आज एका वर्षापासुन मराठा क्रांती मोर्चा निघतोय लाखोच्या संख्येने लोक एकत्र येताहेत आणि हा मराठा तरुण तिथले संपूर्ण नियोजन करतोय, जे काम दिले ते पुर्णत्वास नेतोय पण हे सगळे करत असतांना कुठेही कायदा हातात घेतला जाणार याची पण तो काळजी घेतोय. मनात उद्रेक तीव्र असुनही तो शांतपणे मनाची स्थिती सांभाळत संपूर्ण मोर्चाचे नियोजन करत आहे. यासाठी मराठा समाजातील तरुणांना सलाम. तसेच आता एक तरुण म्हणून आमची जबाबदारी आता जास्त वाढली आहे. समाज म्हणुन एकत्र आलेल्या तरुणांना सोबत घेऊन रचनात्मक काम उभे करुन समाजात सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे, असे मला मनोमन वाटते.

जय जिजाऊ जय शिवराय !!

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Ashish Mete writes about Maratha Kranti Morcha Mumbai Morcha