इतिहास पोलिस दल निर्मितीचा (अशोक इंदलकर)

Ashok Indalkar
Ashok Indalkar

'पोलिस' हा शब्द उच्चारताच आपल्या नजरेसमोर उभा राहतो एका विशिष्ट वर्दीतील सरकारी अंमलदार! काही खास अधिकार असलेला, कायद्याची अंमलबजावणी करणारा, अरेरावी करणारा, उद्धट वाटणारा व समाजामधील लोकांची फारशी सहानुभूती नसलेला हा सरकारी अंमलदार "पोलिस' म्हणून ओळखला जातो. सर्वसाधारणपणे जगभर पोलिस या शब्दाची खास ओळख (स्पेशल आयडेंटीटी) आहे. महसूल खाते, टेलिफोन खाते, विक्रीकर खाते किंवा इतर कोणत्याही खात्यामधील कर्मचारी जर एखाद्या सोसायटीमध्ये सरकारी कामानिमित्त गेला तर कोणी त्याचेकडे ढुंकूनही बघणार नाही किंवा त्याची दखलही घेणार नाही. मात्र एखादा पोलिस त्या सोसायटीमध्ये शिरला की मात्र सगळ्यांचे कान टवकारले जातात. खिडक्‍या किंचित उघडल्या जाऊन उत्कंठापूर्वक नजरा ज्या ठिकाणी पोलिस गेला असेल तेथे घुटमळत राहतात. पोलिस का आला? कोणाकडे गेला? कशासाठी गेला? ज्या घरात गेला त्या घरातल्या लोकांनी काय लफडंबिफडं तर केलं नाही ना?

कोणाला पकडून तर नेले जाणार नाही ना? वगैरे नाना तऱ्हेचे विचार लोकांच्या मनामध्ये येतात. लहान मुलांमध्ये तर पोलिसांबद्दल भलतेच गूढ आकर्षण असते. पोलिसांची भीती लहान मुलांना दाखविली जाते. "दंगामस्ती केलीस तर पोलिसांच्या ताब्यात देईन.' "शाळेत नाही गेलास तर पोलिसांना बोलवीन.' वगैरे वगैरे. वास्तविक पोलिस खाते हे शासनाच्या अनेक खात्यांपैकी असलेले एक खाते आहे. वन खाते, महसूल खाते, विक्रीकर खाते वगैरे. पण या खात्यांबद्दल कधी लहान मुलांनी उत्सुकता दाखवली नाही. कोणत्याही ठिकाणी गेला तर एक दृश्‍य हमखास तुम्हाला बघायला मिळेल. ते म्हणजे लहान मुले चोर पोलिसांचा खेळ खेळताना आढळून येतील. खेळ खेळताना ही लहान मुलं कधी, "तू शेठजी हो', "मी विक्रीकर अधिकारी होतो' किंवा "तू तहसीलदार, तलाठी हो मी शेतकरी होतो' असा खेळ खेळताना आढळणार नाहीत. हिंदी सिनेमावाले तर त्यांच्या स्टोरीमध्ये पोलिसाला घेतल्याशिवाय राहत नाहीत. "वर्दी', "खाकी', "पोलिस फोर्स', "अर्धसत्य' हे हिंदी सिनेमे तर पोलिस खात्यावर काढले गेले आहेत आणि कितीतरी सिनेमांमध्ये पोलिस किंवा पोलिस खात्यावर आधारीत कथा दाखवल्या जातात. यावरून समाजामध्ये पोलिसांबाबत किती उत्सुकता आहे हे दिसून येते. भारतातच काय जगभर हेच आहे. शासनाच्या अनेक खात्यांपैकी "सेलीब्रेटी'चा दर्जा प्राप्त झालेल्या पोलिस खात्याविषयी लोक रोज चांगले वाईट बोलत असतात, ऐकत असतात. परंतु पोलिस हा शब्द आला कोठून? हिंदुस्थानात पोलिस दल कोणी सुरू केले? कधी स्थापन झाले? त्यामागची पार्श्‍वभूमी काय? इतिहास काय? याबाबत फारच थोड्या लोकांना माहिती असते. "पोलिस' हा शब्द, भारतात पोलिस दलाची स्थापना, स्थापनेमागील उद्देश याबाबत थोडक्‍यात इतिहास आता आपण पुढे जाणून घेऊ ......

"पोलिस' हा युरोपियन भाषेमधून आलेला शब्द आहे. त्याचा शब्दश: अर्थ "नगरासाठी' म्हणजे इंग्रजी भाषेत "ए फॉर द सिटी' असा आहे. आपल्या देशाच्या प्राचीन इतिहासामध्ये ही "संस्कृत', "प्राकृत' व "पाली' साहित्यातून "नगरपाल' म्हणजे नगराचे रक्षण करणारा, असे नाव मुख्य पोलिस अधिकाऱ्याला दिलेले आढळते. पोलिस या विदेशी शब्दाला सर्वात योग्य आणि प्राचीन भारतीय शब्द म्हणजे "आरक्षी' हा होय. शरीर व मालमत्तेचे रक्षण करणारा "आरक्षी' होय.

भारतामध्ये आजही काही ठिकाणी पोलिस फोर्सला "आरक्षीदल' हा शब्द आढळतो. शेकडो वर्षापूर्वीं पाषाण युगामध्ये आदिमानव असंघटित अवस्थेत फिरत होता. प्रचंड मोठी जंगले, दुथडी भरून वाहणाऱ्या अफाट नद्या, त्यातून फिरणारे अजस्त्र सुसरी, मासे, दऱ्याखोऱ्यातून फिरणारे अजस्त्र महाकाय श्‍वापदे या सवारशी मुकाबला देत जगणे हे मानवासारख्या दुबळ्या प्राण्याला फार अवघड होते. प्रत्येक प्राण्याला स्वसंरक्षणाकरिता देवाने काही ना काही दिले आहे. हत्तीसारख्या प्राण्याला अजस्त्र शरीर, तलवारीसारखे दात, गेंड्याला प्रचंड ताकद व मोठ्या खंजिरासारखा दात, वाघसिंहाला ताकदीबरोबरच अणकुचीदार नखे व सुळे, तर पक्षांना अणकुचीदार चोच. पण मानव प्राण्याला काय? स्वसंरक्षणासाठी तसे काहीही नाही. परंतु "बुद्धी' ह्या देवाने दिलेल्या सर्वश्रेष्ठ देणगीने मानवाची आजची ही प्रगत अवस्था प्राप्त होऊन महाकाय प्राण्यांना, रौद्ररूप धारण करणाऱ्या निसर्गालाही काही प्रमाणात त्याने गुलाम बनवले आहे. याच बुध्दीच्या जोरावर आदिमानवाने महाकाय अजस्त्र प्राण्यांपासून स्वत:चा बचाव करण्याकरिता "समूहात' राहण्याचे ठरवले. "बुद्धी' ह्या देणगीचा वापर करून संघटित राहण्याचा मानवाच्या इतिहासातील पहिला शोध व बोध असावा. कुटुंबाच्या रूपाने मानवाचा पहिला समूह अस्तित्वात आला.

पाषाणापासून बनवलेली शस्त्रे तो वापरू लागला. एकत्र राहून शिकार करू लागला. केवळ समूहाने राहून चालत नाही, हे लक्षात आल्यावर त्याही शिकार करू लागला. केवळ समूहाने राहून चालत नाही, हे लक्षात आल्यावर त्याही पुढे जाऊन समूहातील एकत्र आलेल्या जाणाऱ्या लोकांनी आचार, विचार व अनुभव यांची सांगड घालून जीवनातील पुढचा टप्पा गाठला. एक आचार एक विचार यातून सांस्कृतिक प्रगती झाली. वेगवेगळ्या आचारातून, विचारातून समूहाचे वेगवेगळे गट पडून विविध धार्मिक समाज व्यवस्था अस्तित्वात आली. मानवी कृतीचे तर्कसंगत विश्‍लेषण होऊ लागले. चांगले कृत्य, वाईट कृत्य, न्याय, अन्याय याबाबत ठामपणे विचार होऊ लागला. संघटित समाजाच्या निकोप वाढीसाठी चांगल्या कृत्यांना पाठिंबा, प्रोत्साहन आणि अन्यायी अनिष्ट दुष्कृत्यांना पायबंद घालण्याकरिता एक प्रकारची संहिता, नियमावली असणे आवश्‍यक वाटल्याने त्याबाबत एकमत झाले. त्यानुसार पुढील पावले पडत गेली. समाजातील दुष्कृत्यांना पायबंद घालण्याकरिता व ती टाळण्याकरिता तसेच ते करणाऱ्यांना शासन देणेकरिता मानवी समूहामधील म्हणजेच समाजातील ठराविक व्यक्तींचे गटावर याची जबाबदारी देण्यात आली. हीच पोलिसांची मूळची संकल्पना होती. "मृच्छकटीक' किंवा " शाकुंतल' या पौराणिक नाटकांमधून प्राचीन भारतातील पोलिस दृष्टीस पडतो. चोरीचा संशय असलेल्या एका कोळ्याची चौकशी एक पोलिस नाईक व त्याचे दोन शिलेदार (पोलिस) करत आहेत हे दृश्‍य पाहावयास मिळते.

ग्रामीण भागात बारा बलुतेदारांइतकेच महत्त्व पोलिसांना होते. नगराचे रक्षण करणाऱ्या मुख्य अधिकाऱ्यास "नगरपाल' म्हटले जायचे. त्यास "कोट्टापाल' असेही नाव होते. हिंदीत "कोतवाल', बंगालीत "कोटाल' यावरून "कोतवाल' हा शब्द रूढ झाला. उत्तर भारतात आजही पोलिस ठाण्यांना "कोतवाली' असे म्हणतात. मुस्लीम तसेच मराठा राज्यकत्यारनी त्यांचे काळात खास पोलिस दल न ठेवता इतर अंमलदारांवर ती जबाबदारी सोपवली. मराठा राज्यकत्यारनी पोलिसाचे काम गावप्रमुखावर-पाटलावर सोपवले होते. त्यावेळचा पाटील (आताचा पोलिस पाटील) हा गावामधील रामोशी, महार, मांग, भिळू, कोळी, मांगल्या या जमातींमधील लोकांचे मदतीने चोरांचा बंदोबस्त करीत असे. गावात पहारा, गस्त, दवंडी वगैरे कामे त्यांचेकडूनच केली जात असत. ब्रिटिशांनीही नंतर गावपातळीवर पाटलाचे महत्त्च ओळखून ती जबाबदारी त्याच्यावरच टाकली. पाटलाला मग पोलिस पाटील म्हणून म्हटले जाऊ लागले. सन 1860 पयरत तरी खास असे पोलिस दल नव्हते. त्यानंतर मात्र परिस्थिती बदलली. आजच्या आधुनिक पोलिस दलाची निर्मिती ही हिंदुस्थानवर साम्राज्य केलेल्या ब्रिटिशांनी केली. हिंदुस्थानी जनतेची सुरक्षितता राखली जावी, त्यांचे मालमत्तेचे रक्षण व्हावे, कायदा व सुव्यवस्था राखली जावी हा पोलिस दल स्थापनेमागचा ब्रिटिशांचा मुळीच उद्देश नव्हता. ब्रिटिश साम्राज्याला, ब्रिटिश राज्याला आवाहन देणाऱ्या अंतर्गत बीमोड करण्याकरिता त्यांचेवर प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष अंकुश ठेवण्याकरिता त्यांची पाळेमुळे खणून काढण्याकरिता पोलिस दलाची त्यांनी निर्मिती केली.

भारतीय पोलिस दलाच्या निर्मितीची बीजे ही स्वातंत्र्यपूर्व काळात सन 1857 मध्ये झालेल्या स्वातंत्र्य युद्धात आढळतात. ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध सन 1857 मध्ये मोठे बंड झाले. झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, कुँवरसिंह यांनी या स्वातंत्र्य समरात महान पराक्रम गाजवला. हिंदुस्थान स्वतंत्र करण्याकरिता ब्रिटिशांविरुद्ध हे युद्ध खेळले गेले. मिरत छावणीत ब्रिटिश अधिकाऱ्यावर मंगल पांडे या शिपाई गड्याने गोळी झाडल्यानंतर या बंडाला सुरुवात झाली. बघता बघता साऱ्या हिंदुस्थानभर ते बंड पेटले. परंतु नंतर मात्र ब्रिटिशांनी हे बंड मोडून काढले. नानासाहेब पेशवे, कुँवरसिंह, झाशीची राणी लक्ष्मीबाई, थोर सेनानी तात्या टोपे, बहादूरशाहा जफर यांचे त्यागाबद्दल, सहभागाबद्दल डोळेझाक करून गोऱ्या साहेबाने या स्वातंत्र्य युद्धास शिपायांचे बंड (म्युटिनीटी ऑफ सिपॉय) असे हिणवले. या बंडानंतर ब्रिटिशांचे लक्षात आले की हिंदुस्थानात प्रचंड प्रमाणात अंतर्गत अशांतता निर्माण झाली आहे. सत्तेविरुद्ध रोज क्रांतिकारक तयार होऊ लागले आहेत. साऱ्या हिंदुस्थानवर त्यांच्या संघटना सहकार्याने वाढू लागल्या आहेत. छोट्या मोठ्या बंडाळ्या करणारे क्रांतिकारी लोक, स्वातंत्र्याकरिता लोकांमध्ये जागृती करणारे लहानमोठे नेते, जनजागृतीसाठी त्यांनी चालवलेली साप्ताहिके, दैनिके, गुप्तपणे त्यांच्या चालणाऱ्या मिटींग या सर्व गोष्टी उधळून लावण्याकरिता व त्यास पायबंद घालण्याकरिता सुसंघटित अशा अंतर्गत यंत्रणेची गरज आहे. त्या दृष्टीने धूर्त ब्रिटिशांची पावले पडू लागली. त्यादृष्टीने सर्व तयारी झाल्यानंतर सर एच. बी. ई. फ्रेरे यांनी विधीमंडळामध्ये (लेजिस्लॅटीव्ह कॉंसिल) बील सादर केले. त्याचेच पुढे भारतीय पोलिस कायदा नं. 5 सन 1861 (इंडियन पोलिस ऍक्‍ट व्ही-18 ऑफ 1861) मध्ये रूपांतर होऊन सुसंघटित अशा पोलिस दलाची निर्मिती झाली. विशेष सांगण्यासारखी बाब म्हणजे आजही तोच कायदा पोलिस खात्याला लागू आहे किंवा पोलिस खात्याच्या मानगुटीवर बसला आहे.

ब्रिटिशांनी तयार केलेले पोलिस दल हे हिंदुस्थानी स्वातंत्र्य चळवळ दडपण्यासाठी क्रांतिकारकांना व त्यांना आश्रय देणाऱ्यांना चिरडण्याकरिता वापरले गेले. कोणत्याही पोलिस कारवाईचा निर्णय घेणारे, अंमलबजावणी करणारे अधिकारी ब्रिटिश असत व त्यांचे हाताखाली काम करणारे कनिष्ठ अधिकारी हे भारतीय असत. शिपाई, नाईक हवालदार, फौजदार व निरीक्षक इत्यादी पोस्टवरील कर्मचारी, अधिकारी हे इंडियन होते व सहाय्यक पोलिस आयुक्त, डी. आय. जी. हे सर्व ब्रिटिश असत. कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी हे अशिक्षित किंवा कमी शिकलेले, वरिष्ठांचा हुकूम मानणारे, त्यांचे आदेशाप्रमाणे खऱ्याचे खोटे, खोट्याचे खरे करणारे, अडाणी, आडगे, रगेल व धटिंगण असे होते. वरिष्ठांच्या म्हणजेच ब्रिटिशांचे आदेशाप्रमाणे आपल्याच देशबांधवांना वाटेल तसे छळायला ते मागेपुढे पाहत नसत. धूर्त ब्रिटिश साहेबांच्या आदेशामागील कुटिल हेतू समजण्याइतकी कुवत त्यांचेमध्ये नव्हती. शिस्तीच्या गोऱ्या कातडीच्या साहेबाचे वाटेल ते हुकूम शिरसावंद्य मानून आपल्याच देशवासीयांचे, देशबांधवांचे, गळे घोठण्याचे, त्यांना यमयातना देण्याचे अघोरी कृत्य पोलिस करत त्यामुळे जनता व पोलिस यांचेमध्ये जी दरी निर्माण झाली ती अद्यापही पूर्णपणे भरून आली नसल्याचे आढळून येते.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात पोलिस दलात खूप सुधारणा होत गेल्या. सुशिक्षितांचे प्रमाण वाढले गेले. पोलिस, कॉन्स्टेबलसारख्या कनिष्ठ पदावर आज ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट तरुण भरती होत आहेत. डॉक्‍टर, इंजिनिअर त्याचप्रमाणे लॉ, मॅनेजमेंटच्या पदव्या घेतलेले तरुण योग्य नोकरीच्या किंवा संधीच्या अभावाने पोलिस उपनिरीक्षक पदासारख्या कनिष्ठ पदावरही पोलिस खात्यात नोकरी करत आहेत. सुशिक्षितांचे प्रमाण वाढल्याने पोलिस दल हे जास्तीत जास्त लोकाभिमुख होत आहे. मानवी हक्कांची जाणीव तसेच त्यांची अंमलबजावणी अधिक जागृत व सुशिक्षित झालेल्या समाजामुळे पूर्वीच्या आडमुठ्या पोलिस भूमिकेची जागा कार्याच्या भावनेने घेतलेली आहे. जनता व पोलिस यांच्यामधील दरी झपाट्याने कमी होत चालली आहे. पोलिसातील माणूस व माणसातील पोलिस एकमेकांनी ओळखायला सुरुवात केल्याने सुसंवाद प्रस्थापित होत आहेत.

मुलाच्या अयोग्य वागण्यावर बंधने घालणारा पिता, पाय घसरलेल्या पोटच्या पोरीला सरळ मार्गावर आणण्याकरिता कठोर भूमिका घेणारी माता, बिघडलेल्या विद्यार्थ्यांना वाईट वळणापासून परावृत्त करून चांगले वळण लावणारा कर्तव्य कठोर शिक्षक ! हे सर्व वैयक्तीक पातळीवर पोलिसाचीच भूमिका वठवत असतात. म्हणूनच म्हटले जाते की प्रत्येक नागरिक हा पोलिस असतो व प्रत्येक पोलिस हा नागरिक असतो पण ऑगस्ट वॉल्टीसमोर यांनी पोलिसांबाबत ते लिहून ठेवले आहे ते आजही पोलिसांबाबत किती तंतोतंत लागू आहे पहा. तो म्हणतो, "पोलिस हा जनतेच्या अनादराचा, गुरुवयारच्या टीकेचा, चित्रपटात विनोदाचा, टिंगलटवाळीचा विषय आहे. वर्तमानपत्रातून कधीही त्याला श्रेय मिळत नाही.

सरकारी वकील व न्यायाधीश यांच्या सहकार्याअभावी तो निराधार असतो आणि आदरणीय व्यक्तींकडून त्याला तिरस्कार मिळतो. अनेकविध धोके व प्रलोभने सतत त्याच्या समोर उभीच असतात. जो जेव्हा कायद्याचा अंमल करतो, त्याचा धिक्कार होतो आणि जेव्हा अंमल करीत नाही तेव्हा मात्र निलंबित होतो. त्याच्याकडून सैनिकाची, शांतीदूताची आणि शिक्षकाची अपेक्षा करीत असताना त्याला पगार मात्र रोजंदार मजुरापेक्षाही कमीच दिला जातो.'

(अशोक इंदलकर यांनी लिहीलेल्या 'लेफ्ट-राईट' या पुस्तकातून साभार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com