अम्लान ‘सुमन’ गाण्याचे...! (अशोक पत्की)

अम्लान ‘सुमन’ गाण्याचे...! (अशोक पत्की)

ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुमन कल्याणपूर यांनी हिंदी-मराठी सिनेसृष्टीत, तसंच मराठी भावगीतांच्या विश्वात आपल्या वेगळ्या आवाजानं स्वतंत्र स्थान निर्माण केलेलं आहे. दशरथ पुजारी, कमलाकर भागवत, विश्वनाथ मोरे, तसंच अशोक पत्की यांच्या संगीतदिग्दर्शनात सुमनताईंनी असंख्य मराठी गीतं गायिली आणि रसिकांचं भावविश्व समृद्ध केलं. आज (२९ जानेवारी) त्या ८१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत, त्यानिमित्त...

तो साधारणतः १९६८ चा काळ होता. त्या काळात हार्मोनिअमवादक/पेटीवादक म्हणूनच माझी ओळख होती. त्याच काळात सुमन कल्याणपूर यांच्याकडचे जे पेटीवादक होते, ते दुसरीकडं काम करण्यासाठी निघून गेले होते आणि सुमनताईंकडं पेटीवादकाची जागा रिकामी होती. कुणीतरी त्यांना माझं नाव सुचवलं. त्यांचा एक ग्रुप होता आणि तो ग्रुप वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करायचा. त्यासाठी त्यांना पेटीवादक हवा होता.
योगायोग असा, की सुमनताई ज्या इमारतीत राहत होत्या, त्याच इमारतीत मीही त्या वेळी राहायला होतो.

त्यांना हे अर्थातच माहीत नव्हतं आणि ते कळल्यावर साहजिकच त्यांना खूप आश्‍चर्य वाटलं. त्यांनी माझं पेटीवादन ऐकलं आणि त्या आनंदित झाल्या. त्यानंतर मी त्यांच्याकडं वादक म्हणून कायमचा कामाला लागलो. पुढं एका वर्षातच आम्हाला वेस्ट इंडीजला जायची संधी मिळाली. त्या कार्यक्रमासाठी आम्ही सुमारे ५० गाणी निवडली होती. त्या गाण्यांचं नोटेशन काढायचं काम मला करायचं होतं; पण नोटेशन वगैरे कसं काढतात, हे मला काहीच माहीत नव्हतं. सुमनताईंच्या ग्रुपमध्ये त्या वेळी अरविंद मयेकर हे सतारवादक होते. नोटेशन कसं काढायचं हे मयेकर यांनी मला शिकवलं. मग रोज मी आणि अरविंद सुमनताईंचे सेक्रेटरी शरू बर्वे याच्या घरी जाऊन वेस्ट इंडीजला होणाऱ्या कार्यक्रमाची पूर्वतयारी करायचो. अशी माझी आणि सुमनताईंची ओळख झाली.
त्या वेळी कवी (कै) अशोकजी परांजपे मुंबईत जम बसविण्यासाठी धडपडत होते. ते शरूकडंच राहायचे. आम्ही शरूकडं कार्यक्रमाच्या तालमीसाठी जात असू, त्या वेळी कवी अशोकची आणि माझी ओळख झाली. अशोकला माझं काम इतकं आवडलं, की तो मला म्हणाला : ‘‘तू म्युझिक डायरेक्‍टर का बनत नाहीस?’’

मी म्हणालो : ‘‘त्यासंबंधीचं मला काहीच ज्ञान नाही.’’
त्यावर अशोकनं माझ्यापुढं एक कल्पना मांडली. तो मला म्हणाला : ‘‘तू तुला हवं तसं, जमेल तसं काम कर... मी माझ्या कविता/गाणी तुला चाली लावण्यासाठी देतो.’’
मग त्यानं मला ‘एकदाच यावे सखया’, ‘केतकीच्या बनी तिथे’, ‘नाविका रे’ अशी चार-पाच गाणी दिली. त्यांना मी चाली लावल्या आणि संगीत दिलं. आठ दिवसांत ती गाणी तयार झाली. मला शरू म्हणाला : ‘‘ही गाणी तू सुमनताईंना ऐकव...’’

पण ती गाणी सुमनताईंना ऐकवण्याचं धाडस माझ्यात नव्हतं. मग शरूनंच ते काम केलं. त्यानंतर मग मी सुमनताईंना माझी गाणी ऐकवली. ती त्यांना इतकी आवडली, की त्यांनी लगेच ‘एचएमव्ही’च्या कार्यालयात वसंतराव कामेरकर यांना फोन केला आणि १९७२ मध्ये माझी पहिली ध्वनिमुद्रिका - सुमनताईंनी गायिलेल्या गाण्यांची - आली. अशा प्रकारे ‘संगीतकार अशोक पत्की’  म्हणून माझा जन्म झाला. ही सगळी सुमनताईंचीच कृपा आहे. त्यानंतर मी जेवढी गाणी केली, ती सगळी गाणी सुमनताईच गातील, हे डोळ्यासमोर ठेवूनच मी ती तयार केली.

सुमनताईंकडं तेव्हा चार संगीत दिग्दर्शक होते... दशरथ पुजारी, कमलाकर भागवत, विश्‍वनाथ मोरे आणि चौथा मी. वर्षाला एक ध्वनिमुद्रिका त्या प्रत्येक संगीत दिग्दर्शकाबरोबर करायच्या; त्यामुळं माझी सगळ्यात जास्त गाणी सुमनताईंसाठीच तयार केली गेलेली आहेत. सुमनताईंचा आवाज आज वयाच्या ऐंशीव्या वर्षीही तरुण आहे. म्हणजे, त्यांच्या कारकिर्दीच्या सुरवातीला त्यांचा आवाज जसा होता, तसाच तो आजही ऐकायला मिळतो. माझ्या मते, त्यांना दैवी आवाज लाभलेला आहे. त्याच्या आवाजात ताजेपणा आहे. सुमनताई स्वभावानं अतिशय साध्या-सरळ आहेत. मनानं निर्मळ आहेत. साहजिकच त्यांचा आवाज त्यांच्या स्वभावाप्रमाणेच निर्मळ, टवटवीत आहे. अम्लान आहे.
सुमनताईंची रियाजाची पद्धतही वेगळी असे. सुमनताई जेव्हा रेकॉर्डिंगला जात, तेव्हा ते गाणं संबंधित संगीत दिग्दर्शकाकडून चार-पाच वेळा तन्मयतेनं ऐकत. नंतर ते गाणं त्या स्वत: गात, तेव्हा ते साहजिकच अतिशय उत्तम प्रकारे आणि संगीत दिग्दर्शकाला जसं हवं तसंच उतरे. हा त्यांच्या रियाजातला वेगळेपणा मला अतिशय भावला.

सुमनताईंचे आणि आमचे अगदी घरच्यासारखे संबंध आहेत. त्यांनी मला आयुष्यात खूप काही दिलं आहे. एक संगीतकार, संगीत संयोजक म्हणून त्यांनी मला नावा-रूपाला आणलं आहे. त्याबद्दल त्यांचे जेवढे मानावेत तेवढे आभार कमीच आहेत. त्यांना निरामय, आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा !
(शब्दांकन ः चिन्मयी खरे)

----------------------------------------------------------------------------

सुमन कल्याणपूर यांची काही सदाबहार मराठी गाणी...

  •   घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
  •   उठा, उठा चिऊताई
  •   राधिका हरिभजनी रंगली
  •   सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले
  •   आकाश पांघरोनी जग शांत झोपले हे
  •   केशवा, माधवा तुझ्या नामात रे गोडवा
  •   चल ऊठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली
  •   जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे
  •   या लाडक्‍या मुलांनो, तुम्ही मला आधार
  •   शब्द शब्द जपुन ठेव बकुळीच्या फुलापरी
  •   शब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना
  •   नाविका रे, वारा वाहे रे
  •   केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर
  •   कशी करू स्वागता, कशी करू स्वागता
  •   आस आहे अंतरी या आसरा हृदयात दे
  •   पाखरा जा दूर देशी
  •   दीनांचा कैवारी, दुःखितां सोयरा
  •   वाट इथे स्वप्नातिल संपली जणू
  •   जिथे सागरा धरणी मिळते
  •   झरा प्रीतिचा का असा आटतो रे
  •   कशी गवळण राधा बावरली
  •   गेला सोडुनी मजसी कान्हा
  •   जुळल्या सुरेल तारा, स्मरते अजून नाते
  •   सांज आली दूरातून, क्षितिजाच्या गंधातून
  •   उतरली सांज ही धरेवरी
  •   उमा म्हणे, यज्ञी माझे जळाले माहेर
  •   नकळत सारे घडले
  •   तुला ते आठवेल का सारे
  •   हे हात असे जुळलेले, हे नेत्र असे खिळलेले
  •   मी बोलले न काही, नुसतेच पाहिले
  •   आमुची वसने दे श्रीहरी
  •   झिमझिम झरती श्रावणधारा
  •   ते नयन बोलले काहीतरी
  •   देवा, दया तुझी की ही शुद्ध दैवलीला
  •   देह जावो अथवा राहो
  •   दीपका, मांडिले तुला सोनियाचे ताट
  •   नंदाघरी नंदनवन फुलले
  •   पैलतीरी रानामाजी नको नको येऊ नको रे
  •   पिवळी पिवळी हळद लागली
  •   रात्री स्वप्न मला पडले
  •   रे, क्षणांच्या संगतीने मी अशी भारावले
  •   सहज तुला गुपित एक सांगते दुपारी
  •   हसतिल मजला कबीर-मीरा
  •   क्षणि या दुभुंगुनिया घेई कुशीत माते
  •   बोलून प्रेमबोल तू लावलास छंद
  •   पक्षिणी प्रभाती चारियाते जाये
  •   मधुवंतीच्या सुरासुरातुन आळविते मी नाम
  •   पाहुणी आली माझ्या घरी, अंबिका माया जगदीश्वरी
  •   चंदनाचे हात, पायही चंदन
  •   नको बावरोनी जाऊ नियतिच्या भयाने
  •   नाम आहे आदी-अंती, नाम सर्व सार
  •   निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
  •   कृष्णगाथा एक गाणे जाणते ही वैखरी
  •   बुडता आवरी मज भयाचे सागरी
  •   प्रीतसागरी तुझ्या स्मृतींचे गर्जत आले वारे-वादळ
  •   अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर...

----------------------------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com