'व्यायामात सातत्य हवं' (अशोक फळदेसाई)

ashok phal dessai
ashok phal dessai

नियमित व्यायाम करणं, पोषक आहार घेणं, वेळेत झोपणं. या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि मी स्वत: या गोष्टी कटाक्षानं पाळतो. रोज फ्रेश दिसायचं असेल, तर आरोग्य उत्तम राखणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी महत्त्वाची असते झोप. डाएटदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. माझा आहार मी स्वत: घेऊन सेटवर जातो.

मला असं वाटत की, मला आनंदी, सुखी ठेवणारं, ऊर्जा देणारं कारण म्हणजे सकाळी लवकर उठून नियमित व्यायाम करणं, पोषक आहार घेणं, वेळेत झोपणं. या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि मी स्वत: या गोष्टी कटाक्षानं पाळतो. आरोग्य उत्तम राखण्यासाठी मी खूपच प्रयत्न करतो. दररोज आमचं चित्रीकरण सुरू असतं. अनेकदा आऊटडोअर चित्रीकरण असतं. त्यामुळं बऱ्याचदा थकवा येतो; पण दररोज फ्रेश दिसायचं असेल, तर तुमचं आरोग्य उत्तम राखणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी महत्त्वाची असते झोप आणि हाच माझा आरोग्याचा मंत्र आहे- जो मला फ्रेश ठेवतो. डाएटदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. माझा आहार मी स्वत: घेऊन सेटवर जातो. माझा भर सध्या माझ्या भूमिकेवर आहे, त्याला लागणाऱ्या गोष्टी मला आत्मसात कराव्या लागतात- ज्यासाठी मी अजूनही मेहनत घेत आहे. त्यासाठी मानसिकतेकडं लक्ष असणं अत्यंत महत्त्वाचं असतं.
सकाळी मी सेटवर गेल्यावर माझ्यासाठी पाच मिनिटं काढून ठेवतो. त्यावेळी मी एकांतात बसतो आणि काही व्हॉइस एक्‍सरसाईज करतो. कारण मी जेव्हा ललित कला केंद्रात होतो, तेव्हा हे क्‍लासेस नियमित व्हायचे. काही विशिष्ट शब्द विशिष्ट पद्धतीनं उच्चारून व्हाइस एक्‍सरसाईज मी करतो.

आहार अन्‌ वेळा महत्त्वाच्या
चांगल्या आरोग्यसंपदेसाठी तुमचा आहार अन्‌ वेळा महत्त्वाच्या असतात. त्याचप्रमाणं पथ्यंही महत्त्वाची असतात. त्यासाठी मी घरातूनच माझा डबा घेऊन येतो. मी सकाळी उकडलेली अंडी खातो. त्याचप्रमाणं चिकन, केळी, सफरचंद, चिकू अशी फळं खातो. मात्र, जास्त तेलकट अन्‌ तिखट खात नाही. साखरही कमी खातो. मला गोड खूप आवडतं; पण काही पथ्य पाळावी लागतात, नाहीतर फॅट दिसून येतात. मी दररोज पाच लिटर पाणी पितो. "जीव झाला येडापिसा' ही मालिका सुरू झाल्यापासून मी आरोग्याला खूप जपतो. आरोग्यासाठी मी घेतलेल्या या काळजीमुळं मला पाच महिन्यांपासून ताप, सर्दी, खोकला झालेला नाहीये. त्यामुळं मी शारीरिक आणि मानसिकरित्या फिट आहे.

व्यायामात नियमितपणा
मी दररोज सकाळी पाच वाजता उठतो आणि एक-सव्वातास वर्कआऊट करतो. नियमित व्यायाम करणं मला आवडतं आणि ते नाही झालं तर मला खूप अस्वस्थ वाटतं. मात्र, कधी-कधी चित्रीकरणादरम्यान वेळ काढून वर्कआउट करतो. कारण, एक दिवस जेवलो नाही तर कसं वाटत, तसं मला वर्कआऊट न केल्यानं चुकल्यासारखं वाटतं. मात्र, माझा दिनक्रम ठरलेला आहे. जिम जवळ असल्यामुळं सगळं व्यवस्थित होतं. मी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन यालाच माझा मार्गदर्शक मानतो. कारण, त्याच्या शरीराची ठेवण आणि फिटनेस या गोष्टी मला आवडतात. त्यानं घेतलेली मेहनत खरंच कौतुकास्पद आहे. त्यामुळं त्यालाच मी माझा गुरू मानतो.
शरीराबरोबर मानसिक आरोग्यही खूप महत्त्वाचं असतं. या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. मानसिक शांततेसाठी मी दररोज पाच मिनिटं वेळ काढून ठेवतो आणि त्यात मी एकाग्रचित्त करून, कोपऱ्यात बसून ओमचं मनन करतो. दररोज चित्रीकरणामुळं कोणीही थकतोच. त्याचप्रमाणं व्यग्र दिनक्रमामुळं स्वत:ला वेळही देता येत नाही. चित्रीकरणादरम्यान अनेकदा दिग्दर्शक काही ना काही गोष्टी सांगत असतात. त्यांच्या हातात स्क्रिप्ट असतं. त्यामुळं नेहमीच तयार राहावं लागतं. अशा वेळी डोकं शांत ठेवणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी मन शांत राहणं खूपच गरजेचं आहे. ललित कला केंद्रामध्ये शिकत असताना पाच मिनिटे स्वत:साठी द्या, असा सल्ला शिक्षकांनी दिला होता. त्यामुळं मी माझ्या मन:शांतीसाठी पाच मिनिटं काढतो. अनेकदा ताणतणावही येत असतो. मात्र, मन:शांतीमुळं मला मनासह शरीरावरही ताबा मिळवता येतो. विचारांतही स्थिरता येते. खरं तर शांत बसणं हीच माझ्या मन:शांतीची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक कलाकाराला मालिका वा चित्रपटातल्या व्यक्तिरेखेबद्दल माहिती असते. मात्र, त्याला अनुसरून आपल्या आवाजाची लयबद्धताही तेवढीच गरजेची असते. आपली जीभ हवी तशी आपल्याला वळवता आली पाहिजे आणि शब्द बोलता आले पाहिजेत. शब्दांचे उच्चारही त्याचप्रमाणं जपले पाहिजेत. त्यासाठीच मी व्हॉइस एक्‍सरसाईज करतो.

वजन वाढवलं
"जीव झाला येडापिसा' या मालिकेतल्या शिवादादाच्या भूमिकेसाठी मला वजन वाढवावं लागलं. पूर्वी माझं वजन साठ किलो होतं. मात्र, मी काही महिन्यांत आठ किलो वजन वाढवलं. त्यासाठी व्यायाम आणि डाएट यांच्यावर लक्ष केंद्रित केलं. त्याचप्रमाणं जास्त झोप घेत होतो. त्याचप्रमाणं अनेक पथ्यंही पाळली. यापूर्वी वजन कमी करण्याची वा वाढवण्याची वेळ कधीही आली नव्हती; पण या मालिकेसाठी मी पहिल्यांदाच हा प्रयत्न यशस्वी केला. माझं वर्कआऊट अन्‌ शरीरसंपदा पाहून माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींनी व्यायाम करायला सुरवात केली आहे. त्याचप्रमाणं ते माझ्याकडून मार्गदर्शनही घेतात.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com