नसता आळ (अशोक साबळे)

अशोक साबळे
रविवार, 22 एप्रिल 2018

आत्याबाई देवपूजा उरकून घाईघाईनं न्हाणीघराकडं गेल्या अन्‌ शोधाशोध करू लागल्या...""उमे, मी इथं आंघोळ करताना माझं गाठलं (गळ्यातला दागिना) ठिवलं व्हतं; पर आता हितं दिसत न्हाय गं...''
असं म्हणत त्यांची शोधाशोध सुरूच राहिली. तापल्या तव्यावर भाकरीला पाणी लावताना जसा चर्र आवाज येतो तसं उमाचं काळीज चरकलं.

आत्याबाई देवपूजा उरकून घाईघाईनं न्हाणीघराकडं गेल्या अन्‌ शोधाशोध करू लागल्या...""उमे, मी इथं आंघोळ करताना माझं गाठलं (गळ्यातला दागिना) ठिवलं व्हतं; पर आता हितं दिसत न्हाय गं...''
असं म्हणत त्यांची शोधाशोध सुरूच राहिली. तापल्या तव्यावर भाकरीला पाणी लावताना जसा चर्र आवाज येतो तसं उमाचं काळीज चरकलं.

कोंबड्यानं बांग दिली अन्‌ उमा जागी झाली. पदर सावरला अन्‌ केसांचं वेटोळं करून घट्टसर अंबाडा बांधला. कोनाड्यातून डोकावून पाहिलं तर झुंजूमुंजू झालं होतं. ती लगबगीनं उठून उभी राहिली. म्हादा अजून शांत पहुडला होता. तिनं आत्याबाईंच्या खोलीत डोकावून पाहिलं. तिथंही काही हालचाल दिसली नाही.

उमा झरझर चुलीपाशी आली, चुलीतली राख एका लाकडानंच खोरून तिनं बाहेर काढली अन्‌ एका बाजूला लावली. गोवरीवर थोडं चिमणीतलं रॉकेल टाकलं, दोन-तीन लाकडं चुलीत कोंबली अन्‌ थोड्या बारीक काटक्‍या लावून चूल पेटवली. आंघोळीच्या पाण्याचं पातेलं चुलीवर चढवलं. मनीनं तिच्या पायाला मऊशार स्पर्श केला अन्‌ ती तिच्या जवळच घुटमळू लागली. उमा पुढच्या कामाला दाराकडं वळली. मनीची लुडबूड सुरूच होती. ती मधूनच हलकासा म्यॉंव म्यॉंव आवाज करून जणू तिला काही सांगत होती. तिच्यासाठी उमा लगेच "न्याहारी' देईल याची तिला खात्री होती. उमानं रात्रीचा शिळा भात अन्‌ टोपातून त्यावर दुधाची धार ओतत ताटली तिच्यापुढं सरकवली. मनीनं आपलं "न्याहारी'चं काम चुटुक चुटुक करत सुरू केलं.

उमानं दाराची आगळ काढली. लोखंडी कोयंडा काढून दरवाजा उघडला. दारातल्या मोत्यानं याची चाहूल घेतली अन्‌ तो भुंकू लागला. आता बाहेर चांगलंच फटफटलं होतं. पाखरांची किलबिल कानावर येत होती. उमा खराटा घेऊन अंगण झाडू लागली. शेजारच्या गोठ्यातल्या जनावरांनाही याचा कानोसा लागला अन्‌ ती एकेक करत ताडकन्‌ उभी राहिली, हंबरू लागली. कोपऱ्यावर कचरा जमा करून उमानं खराटा जागेवर ठेवून दिला. दोन पेंढ्या सोडून जनावरांपुढं मोकळ्या केल्या. कचरा पाटीत भरून ती घरात आली. ओसरीवरची झाडझटक करून तिनं कचरा एकत्र केला अन्‌ उकिरड्यावर भिरकावला. पाटी झटकत ती कोपऱ्यात सरकवली.
पेटलेलं चुलांगण एकसारखं करत उमानं तापलेलं पाणी ओतून घेतलं. पातेलं पुन्हा चुलीवर चढवलं.

म्हादा उठून अंगणात मिश्री घेऊन गेला अन्‌ उमा न्हाणीघराकडं आंघोळीला वळली. आत्याबाईंच्या खोलीतून अजूनही काही हालचाल दिसत नव्हती. तिनं आपली आंघोळ उरकली अन्‌ म्हादाला आंघोळीसाठी पाणी काढून दिलं. गरिबाघरची उमा आता इथं चांगलीच सावरली होती. जेमतेम सहा महिनेच झाले असतील तिच्या लग्नाला. मजुरीनं आलेली उमा म्हादाच्या मनात भरली अन्‌ हट्टानं त्यानं उमाशी लग्न केलं. गरिबाघरची उमा सालस होती. म्हादाचा बा गेल्यानंतर आत्याबाईंनी म्हादाला मोठ्या कष्टानं वाढवलं होतं. आपल्या मनासारखी सोयरीक बघून पोराचं लगीन लावून द्यावं, असं त्यांना वाटत होतं; पण म्हादाच्या हट्टापुढं त्यांचं काही चाललं नाही.
उमा घरात आल्यापासून आत्याबाई चिडचिड करू लागल्या, धुसफूस करू लागल्या. गरिबाघरची गाय उमा त्यामुळं पार गांगरून गेली; पण म्हादाच्या समजावण्यानं तिचं मन परत थाऱ्यावर यायचं. घरातलं सगळं उरकून आज मोकळाईच्या रानात खुरपायला जायचं असल्यानं तिचं एकेक काम उरकणं सुरू होतं. म्हादाची आंघोळ झाली अन्‌ तो गोठ्यात जनावरांच्या धारा काढायला गेला. आत्याबाई उठून अंगणात गेल्या होत्या अन्‌ म्हादाला आजच्या कामांबद्दल काहीबाही सांगत होत्या. म्हादाच्या धारा काढून झाल्या. त्यानं एक चरवी उमाकडं देत, बाकीचं दूध किटलीत भरलं. अंगावर कापडं चढवली अन्‌ उमानं त्याच्या हातात चहा आणून दिला. दूध घालण्याची किटली घेऊन म्हादा बाहेर पडला.

उमानं चुलीवरचं तापलेलं पाणी उतरवलं अन्‌ आत्याबाईंसाठी न्हाणीघरात नेऊन ठेवलं. आत्याबाई अजून ओसरीवरच मिश्री घासत होत्या. उमाचं लगबगीनं एकेक काम उरकणं सुरूच होतं. भाताचं आधण चुलीवर उकळत होतं अन्‌ वैलावर वांग्याचं कालवण शिजत होतं. मनी बाजूलाच तिथं चुलीच्या कोपऱ्यात लवंडली होती. उमानं परातीत पीठ मळायला घेतलं. अंदाजानं पीठ परातीत टाकत तिनं पाणी ओतलं अन्‌ पीठ मळू लागली. एका हातानं चुलांगण सावरणं सुरूच होतं. मनी अधूनमधून किलकिले डोळे करून सगळं न्याहाळत होती. आत्याबाई न्हाणीघराकडं गेल्या होत्या. उमा आपल्याच नादात भाकरी थापत होती. आत्याबाई अजून न्हाणीघरातच होत्या. चुलीतल्या लाकडाची ठिणगी बाहेर उडाली. उमाच्या हातावर ठिणगी उडाल्यानं ती कळवळली. मनीच्या अंगावरही ठिणगी पडल्यानं ती फिसकारली अन्‌ कोपरा सोडून पळाली. उमाचा हात पुन्हा भाकरी थापण्यात दंग झाला. तव्यातली भाजलेली भाकरी ती चुलीतल्या निखाऱ्यावर शेकवून टोपल्यात टाकत होती. आत्याबाई आंघोळ उरकून देवघरात गेल्या अन्‌ म्हादू घरात आला. ""उमा, लय भूक लागलीया. बैलगाडी जुपून दादऱ्याकडं जायचया, वाढ बरं पयलं खायाला,'' म्हादू उमाला म्हणाला. त्यानं न्हाणीत जाऊन हात धुतले अन्‌ पायजम्यालाच हात पुसत चुलीच्या बाजूला येऊन बसला. उमानं ताटात वांग्याचं कालवण अन्‌ ताटलीत एक भाकरी मोडून म्हादासमोर ताट ठेवलं. तिनं परात एका बाजूला सरकवली अन्‌ म्हादासमोर येऊन बसली.

आत्याबाई देवपूजा उरकून घाईघाईनं न्हाणीघराकडं गेल्या अन्‌ शोधाशोध करू लागल्या...""उमे, मी इथं आंघोळ करताना माझं गाठलं (गळ्यातला दागिना) ठिवलं व्हतं; पर आता हितं दिसत न्हाय गं...'' असं म्हणत त्यांची शोधाशोध सुरूच राहिली. तापल्या तव्यावर भाकरीला पाणी लावताना जसा चर्र आवाज येतो तसं उमाचं काळीज चरकलं. आत्याबाईंनी आरडाओरडा सुरू केला...""आरं म्हादा, म्या गाठलं ठिवलं व्हतं हितंच, कोण आलं न्हाय-गेलं न्हाय, मंग गेलं कुटं रं?''
तेवढ्यात माळवदावर मांजर चांगलीच फिसकारली अन्‌ उमाच्या काळजात चर्रर्र झालं. ""आज हे काय नवीन बालंट,'' म्हणून तिचा जीव घाबराघुबरा झाला.
""आगं, आसंल हितच कुटंतरी, नीट आठवून बघ, ईसारभोळ्यापनानं, डाव्या-उजव्या हातानं कुटंतरी ठिवलं आसंल, आठव नीटवानी'' म्हादा समजावणीच्या सुरात म्हणाला. आत्याबाई शांत होण्याचं नाव घेत नव्हत्या. तोंडाचा पट्टा सुरूच होता. माळवदावर मांजराचं ओरडणंही सुरूच होतं अन्‌ त्यात उमाला काहीतरी विपरीत होतंय याची जाणीव होत होती. म्हादानं कशीबशी एक भाकरी अन्‌ थोडा भात खाल्ला अन्‌ तो बैलगाडी जुंपायला बाहेर पडला. आत्याबाईंचं ऊर बडवणं सुरूच होतं. उमाच्या नावाचा नकळत उद्धार झाला होता. न्हाणीघर, माजघर, देवघर सगळीकडं उचकापाचक सुरू होती.

यमुनाबाईंनी हाक दिली अन्‌ उमा बाहेर आली. मोकळाईच्या रानात खुरपायला जायचं; पण घरातल्या या प्रकारानं उमाच्या घशाखाली एक घास उतरला नाही. तिनं खुरपं घेतलं अन्‌ आत्याबाईंना "जाते' म्हणताच त्यांच्या जळजळीत नजरेनं ती गळाठून गेली.
""का गं ? एवढी का घाबारल्यावानी दिसतीयास?'' यमुनाबाईंनी विचारताच "काय नाय' म्हणत उमानं वेळ मारून नेली. वाटेतही ती गप्पगप्पच होती. मोकळाईच्या रानात पोचताच बायकांनी आपापली पात पकडून खुरपणी सुरू केली. उमानं निमूट एका बाजूची पात धरली अन्‌ ती खुरपं चालवू लागली. ""ऐ उमा, अगं माझ्या पातीत कुटं गवात टाकतीयास? एक्‍या बाजूला ठिव की...'' मीनानं असं म्हणताच ती भानावर आली. जिवाभावाच्या यमुनानं उमाचं विचित्र वागणं नजरेनंच ओळखलं होतं. कसंबसं दुपारपर्यंत काम उरकलं अन्‌ बायका झाडाच्या सावलीला गेल्या. प्रत्येकीनं भाकरीचं गाठोडं सोडलं. ""आज माही भाकर इसारली,'' असं म्हणत उमा एका बाजूला बसली. यमुनानं तिला आपल्या शेजारी बसवलं. तिला भाकरी अन्‌ चटणी दिली. उमाचं सारं अवसान सुटलं. तिच्या डोळ्यांतून धारा वाहू लागल्या. यमुनानं तिला मोकळं होऊ दिलं अन्‌ बाजूला घेत, नेमकं काय झालंय, ते विचारलं. उमानं "आत्याबाईंच्या गाठल्या'चा विषय सांगितला, यमुनाही यामुळं गोंधळात पडली. ""घावंल गं, घरातनं कुटं जातंय?'' म्हणून तिला बळबळं अर्धी भाकरी खाऊ घातली.
उमानं दिवसभर कसंबसं काम केलं; पण तिचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. तिची पात ती पुढं नेत होती; पण तिचं सगळं ध्यान "आत्याबाईंचं गाठलं कुठं गेलं असंल?' याच विचारावर केंद्रित झालं होतं.
"वाचव गं आई मला या बालंटातून' असं साकडं उमानं मोकळाईला मनातल्या मनात घातलं.
संध्याकाळी उमानं घरात पाऊल ठेवलं अन्‌ आत्याबाईंकडं पाहून तिला सगळं घर आपल्याकडं संशयानं बघताय असं वाटायला लागलं. रोज पायात येणारी मनीमाऊ आज न येता अजूनही माळवदावरच फिसकारत बसली होती. उमानं सहजच माळवदावर डोकावून पाहिलं अन्‌ तिचे डोळे चमकले.

उमानं मनीला जवळ घेतलं अन्‌ तिच्या डोक्‍यात, पायात अडकलेलं गाठलं काढून तिला मोकळं केलं. सकाळी चुलीतून अंगावर ठिणगी उडाल्यावर मनीन मोरीवर उडी मारताना तिच्या गळ्यात गाठलं घसरून पडलं होतं अन्‌ ते तिच्या पायात, डोक्‍यात अडकून त्याचा फास पडला होता. त्यामुळंच ती सकाळपासून फिसकारत, ओरडत होती. गाठलं मोकळं करत उमानं ते आत्याबाईंपुढं ठेवलं अन्‌ ती मुसमुसून रडू लागली. मांजरीच्या गळ्यात गाठलं कसं अडकलं होतं आणि ती माळवदावर जाऊन कशी बसली होती, हे तिनं सगळं आत्याबाईंना सांगितलं. आत्याबाई एकदा गाठल्याकडं अन्‌ एकदा उमाकडं बघत राहिल्या. "आज मोठ्या बालंटातून वाचवलंस गं मने' म्हणत उमा मनीला कुरवाळत राहिली अन्‌ झरणारे डोळे पुसत राहिली...

Web Title: ashok sabale write article in saptarang