भाईयों और बहनों देश आगे बढ रहा है या नही?

अशोक सुरवसे
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

पंतप्रधानांच्‍या उपस्थितीत नोटाबंदीवर चर्चा झाली पाहिजे, या मागणीनं विरोधकांनी संसद डोक्‍यावर घेतलीय. त्‍यांचा आवाज ऐकून घेण्‍याऐवजी त्‍यांनाच काळ्या पैशाचे संरक्षक असल्‍याचं भासवलं जाऊ लागलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देश बदल रहा है, असं सांगत सुटलेत. त्‍यांच्‍या भक्‍तांप्रमाणं मलाही तसंच वाटतंय.

प्रत्‍येक गोष्‍टीत देशभक्‍ती, देशसेवा, देश, भ्रष्‍टाचार अशा गोष्‍टी खुपसण्‍याची लागत असलेली सवय, यामुळंच देश बदलतोय, यावर माझाही विश्‍वास बसू लागलाय. आता विरोधकांनी आज पुकारलेल्‍या आक्रोश दिनाचंच बघा ना... विरोधक आक्रोश दिन आहे, असा आक्रोश करत असले, तरी हा बंद आहे आणि काळ्या पैशाचं समर्थन करण्‍याचा केविलवाणा प्रयत्‍न आहे, असा प्रचार सोशल मिडियावरुन सोईस्‍करपणे सुरुय. विरोधी आवाज ऐकून घ्‍यायचाच नाही, अशी घातक मानसिकता रुजू लागलीय. त्‍यामुळंच देश बदल रहा है, यावर माझाही विश्‍वास बसायला लागलाय.

काल परवापर्यंत नोटाबंदीच्‍या निर्णयावर मोदी आणि भाजपचीच बाजू मांडणारी माध्‍यमं नागरी भागात मिळत असलेला पाठिंबा दाखवत होती. त्‍या पाठिंब्‍यावरुन देशभराचा पाठिंबा असल्‍याचं चित्र रंगवत होती. मोदींनीही त्‍याच मार्गाचा अवलंब करत लोकांची मतं जाणून घेतली. त्‍याला पाच लाखांनी प्रतिसाद दिला. त्‍यातल्‍या 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त लोकांनी नोटाबंदीला पाठिंबा दिला. अर्थात, कुठलंही सर्वेक्षण करताना एकूण एक लोकांची मतं जाणून घेतली जातात, असं कधीच आणि कुठंही होत नाही. शीतावरुनच भाताची परीक्षा घेतली जाते आणि घ्‍यायचीही असते. पण त्‍यासाठी तुम्‍हाला सर्व समाजघटकांचं प्रतिनिधीत्‍व सामावून घ्‍यायला हवं असतं. म्‍हणूनच मलाही देश बदलतोय, असं वाटतंय.

असं झालं असेल, असं अजिबात वाटत नाही. याचं महत्वाचं कारण म्‍हणजे, काल-परवापर्यंत नागरी भागात अडकून पडलेली माध्‍यमं आता बाजारपेठा, मार्केट यार्ड, शेतक-यांच्‍या बांधावर पोचायला लागलीत. आणि तेव्‍हापासून माध्‍यमांनाही या निर्णयाच्‍या झळा किती तीव्र आहेत, हे दिसायला लागलंय. बाजारपेठा थंडावल्‍यात, मार्केट यार्डातली लगबगही मंदावलीय, शेतक-यांचा माल एक तर शेतात किंवा बांधावरच पडून राहिलाय. त्‍यामुळं ही नोटाबंदी नेमकी मूठभर काळा पैसा जमवणा-यांच्‍या नाड्या आवळण्‍यासाठी आहे की हातावरचं पोट असलेल्‍यांच्‍या पोटबंदीसाठी आहे, हेच कळेनासं झालंय. याला भरीस भर म्‍हणून काही मोठ्या उद्योगांनी एकेका रात्रीत शेकड्यांनी रोजगाराचे हात खुडण्‍याचं काम सुरु केल्‍याचं ऐकायला मिळू लागलंय. त्‍यामुळंही देश बदलू लागलाय, असं वाटू लागलंय.

काळा पैसा रोखण्‍यासाठी आणि दहशतवाद्यांची आर्थिक कोंडी करण्‍यासाठी नोटाबंदीचा निर्णय घ्‍यावा लागल्‍याचं मोदींनी सांगितलं. त्‍यामुळं ही घोषणा झाल्‍या झाल्‍या सर्वच स्‍तरातून स्‍वागत झालं. हा निर्णय हिवाळी अधिवेशनाच्‍या तोंडावर जाहीर करुनही त्‍याची सविस्‍तर माहिती संसदेत दिली गेली नाही. उलट संसदेबाहेर जिथे जिथे संधी मिळेल, तिथं तिथं कधी कणखरपणे तर कधी भावनिक होत मोदींनी हा निर्णय कसा अत्यावश्‍यक होता, हे पटवून देण्‍याचं काम केलं. यावरुन मलाही वाटू लागलंय, देश बदलतोय.

संसदेत लोकांना होत असलेला त्रास मांडण्‍यासाठी विरोधकांनी चर्चेची मागणी केली. नाही हो म्‍हणत ती मान्‍य झाली. माजी पंतप्रधान मनमोहनसिंगांनी मोजक्‍या पण कठोर शब्‍दात या निर्णयाची चिरफाड केली. ती गंभीरपणे घेण्‍याऐवजी मनमोहनसिंगांना आताच कंठ का फुटला, अशी विचारणा करत त्‍यांची खिल्‍ली उडवण्‍याचा प्रयत्‍न सुरु झाला. त्‍यांनी केलेली चिरफाड खूपच मुद्देसूद होती. काळा पैसा रोखायला कोणाचाच विरोध नाही. दहशतवाद्यांची आर्थिक कोंडी करण्‍यालाही कोणाचा विरोध नाही. पण सारं करताना खूपच घाई केली गेली आणि या घाईच्‍या निर्णयाच्‍या जोरावर आपण देशाच्‍या अधोगतीचं स्‍मारक उभं करतोय, असं सडेतोड मत मनमोहनसिंगांनी मांडलं. साहजिकच, या निर्णयामुळं देशाची आर्थिक पिछाडी होणार आहे, प्रगतीला खीळ बसणार आहे, हेही त्‍यांनी आवर्जून सांगितलं. हे सारं समजून घेण्‍याचा प्रयत्‍न करण्‍याऐवजी त्‍यांना आताच कसा कंठ फुटू लागला, असं विचारलं जाऊ लागलंय. म्‍हणूनही देश बदलतोय असं वाटायला लागलंय.

पंतप्रधानांच्‍या उपस्थितीत नोटाबंदीवर चर्चा झाली पाहिजे, या मागणीनं विरोधकांनी संसद डोक्‍यावर घेतलीय. त्‍यांचा आवाज ऐकून घेण्‍याऐवजी त्‍यांनाच काळ्या पैशाचे संरक्षक असल्‍याचं भासवलं जाऊ लागलंय. त्‍यांचा विरोध सर्वसामान्‍यांच्‍या अडचणी मांडण्‍यासाठी नाही, तर काळा पैसा जिरवण्‍यासाठी त्‍यांना वेळ दिलेला नाही, यासाठीच आहे, हे पंतप्रधानांपासून ते सर्वच भाजप नेते सांगत सुटलेत. त्‍यात काही प्रमाणात तथ्‍य असेलही, पण याचा अर्थ सर्वसामान्‍यांच्‍या भावना मांडण्‍याची संधीच विरोधकांना मिळू नये, असं नाही.

म्‍हणूनच वात्रटीकाकार रामदास फुटाणेंच्‍या नावानं सोशल मिडियावर एक पोस्‍ट सध्‍या खूपच व्‍हायरल होतेय. त्‍या पोस्‍टमध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जसं आपल्‍या सर्वांकडून वदवून घेतात, तसंच मीही देश बदल रहा है और बढ भी रहा है असं म्‍हणतो.

रामदास फुटाणे यांच्‍या नावे व्‍हायरल होत असलेली ही पोस्‍ट-
भाईयों और बहनों
आपही बताईये
कल 26 तारीख थी
थी या नही ?"
"थी ".
आज 27 तारीख है.
है या नही ?
"हा "
भाईयों और बहनों
जब कल 26 थी
आज 27 है
आनेवाले कल 28 होगी
या नही ?
"होगी "
तो बताओ भाईयों और बहनों
देश आगे बढ रहा है या नही ?

Web Title: Ashok Surwase write about demonetization issue