डिझाईनच्या मदतीनं सवयी बदलता येतात? (डिझाईन पर्पज)

Ashvini deshpande
Ashvini deshpande

माणसाचं मन बदलणं, मत बदलणं, सवय बदलणं ही एक अतिशय अवघड आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असते. प्रत्येक वेळी ती चित्र, शब्द किंवा आवाजानं साध्य होतेच असं नाही. मात्र, आपल्याला अमूक अमूक सवय बदलायची आहे, हे एकदा नक्की झालं की निरीक्षण, व्यवहारज्ञान आणि जिज्ञासू वृत्ती यांचा मेळ घालून ती बदलण्यासाठीचा उपाय सापडतोच. मानसशास्त्र आणि डिझाइन यांनी एकत्र येऊन अशा चिवट सवयी बदलण्यासाठी उपाय शोधायला हवा.

हजार शब्दांची बरोबरी करणाऱ्या चित्राविषयी गेल्या वेळच्या लेखात आपण चर्चा केली. अर्थात एक चित्र काय किंवा हजार शब्द काय, दोन्हींचा उद्देश एकच. जे सांगायचं असतं ते प्रेक्षकांपर्यंत पोचवणं आणि त्याचा अपेक्षित परिणाम साधणं.
मात्र कधी कधी संदेश जरी प्रसारित झाला तरी परिणाम साधला जात नाही. शिवाय, तोच तोच संदेश वारंवार प्रसारित केला, तर प्रेक्षकांना तो जाणवेनासा, दिसेनासा होतो. माणसाचं मन बदलणं, मत बदलणं किंवा वागणुकीत बदल घडवून आणणं ही एक अतिशय अवघड आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असते. प्रत्येक वेळी ती चित्र, शब्द किंवा आवाजानं साध्य होतेच असं नाही.
विशेषतः एखादी सवय बदलायची असेल तर ते जवळजवळ अशक्‍यच होऊन बसतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण शेकडो छोटे-मोठे निर्णय घेत असतो. चहात बिस्किट बुडवायचं की तसंच खायचं, वर्तमानपत्रातली कोणती बातमी आधी वाचायची, इथपासून ते मीटिंगमध्ये कोणते मुद्दे मांडायचे इथपर्यंत. गंमत अशी आहे, की यातले निम्मे निर्णय हे केवळ सवयीचा भाग असतात. स्वयंचलित खेळण्यासारखे आपण विचार न करता टूथपेस्ट ब्रशवर लावू शकतो आणि ५० टक्के गोष्टी सवयीनुसार करणं ठीकच आहे, नाहीतर आपल्याला प्रत्येक गोष्ट विचार करून, मोजून-पडताळून ठरवायची वेळ आली तर दिवस पुरा पडणार नाही.
नुकत्याच पार पडलेल्या ११ व्या ‘पुणे डिझाइन फेस्टिव्हल’मध्ये बिजू डोमिनिक यांनी Design for Behavior Change म्हणजेच सवयी, वागणूक बदलण्यासाठी डिझाइन कशा प्रकारे मदतशील ठरू शकतं, याची चर्चा केली. या लेखात तोच विषय घेऊन काही तत्त्वं आणि उदाहरणं मी मांडत आहे.
आपल्याला सवयी कशा लागतात हे पाहायला गेलं तर लक्षात येईल, की सुरवात एखाद्या गरजेपासून होते. आपण विचार करून, माहिती गोळा करून, थोडेफार हातपाय हलवून ती गरज भागवण्याचा प्रयत्न करतो. जर हे सगळं व्यवस्थित घडलं आणि परिणाम चांगला वाटला, तर पुढच्या वेळी जेव्हा तीच गरज पुन्हा उभी राहते, तेव्हा आपण ती अगदी तशीच भागवतो. हे वारंवार घडल्यावर ती ‘सवय’ बनते.
चार्लस डुईग आपल्या Power of Habit या पुस्तकात म्हणतात ः ‘सवय बदलायची असेल, तर नवीन सवयीचा परिणाम कित्येक पटींनी जास्त चांगला असला पाहिजे.’ हा जास्त फायदेशीर परिणाम कसा साधता येईल? नेमकं याच जागी ‘डिझाइन’ काय काम करू शकेल; विशेषतः सार्वजनिक सवयीसाठी...हेल्मेट न घालता भरधाव दुचाकी चालवणं, धोक्‍याच्या सूचनांकडं दुर्लक्ष करून रेल्वे लाईन ओलांडणं, विभागणी न करता कचरा टाकणं, वाट्टेल तिथं थुंकणं, रांग मोडणं, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी करणं, सिग्नल तोडणं आणि अशा कित्येक जटिल समस्या सोडवायच्या असतील तर डिझाइनची मदत घेऊन सवयी बदलता येतील का? 
या ठिकाणी ‘डिझाइन’चा अर्थ केवळ माहिती-चित्र लावण्यापुरता घेतला, तर परिणाम अशक्‍य आहे, हे आपण पाहू शकतो. 
प्रत्येक रेल्वे क्रॉसिंगला धोक्‍याची सूचना लावलेली असते आणि तरीही तिथं दरवर्षी असंख्य लोकांचा मृत्यू किंवा अपघात होतो. डिझाइनच्या तत्त्वांचा आधार घेऊन जेव्हा या समस्येचं, सवयीचं बारकाईनं निरीक्षण केलं, तेव्हा एक मुद्दा ठळकपणे पुढं आला व तो म्हणजे रेल्वेसारख्या अवाढव्य गोष्टींच्या वेगाचा आपण अचूक अंदाज करूच शकत नाही. वाटतं त्यापेक्षा ती खूपच लवकर जवळ येते. तर हा वेग क्षणार्धात समजावा, यासाठी काय करता येऊ शकेल? बराच अभ्यास करून ‘फायनलमाईल’च्या टीमनं क्रॉसिंगच्या आसपासच्या रेल्वे लाईनवर काही विशिष्ट अंतरावर पिवळे ठळक पट्टे लावले. जसजशी रेल्वेगाडी ते पट्टे ओलांडते, तसतसा तिचा वेग हा किती पट्टे किती झटकन ओलांडले आहेत, यावरून समजायला मदत होते. उपाय अगदी सोपा; पण अपेक्षित परिणाम खूपच मोठा आणि कदाचित शेवटच्या क्षणी धडपडत क्रॉसिंग ओलांडण्याची सवय बदलणारा...

काही वर्षांपूर्वी आमची टीम एका आघाडीच्या स्कूटर-मोटारसायकल ब्रॅंडसाठी शोरूम डिझाइन करत होती. ही कंपनी एवढी प्रसिद्ध होती, की त्या काळात बुकिंग केल्यावर काही वर्षांनी गाडी मिळायची. याचा परिणाम असा झाला होता, की शोरूममध्ये भेट देणाऱ्या व्यक्तीला विशेष महत्त्व दिलं जायचं नाही. ‘कसाही पाहुणचार केला (किंवा न केला) तरी ग्राहक जाणार कुठं?’ अशा प्रवृत्तीनं कारभार चालायचा. शोरूमची आखणी, फर्निचर, लायटिंग हे सगळं ग्राहक आणि वाहन यांच्यामध्ये ‘उत्कृष्ट संवाद’ व्हावा असंच योजलं जात होतं; पण याबरोबरच विक्रेते आणि ग्राहक यांचाही सुसंवाद होणं आवश्‍यक होतं. कंपनीची प्रतिमा सकारात्मक होण्यासाठी शोरूमच्या स्टाफचं सहकार्य महत्त्वाचं होतं, तेही केवळ एका ठिकाणी नव्हे, तर देशभरातल्या तब्बल ५०० हून अधिक शोरूममध्ये. आमच्या टीमच्या सूक्ष्म निरीक्षणांचा इथं अतिशय उपयोग झाला. या टीमला निरीक्षणाअंती असं जाणवलं, की शोरूममध्ये कुणीही आत शिरलं, तरी रिसेप्शनिस्ट व्यक्ती जागची हालायची नाही. ही सवय कशी बदलायची? आत येणाऱ्या पाहुण्याला ‘त्याचं स्वागत आहे’ अशी जाणीव कशी करून द्यायची? आमच्या टीमच्या हातात एकच अस्त्र होतं व ते म्हणजे डिझाइन. टीमनं ठरवलं की रिसेप्शनचं टेबल थोडंसं उंच ठेवायचं; जेणेकरून आत येणाऱ्याला ते लगेच दिसेल; पण मागं बसणाऱ्याला उभं राहिल्याशिवाय समोरच्याशी बोलता येणार नाही. सुरवातीला थोडी कुरकुर करत का होईना; पण हे रिसेप्शनिस्ट ग्राहकांशी उभं राहून बोलायला लागले. हळूहळू अशी सवय अंगी बाणली गेली, की कुणीही शोरूममध्ये प्रवेश केला, तरी उभं राहून विचारपूस करायची. या छोट्याशा कृतीमुळं ‘आपली दखल घेतली गेली’ असं पाहुण्याला वाटायला लागलं आणि आपोआपच त्याची मनःस्थिती चांगली व्हायला लागली. खरेदी होवो अथवा न होवो; पण हा पाहुणा त्या कंपनीबद्दल सकारात्मक विचार करत बाहेर पडू लागला.

अशाच प्रकारची दुसरी एक समस्या आघाडीची ‘बॅंक ब्रॅंच’ डिझाइन करताना पुढं आली होती. आमच्या टीमच्या लक्षात आलं, की अधिकारी आणि ग्राहक यांच्यात केवळ व्यवहार होतात. नुसती देवाण-घेवाण. त्यातही अधिकारी त्यांच्या उंच पाठीच्या खुर्चीवर बसून वर्चस्व ठेवतात आणि ग्राहक थोडेसे दबून जाऊन व्यवहार पूर्ण करतात. खरंतर हे अधिकारी ‘सल्लागार’ असणं अपेक्षित असतं. मग हे लांबलचक टेबल, उंच पाठीची खुर्ची आणि समोर दोन छोट्याशा ‘अंग चोरून’ ठेवलेल्या खुर्च्या कशाला? ही ‘आम्ही-तुम्ही’ सवय जाऊन ‘आपण’ नाही का करता येणार डिझाइनची मदत घेऊन? उत्तम उपाय म्हणजे, वर्तुळाकार टेबलाभोवती ठेवलेल्या एकसारख्या आकाराच्या खुर्च्या. यात ना कोणता भेदभाव, ना कोणताही दबाव. अशा परिस्थितीत व्यवहार सोपे आणि सुरळीत होण्याची शक्‍यता नक्कीच वाढणार. तेव्हा हेच सुचवलं डिझाइन टीमनं.

आपल्या देशात पान खाऊन (किंवा न खाताही!) थुंकण्याची एक ‘अनिवार्य’ सवय लाखो लोकांना आहे. काळ-वेळ-स्थळ याचं भान न ठेवता ही थुंकणारी टोळी आपलं काम कुठंही करू शकते! ‘येथे थुंकू नये’ ही पाटी लावलेली असली, तरी त्या पाटीवरच पिंक टाकलेली दिसते. यावर कुणीतरी अप्रतिम उपाय शोधला आहे. समाजाचा धार्मिक कल लक्षात घेऊनच याची सुरवात झाली असावी. जिथं लोकांनी थुंकू नये असं वाटतं, तिथं देवादिकांच्या टाईल लावून टाकल्या जातात; त्यामुळं ती जागा तरी थुंकीपासून वाचते. मात्र, थुंकण्याची एकंदरच सवयच बंद झाली आहे का? तर ती अजूनही बाकी आहेच. तेव्हा हा तात्पुरता उपाय झाला. जिथं चालला, तिथं चालला.  अशा कित्येक चिवट सवयी आहेत, ज्या बदलायला मानसशास्त्र आणि डिझाइन यांनी एकत्र येऊन उपाय शोधायला हवा.
नेमकी कोणती सवय बदलायची आहे, हे एकदा नक्की झालं, की निरीक्षण, व्यवहारज्ञान आणि जिज्ञासू वृत्ती यांचा मेळ घालून उपाय सापडतोच. ...तर समाजातल्या अशा कोणत्या सवयी बदलायला तुम्हाला आवडेल? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com