बायोमिमिक्रीची कमाल (आश्विनी देशपांडे)

आश्विनी देशपांडे ashwini@elephantdesign.com
रविवार, 18 मार्च 2018

निसर्गातले अंतर्गत घटक, त्यांची रचना, त्यांच्या बांधणीतला बळकटपणा
आणि लवचिकता, हवामानानुसार बदलण्याची क्षमता या सगळ्याचा अभ्यास करून त्या तत्त्वांचा  शक्‍यतो हुबेहूब वापर करण्याचं शास्त्र म्हणजेच बायोमिमिक्री. निसर्गातली भूमिती, त्रिमिती, प्रमाणबद्धता यांच्यापासून प्रेरणा घेऊन केलेल्या रचनांची अनेक उदाहरणं बघायला मिळतात.

निसर्गातले अंतर्गत घटक, त्यांची रचना, त्यांच्या बांधणीतला बळकटपणा
आणि लवचिकता, हवामानानुसार बदलण्याची क्षमता या सगळ्याचा अभ्यास करून त्या तत्त्वांचा  शक्‍यतो हुबेहूब वापर करण्याचं शास्त्र म्हणजेच बायोमिमिक्री. निसर्गातली भूमिती, त्रिमिती, प्रमाणबद्धता यांच्यापासून प्रेरणा घेऊन केलेल्या रचनांची अनेक उदाहरणं बघायला मिळतात.

"जगात सर्वोत्कृष्ट डिझायनर कोण?' या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. निसर्ग!
प्रतिकूल हवामान असो अथवा निर्दयी मनुष्यप्राणी, कोणत्याही आव्हानाला सामोरं जाऊन तावून-सुलाखून लाखो वर्षांपासून सातत्यानं टिकून राहणं, क्रियाशील असणं हे निसर्गालाच जमू शकतं. पाना-फुलांची नक्षी असलेले कपडे, साड्या, चादरी, पडदे वर्षानुवर्षं प्रचंड लोकप्रिय आहेत, तसंच वाघासारखे पट्टे किंवा चित्त्यासारखे बुट्टेही फॅशनेबल समजले जातात. अगदी प्राथमिक स्तरावर चित्रकलेची ओळख होत असताना सुरवातीची चित्रं डोंगर, दऱ्या, नदी, झाडं यांचीच काढली जातात. रंग भरायला शिकताना पाना-फुलांची रेखाचित्रं वापरली जातात, मेंदीतली मुख्य नक्षी कोयरीची असते, निसर्गातले वेधक, मोहक रंग, पोत आणि मांडणी या बाबी आपल्याला सहजपणे आनंद देऊन जातात. या सर्वमान्य गोष्टीकडं डिझायनर्सचं लक्ष गेलं नाही तरच नवल. केवळ बाह्यस्वरूपीच नव्हे तर निसर्गातले अंतर्गत घटक, त्यांची रचना, त्यांच्या बांधणीतला बळकटपणा आणि लवचिकता, हवामानानुसार बदलण्याची क्षमता या सगळ्याचा अभ्यास करून त्या तत्त्वांचा शक्‍यतो हुबेहूब वापर करण्याचं शास्त्र म्हणजेच बायोमिमिक्री. निसर्गातली भूमिती, त्रिमिती, प्रमाणबद्धता यांच्यापासून प्रेरणा घेऊन केलेल्या रचनांची अनेक उदाहरणं बघायला मिळतात.
***

ईजी नाकात्सु हे जपानमधल्या सगळ्यात वेगवान म्हणजेच बुलेट ट्रेनच्या डिझाईन टीमचे मुख्य होते. बुलेट ट्रेन जास्तीत जास्त वेगवान करण्यासाठी एक मोठा अडथळा म्हणजे बोगद्याच्या आत-बाहेर करताना होणार प्रचंड कानठळ्या बसवणारा आवाज. ट्रेनच्या वेगामुळं जी हवा मोठ्या प्रमाणात विस्थापित होते, त्यामुळं "सोनिक बूम' म्हणजेच प्रचंड घुमणाऱ्या ध्वनिलहरी तयार होतात. या आवाजामुळं बुलेट
ट्रेनना मनुष्यवस्तीतून नेणं अशक्‍य होऊन बसलं होतं. नाकात्सु एक वेगळाच छंद बाळगून होते. त्यांना पक्षिनिरीक्षणात रस होता. याच विषयावरच्या एका चर्चेत त्यांच्या लक्षात आलं, की हवेतून प्रचंड वेगानं पाण्यात सुळकांडी मारताना किंगफिशर पक्ष्याची चोच जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा पाण्याचा एखादा शिंतोडाही उडत नाही. मग त्यांनी त्या चोचीच्या आकाराचा अभ्यास करायला सुरवात केली. वरचा आणि खालचा भाग दोन्ही बाजूंनी निमुळता असून एका बाजूनं पाहिलं तर चोच जवळपास चौकोनी आकाराची दिसते. यातच संशोधन करून नाकात्सू यांच्या टीमला बुलेट ट्रेनच्या पुढील आवृत्तीचा आकार सापडला.
***

वेगाचा हट्ट आणि शोध केवळ ट्रेनसाठीच नसतो. स्विमिंग कॉस्च्युमसाठी जगप्रसिद्ध अशा स्पीडो कंपनीची डिझाईन टीम जगज्जेत्या पोहणाऱ्यांसाठी पाण्याचा अडथळा कमीत कमी जाणवेल आणि परिणामी जास्त वेगानं पोहता येईल अशा "मटेरिअल'च्या शोधात नेहमीच असते. त्यांना बायोमिमिक्रीची प्रेरणा शार्क माशाच्या खवल्यांत सापडली. वेगात पुढं जाताना पाण्याखालच्या दबावामुळं शरीर मागं ओढलं जातं; पण खवल्यांच्या आकारामुळं आसपासचा दबाव कमी होऊन मागं ओढण्याची प्रक्रिया नाहीशी होते. या तत्त्वावर आधारित असलेल्या खवाल्यांच्या जाळ्यासारख्या दिसणाऱ्या "मटेरिअल'चे "एलझेडआर बॉडीसूट' सन 2008 मध्ये बीजिंग इथं होणाऱ्या
ऑलिम्पिकसाठी डिझाईन करण्यात आले. सन 2008 ऑलिम्पिक्‍समध्ये पोहण्याच्या स्पर्धांत जी काही पदकं जिंकली गेली, त्यातली 98 टक्के पदकं हा खास बॉडीसूट घालणाऱ्यांनी पटकावली. प्रेरणा जरी निसर्गापासून घेतलेली असली तरी, यात प्रत्येक पोहणाऱ्याची नैसर्गिक कसोटी पणाला लागली, असं ऑलिम्पिक समितीला वाटलं नाही. त्यामुळं 2010 पासून हे खवल्याच्या पोताचे सूट बाद करण्यात आले.
***

जसजसा सूर्य आकाशात दिशा बदलतो, तसतशी सूर्यफुलाची दिशाही बदलत जाते आणि सूर्यास्तानंतर ती फुलं चक्क मिटून जातात, हे आपल्याला माहीतच आहे. याच तत्त्वावर एक अगदी वेगळ्या प्रकारच्या सौर प्रकाशसाधनाचा प्रयोग जोनाथन ओटा या डिझायनरनं यशस्वी करून दाखवला आहे. पाकळ्यांसारखी रचना असलेली चकचकीत पॅनेल कोणत्याही प्रकारची ऊर्जा न वापरता केवळ कमी-जास्त दबावाद्वारे सूर्याच्या दिशेनुसार फिरतात आणि उघड-मीट करतात. अशा तऱ्हेनं दिवसभर
सौरऊर्जा गोळा होत राहते आणि त्या रचनेत मध्यभागी असलेला दिवा सूर्यास्तानंतर त्या सौरऊर्जेमुळं उजळून जातो.

बायोमिमिक्रीचा हा विषय सुरू असताना मधाच्या पोळ्याला विसरून चालणार नाही. अतिशय पद्धतशीर रचना असलेलं हे मधमाश्‍यांचं घर असंख्य षट्‌कोनी आकारांनी तयार होतं. प्रचंड वजन सामावून घेण्याची क्षमता असलेलं, मजबूत, टणक तरीही हवेशीर, अर्धपारदर्शक... मधाच्या पोळ्यात स्थापत्यशास्त्रातले अनेक चमत्कार आढळतात. बाराही महिने थंडी असणाऱ्या स्लोव्हेनिया या देशातल्या आयझोला या शहरात "ओहफीस आर्हिटेक्‍टी'च्या तरुण आर्किटेक्‍टसनी सन 2012 मध्ये "बीहाईव्‌ (पोळे) अपार्टमेंट्‌स' उभी केली. कॉंक्रिट आणि कॅनव्हास वापरून डिझाईन केलेली ही छोटी मॉड्युलर घरं विजेचा कमीत कमी वापर करूनही उबदार राहू शकतात. शिवाय ती दिसतातही सुंदर.

निसर्गातली प्रत्येक गोष्ट डिझायनर्सना प्रेरणा देऊ शकते. बायोमिमिक्रीचा आधार घेतला तर भविष्यात कोणत्याही समस्या सोडवायला अडचण येऊ नये असं वाटतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ashwini deshpande write article in saptarang