भावपूर्ण डिझाईन (आश्विनी देशपांडे)

आश्विनी देशपांडे ashwini@elephantdesign.com
रविवार, 10 जून 2018

एखाद्या वस्तूचं डिझाइन पाहिल्यावर "सुंदर' अशी उत्स्फूर्त दाद येते ती केवळ भावनेतून. त्या वेळी ही वस्तू उपयोगाची आहे का, तिची किंमत काय असेल, ती टिकाऊ असेल का असे तर्कशुद्ध प्रश्न नंतर जरी पडले तरी हृदयाची पहिली पसंती कायम राहते. वस्तूंची अशी भावपूर्ण डिझाईन योजण्याची कल्पना योग्य असली तरी ती अद्याप विशेष अमलात आलेली नाही. मात्र, भावना व्यक्त करायला लावू शकतील अशा वस्तू आपल्या अवतीभवती भविष्यात वाढत जाणार एवढं मात्र निश्‍चित.

एखाद्या वस्तूचं डिझाइन पाहिल्यावर "सुंदर' अशी उत्स्फूर्त दाद येते ती केवळ भावनेतून. त्या वेळी ही वस्तू उपयोगाची आहे का, तिची किंमत काय असेल, ती टिकाऊ असेल का असे तर्कशुद्ध प्रश्न नंतर जरी पडले तरी हृदयाची पहिली पसंती कायम राहते. वस्तूंची अशी भावपूर्ण डिझाईन योजण्याची कल्पना योग्य असली तरी ती अद्याप विशेष अमलात आलेली नाही. मात्र, भावना व्यक्त करायला लावू शकतील अशा वस्तू आपल्या अवतीभवती भविष्यात वाढत जाणार एवढं मात्र निश्‍चित.

कॉम्प्युटरच्या सुरवातीच्या काळात, म्हणजेच 1980 च्या दशकात रंगीत स्क्रीन नसायचे. तेव्हा बहुतेक सगळे मॉनिटर ब्लॅक अँड व्हाईटच होते. त्या काळात ज्या प्रकारचं काम कॉम्प्युटरवर केलं जायचं ते एकतर "टाईपरायटरची सुधारित आवृत्ती' म्हणून किंवा "अतिशय प्रगत कॅल्क्‍युलेटर' म्हणून. यात रंगीत स्क्रीन फारसा उपयुक्त समजण्याचं कारणच स्पष्ट झालं नव्हतं. एखादी ओळ अधोरेखित करण्यासाठी कुठं रंगीत हायलायटरचा वापर किंवा ताळेबंद दाखवताना लाल रंगात नोंदलेला तोटा... - रंगांचा उपयोग हा इतपतच होता! असं असूनही रंगीत मॉनिटरची मागणी झपाट्यानं वाढत गेली. तीच स्थिती टेलिव्हिजनची आणि त्यापूर्वी चित्रपटांची. रंगीत चित्रफितींचा काळ सुरू होण्यापूर्वी कृष्ण-धवल चित्रपट अतिशय लोकप्रिय होते. प्रभावी कथानक, संगीत, अभिनय यांच्या बळावर हे माध्यम विकसित होत होतं. मात्र, रंगीत चित्रपटांचं तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यावर ते मागंच पडलं. रंगीत संच मिळायला लागल्यावर ब्लॅक अँड व्हाईट टेलिव्हिजनची मागणी कमी होऊन शेवटी ते बाजारातून नाहीसेच झाले. जर साध्या अक्षरांत छापलेली कथा वाचकापर्यंत मसुदा पोचवू शकते तर ती रंगीत चलच्चित्रांतून, दृक्‌-श्राव्य माध्यमातून मांडण्याचा खटाटोप कशासाठी? या माध्यमांमध्ये रंगांची नेमकी भूमिका कशी आणि कोणती? या प्रश्नांचा मानसशास्त्रज्ञांनी जेव्हा पाठपुरावा केला तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली व ती म्हणजे रंगामुळं कथेचा भावनिक परिणाम जास्त तीव्रपणे होतो. कोणत्याही वस्तूचं स्वरूप, तिचा रंग, आकार, पोत आणि असलेच तर शब्द किंवा सूचना या अनुक्रमानं ठळक होत जातं. केवळ रंगाच्या लक्षणीयतेमुळं त्या वस्तूत आपण रस घ्यावा/ न घ्यावा हे ठरवलं जातं. रंगाबरोबरच काही आकार हवेहवेसे वाटतात, काही पोत हे पटकन हात लावून पाहावा असं वाटावं असे असतात. ही माहिती डिझायनर्सच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. नियोजनाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर कार्यशीलतेची व्यवस्था केल्यानंतर वस्तूचा आकार योजला जावा की आकाराबाबत निर्णय घेऊन नंतर त्यात उपयुक्ततेचा मेळ बसवावा, अशी चर्चा नेहमीच होते.

Function follows form or form follows function ही चर्चा म्हणजे आधी कोंबडी की आधी अंडं अशीच आहे. मात्र, योग्य उपयुक्तता आणि ठीकठाक रूप असलेल्या वस्तूंना ग्राहकांची पसंती मिळेलंच असं नाही, असं अनेक संस्कृतींच्या आणि आवडी-निवडींच्या अभ्यासानंतर सिद्ध झालेलं आहे. जी प्रॉडक्‍ट्‌स यशस्वी होतात, वर्षानुवर्षं लोकप्रिय राहतात, त्यांच्यात भावना जागृत होण्यासारखे काही खास रंग, आकार नक्कीच आढळतात. एखादी वस्तू पाहिल्यावर "सुंदर' अशी उत्स्फूर्त दाद येते ती केवळ भावनेतून. त्या वेळी ही वस्तू उपयोगाची आहे का, तिची किंमत काय असेल, ती टिकाऊ असेल का असे तर्कशुद्ध प्रश्न नंतर जरी पडले तरी हृदयाची पहिली पसंती कायम राहते. ज्येष्ठ डिझाईन-विचारवंत डोनाल्ड नॉर्मन यांनी या विषयावर पुस्तक लिहिलं आहे. त्यात ते म्हणतात ः "सगळ्या तर्कापलीकडं जाऊन डिझायनर्सनी सौंदर्याचाही विचार करायला हवा. कोणत्याही डिझाइनकडं पाहून स्वतःला दोन प्रश्न विचारा. एक प्रश्‍न मेंदूला आणि एक प्रश्‍न हृदयाला. "ते उपयुक्त आहे का' आणि "ते सुंदर आहे का?' या दोन्ही प्रश्नांची उत्तरं होकारार्थी असतील तरच त्या वस्तूची निर्मिती व्हावी.

सन 1950-60 च्या काळात मेरिलिन मन्रो ही अमेरिकी अभिनेत्री प्रचंड लोकप्रिय होती. तिचे सोनेरी केस, मधाळ डोळे आणि मोहक लाल ओठ यांची जगभर चर्चा होती, प्रसिद्धी होती. तिच्यावर फिदा होऊन सन 1970 मध्ये "स्टुडिओ 65' या इटालियन कंपनीनं चक्क तिच्या ओठांच्या आकाराचा "मेरिलिन' नावाचा सोफा डिझाईन केला. मेरिलिनबद्दल चाहत्यांच्या मनात ज्या भावना होत्या, थेट त्याच भावना हा सोफा पाहून ताज्या व्हाव्यात अशी कल्पना होती. त्या काळी नुकतंच उपलब्ध झालेलं पॉलिस्टायरिन आणि ताणलं जाऊनही आकार न सोडणारं पॉलिएस्टर यामुळं हा सोफा बनवणं शक्‍य झालं होतं. ती कल्पना इतकी यशस्वी झाली की पुढं हा सोफा मोठ्या प्रमाणात अमेरिकेतही आयात केला गेला. सुमारे 50 वर्षांनंतर ते डिझाईन वेगवेगळ्या रूपात आजही पाहायला मिळतं.

सन 1998-99 मध्ये ऍपल कंपनीच्या जोनाथन आईव या जगप्रसिद्ध डिझायनरनं कॉम्प्युटरचा चेहरामोहराच बदलून टाकला. तोपर्यंत नीरस रंग आणि ठोकळेबाज आकार असलेले कॉम्प्युटर हे iMac G3 च्या प्रस्तुतीमुळं गोलाकार, पारदर्शक, रंगीबेरंगी आणि मुख्य म्हणजे हवेहवेसे झाले. केवळ उपयुक्त असण्याच्या कितीतरी पलीकडं जाऊन या कॉम्प्युटर्सनी तंत्रज्ञान वापरण्यातही मजा, आनंद आणि अपूर्वाई सामावलेली असू शकते हे दाखवून दिलं. याच विचारसरणीवर आधारित एक अगदी अलीकडच्या काळातलं छोटं; पण प्रभावी उदाहरण पाहू या. मिंट कंपनीच्या अल्बर्टो मंतीला, अँथनी बॅक्‍स्टर आणि स्कॉट हॅंडरसन या डिझायनर्सनी समतेच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी अगदी साध्या मीठ-मीरपूडदाणीचा आधार घेऊन हग (Hug) म्हणजेच आलिंगन देणारी काळी-पांढरी जोडी डिझाईन केली. माणसांसारखी दिसणारी ही मीठ-मीरपूडदाणी कार्यक्षम आणि सुबक तर आहेच; शिवाय दोन भिन्नवंशीय व्यक्तींचा मेळ घालून विशिष्ट भावना थेट पोचवण्याचं कामही ती छोटीशी वस्तू सहजपणे करून जाते. योजनाबद्ध वस्तू किंवा यंत्राच्या संपर्कात आल्यास भावपूर्ण अभिप्राय मिळू शकतोच; पण जेव्हा रोबोच भावना व्यक्त करणारा असेल तर त्याच्या संपर्कात येणारी व्यक्तीही काही अंशी भावना व्यक्त करणारच. गेल्या वर्षी एसूस कंपनीनं झेनोबो नावाचा भावना दर्शवू शकणारा रोबो सादर केला. झेनोबो अजून विशेष लोकप्रिय झाला नसला तरी त्याची भावना व्यक्त करण्याची पद्धत लक्षणीय आहे...आणि मनोरंजकही.

भावपूर्ण डिझाईन योजण्याची कल्पना योग्य वाटली तरी ती अद्याप विशेष अमलात आलेली नाही. मात्र, भावना व्यक्त करायला लावू शकतील अशा वस्तू आपल्या अवतीभवती भविष्यात वाढत जाणार एवढं मात्र निश्‍चित.

(छायाचित्रं : निर्मात्याच्या मालकीची)

Web Title: ashwini deshpande write article in saptarang