मूर्ती लहान, कृती महान (आश्विनी देशपांडे)

ashwini deshpande
ashwini deshpande

सेफ्टी पिन, झिप, बटण, वेल्क्रो...यांपैकी सगळ्याच किंवा काही बाबींशी आपला संबंध रोज अथवा कधी ना कधी येतोच. या आहेत तशा छोट्याशाच बाबी; पण जेव्हा त्यांची गरज पडते, तेव्हा त्या किती महत्त्वाच्या ठरतात, हे काही वेगळं सांगायला नको. कसा लागला या बाबींचा शोध, त्याविषयी...

बऱ्याच वेळा मोठ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याच्या गरजेमुळे छोट्या; पण महत्त्वाच्या गोष्टींना योग्य तेवढं श्रेय दिलं जात नाही. मात्र, डिझाइन क्षेत्रात "तपशिलात सर्वोच्च शक्ती सामावली आहे' असं मानलं जातं. कधी हा तपशील म्हणजे एक छोटीशी रेघ, एक बिंदू किंवा एक खाच इतकंच असलं तरी त्यात मोठी खासियत दडलेली असू शकते. प्रॉडक्‍ट जास्त उपयुक्त, वेगळं किंवा अर्थपूर्ण बनवण्याची खुबीही त्या तपशिलातून मिळू शकते. अगदी रोज वापरल्या जाणाऱ्या, गरजेच्या; पण साधारणपणे दुर्लक्षित असलेल्या छोट्या वस्तूंच्या डिझाइनकडं पाहिलं तर त्यांचं असामान्य अस्तित्व आणि महत्त्व लक्षात येईल. त्यातल्या काही वस्तू योगायोगानं तयार झाल्या तर काही प्रयत्नपूर्वक.
***

सेफ्टी पिन. तसं पाहता एक छोटी आणि क्षुल्लक वाटणारी वस्तू; पण टाचेत रुतलेला काटा असो, पायजम्याची गायब झालेला नाडी असो किंवा अचानक तुटलेलं बटण असो...अशा वेगवेगळ्या प्रसंगी जेव्हा तिची गरज भासते तेव्हा ती किती महत्त्वाचं काम करून जाते ते सांगायची गरजच नाही. तर आता अगदी स्वस्तात मिळणाऱ्या या वस्तूचा शोध केव्हा, कसा आणि कुणी लावला? सन 1796 मध्ये अमेरिकेत जन्मलेल्या वॉल्टर हंट नावाच्या मेकॅनिकल इंजिनिअरनं सन 1833 मध्ये शिवणयंत्र डिझाईन केलं. सुरवातीचं डिझाईन जरी निर्दोष नसलं तरी कपडे शिवण्याच्या वेगात त्या मशिनमुळे प्रचंड सुधारणा घडू शकली असती; पण वॉल्टर यांना इतर अनेक गोष्टींत रस असल्यामुळे शिवणयंत्राबाबतचं काम मागं पडलं. सन 1846 मध्ये या प्रकल्पाकडं त्यांचं पुन्हा लक्ष गेलं, तेव्हा "शिवणयंत्रांचा कारखाना सुरू कर', असा सल्ला वॉल्टर यांनी त्यांच्या मुलीला दिला; पण "यंत्राच्या वापरामुळे हातानं शिवणकाम करणाऱ्या शेकडो महिला बेरोजगार होतील,' असं तिचं त्या वेळी मत पडलं. त्यामुळे तो उद्योग पुन्हा मागं पडला. नेहमीच काही ना काही नवीन शोधात मग्न असलेल्या वॉल्टर यांना नियमित असं उत्पन्न नव्हतंच. ते कर्जातही बुडालेले असत. सन 1949 मध्ये अशाच एका 15 डॉलर्सच्या कर्जापायी ते हताश झाले होते. नेहमीप्रमाणे काहीतरी प्रयोग, शोध सुरूच होते; पण पैसे कसे फेडावेत ते समजत नव्हतं. हातात एक वायर होती. विचार करता करता नकळत ते वायर वाकवत होते. एका विशिष्ट वेढ्यानंतर वायरमध्ये त्यांना अचानक एक स्प्रिंग जाणवली. वेढ्यांमुळे साध्या, सरळ वायरचा उघड-मीट करता येण्यासारखा चाप तयार झाला होता. यातून स्फूर्ती घेऊन वॉल्टर यांनी रातोरात त्या कल्पनेला पक्कं स्वरूप दिलं आणि लगेच त्याबाबतचं पेटंटही मिळवलं. ते पेटंट "डब्ल्यू. आर. ग्रेस कंपनी'ला केवळ 400 डॉलर्सना विकून त्यांनी 15 डॉलर्सच्या कर्जाची परतफेड केली. पुढं त्या डिझाईनमध्ये थोडी सुधारणा झाली आणि आज वापरात असलेल्या सेफ्टी पिनचा विकास झाला. वॉल्टर हंट यांच्या नावावर फाउंटन पेन, रिपिट फायरिंग गन, बर्फाळ भागात चालणारी बोट, रस्ता झाडणारं यंत्र, खिळे तयार करण्याचं यंत्र असे अनेक शोध आहेत; पण आपल्या शोधांची खरी किंमत न कळल्यामुळे त्यांचं आयुष्य कर्जात आणि कष्टात गेलं.
***

पॅंट्‌स, बॅगा, पर्सेस ज्याशिवाय वापरताच येणार नाहीत त्या झिपर किंवा झिपचं डिझाईन सन 1909 मध्ये गिडियन संडबॅक या स्वीडिश-अमेरिकी डिझायनरनं तयार केलं. उत्तम तंत्रज्ञान आणि फॅक्‍टरी मॅनेजरच्या मुलीशी लग्न अशा दोन कारणांनी संडबॅक यांना "टॅलोन इन्कॉर्पोरेटेड' या कंपनीच्या मुख्य डिझायनरचा दर्जा प्राप्त झालेला होता. टॅलोन कंपनीकडं वेगवेगळ्या प्रकारच्या जुळणी करण्याच्या चापांची माहिती होती. त्यातल्याच एका दातेरी, दोन बाजू एकमेकींत गुंफल्या जाऊ शकणाऱ्या चापावर संशोधन आणि प्रयोग करून संडबॅक यांनी एका इंचात दहा ते बारा दात असलेली जबड्यासारखी दुहेरी पट्टी डिझाईन केली. तिची सुधारित आवृत्ती म्हणजे आजच्या वापरातल्या झिपर्स. नुसत्या झिपचाच नव्हे तर संडबॅक यांनी झिप तयार करणाऱ्या मशिनचाही विकास केला.
***

वरील दोन वस्तूंसारखीच छोटीशी आणि सर्रास वापरात असलेली वस्तू म्हणजे कपड्यांची बटणं. त्यांच्या डिझाईनमागचा इतिहास नेमका नोंदला गेलेला नाही; पण जगातली 60 टक्के बटणं आणि 80 टक्के झिप एकाच जागी तयार होतात. ती जागा म्हणजे चीनमधला यॉंगज्या हा
प्रदेश. तिथल्या "बटण सिटी'मध्ये दरवर्षी तब्बल दीड लाख कोटी बटणं आणि वीस कोटी मीटर झिपच्या पट्ट्या तयार होतात आणि अर्थातच त्या जगभर निर्यात केल्या जातात.
***

आणखी एक छोटा; पण महत्त्वाचा शोध म्हणजे "हूक आणि लूप' या तत्त्वानं एकमेकांवर घट्ट बसणारा पट्टा, जो "वेल्क्रो' या नावानं प्रसिद्ध आहे. सन 1940 च्या दशकात जॉर्ज मेस्ट्राल हा स्विस इंजिनिअर जेव्हा जेव्हा जंगलात फेरफटका मारून यायचा तेव्हा तेव्हा काही झाडांची छोटी काटेरी फळं हमखास त्याच्या कोटाला चिकटलेली त्याला आढळायची. कोटाचं कापड आणि फळांचे काटे यांचा बारकाईनं अभ्यास केल्यावर जॉर्ज यांच्या लक्षात आलं की काटे कापडाच्या विणीत आकड्यासारखे घुसून तिथंच चिकटून राहतात. याच तत्त्वावर जॉर्ज यांनी एकमेकांत रुतून बसतील अशा दोन पट्ट्यांची रचना केली. या कल्पनेच्या सुधारित आवृत्तीचं पेटंट 1955 मध्ये जॉर्ज यांनी मिळवलं. "वेल्वेट' आणि "क्रोशे' हे दोन शब्द एकत्र करून "वेल्क्रो' या ब्रॅंडचा जन्म झाला. आजही हा ब्रॅंड त्याच्या क्षेत्रात अग्रणी आहे आणि नवनवे शोध लावण्यात अग्रेसर आहे. पटकन घालता-काढता येणारे बूट आणि सॅंडल्स यांची कल्पना केवळ "वेल्क्रो'-मुळेच शक्‍य झालेली आहे. या शोधाचे अनेक औद्योगिक उपयोगही आहेतच. वस्तू कितीही लहान असली तरी तिचं कर्तृत्व मोठं आणि दीर्घकालीन असू शकतं याचीच ही उदाहरणं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com