वापरकर्त्याच्या सुविधेलाच प्राधान्य हवं (आश्विनी देशपांडे)

वापरकर्त्याच्या सुविधेलाच प्राधान्य हवं (आश्विनी देशपांडे)

कोणत्याही छोट्या-मोठ्या यांत्रिक-तांत्रिक उपकरणाचं डिझाइन करताना ते उपकरण सर्वसामान्य माणसाला आणीबाणीच्या प्रसंगी विनाअडथळा, सहजपणे वापरता येईल ना, हाच विचार प्राधान्यक्रमांच्या यादीत सर्वोच्च असायला हवा. तशा प्रसंगी संबंधित व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीला अनुसरून या उपकरणाचा आकार, वजन असायला हवं. शिवाय, ते उपकरण नियंत्रित करण्याचे मार्ग बिकट प्रसंगी हाताळण्यास सहज-सोपे आहेत ना याही बाबीचा विचार होणं अत्यावश्‍यक असतं.

‘डिझाइन’ या कार्यप्रक्रियेनं सर्वसामान्यांचं दैनंदिन जगणं सुकर, सुविधापूर्ण होण्यास मदत होऊ शकते, या जाणिवेचा व्यापक दृष्टीनं प्रसार व्हावा, हा या सदराचा मुख्य उद्देश आहे.

एखादी वस्तू अथवा सेवा निवडताना केवळ बाह्य रूपावरूनच त्याबाबतची परीक्षा न केली जाता सोय, उपयुक्तता, योग्यता, पर्यावरण या बाबींचाही विचार व्हावा आणि सजग दृष्टिकोन वाढीस लागावा, अशा विचारप्रक्रियेतून या लेखांचे विषय आणि त्यांत दिलेली उदाहरणं निवडली जातात. वैयक्तिक समस्या मांडण्याचे किंवा त्या सोडवण्याचे व्यक्तिविशिष्ट प्रयत्न हे स्वागतार्ह आहेतच; परंतु ‘डिझाइन’चा हेतू ‘व्यापक उत्तर शोधून ते जास्तीत जास्त ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागू करता येईल, अशी योजना यशस्वीरीत्या करणे’ हा आहे. इथं हा खुलासा करणं मला आवश्‍यक वाटलं.

मुंबईत नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसानं जो हाहाकार माजला त्यावर आणि तो कसा टाळता आला असता यावर सध्या चर्चा सुरू आहेत. ता. २६ जुलै २००५ ते २९ ऑगस्ट २०१७  या १२ वर्षांच्या काळात संकटकालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी काय उपाय शोधले गेले आणि त्यातले किती यशस्वी होऊ शकले, हा संशोधनाचा विषय आहे. मुंबईची लोकसंख्या, बेछूट वेगानं वाढणारं काँक्रिटचं जंगल, रोडावत जाणारे नाले, ओढे, नद्या या सगळ्याचा ऊहापोह आणीबाणीची वेळ येऊन गेल्यावर करण्याऐवजी मोठ्या समस्येचे लहान लहान भाग करून प्रत्येक भागावर उपाय शोधले गेले तर, तसंच डिझाइनच्या विचारप्रणालीनुसार सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यापुढं ठेवून आणि नागरिकांच्या सहभागानं हे उपाय योजले गेले, तर मोठा बदल घडू शकतो.

जर मोठ्या समस्यांशिवाय आपण आपल्या अवतीभवती घडणाऱ्या छोट्या समस्यांकडं लक्ष दिलं, तर त्या सोडवण्याचे जे उपाय उपलब्ध आहेत, त्यांची खुबी लक्षात येईल.
संकटात किंवा अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला वापरण्यासाठी जी उपकरणं तयार केली जातात, ती खास विचार करूनच डिझाइन केली जावीत. कारण, त्या क्षणी सामान्य आकलनशक्ती किंवा कार्यक्षमता उपलब्ध नसण्याचीच शक्‍यता जास्त. अमेरिकी माहितीशास्त्रज्ञ स्टीव्ह क्रुग यांच्या प्रसिद्ध पुस्तकाचं नाव आहे Don`t Make Me Think. विचार करायला लावू नका. आणीबाणीच्या वेळी वापरायच्या उपकरणांचं डिझाइन करण्याविषयीचं सार या शीर्षकातच आहे.

आजकाल मोठ्या इमारती, सार्वजनिक सेवा देणाऱ्या जागा, वाहनं या सगळ्या ठिकाणी फायर एक्‍स्टिंग्विशर अर्थात आग विझविणारी उपकरणं ठेवणं अनिवार्य आहे. हे उपकरण त्या त्या जागेच्या क्षेत्रफळानुसार लहान, मोठं असावं आणि गरजेनुसार, म्हणजे आग कशा प्रकारची असू शकते आणि तिची व्याप्ती किती असू शकते, यानुसार नेमक्‍या कोणत्या प्रकारचं असावं, हे ठरवलं जातं. आग विझविण्याचे रासायनिक गुणधर्म असलेले पदार्थ या उपकरणांच्या आत विशिष्ट दबावाखाली साठवलेले असतात व चाप उघडल्यास ते सक्रिय होतील, अशी योजना असते. रसायनशास्त्र आणि अभियांत्रिकी-कौशल्य यांची सांगड घालून या उपकरणाची कार्यशीलता पक्की करण्यात यश आलेलं आहे. मात्र, शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची कडी म्हणजे, जी व्यक्ती आणीबाणीच्या प्रसंगी हे उपकरण वापरून आग विझविण्याचा प्रयत्न करेल, त्या व्यक्तीला त्या वेळच्या गांभीर्यातही ते सहजपणे चालवता येणं ही होय. त्या व्यक्तीच्या त्या प्रसंगीच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीला अनुसरून या उपकरणाचा आकार, वजन किंवा नियंत्रणं आहेत का, हा प्रश्न यासंदर्भात उपस्थित होतो.

वरकरणी सगळेच फायर एक्‍स्टिंग्विशर सारखेच दिसत असले, तरी त्यांची खरी परीक्षा म्हणजे, कुठलाही पूर्वानुभव नसताना, सूचना न वाचता, अवसान गळालेल्या स्थितीत, आग समोर दिसत असलेल्या क्षणी एक सामान्य व्यक्ती तो यशस्वीरीत्या वापरू शकेल का? यासाठी त्या क्षणाच्या, त्या प्रसंगाच्या अनुषंगानं नेमकं काय घडू शकेल, याचा सर्वांगीण विचार करून, वजन, हाताचा आकार आणि शक्ती यांची क्षमता सहानुभूतिपूर्वक समजून-उमजून घेऊन या उपकरणाचं डिझाइन केलेलं असणं आवश्‍यक आहे. विमानातली ‘इमर्जन्सी एक्‍झिट’ म्हणजेच संकटकाळी बाहेर पडण्याचा दरवाजा हाही एक विचारपूर्वक डिझाइन केलेला असण्याचा विषय. विमानोड्डाणादरम्यान येणाऱ्या आपत्ती वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. तांत्रिक बिघाडानं आग लागण्यापासून ते दहशतवाद्यांनी केलेल्या अपहरणापर्यंत कोणत्याही कारणांनी हा संकटकाळी उघडण्याचा दरवाजा हाताळण्याची गरज एखाद्यावर येऊ शकते. प्रशिक्षण किंवा सराव नसताना, मानसिक दबावाखाली, इतर प्रवाशांमध्ये घबराट पसरलेली असताना, कदाचित समुद्रावर विमान लॅंड होत असताना, सूचनेनुसार ऑक्‍सिजन मास्क वा जीवरक्षक जॅकेट घालून एखाद्या प्रवाशावर जर हा दरवाजा उघडण्याची वेळ आली, तर तो सुरळीतपणे उघडावा यासाठी सूचना वाचण्याची अथवा डावा/उजवा विचार न करता ते थेट उघडता यावं, यासाठी हे डिझाइन काळजीपूर्वक केलेलं असणं अत्यावश्‍यकच.

विमानाच्या एक्‍झिटचं उदाहरण गुंतागुंतीचं आणि तांत्रिकदृष्ट्या भक्कम पायावर बांधलेल्या उपकरणांत बसेल; पण ज्या वस्तू किंवा सेवा छोट्या समस्यांवर उपाय म्हणून वापरल्या जातात, त्यांचंही डिझाइन वापरणाऱ्या व्यक्तीच्या त्या वेळच्या शारीरिक व मानसिक परिस्थितीनुसार केलं जाणं गरजेचंच आहे. अगदी छोटं पण महत्त्वाचं उदाहरण म्हणजे, औषधी चिकटपट्टी किंवा Bandaid. जखम झालेली असताना, कदाचित थोडा रक्तस्राव झाल्यावर, तो भाग दुखत असताना सगळ्यात सोपा प्रथमोपचार म्हणून बॅंडएडचा वापर जगभर होतो. सन १९२० मध्ये ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ कंपनीत काम करणाऱ्या अर्ल डिक्‍सन यांनी त्यांच्या पत्नीला स्वयंपाक करताना वारंवार होणाऱ्या जखमांवर उपाय म्हणून साध्या चिकटपट्टीला गॉझचे तुकडे लावण्याचा प्रयोग केला होता. जेम्सवूड जॉन्सन या त्यांच्या बॉसला ही कल्पना पसंत पडली.

पुढच्या काही वर्षांत पट्टीचा आकार, रंग, गॉझचा आकार, त्यावरचा मलम या गोष्टींवर गरजेनुसार संशोधन करून सन १९२४ मध्ये बॅंडएडचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आलं. आज सुमारे १०० वर्षांनंतरही हा प्रथमोपचार तेवढाच उपयुक्त आणि म्हणून लोकप्रियही आहे. या आणि इतरही उदाहरणांत एक लक्षात घ्यायचं, की प्रत्येक वस्तू, उपकरण किंवा सेवा ही उत्तम प्रकारे ‘डिझाइन’ करण्यात प्रशिक्षित ‘डिझायनर’ सहभागी असेलच असं नाही. मात्र, डिझाइनची विचारप्रणाली वापरून म्हणजेच वापरणाऱ्या व्यक्तीचा चौफेर विचार करून तयार झालेला, व्यापक प्रमाणावर उपलब्ध होऊ शकणारा उपाय असेल, तर त्यालाही उत्तम डिझाइनच म्हणता येईल.

(टीप : सर्व छायाचित्रं क्रिएटिव्ह कॉमन परवान्यानुसार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com