रोजच साजरा करू या बालदिन (आश्विनी देशपांडे)

रोजच साजरा करू या बालदिन (आश्विनी देशपांडे)

आपण मुलांना लाडात वाढवतो अशी समजूत असलेल्या घरांमध्ये देवघर किंवा बारसाठी जागा योजली जाते; पण मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करून खेळण्याची जागा मात्र ठेवलेली नसते. मासिकातल्या चित्रांप्रमाणे रंगीबेरंगी खोली तयार केली जाते; पण ती मुलांच्या विकासाच्या दृष्टीनं कितपत उपयुक्त आहे, याचा विचार कमीच दिसतो. येत्या आठवड्यात साजऱ्या होणाऱ्या बालदिनानिमित्त  (१४ नोव्हेंबर) आसपासचं निरीक्षण करू या आणि मुलांसाठी योग्य तेच निर्णय घेण्याचा निश्‍चय करू या.

शाळकरी मुलं स्वतःच्या समस्या कशा प्रकारे सोडवतात ते Design For Change च्या माध्यमातून गेल्या वेळच्या लेखात स्पष्ट झालं. तोच विषय दुसऱ्या बाजूनं पाहिला तर असं लक्षात येतं, की खास लहान मुलांच्या गरजा शोधून, समजून घेऊन त्यांच्यासाठी कशा प्रकारचं डिझाइन योजलं जावं, यावर अगदी कमी प्रमाणात काम होतंय. ‘लहान मुलं म्हणजे खेळणी’ असं समीकरण पुढं येतं. बाजारात नानाविध प्रकारची खेळणी उपलब्ध असल्यामुळं असं वाटणं साहजिकच आहे, की त्यांच्यासाठी खूप काही डिझाइन केलं जातं. खेळण्यांद्वारे शारीरिक आणि मानसिक विकास हा जरूर होऊ शकतो; पण बाजारातली किती खेळणी या विकासावर लक्ष केंद्रित करून, वैज्ञानिक आधार घेऊन बनवलेली असतात हा एक स्वतंत्रच विषय होईल. त्यावर पुढं कधीतरी. या लेखात खेळण्यांव्यतिरिक्त वस्तू किंवा सेवा यांची चर्चा करू या.
रोजच्या वापरातल्या असंख्य उपयुक्त वस्तू लहान मुलांच्या वयानुसार क्षमतेप्रमाणे किंवा त्यांच्या वैविध्यपूर्ण भावविश्वाप्रमाणे योजलेल्या आहेत, असं वाटत नाही.
लहान मुलांची चौकस बुद्धी, संवेदनशील त्वचा, सतत विकसित होणारी अंगकाठी, मर्यादित लक्ष अशा अनेक गोष्टींचा विचार करून डिझाइन केल्या जाणाऱ्या वस्तू, पुस्तकं, कपडे, खेळणी सापडतच नाहीत. इतकंच नव्हे तर, ती शोधली किंवा मागितलीही जात नाहीत. असं म्हणतात की बाजारात मागणी असेल तरच पुरवठा करण्याचे प्रयत्न केले जातात. जर भावी पिढीचा सर्वांगीण विकास हा खुद्द पालकांचा किंवा शिक्षकांचा केंद्रबिंदू नसेल तर मागणीची शक्‍यताच नाही. वयोगटानुसार मुलांच्या क्षमता, भावना, कुतूहल आणि वर्तणूक बदलत जाते. या बदलत्या गरजांनुसार काही ढोबळ गट केले, तर नेमक्‍या गरजा आणि मर्यादा लक्षात घेऊन डिझाइन करणं शक्‍य होतं.

बहुतेक चित्र असं आहे की मोठ्या वयाच्या, संपूर्ण विकसित व्यक्तीसाठी जी वस्तू तयार करण्यात येते, तीच केवळ आकार लहान करून, कधी रंगीबेरंगी करून, तर कधी एखादं कार्टून लावून ‘मुलांसाठी’ म्हणून विकली जाते-विकत घेतली जाते. ‘केवळ बाह्यरूप मुलांना आकर्षित करेल म्हणून ती वस्तू योग्य’ ही मोठी गैरसमजूत दूर व्हायला हवी. वयानुसार त्यांच्या बोटांच्या हालचाली आणि एकंदरीत नियंत्रण यांच्यात सुधारणा होत असते.

त्यानुसार वस्तूंची पकड, मटेरिअल, पोत यांचा विचार व्हायला हवा. उदाहरणार्थ ः टूथब्रश, बूट-चपला, कपडे, पेन्सिल बॉक्‍स, डबा, वॉटर बॉटल, खेळणी, वह्या, पुस्तकं, फर्निचर, बटणं, पायऱ्या, दिवे इत्यादी त्यांच्या गरजेनुसार आणि सोईप्रमाणे निवडलं गेलं पाहिजे.

लहान मुलांच्या मानसिक व शारीरिक गरजा आणि विकास यांवर अवलंबून काही सोपी तत्त्वं डिझाइन करताना, तसंच मुलांसाठी दैनंदिन वापरातल्या वस्तू खरेदी करताना लक्षात घेतली पाहिजेत.

१) योग्य प्रमाणात प्रोत्साहन
खेळणी किंवा वस्तू वापरल्यावर आपण काहीतरी नवीन साध्य करू शकलो, असं मुलांना वाटलं तर त्यांची त्या वस्तूतली गोडी कायम रहाते. साध्या छोट्या कृतींतून एखादी माहिती, शब्द, रंग, निसर्ग, विज्ञान यांबद्दलची अनुभूती मुलांना मिळाली तर ती प्रत्यक्ष बक्षिसापेक्षा जास्त महत्त्वाची ठरते. वयानुसार ही अनुभूती प्रमाणित करता येते.

२) अनपेक्षित किंवा आश्‍चर्यकारक अनुभव
त्याच त्याच गोष्टींचा लहान मुलांना लवकर कंटाळा येऊ शकतो. कुठल्याही वस्तूवरून किंवा कृतीवरून त्यांचं मन सहजपणे उडू शकतं. सातत्य, शिस्त या गोष्टी मोठ्यांसाठी ठीक आहेत; पण मुलांचं कुतूहल जागृत ठेवण्यासाठी काहीतरी अनपेक्षित; पण आनंददायी घडवून आणणं आवश्‍यक असतं. रोज तीच गोष्ट वेगवेगळ्या वळणांनी सांगणं हा याचाच भाग. अशा अनुभवांमुळं लहान मुलांची कल्पनाशक्ती विकसित होते.

३) नैसर्गिक प्रवृत्तीनुसार समज आणि शोध
वैज्ञानिक किंवा शैक्षणिक खेळणी किंवा पुस्तकं जर उपदेशपर वाटायला लागली, तर मुलांचा त्यातला रस संपतो. तेव्हा जरी शिकवण्यासाठी तयार केली, तरी ती वस्तू मुलांच्यातल्या उपजत शोध घेण्याच्या वृत्तीप्रमाणे योजलेली असावी. लांबलचक सूचना, गुंतागुंतीची रचना या गोष्टी वाढत्या वयानुसार स्वीकारल्या जातात; पण त्या वयाला साजेशा असायला हव्यात.

४) सुरक्षित आणि आरामदायक
वस्तू दिसायला कितीही आकर्षक आणि हवीहवीशी वाटली, तरीही मुलांसाठी निवड करताना त्यांच्या क्षमतेचा, हाता-बोटांच्या आकाराचा, विकसित होणाऱ्या यष्टीचा प्रथम विचार झाला पाहिजे. उंच टाचांचे बूट, परीसारखा दिसणारा; पण चरचरीत, कृत्रिम धाग्यांचा ड्रेस, केसांना लावण्याचं हानिकारक जेल, तीक्ष्ण कोपरे असलेला भूमितीचा बॉक्‍स, अखाद्य रंग घातलेलं लंच बॉक्‍स, कमी दर्जाच्या प्लास्टिकच्या वॉटरबॉटल्स, चुकून गिळले जातील इतके लहान भाग असलेली खेळणी, पक्की न शिवलेली बटणं अशा अनेक प्रकारे मुलांना धोकादायक असे निर्णय त्यांच्या आरामदायकतेचा, सुरक्षिततेचा विचार न करता घेतले जातात. याचे दुष्परिणाम मुलांच्या वाढीवरही दिसून येतात.

५) प्रामाणिक आणि सहनशील
एखाद्या वस्तूचा अनुभव आनंददायक करण्यासाठी त्याची योजना थोडीफार सैलसर असावी. वापरताना चूक झाली तर लगेच तुटून, मोडून ती निकामी होत असेल, तर लहान मुलांना त्या वस्तूची भीती बसू शकते. त्यांच्यात असलेल्या प्रायोगिक प्रवृत्तीला या भीतीमुळं खीळ बसू शकते. त्यामुळं लहान मुलांसाठी तयार झालेल्या वस्तू कमकुवत नसाव्यात. त्यांची मटेरिअल्स, नियंत्रणं जास्त सहनशील असावीत. ही बाब कॉम्पुटर गेम्स, ॲप्स यांच्यासंदर्भातही लक्षणीय आहे. थोड्या चुकांना वाव ठेवला जावा.

आपण मुलांना लाडात वाढवतो अशी समजूत असलेल्या घरांमध्ये देवघर किंवा बारसाठी जागा योजली जाते; पण मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करून खेळण्याची जागा मात्र ठेवलेली नसते. मासिकातल्या चित्रांप्रमाणे रंगीबेरंगी खोली तयार केली जाते; पण ती मुलांच्या विकासाच्या दृष्टीनं कितपत उपयुक्त आहे, याचा विचार कमीच दिसतो. येत्या आठवड्यात साजऱ्या होणाऱ्या बालदिनानिमित्त  (१४ नोव्हेंबर) आसपासचं निरीक्षण करू या आणि मुलांसाठी योग्य तेच निर्णय घेण्याचा निश्‍चय करू या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com